- दुर्गा भागवत
वासूनाका हा श्री. भाऊ पाध्ये यांच्या नऊ गोष्टींचा संग्रह आहे. मुंबईच्या कुठल्याही नाक्यावरच्या बकालपणाचा अतितीव्र उपहासाबरोबरच लेखकाला सहसा दुर्लभ असलेल्या निर्मम करुणेपोटी उद्भवलेल्या कथा वाचताना अंगावर शहारे येतात. या जगात जन्मतात, वाढतात, प्रजनन करतात आणि नंतर मृत्यूमुळे घाणीच्या प्रवाहातून कुठेतरी अज्ञातात फेकले जातात, अशा क्षीण व क्रूर, पाशवी वासनेने हतबल व हतबुद्ध झालेल्या जिवांच्या या कथा आहेत. मोठमोठ्या शहरात अनेक मोठमोठ्या सुंदर गोष्टी जन्म घेतात; पण तिथेच ठायी ठायी अशी डबकी असतात की त्यांची नैतिक दुर्गंधी समग्र नागर जीवनाला सदैव व्यापून टाकते. आतून लागलेली ही क्षुद्र जीवजंतूंची कीड कधीही कशानेही मारत नाही. इथे अब्रू फिरली तर लक्तरातच फिरते. मवालीगिरीच्या बरबटात ती अखंड वेडेचार करीत भटकत असते. वासनांच्या विचकट बुजबुजाटातून आपली सुटका होणार नाही हे तिला माहीत असते; आणि देव, धर्म, संस्कृती यांनी तर कायमची आपणाकडे पाठ फिरवलीच आहे. पंसाध्ये गृहस्थीपणाचे कामसुखही आपल्याला वंचित झालेले आहे. हे त्या अब्रूला कळते. ती आक्रंदते, सूडाने पेटते, फणकारते, फुत्कारते, पण हार होवो की जित अखेर ती अगतिक होऊन पडते; आपण मरणार नाही या जाणीवेच्या पोटी उद्भवलेली ती भयाण अगतिकता असते. आणि मग अनिर्बंध स्त्री-पुरुषसंबंधांभोवती वेडा पिंगा घालण्यापलिकडे तिला काही करण्यासारखे उरत नाही.
वास्तविक पहाता या कथांत एकच मूळ कल्पना आहे. ती म्हणजे पोरवयातच बिघडलेल्या माणसांच्या अतृप्त लैंगिक वासनेची. पोरसवदेपणाचा सारा निरागसपणा कधीच नाहीसा झालेला असतो. पण पिसाटपणे कशामागे तरी आसुसून लागण्याचा भाबडेपणा यातल्या प्रत्येक पात्रात आहे. वासनेच्या भुकेचे बळी आहेत सारे. वखवखलेले, मत्सरी . मूर्ख असले तरी त्यांना बरेवाईटातला फरक कळतो. लैंगिक वासना उत्तान असल्या तरी त्यांना अस्सल कमअस्सल बरोबर समजते. तसे पाहिले तर आपापल्यापरीने प्रत्येकच पात्र धूर्तपणे वागू पहाते. सदैव दुस-यावर मात करण्यास धडपडते, पण त्यांच्या कुणाच्याही धडपडीला काही यश येत नाही. जिथे यश येते तिथेच उदंड वैताग माजतो. वासना व वैताग यांची सांगड आडदांड, व्यसनी, बेशिस्त, बेजबाबदार पुरुषांच्या पात्रात तर बेमालूम पडली आहे. हे सारे पुरुष उंडगे म्हणजेच मनाचे दुबळे आहेत, आणि वरकड उद्दामपणा आणि दुस-याच्या अब्रुनुकसानीचे सवंग शस्त्र परजून आत्मसंरक्षण करण्याखेरीज त्यांना गत्यंतरच नसते. अर्थात ही दोन्ही हत्यारे वापरण्यास टोळीचे जीवन हवेच. पण ही टोळी धाडसी दरवडेखोरांची संघटित उद्दिष्ट असलेली टोळी नव्हे, तर नुसते टोळके आहे. हे लोक चोरबीर नाहीत, राजकीय आकांक्षा असलेले गल्लोगल्लीतले गुंड नाहीत; ते दारुडे, व्यसनी व बीभत्स चलनी भाषा बोलणारे आहेत. टिर्रेबाजी हेच त्यांचे लोकांना जरब बसवण्याचे तंत्र आहे. आणि जमावाने केलेली टिर्रेबाजी भीरू लोकांच्या बाबतीत किती घातक होते याचे चित्रण या कथांत केलेले आहे. अशा कुठलीही आंकाक्षा नसलेल्या पोकळ माणसांची पोकळ घमेंड फक्त चरबट, गोब-या, राठ भाषेत व्यतीत होते. आणि तेच हे बरळ भाषेचे स्वरूप पोकळ व्यक्त्तित्वातून एकत्र होऊन सामाजिक ठाण मांडून बसते. ते ठाण म्हणजेच हा वासूनाका. ते सामाजिक एकत्रीकरण म्हणजेच हे अत्यंत शिथिलतेवर, पण सदाच टोळक्याच्या स्वरूपात आढळणारे, पोक्याच्या शत्रू-मित्र मंडळ. या टोळक्यात आज शत्रू तो उद्या मित्र व आजचा मित्र तो उद्याचा शत्रू होतो. आणि नवल हे की, या मर्यादाही फार पुसट असतात. फिरून रागलोभ एकत्र होऊन या व्यक्ती टोळक्याच्या परिघातच अखंड वावरतात.
या कथांचा परीघ वासूनाक्याचा. म्हणजे हमरस्त्यावरील अड्ड्याचा, म्हणजेच पुरुषपात्रांच्या निरर्गल संचाराचा. हा संचार शारीरिक तर आहेच, पण मानसिकदेखील आहे. नव्हे, अधिक मानसिकच आहे. वासनांच्या डोंबात, शरीर दृष्ट्या मामू, पोक्या, चम्या, टण्या केव्हाच जळून खाक झालेले आहेत. पण मनाची धुगधुगी मात्र त्यांच्यात आहे. आणि हीच धुगधुगी लेखकाने या पात्रांच्या जिवंतकळेच्या चित्रणासाठी वापरलेली आहे. धुगधुगी म्हटली की कुठेतरी आशेचा ताणतणाव आलाच. वासनाच मुळी आशारूप आहे. पण त्या वाह्यातांची आशा, त्यांच्या माणुसकीची जिवंत खूण कशात आहे? द्रव्यात नाही, भोगात नाही. भोग फक्त त्यांचे शरीर भोगते आहे आणि रोज अनावर चिडीने आदल्या दिवशीच्या भोगांचा सूड दुस-या दिवशी दुप्पट होऊन मिळवण्याचा आटापिटा करते आहे. भोग ही ह्यांची गर्ता आहे. तिथे आनंद नाही, प्रेम नाही, शांती नाही. पण ह्या टग्यांच्या रितेपणात जो हिरवा तळ आहे, त्याच्यातून त्यांनी एक गंधर्वसृष्टी निर्माण केलेली आहे. या गंधर्वसृष्टीत फक्त एकच गोष्ट आहे : स्त्री. तरुण अप्सरेसमान स्त्री, पतिव्रता स्त्री. यांच्यासारख्या बाहेरख्याली माणसाशी ती कुठलाच संबंध ठेवीत नाही. ती स्वच्छ असते. अंतरबाह्य स्वच्छ. बोलते गोड. यांच्याशीही. रहाते छानशा बाहुलीच्या घरात. रमते फक्त पतीत. अशीही चिरतरुण गृहिणी-मोहिनी त्या टोळक्याच्या सामुदायिक मनात स्वप्नाप्रमाणे वागत असते. पुराणातल्या कथेप्रमाणे या कथेला हे सारे गणंग अगदी हिरकणीप्रमाणे जपतात. ते एक त्यांचे पार्थिव पूजास्थान असते. सामाजिक नीतीच्या मूल्याचे प्रतीक म्हणजे पतिव्रता बायको. ती आपली नव्हे तर दुस-या कोणाची तरी, असा तिरपागडा नीतीचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. नैतिक पावित्र्याची भावना आली की, मग तिचा पुरस्कारही आलाच. मन:स्वर्गातली पतिव्रता नार मग साहजिकच हे अवतीभोवती पंचक्रोशीत शोधतात. प्रत्येक तरुणीची छेड काढून आपापल्यापरीने अचकटविचकट चाळे करून तिची परीक्षा घेतात. आणि सगळ्या वासूनाक्यावरच्या पोरी ते निकालात काढतात. नुकताच वयात आलेला पोरगा जसा स्त्रीभोवती मनाने पिंगा घालतो तसेच हे कायम घालीत रहातात. त्यांचे मानसिक वय पौगंडदशेपलिकडे पोचतच नाही मुळी. आणि या कायम पौगंडावस्थेमुळे अशी स्त्री दिसली की आपला विश्वास तिच्यावर टाकून ते तिला मोठ्या अदबीने वागवतात. बायजी ही पदवीधर तरुणी ही अशीच आदर्श नारी त्यांच्या मते होती. आणि जेव्हा बायजी विधवा झाल्यानंतर चळल्याचे त्यांना कळते तेव्हा त्यांच्यामधले सारे नैतिक स्वप्नाचे अवसान गळून जाते. एखाद्या मूर्तिभंजकाप्रमाणे ते मग तिच्यावरच तुटून पडतात; हा चेव त्यांच्यात होता. कारण स्त्री-पुरुषांच्या सर्वांगपूर्ण मीलनात जीवनाचे परम सार्थक आहे असा त्यांचा भोळा भाव होता. हे सारे टारगट वाह्यात बायकांच्या बाबतीतच लालसा धरणारे होते; पतिव्रतेला भिणारे होते. ते उन्मार्गी असले तरी वाममार्गी नव्हते. समसंभोगी नव्हते, दणकट पौरुषाची ग्वाही म्हणजेच पतिव्रता सुंदरीचे इमान असे गणित त्यांच्या मनात भिनलेले होते. आणि त्यांच्या वासना मोकाट व अतिरिक्त असल्या तरी त्या विकृत नव्हत्या असे या संदर्भात म्हणता येते. स्त्रीत्व हे त्यांच्या लैंगिक जाणिवेचे एकमेव प्रतीक आहे; आणि तारुण्य, सौंदर्य, चारित्र्य व प्रेमळपणा या चार गुणांचा साज त्यांनी आपल्या मनाने या पूज्य वस्तूभोवती चढवलेला आहे. ही वस्तू पूज्य आहे, कारण अचेतन पुरुषमानसात स्त्रीत्व हे एक अनाकलनीय रहस्यमय रूप घेऊन वावरत असते. पूजा, प्रेम व द्वेष या तीन भावनांनी ह्या रहस्याचा वेध घेण्याचा प्रयत्न पुरुष करतात. स्त्रीत्व म्हणजे निर्मितीचे गूढ, सा-या ब-यावाईटाचे शारीरिक व मानसिक जनन स्त्रीत अभिप्रेत असते; आणि म्हणूनच स्त्रीत्वाची मनधरणी होते व अति दारुण निंदाही होते. विशेषत: जे जग केवळ पुरुषांचेच आहे, तिथे पूजा व तिरस्कार या दोनच भावना मुख्यत्वे आढळतात. ग्रीक संस्कृती पूर्णपुरुषी असल्यामुळे तिथे स्त्रीला अतीव गौण स्थान प्राप्त होऊन पुरुषच पुरुषाचा आराध्य विषय बनला आणि समसंभोगाला त्यांच्या तत्त्वज्ञान, साहित्य व कलांत एक वेगळाच आकार प्राप्त झाला. पण वासूनाक्यावरचे टोळके तसे भारतीय सनातनी परंपरेचे आहे. माता व प्रेयसी या दोन रूपांत ते स्त्रीला मानतात. पोक्या देखील आपल्या आईचा उल्लेख करतो तेव्हा ती म्हणेल ते ते मंजूर करतो. ककीशी प्रेमाचे चाळे केले तरी लग्न आईने ठरवलेल्या मुलीशीच करतो. आणि बायकोबद्दल ब्रही काढत नाही. ती त्याची अगदी खाजगी गोष्ट आहे. वासूनाक्यावर तिची चर्चा मुलीच होत नाही. अर्थात वासूनाक्यावरच्या या बेताल पुरुषांनाही स्त्रीत्वाच्या अदीम रहस्याचे अनामिक भय वाटत होते; भयाची भावना जी जी बीभत्स रूपे घेऊन, जितक्या राठ व पुनरावृत्तीच्या भाषेत प्रकट होते तितकी कुठलीही भावना प्रकट होत नाही. आणि त्यात भीतीचा विषय लैंगिक असला म्हणजे बोलायलाच नको. मग ती विकृतीच होते. वासूनाक्यावरच्या कथांत जी विकृती चित्रित केलेली आहे ती या भीतीची आहे.
इष्क या गोष्टीत मामू या वालपाखाडीतल्या दादाचे चित्र आहे. बाकीच्या गोष्टीत मामू अधिकारी आहे. मवाल्यांच्या शिस्तीत व नीतीत कुठे एवढासा फेरफार झाला तरी त्याला खपत नाही. बायकांच्या बाबतीत देखील त्याची मिजास और आहे. हा या टोळक्याचा नायक आहे म्हणा ना! पण इष्क या कथेत मामूचे खरोखरच जेव्हा भानूवर प्रेम बसते आणि ती छचोर मुलगी पुढे लग्न करून त्याच्या तोंडाला पाने पुसते, तेव्हा काही मामू तिचे पूर्वचरित्र सांगून तिचा संसार उधळीत नाही; उलट तो या प्रेमभंगाने घायाळ होऊन अक्षरश: वेडा होतो. वेडातही ती दिसली तेव्हा तोंड खाली घालून तिची ओळखही न देता तो निघून जातो. मामूच्या या वर्तनाचे आश्चर्य भानूलाही वाटते. तिला ते एक प्रकारे लागते. व त्याचे वेडे खोटे आहे हे ती शाबीत करू लागते. आपल्यामुळे त्याला वेड लागले या वंचनेच्या आरोपासाठी भानू जी केविलवाणी धडपड करते ती धडपड मामूच्या वेडाहूनही अधिक बापुडवाणी आहे.
आवाज या कथेत बदफैली बाबल आपल्या दुसरेपणाच्या बायकोचा आपल्या मुलांशी संबंध आहे असा संशय घेऊन घरादाराला हैराण करतो. पुढे त्याची बायको वैतागून घर सोडते व कुंटणखाना करते. पोक्या या कुंटणखाण्यात तिला भेटल्यावर ती मनीचे शाली भडभड बोलते. नव-याने रखेलीसमोर आपल्याला 'आई' म्हटले हेच तिचे महान दु:ख असते.
मेहमान या कथेतला बावळट टण्या हा वासूनाक्याच्या मवालेगिरीचा सर्वात मोठा बळी आहे. बापा घरून भानगड करून तो पळतो व पोक्याचा आश्रय घेतो. एकामागून भानगडी तो करतो व प्रत्येक भानगड त्याच्या अंगाशी येते. मवालीगिरीचे तंत्रमंत्र त्याला अवगत नसतात. त्याच्या निमित्ताने मामू वगैरे सर्वच जण त्याला आपल्या नीतीचे व शहाणपणाचे घोट पाजतात. शेवटी मामूने त्या भोळ्या पोरावर आपल्याच पोरीच्या नादात त्याला गुंगवून त्याचा फजिता केला, तेव्हा बायकांच्याबद्दल मनोमनी संशय ठेवून त्यांच्याशी खेळ करण्यात काहीसे यश संपादन केलेल्या बाकीच्या मंडळीहून अलग पडतो. तनामनानेच पागल होतो. बाकीचे तरतात. शेवटी हे ओळखून टण्या वैतागतो व या मवाल्यांची सांगत कायमची सोडून बापाकडे परत जातो. या टोळक्याच्या मवालीगिरीवरचे सर्वात यशस्वी टीकाभाष्य याच कथेत आहे. ही कथा वाचल्यावर लेखकाची शैली व कथावस्तू यातला एकजीवपणा लक्षात येतो.
***
(दुर्गाबाईंच्या 'आस्वाद आणि आक्षेप' या 'डिंपल पब्लिकेशन्स'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून.)
पूर्वप्रसिद्धी: सत्यकथा, मार्च १९६६.
No comments:
Post a Comment