Monday, July 19, 2010

'वासूनाक्या'बद्दल

- विजय तेंडुलकर

('वासूनाका' प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू झालेल्या वादादरम्यान तेंडुलकरांनी 'वासूनाका'बद्दल 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये लिहिलेला हा लेख. 'वासूनाका सांगोपांग' ह्या डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या आणि वसंत शिरवाडकरांनी संपादित केलेल्या पुस्तकातून हा मजकूर घेतला आहे. तिथे ह्या लेखाचं शीर्षक दिलेलं नाही, म्हणून नुसतं ''वासूनाक्या'बद्दल' असं म्हणून ठेवलंय.)

१९६१च्या एका वाङ्मयीन आणि नव्याच दिवाळी अंकात धमाल नावाची एक कथा प्रसिद्ध झाली; आणि साहित्यात रस घेणाऱ्या, साहित्याविषयी आस्था असणाऱ्या अनेकांना तिने धक्का दिला, सुन्न केले आणि मग विचार करायला लावले.
या कथेने धक्का दिला तो तिच्या विषयापेक्षा तिच्या शैलीने. नेहमीहून पार वेगळ्या, विक्षिप्त आणि सद्भिरुचीच्या रूढ व्याख्येला पूर्णतया सोडून अशा या त्रेपन्न टिकल्यांच्या भाषेने मी मी म्हणणाऱ्या वाचकांना गोंधळवून टाकले. अनेक चुकीचे, अशुद्ध इंग्रजी वाक्प्रचार, पूर्णतया अपरिचित असे सूचक मराठी शब्द, शब्दप्रयोग आणि काही वेळा सरळ सरळ गचिच्छ शब्द आणि वाक्ये, यांनी भरलेल्या या भाषेचे त्या आधीच्या कोणत्याही ललितकृतीतल्या कोणत्याही भाषाशैलीशी नखाएवढेही साम्य नव्हते.
ही भाषा आली होती वासूनाक्यावरून. वासूनाके मुंबईमध्ये जागोजाग होते. त्यावरचे डाफ्या, पोक्या, मामू येताजाता सभ्य आणि सुसंस्कृत मराठी वाचकाने ऐकले-बघितलेही असतील. परंतु ही मनस्वी संकोच आणणारी भाषाशैली आणि ही माणसे वाङ्मयाच्या प्रतिष्ठित पीठावर धमालच्या निमित्ताने प्रथमच येऊन बसत होती.
एवढ्या एका कथेपुरतेच हे थांबेल अशी अपेक्षाही खोटी ठरली आणि पुढल्याच वर्षीच्या आणखी एका दिवाळी अंकात याच लेखकाची, अशाच विषयावरची, वासूनाक्याच्याच विलक्षण विश्वातली आणि तशाच चमत्कारिक, असभ्य परंतु अत्यंत बोलक्या शैलीतली इष्क ही कथा प्रसिद्ध झाली आणि हा वासूनाका एखाददुसऱ्या गोष्टीपुरता मराठी वाङ्मयात फिरकण्यासाठी आला नसून याचे आक्रमण अधिक टिकाऊ आहे हे जागरूक जाणकारांच्या ध्यानी आले; आणि मराठी वाङ्मयात येऊ घातलेल्या या नव्या प्रवाहाची इष्टानिष्टता, त्याचे कलात्मक मूल्यमापन ते मनाशी ठरवू लागले. या प्रवाहाची अपरिहार्यता तर गृहीतच होती.
वासूनाका हे भाऊ पाध्यांचे नवे पुस्तक त्या पहिल्या-वहिल्या दोन कथांची अपरिहार्य परिणती म्हटली पाहिजे. एकाच विषयावरच्या, एकाच जगाशी निगडित, त्याच त्या प्रमुख व्यक्तिरेखांतून उलगडणाऱ्या, एकाच शैलीच्या या अनेक कथा आहेत. या सामायिक भागांमुळे त्यांना कादंबरीसदृश स्वरूपही आले आहे. कादंबरीला लागते ते सलग, पूर्वनियोजित उलगडते कथानक यांना नाही, एवढेच.
या कथांतल्या वासूनाकानामक जगाविषयी तेथल्याच भाषेत सांगायचे म्हणजेः
उन्हे उतरली म्हणजे आमची कंपनी वुलन पँटस् चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. दुसरा धंदाच नव्हता. क्रिकेटचे अंग नव्हते की आर.एस.एस.मध्ये जाऊन दहिने रुख-बाए रुख करायला आम्ही भट नव्हतो. एस्.एस्.सीच्या कोचिंग क्लासेसमध्ये हल्ली पोरी फार येतात. त्यांच्यावर पत मारावी, तर आमच्य कंपनीमध्ये एक मी सोडून; दुसऱ्या कोणाचेही हात एस.एस.सी.ला पोहोचले नव्हते. शिकणे जमतच असे कोणाला! शिकून तरी काय उपयोग? माणूस नोकरीच करतो आणि वुलन पँटस् शिवतो. आमच्या बापांनी आम्हाला वुलन पँटस् शिवून ठेवल्याच आहेत. आम्हाला, च्यायला मधुबालेसारखी पणती पकडणे शक्य आहे का? खरंच, च्यायला हायवे 301 सारखा एक दणदणीत दरोडा टाकला तरच आमच्या आयुष्याचे कल्याण होईल. जाना दो. तूर्त भंकसगिरी करूनच वालपाखडीमधल्या कोणल्याही दिवटीचा आसरा झाला तरी भले.
यावरून हे लक्षात येईल की कोणतेही रूढ अर्थाने उच्च, उदात्त, सात्विक अथवा साधे सुसंस्कृत देखील एखादे उद्दिष्ट आयुष्याला नसलेली ही तरुण मुले आहेत. यांचे जगणे हेतूहिन आहे, मने मूलतः निकोप असली तरी रिकामी आहेत आणि आदर्श आजच्या (खरे म्हणजे तशा कालच्याच) मधुबाला आणि हायवे 301 संस्कृतीने पुरवलेले आहेत. वुलन पँटस् आणि भंकसगिरी हा यांची यांच्याच मते दोन मोठी वैशिष्ट्ये आहेत. यातल्या अनेकांचे लग्न झाले आहे. आम्ही पण रंडीबाज असलो तरी आमच्या घरातल्या बायकोची इज्जत करत असतो. . . असे ते सांगतात. कुणाकुणाला सहासहा मुले झालेली आहेत. आता कशात काही राम नाही राहिला या कलीमध्ये असे म्हणणारी म्हातारी आई कुणाकुणाला आहे. यातील कुणाचा रोजगार इलेक्ट्रिक मेकॅनिकसारखा रीतसर आहे; तर कोणी सट्टा-बेटिंगवर पैसे करून पोरी फिरवतो. चोरटी दारू गाळण्याचाही अनुभव या तरुण मुलांना आहे. परंतु या सर्वांचा मिळून मुख्य उद्योग एकच – भंकसगिरी. आपल्या विषयीच्या लौकिक समजाची कल्पना यांना आहे. एके ठिकाणी यातला एक म्हणतो, अरे, पोरीनं इज्जत घेतली, त्यात काय एवढं मरायचं?. . . आपला धर्मच आहे! दुनियेनं आपली इज्जत केव्हाच केली आहे! सगळी वालपाखडी आपल्याला ओवाळून टाकलेली मानते!’ इज्जत जाणे आणि घालवणे हा त्यांना धर्म वाटतो.
तसे पाहिले तर इज्जत (ऑनर) या गोष्टीची चाड अशी ना तशी या तरुणांच्या बोलण्यातून या पुस्तकात पानोपानी व्यक्त होते. आणि तिला एक प्रांजळपणा आहे. मनःपूर्वकता आहे. बायकोची इज्जत, कोणातरी सूची इज्जत, पापामियाच्या चाळीतल्या पोरींची इज्जत, बायजीची इज्जत अशी भोवतालच्या अनेकांची इज्जत हा त्यांचा चिंतेचा आणि चर्चेचा एक महत्त्वाचा विषय आहे. कोणी इज्जतीला न जागणे हे त्यांना भयंकर पापकर्म वाटते, अक्षम्य गुन्हा वाटतो. याने ते उद्विग्न आणि संतप्त होतात. अनेकदा आपला रिकामटेकडेपणा झुगारून कृतीला प्रवृत्त होतात; ‘इज्जत शिकवू जातात. या संदर्भात आपली गेलेली आणि जाणारी इज्जत हा त्यांचा धर्म वाटतो. त्याहीपेक्षा ती त्यांची एक फार मोठी खंत वाटते. या गोष्टीपुढे स्वतःपुरते ते असह्य, हतबल दिसतात आणि एक प्रकारे याचीच तीव्र प्रतिक्रिया म्हणून इतरांच्या इज्जतीची काळजी ते पोटतिडकीने वहातात.
यातही एक विलक्षण गोष्ट घडत असते. कोणाकोणाची इज्जत सांभाळू जाताना सुक्तसूक्त विचार त्यांना रहात नाही, सार्वजनिक आणि खासगी यातल्या मर्यादा ते धर्मयोद्ध्याच्या तडफेने पाहाता पाहाता ओलांडतात. प्रसंगी हिंस्रदेखील बनतात. परंतु एवढे सगळे इतक्या हिरीरीने केल्यावर शेवटी त्यांना आढळते ते हे की, इज्जत कुणालाच आणि कुठेच नाही! सगळा एकजात बेइज्जतीचा, बनावट, नकली, ढोंगी, खोटा सोयिस्कर मामला आहे! सगळीच भंकस आहे! उदाहरणार्थ, जिच्या इज्जतीची वासूनाक्यावरच्या पोक्याला फार चाड, आणि जिला बश्याने तिच्या लग्नात पन्नास रुपयाची साडी सदिच्छांसह दिली, तिच्याविषयी हा बश्याचा नंतरचा अनुभव पाहाः परवा संक्रातीची गोष्ट. सकाळी तिचा भाऊ तिळगुळ घेऊन आला. त्याने मला चिठी दिली. भ्यांचोद काय काय लिहिलं होतं त्यात ते वाचायला कोणीतरी प्रोफेसरच आणायला पाहिजे. काय म्हणे मला फक्त तुम्ही हवेत; दुसरं कोणी नको!’ भ्यांचोद ती काय बडबडते ते मला काय समजत नाही. . .
तशाच प्रकारचा हा आणखी एक अनुभवः इतक्यात मागल्या दारावर टकटक. तशाच ओल्या अंगाने दार उघडले. पाहतो तो ककी- हातात आमंत्रणपत्रिका. मी तिला आत घेतले आणि लग्नाबद्दल तिचे काँग्रॅच्युलेशन्स केले. ती काही बोलली नाही. इतक्यात तिने दार लोटले आणि मला घट्ट आवळून धरले. म्हणते काय माहीत आहे, पोक्या. . . पोक्या तुझ्यापासून मला मूल व्हावे अशी इच्छा आहे माझी! करशील ना रे पुरी?’
पोक्या यापुढे सांगतो, बंद केलेल्या दाराकडे पहात मी मनातल्या मनात म्हणालो, च्यायला!’
बश्याची अशाच अनुभवाविषयीची प्रतिक्रिया काहीशी वेगळी आहे. तो म्हणतो, साला हिच्याबरोबर दोन घंटे टाइमपास होतो आहे ना! . . . ही सगळी हिरव्या नोटेची पावर आहे.
इज्जतीच्या नावानं जिथे तिथे दिसणाऱ्या अशा खोटेपणावर, विपरीत प्रकारांवर, हलक्या वागणुकीवर या तरुण मुलांच्या मनात एक तर स्तिमित गोंधळलेपणा आहे किंवा एखादा त्यांच्या मते नेमका निष्कर्ष आहेः हिरव्या नोटेची पावर!
ही प्रसंगी हिंस्र आहेत. असभ्य आहेत, गचिच्छ आहेत, दिशाहिन जगणारी आहेत, परंतु मुर्दाड नाहीत. फिरकी कथेत बायजीचा रावजी अपघातात वारल्याचे धक्कादायक वर्तमान कळल्यावर या मुलांच्यात घडते ते संभाषण भावनेने विलक्षण थबथबलेले आहे; किंबहुना भावविशच आहे. त्यांच्या मनातून काहीतरी उफाळून येते, डोळे भिजतात, मन गहिवरते, आपली वासूनाक्यावरची कंपनीच हलकट!’ असे चिडीने मनात येते. ही तरुण मुले वासूनाक्यावर दरसाल सत्यनारायण घालतात, डोंगरीच्या विद्याधर बाबाकडेही यातला कोणी कोणा जाऊन पश्चाताप करतो.
परंतु विद्याधर बाबा, बायजी, सू, बकुळा, केशरवडी, भानू, ऍडव्होकेट पंडित आणि त्याचे घरंदाज कुटुंब, अशा सर्वांच्या बाबतीत या तरुण मुलांचा अनुभव एकच एक आहे. त्याचे नकलीपण, खोटेपण, ढोंग, भंकस! सगळ्या चांगल्या गोष्टींची अर्थहीनता आणि तकलादूपण! आणि यातली सफाई!
याने ती गोंधळतात, मनापासून उबगता. क्वचित संतापतात. हा संताप, उबग मग निघतो त्यांच्यामागून त्यांच्याच वळणाने येणाऱ्या पोरांच्या बाबतीत.
पोक्या म्हणतो, या वयात या पोरांची ही लाइन म्हणजे ही पोरं पुढे काय करणार हे दिसत होतं. या पोरांना खानदानीत नोकरी धंदा करायचा नाही, लाइनशीर राहायचं नाही, लोफर व्हायचं आहे आणि एक दिवस व्हॅगॉबॉण्ड नाहीतर रोडसाइड रोमिओ म्हणून लॉकपमध्ये जाऊन इज्जतीचं खोबरं करून घ्यायचं हे. . .
ही उद्विग्नता दिखाऊ नव्हे, ही काळजापासूनची आहे, उत्स्फूर्त आहे. ही बाळगणारांच्या स्वतःच्या आयुष्याचे खोबरे पार्श्वभूमीवर असल्याने ही क्षणभर हास्योत्पादक ठरली तरी त्याहून ती हृदयस्पर्शी आहे, अस्वस्थ करणारी आहे.
इज्जत नावाच्या गोष्टीमागचा खोटेपणा, नकलीपणा, दांभिकता, मुलायम सफाई हा या कथांतून सातत्याने व्यक्त होणारा विषय कितपत खरा, व्यापक आणि महत्त्वाचा आहे हे ज्याने त्याने स्वतःपुरते ठरवायचे आहे. यापोटचा उबग, चीड यांचा वांझपणा आणि एकूणच सगळ्या जीवनाची अर्थहीनता प्रत्येकाने स्वतःशी पडताळून पाहाण्याची बाब आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थोड्याफार फरकाने असले वासूनाके आज अस्तित्वात आहेत हे मात्र एक निर्विवाद सत्य आहे आणि त्यांचे कमालीचे स्पष्ट, निरर्गल, उबगवाणे तरीही हृद्य दर्शन भाऊ पाध्यांनी त्यांच्या पुस्तकात घडवले आहे.
कलात्मकतेत या कथांत डावे-उजवे करता येईल; परंतु त्यामागची हृद्यता उपेक्षून केवळ निरर्गलतेकडे पाहाणे मात्र भाऊ पाध्यांना, या कथांना आणि एकूण वाङ्मयनिर्मितीच्या उद्देशालाच अन्यायाचे तसेच हानिकारक ठरणार आहे.
***
(महाराष्ट्र टाईम्स, मार्च १९६६)

No comments:

Post a Comment