Saturday, October 30, 2010

व्यष्टीच्या कोषामधून समष्टीचे दर्शन घडवण्याचे भाऊ पाध्यांचे कलात्मक कौशल्य हाच त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गाभा आहे. भाऊंच्या लेखनात निवेदक ते स्वत: आहेत आणि नाहीतही. त्यांचे प्रत्येक पात्र निवेदनात आपला रास्त हिस्सा घेते, आपली बाजू मांडते. न्यायाधीशाशिवाय चाललेले हे खटले आहेत. परस्परविरोधी दावे करणारे आणि स्वत:ची वकिली करणारे लोक, आरोप करणारे, अपराध करणारे, साक्ष देणारे, निकाल देणारे असे अनेक निवेदकांचे स्वर भाऊंच्या लेखनात आपल्याला ऐकू येतात. मग कळते की हा एक समाजाचा गलबला आणि त्यातून येणारा मानवतेचा आवाजच आहे.
- दिलीप पुरुषोत्तम चित्रे


आम्ही मराठी माणसं मुर्दाड आहोत. आमचा मख्खपणा एका ज्ञानेश्वरानं जात नाही, एका तुकारामानं जात नाही, एका साने गुरुजीनंसुद्धा जात नाही. भाऊ पाध्येनं तर तसा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. त्यामुळे भाऊचं लिखाण काय प्रतीचं होतं ह्याबद्दल आम्ही अडाणी राह्यलो असलो तर नवल वाटायचं काहीच कारण नाही. 'कधीकाळी कुठंतरी माझा समानधर्मा निपजेल' ही प्रत्येकच लिहिणा-याची आशा असते. अशी काही आशा भाऊ मागं ठेवून गेलाय का नाही कोण जाणे!
(महाराष्ट्र टाइम्स, ३ नोव्हेंबर १९९६)


The new literature (that began in 1960s) dedicated itself to looking at life with the naked eye and recording what it saw in ruthless detail. Bhau Padhye took the short story out of its cosy, middle-class environs onto the streets, gutters and public parks of the big city where loafers and layabouts, clerks and coolies, struggled to survive. Padhye's language too was of the streets, paying no heed to the niceties that had, until then, separated literature from life. Conservatives rose up in arms against him, but the young recognised their world in his.
- Shanta Gokhale
(The Hindu, 7 March 2010 )


Every great city creates its own great writer and Bhau Padhye — the Marathi fiction-writer— was created by Bombay. I consider him the greatest writer of Bombay in any language.
- Dilip Chitre
(Tehelka, 02 July 2005)


पात्रचित्रणाच्या तंत्रात 'नमुने' हे वास्तववादी साहित्याचे लक्षण आणि घटक समजले गेले आहेत (लुकाच). ह्या नमुन्यांत व्यक्तीचे सामान्यत्व व विशेषत्व हे दोन्ही गुण असावे लागतात, दोन्हीचा संयोग व्हावा लागतो. मराठीतल्या व्यक्तिप्रधान कादंब-यांत, विशेषत: लैंगिकता हेच आशयसूत्र असलेल्या कादंब-यांत, वास्तवाभिमुख असा हा संयोग घडत नाही. ह्याशिवाय नव्या समाजात भावनिक व बौद्धिक अशा दोन्ही वृत्ती माणसांमध्ये सापडतात. पात्रे विचार करणारीही असावी लागतात. नुसती भोगणारी, भोग देणारी, असहाय अशी नसतात. वेश्या झालेली स्त्रीही आधीची एक असह्य चौकट मोडून वेश्या होते, ही वस्तुस्थिती मांडली गेली पाहिजे. ह्या बाबतीत भाऊ पाध्ये यांची पात्रे ठळकपणे समोर येतात (अग्रेसर, वैतागवाडी, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, वासूनाका). म्हणून भाऊ पाध्ये आजचे सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहेत असे मानावे लागते.
- भालचंद्र नेमाडे
(टीकास्वयंवर, पान २२८)



  
ज्यांना भाऊंच्या ह्या दस्तावेजाविषयी इतरांना सांगायचंय त्यांना हे पत्रक ई-मेलने पाठवता येईल, किंवा प्रिंट काढून नोटीस बोर्डावर लावता येईल, किंवा नुसतं वाटता येईल.
***

Thursday, October 28, 2010

चित्र्यांचा एक मजकूर

(भाऊंबद्दल चित्र्यांनी खूप वेळा खूप ठिकाणी खूप काही लिहिलंय. इथे जो मजकूर प्रसिद्ध होतोय तो चित्र्यांच्या खाजगी संग्रहातला विजया चित्र्यांनी दिलेला- कुठेच छापून वगैरे न आलेला.)


 मुंबई: पठ्ठे बापूरावांपासून थेट नामदेव ढसाळांपर्यंत, मर्ढेकरांपासून थेट विवेक मोहन राजापुरेपर्यंत, नारायण सुर्व्यांपासून थेट प्रकाश जाधवांपर्यंत मराठीत तिचा वाङ्मयीन व्याप आहे. पण ह्या वाङ्मयीन मुंबईच्या थेट केंद्रापाशी एकच मराठी कथा-कादंबरीकार उभा आहे, तो म्हणजे भाऊ पाध्ये. मराठी संस्कृतीतलं हे मूळ महानगर त्याच्या सर्व सामाजिक गतिमत्तेसकट आणि नीतिमत्तेसकट भाऊंच्या विश्वात साकार झालंय. मार्क्वेझ, कुंदेरा, रश्दी यांसारखे अनेक लेखक गेल्या दहा-वीस वर्षांत जगभर गाजले. भाऊ ह्या लेखकांच्या इयत्तेचे, वैश्विक महत्त्वाचे लेखक आहेत. पण मराठीतही त्यांना पुरेसं ओळखलं गेलेलं नाही. मराठी साहित्या संस्कृतीच्या कोतेपणाचीच ही खूण आहे. आणखी दहा-वीस वर्षांनी भाऊंच्या कर्तबगारीची ओळख सर्वांनाच पटेल, अशी मला खात्री आहे.
मराठीतच नव्हे, जगात कोठेही, महानगरीय माणसाचं जीवन अस्तित्व आणि अनस्तित्वाच्या हिंसक आणि विक्राळ सीमेवरल्या अतिवास्तवसदृश वास्तवात जगलं जातं. त्याच्या दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या घटनांमध्ये अमानुष हिंसेचा ओघ प्रकटत रहातो. संपूर्णपणे मानवनिर्मित जगात, जिथे नियती हे मानवी समाजाच्याच सामूहिक आत्माक्रमणाचं फळ आहे, माणसं एक चमत्कारिक जीवन जगत असतात. त्यांनी सामूहिकरित्या दडपलेला निसर्ग आणि त्यांनी स्वीकार केलेली जीवनशैली यांच्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक जीवनाची तारेवरली कसरत चालू असते. भाऊ पाध्यांच्या कथा-कादंब-यांच्या विश्वात ही कसरत आणि तिच्यातल्या दारुण विसंगती प्रकट झाल्या आहेत. नोबेल पुरस्कारासाठी एखाद्या भारतीय लेखकाचं नाव सुचवायचं झालं तर बिनदिक्कत मी भाऊंचं नाव सुचवीन. दुर्दैव हेच की मराठीतही भाऊंचं महात्म्य कोणी ओळखत नाही.
***
हा मजकूर लिहिला गेला त्याला बुडाला बाजार दहा-वीस वर्षं तरी नक्कीच झाली असतील.
***

Sunday, October 10, 2010

About Bhau


- Shoshanna Padhye

Shoshanna and Bhau Padhye
(Bhau’s wife Shoshanna was born in the Bene Israel Community. This post includes excerpts from the article based on an interview of Shoshanna Padhye. This article is a part of the book titled ‘Jewish, Indian and Women : Stories from the Bene Israel Community’. This book, published by VACHA Women’s Resource Centre (Mumbai) in July 2002 was edited by Nina Haeems. As this book was a part of the project to “search for invisibilized women’s role and contribution in history and community life”, the purpose of the interview was to document the social contribution of Shoshanna Padhye, the trade union worker. But, in between, she does talk about her personal life too. As this blog is an effort to document ‘Bhau Padhye’, the words of Shoshanna that directly talk about Bhau are only included here; So there may not be a flow between one paragraph and the other but there is definitely a relevant link.)
                    


I met Bhau in 1950. His full name was Prabhakar Narayan Padhye but he was better known as Bhau Padhye and later that became his pen name. At that time he was in Ruia College studying Economics and Statistics and his professor, U. U. Bhatt had told the students, ‘You must study Trade Unions first hand. It won’t do only to read about it in books. Go out and get direct experience. See how unions function.’ Prof. U. U. Bhatt used to hold study circles for the students and had called Ashok Mehta and others to address them. That was how Bhau came and worked with us. Later he became a full timer.

Bhau completed his B.A. After graduating he even taught Maths for one year in the Sir Elly Kadoorie School in a leave vacancy. He attended university for one year, working towards his M.A. degree. He took Sanskrit for M.A. and wanted to become a teacher. But he gave up studies after one year. We got married in 1956 and he had to get a job. I was working at that time, but I earned very little. I used to get Rs. 75 per month for my work in the union.

Mine is an inter-caste marriage. Earlier, in 1931 I think, my elder sister married a Nagar Brahman. She married very young. She was not even fourteen year old at that time. My sister’s in-laws were very orthodox. If you meet her you will never guess that she was born Jewish, she has changed so much. As for me, I have not changed at all. I never put kumkum, or wore green bangles. And I have never worshipped idols. I never wore a mangalsutra. My mother-in-law used to say, ‘If you don’t want to wear it, don’t.’

We had a registered marriage. After the wedding we did not go to Bhau’s house. His mother did not even know that we were to get married that day, 13 November 1956. No one from his side was present at our wedding. Only a friend was there. Bhau stepped out of the house without saying he was going to get married that day. If he had told them he was going to marry a Jewish girl, they would have been upset and there would have been a quarrel. So, why have all that?

Bhau’s friend was a clerk in the Labour Court which was in Jacob Circle. He had a room in Matunga, opposite Aurora Cinema. When we told him that we wanted to get married but first needed to find a place to stay, he had said, ‘ Don’t worry, submit the notice of the marriage. My wife will be going to her village soon, and you can stay in my house. I will sleep outside.’ My husband bought all the things that we would require to set up a new home. My parents had given me a trunk with some clothes.

My mother came with me for the registration of my marriage. Three of my brothers also came. My eldest brother was not there, he was in Vengurla. He sent me some money as a wedding gift. My father was bedridden. My bhabhi’s father, who was a Nowgaonkar and related to Principalbai Rebecca Reuben, came from Nashik to sign as a witness. He worked with PWD.

I told my husband that I would keep the same name- Shoshanna. Shoshanna Mazgaonkar will become Shoshanna Padhye. But Shoshanna will not become Sushma or Shobahana.

My husband used to say, ‘You just be the way you are.’

My husband’s mother herself took the first step of reconciliation with Bhau and myself. Bhau and I had gone to Nashik to my uncle’s house, and she happened to be staying with her daughter and her family who were also in Nashik. She met me on the street in Nashik, and she said, ‘Shoshanna, now come to me in Mumbai, do not stay anywhere else.’

Someone from Tata Institute came to interview me once. She looked around our house and remarked, ‘There is no dev-ghar in your house, which god do you worship?’ Actually, when it is time to celebrate our festivals, I go to my brother’s house. I am there for Rosh Hashanah and the other festivals. For Diwali I used to go to my mother-in-law’s house.

Bhau was a writer. He has written some ten to twelve novels, short stories and a book on the film maker Guru Datt. He used to bring out a magazine, and contributed articles to various weeklies- Sobat, Manus.

I did not write myself. I did try, but never succeded. However, I used to give my husband a lot of material that often formed the basis of his work. I am a close observer of people. I used to visit families and take in minute details of their way of life, their home, the kind of relations they had with each other, and I would describe all this to him. He always said that I had a great understanding of human nature.

In 1989, my husband had a paralytic attack. His friends, Dilip Chitre and Bhalchandra Nemade went to Delhi and got a government pension for him. This started in 1995.

After his death, the pension should have continued in my name. I wrote to the government. They wanted proof of our marriage- a wedding photograph for one thing. We didn’t have a big wedding with a reception and all that and so there was no photograph. I went to the Old Custom House where we had registered our marriage in 1956 and finally managed to get a copy of the original marriage certificate. This I sent to Delhi. Finally three years after his death I started getting the pension. I fought and I got the pension. All my life I have fought for others, why should I not fight for myaself? Even now they send the pension to Vasai. Bhau and I used to live there. But now I have sold that house. I have sent them my current address, yet the pension goes to Vasai.
***
Shoshanna Padhye was born on 25 June 1925. Died in July 2005.
***

Shoshanna and Bhau
***

Thursday, October 7, 2010

माझी कादंबरी- एक ब्लडी हार्ड वर्क !

- भाऊ पाध्ये


(१९८१ साली 'आयुध' ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख.)
 
नुस्तं लिखाण करणं म्हणजे चक्क ब्लडी हार्ड वर्क (अभिनेत्री तनुजाच्या शब्दांत!) असतं. आणि कादंबरीसारखं विस्तृत लेखन करणं म्हणजे तर....., मराठीमध्ये हल्ली जो तो कादंबरी लेखन करू लागलाय. ते पाहून मनात विचार येतो की एक तर आपल्याला वाटतं तितकं काही कादंबरी लेखन हार्ड वर्क नसावं किंवा मराठी भाषेतले लेखक असे काही जिनिअस असावेत की एकोणिसाव्या शतकातील ग्रेट रशियन रायटर्सही त्यांच्यापुढे फालतू वाटावेत.
 
लेखनासंबंधी म्हणाल तर तनुजाची जी भूमिका फिल्म इंडस्ट्री व अदाकारीसंबंधी आहे तीच आहे. (तिच्या क्षेत्रात ती आणि माझ्या क्षेत्रात मी सारख्याच उंचीचे आहोत, असे मला म्हणायचा मोह होतोय!)
 
माझ्या 'वासूनाका', 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' अशा एक दोन चीजा गाजल्या तर तनुजाचीही 'दो चोर', 'अनुभव' अशी एक दोन पिक्चर्स चालली. दुसरे म्हणजे ती आपण फिल्म इंडस्ट्रीला बांधलेले आहोत असे मानते तसे मीही कादंबरी लेखनाला बांधलेलो आहे असे मानतो. कादंबरी हा सर्वात श्रेष्ठ वाङ्‌मयप्रकार असून नाटक-बिटक लिहिणे त्या मानाने फारच मामुली आहे असे मनापासून मी मानतो.
 
मी कादंबरी लिहायला घेतली त्या वेळी कादंबरी हा पॉप्युलर वाङ्‌मयप्रकार नव्हता. त्या वेळी मराठीत कादंबरीकार किती- तर हातावर मोजण्याइतके तीन-चार. श्री. ना. पेंडसे, व्यंकटेश माडगूळकर किंवा गो. नी. दां. कुठल्याही साहित्यप्रेमी व्यक्तीस मी, एका नवोदित लेखकाने कादंबरी लिहिली असे म्हटले, म्हणजे तो शॉक लागल्याप्रमाणे माझ्याकडे पहात असे. माणसाने हळूहळू लघुकथा लिहून हात घोटवावा. मग तो चांगला कसून तयार झाला की लिहावी कादंबरी असे तेव्हा मानले जात असे नि मला तसा हितोपदेश केला जात असे. अशी परिस्थिती. ...तोच प्रकार आता किती पॉप्युलर झाला पहा. मी लघुकथांचा संग्रह करावा म्हणून प्रकाशकाला शोधतो तेव्हा प्रकाशक मला सांगतो, "कादंबरी आहे का बोला? आज कादंबरी खपते." काय जमाना आहे पहा, ज्या वेळी मी हातात कादंबरी घेऊन प्रकाशकाकडे जात होतो, त्या वेळी त्याला कथा हव्या होतात. आता कथा घेऊन जातो त्या वेळी त्याला कादंबरी हवी. आज बाजारात हा माल खपतो म्हणून तो हवा. 'ऑफ सीझन'चा माल आणू नका. मागे दुसरा माल खपत होता, हा खपत नव्हता. हा माल 'ऑफ सीझन'चा ठरला होता. मराठी प्रकाशक प्रकाशक आहेत की बनिये?
 
असो. 'डोंबा-याचा खेळ' या माझ्या कादंबरीचे प्रकाशन म्हणजे मराठी साहित्याच्या इतिहासातली दर्दभरी दास्तान आहे. वो किस-किसको सुनाऊं! 'लग्न पहावं करून' या उक्तीप्रमाणे 'कादंबरी पहावी छापून' अशी एक म्हण मी त्या वेळी काढली होती. पण सध्या लग्न सराईची धामधूम पाह्यली की 'लग्न पहावं करून' म्हणण्याची सोय राह्यली नाही. ललित मासिकाचा कुठच्याही महिन्याचा अंक उचलावा नि नव्या कादंब-यांची जंत्री पहावी. लग्नानंतर फॅमिली प्लॅनिंग तरी करता येते- पण कादंब-यांच्या प्रॉडक्शनचे काय? सध्या ज्या जोमाने हे प्रॉडक्शन चालू आहे, त्यांच्या हिशेबात स्वत:चा विचार करता मला नपुंसकत्व आल्यासारखे वाटते.
 
लिहिण्याबाबत आपले लहरी खाते- हवं तर म्हणा. हवं तर 'लिहावेसे वाटेल तेव्हाच लिहावे' अशी यामागे तात्विक भूमिका आहे असे म्हणा. परंतु दर वर्षी बाजारात आपण काही माल टाकला नाही म्हणून गेलाबाजार पश्चात्ताप करण्याची वेळ नियमितपणे आली आहे.
 
खरे म्हटले तर आपला कादंबरीचा माल बाजारात टाकला आणि माल कसा काय खपला म्हणून बाँबे बुक डेपोवाले, मॅजेस्टिक बुकवाले यांच्याकडे जाऊन 'कसं काय चाललंय?' म्हणून विचारावं आणि माल खपत असला तर त्यांनी म्हणावं. "आणा आणा, आणखीन असला माल आणा- चांगली डिमांड आहे तुमच्या मालाला!" असे मलाही वाटते. असे भाग्य आपल्याला कुठे? आपण इतके कुठे सेलेबल आहोत? आपण म्हणजे आपला माल! आपला माल आणि आपण यात फरक कुठे आहे? माल कसा प्रोड्यूस करावा याचे बाजाराचे तंत्र आपल्याला कुठे ठाऊक आहे? आपल्या देशात बांगलादेशचे युद्ध झाले. त्या निमित्ताने दादरला एक परिसंवाद झाला. या परिसंवादात शाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी साहित्य व्यवसाय मार्गदर्शन करणारा बराच बोध केला. ते म्हणाले,"पहा, बांगलादेशचा लढा म्हणजे एक रोमहर्षक अनुभव आहे. यावर साहित्यिकाने लिहिले पाह्यजे! कुठे आहे साहित्यिक?" मी तोंड लपवले. कसं मी त्या शाहिरांना कादंबरीकार म्हणून आश्वासन देणार- "शाहीर, हा मी आहे. पाडतोच मी एक बांगलादेशच्या लढ्यावर कादंबरी!" आपली ती कुवत नाही. आपल्याला या मर्यादा मंजूर आहेत. त्यानंतर आणीबाणी आली तेव्हा हेच! ...हाही प्रसंग मोठा संघर्षमय! कुठे आहेत साहित्यिक? अश्या आपल्या रोमहर्षक ऐतिहासिक प्रसंगाच्या बसेस चुकत आल्या आहेत. एखाद्याच्या लेखणीच्या मर्यादा असतात! मर्यादा तरी वाचकांनी मंजूर करायला हरकत काय आहे?
 
कादंबरी लिहिणे हा हार्ड जॉब असो वा नसो, मला तो करावाच लागतो. आपल्याला मिळालेला तो शापच म्हणा. तुम्ही कधी एखाद्या प्रचंड कारखान्यात गेलात त्या वेळी तुम्हाला प्रचंड चक्र फिरताना, शॅफ्टस् हालताना दिसतात. अनेक वेळा ही यंत्र थांबवण्यासाठी आपला हात घालण्याची वेडी उर्मी माझ्या मनात आली आहे. तशीच माझ्या डोक्यात चालणारी चक्रे, शॅफ्टस्, पिस्टन्स थांबवावेत असे मला वाटले आहे. ही जोपर्यंत चालतात तोपर्यंत 'प्रॉडक्शन' निघणारच. ते अटळच असतं. कुठल्याशा अमेरिकन कादंबरीकाराला एका पत्रकाराने मुलाखतीत सवाल विचारला होता, 'आपण लेखक होऊ असे तुम्हाला केव्हापासून वाटू लागले?' मला हा प्रश्न विचारला असता तर मी उत्तर दिले असते, "अगदी फार पूर्वीपासून!. . . " पण, असे वाटत तरी मी लिहिण्याकडे कधीच तसे लक्ष दिले नव्हते. मला पुढारी व्हायचे होते, मला आदर्श शिक्षक व्हायचे होते. तरुण वय म्हणजे हिरो बनण्याची स्वप्न पहाण्याचे. ब्लडी हार्ड वर्क करण्याचे नव्हे. पुढारी बनणे सोपे आहे, कोवळ्या विद्यार्थ्यांवर भंपकपणे इंप्रेस करून हितोपदेश करून आदर्श शिक्षक होणे शक्य आहे. परंतु ब्लडी हार्ड वर्क केल्याखेरीज कादंबरीकार बनणे कसे शक्य आहे? मला वाटते म्हणूनच मी कादंबरी लिहिण्याचा माझा मनसुबा पुढे ढकलला होता. आयुष्यात चांगले कर्तृत्व संपादन करून उतार वयात निवृत्त व्हावे. आपली एखादी लायब्ररी असावी. उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन करून आपण व्युत्पन्न व्हावे. आपल्या जवळ भरापूर वेळ असावा. कधीही कॉन्स्टीपेशन होऊ नये आणि आपण तोंडात पाईप धरून धुराची वलये काढत गालिच्यावरून येरझारा घालत आपला नायक नायिकेशी कसा वागेल याचा विचार करावा वगैरे वगैरे. म्हणजे आपण पूर्ण कादंबरीकार बनू असे मला वाटायचे. सुप्रसिद्ध पाश्चात्य लेखक सॉमरसेट मॉम यांनी लेखनाविषयी एक ग्रंथ लिहिला आहे, तो मी वाचला होता. त्यातले एक वाक्य माझ्या नजरेत अंजन घालणारेच होते. "बरेच लेखक आपल्या तारुण्याच्या उर्मीमध्ये लिहितात, पण. . . " आपण तरुण असलो म्हणजे लिहिणे बरे नाही असे माझ्या मनात तेव्हापासून घर करून बसले होते. मग कादंबरीसारखा प्रदीर्घ व विस्तृत खटाटोप करण्यास पन्नाशीपुढचा निवृत्तीचा काळ योग्य नव्हे काय? तर कादंबरी लेखनासाठी योग्य काळाचे भान असूनही मी ऐन पंचविशीतच कादंबरी लिहावयास घेतली याचे कारण माझ्या डोक्यात चालणारी यंत्रेच होत, दुसरे काही नाही. पंचविशीत किंवा गद्धे-पंचविशीत विचार म्हणजे एक कथानक, एका विशिष्ट पार्श्वभूमीवर येणारी कॅरेक्टर्स व त्यातून निर्माण होणारे कथेचे सूत्र यापुढे गेलेला नसतो. हिंदी चित्रपटात कधी काश्मीर, कधी युरोप तर कधी मुंबई असे बॅक ड्रॉप वापरून हिरो-हिरॉईन व खलनायक, त्यांचे आईबाप, सहायक नट, त्याची प्रेयसी, विनोदी नट, नोकरचाकर असा एक संपूर्ण प्लॉट तयार करावा लागतो, त्याचप्रकारे कादंबरीचे आहे. तसे हिंदी चित्रपटाची पटकथा जमवणे वाटते तितके सोपे नसते. त्याचप्रमाणे ना. सी. फडक्यांच्या तंत्र - मंत्राने बेतून लिहिलेली कादंबरी लिहिणे सोपे नसते. दोन्ही हार्ड जॉब्स असतात. निवृतीच्या वयात बुद्धिबळ खेळण्याचा जो आनंद मिळेल तोच आनंद असे हार्ड जॉब्स करण्यात मिळतो. म्हणून हार्ड जॉब्स न करता लेखन हे इझी व्हायला हवे असते. असे इझी झालेलं लेखन हे केव्हाही अधिक समाधान देणारे असते. मी 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर' ही कादंबरी एका महिन्यात 'नॉन स्टॉप' लिहिली. त्यामुळे ती चांगली उतरली यात मला शंकाच राह्यली नाही. कादंबरी लिहिताना आपला अनुभव, धडपड, मेहेनत, डोक्यातील चक्रे यांचा अशा रीतीने मिलाफ झाला पाहिजे की कधीही कॉनस्टीपेशन झाल्याप्रमाणे अस्वस्थ होता कामा नये. लेखन हे तेव्हाच स्वस्थता निर्माण करते जेव्हा तुम्हाला ते पार करताना कॉनस्टीपेटेड अवस्था अस्वस्थता निर्माण करत नाही. हा एक असा ब्लडी हार्ड जॉब आहे की जो कादंबरीकाराला आवडायला हवा. मी जेव्हा तो ब्लडी हार्ड जॉब म्हणतो, त्या वेळी कादंबरी लेखनाविषयीचा तिटकारा आणि कादंबरी लेखनाची ओढ यातील 'लव्ह-हेट रिलेशनशिप' मी अनुभवतो. या 'लव्ह-हेट रिलेशनशिप'मधूनच कादंबरी निखार चढतो. 'वैतागवाडी' हे माझ्या कादंबरीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. 'वैतागवाडी' ही मुंबईतल्या बेघर कारकुनाची कहाणी. ती लिहिताना मला फारच कॉनस्टीपेटेड अस्वस्थता जाणवली. मी हा विषय का लिहिण्यास घेतला हे मलाच समजत नव्हतं. या कादंबरीतला मध्यमवर्गीय बेघर माणूसच एकदा म्हणतो, "मला घर नाही ही काय समस्या आहे?" एका मोठ्या प्रकाशकाने ही कादंबरी (स्क्रिप्ट) वाचल्यावर मला म्हटलं, "ही कादंबरी तुम्हाला यश मिळवून देणार नाही कारण ही हिणकस आहे!" मी त्याच्याशी सहमत झालो नाही. माझे मित्र अशोक शहाणेही सहमत झाले नाहीत. मला बेघर माणसाचे दु:ख लिहिण्याची इच्छा डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या एका भाषणातून झाली. ते म्हणाले होते, "कल्पना करा, एखाद्या माणसाला रस्त्यावर पडल्यानंतर त्याची काय परिस्थिती होते ती." मी अनेक वेळा आमच्या गृहनिर्माण मंडळातील अनधिकृत भाडेकरूंना घराबाहेर काढल्याची दृश्ये पाह्यली. केव्हढी दर्दभरी शोकांतिका! सामानसुमान, बायकामुले यांसह माणूस घराबाहेर फेकला जातो, ते केव्हढे प्रचंड क्रौर्य दिसते. मी आमच्या समाजवादी कार्यकर्त्यांनाही तो कायदा बदलण्यासाठी हलवू लागलो होतो. 'वैतागवाडी'चा नायक अखेर आपला संसार, आपली ड्यू असलेली बायको घराबाहेर पडणार अशा परिस्थितीत येऊन पचतो, त्या वेळी त्याचा पुरुषार्थ संपतो. डोळ्यासमोर एक प्रचंड काळोखाची खाई पसरते नि तो रडतो. बेघर माणसाच्या प्रचंड शोकांतिकेच्या त्या शेवटाला पॅरलल फक्त डी-सिकाच्या 'बायसिकल थीफ'मधल्या नायकाच्या रडण्यामध्ये मिळेल.

कुठचीही कलाकृती म्हणजे कलाकाराने पसंत केलेला विषय आणि त्याचे व्यक्तिमत्व यांचे लग्न अशी माझी एक स्वत:च्या लेखनाच्या संदर्भात केलेली सुटसुटीत व्याख्या आहे. आपल्याकडचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'कोसला' ही कादंबरी आहे. ही कादंबरी आणि प्रा. भालचंद्र नेमाडे यांचे व्यक्तिमत्व ह्या गोष्टी अविभाज्य आहेत. आय राईट अ‍ॅज आय लिव्ह, असे ज्या वेळी लेखकाला म्हणता येते, त्याच वेळी आपल्याला त्या लेखकाची लेखन प्रवृत्ती लक्षात येते. बाजारात अनेक प्रकारचे खपाऊ माल हारीने पेश केले जातात, त्या वेळी लेखक स्वत:ला पेश करून आपले व्यक्तिमत्व अनेक प्रवाहपतितांपेक्षा वेगळे असे असल्याचे स्वच्छपणे दाखवतो. कादंबरी हे तुमच्या स्टेटमेंट व्हायला हवे. 'बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर'मध्ये त्या कादंबरीचा नायक एका अपघाताविषयी चिंतन करताना दिसतो. मी असा अपघात- सामान्य अपघात जो मुंबईसारख्या शहरात घडतो- तो पाह्यला. तो पाह्यला यात विशेष काहीच नाही. तसा तो त्या वेळी अनेकांनी पाह्यालाच होता. हेमिंग्वेच्या शब्दांत 'एव्ह्री डेथ डीमीनिशेस मी' अशी अवस्था मला जाणवली. आणि ती बॅ. धोपेश्वरकराच्या चिंतनामध्ये मी मांडली. जो अनुभव अनेकांनी घेतला होता तरीसुद्धा मला तो माझ्या लिखाणातून पुन्हा सर्वांप्रत पोचवावासा वाटला, इतका तो माझ्या व्यक्तित्वाशी अटळ बनला होता.

असाच एक अनुभव म्हणजे माझ्या एका प्रिय पात्रासंबंधी. तिने एक दिवस लग्न जमवल्याची बातमी मला दिली. मला धक्का बसला. मी म्हणालो, "माझ्याबरोबर राह्यल्यानंतर तुला लग्नाची इच्छा कशी होते?. . . ज्या पुरुषाशी तू लग्न करण्यास तयार झालीस त्याच्यापासून तुला सुख मिळण्याची खात्री कुठे आहे?" तिने मला काय उत्तर द्यावे. "त्यात काय आहे? चार-चार वेळा पोट पाडूनही मुलींची लग्न होतात! मग माझे का होऊ नये?" ती स्वत:ला 'अग्रेसर चेंडू' म्हणवून घ्यायची. तिच्या या दृष्टीचा मी प्रथमच अनुभव घेत होतो. मी तिला मानलं. तिच्यासारख्या चार-चार वेळा पोट पाडणा-या समाजातल्या सर्व मुलींना मानलं! ती मुलगी चालू खरी परंतु तिच्या चालूगिरीमध्ये सुसंगतपणा होता. मानलं तिला मी!

मोटार अपघात ही एक सर्वसामान्य घटना असेल किंवा अग्रेसर चेडूची विचार करण्याची पद्धत जगावेगळी असेल, या दोन्ही घटनांकडे मी माझ्या दृष्टीकोनातून पाहातो म्हणूनच त्या मला सिग्निफिकंट वाटतात. ज्याप्रमाणे बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर हे माझे कॅरेक्टर मृत्यूच्या दर्शनाने हादरते व अंतर्मुख होते त्याच प्रमाणे अग्रेसर चेडूला सवाल करणारा मी आपल्या कनिष्ठ मध्यम वर्गातील तरुण मुली व्होअरिश लेव्हलवर कशा जगात असतात हे दाखवतो. पावित्र्याचे आणि पातिव्रत्याचे, सेलेबल नीतिमत्तेचे बोजड कुबड पाठीवर न बाळगता त्या अधिक मुक्त जीवन जगतात. (साहजिकच स्त्री-मुक्तीची चळवळ त्यांना अपील होत नाही.) सध्या लेखकांच्या व्यक्तिमत्वाविषयी मराठी भाषेमध्ये चर्चा करणे थांबलेच आहे. आणि चर्चा तरी कुणाची करणार?. .. आजचा एखादा लेखक स्वत:ला मार्क्सवादी म्हणवतो, म्हणजे काय, तर काहीच नाही! किंवा एखादा लेखक स्वत:ला दलित म्हणवतो. म्हणजे तो ज्या समाजात वाढला त्या समाजाचा आरसा समाजापुढे ठेवतो आहे. त्याच्याविषयी इंटरेस्ट वाटेल असे कुठे आहे. मी कादंबरीची व्याख्या केली त्याप्रमाणे कादंबरी म्हणजे लेखकाचा विषय आणि व्यक्तिमत्व यांचे लग्न आहे असे एकदा गृहीत धरले तर आजच्या कादंबरीच्या बोहल्यावर फक्त विषय उभा आहे. परंतु आंतार्पाटापलीकडे नवरा मुलगा जो लेखक असायला पाहिजे त्याचा पत्ताच नाही. लेखक हा युनिक असायला हवा. तो दुस-या कुणासारखा असू नये. अर्थात युनिक माणसालाच युनिक अनुभव मिळतात आणि युनिक अनुभवांतूनच तो युनिक निर्मिती करू शकतो. अलीकडे एका अमेरिकन ज्यू लेखकाची- आयझॅक सिंगरची मुलाखत वाचली. तो जे म्हणतो, टॅलेंट नेव्हर ट्राइज टू इमिटेट अदर टॅलेंट. इट इज इटसेल्फ. ही स्वत:च्या लिखाणाविषयी जागरूक असलेल्या लेखकानेच खबरदारी घेतली पाह्यजे. मी माझ्या कादंब-यांच्या आलेखाकडे वळून पहातो, त्या वेळी किती वेगवेगळ्या विषयांना मी हाताळले आहे, हे मला सांगावेसे वाटते. डोंबा-याचा खेळ, करंटा (कामगार चळवळ), वैतागवाडी (गृहहिनांची समस्या), वासूनाका (रोडसाईड रोमिओज), बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर (परात्म व्यक्तिमत्व), अग्रेसर (कनिष्ठ मध्यम वर्गातील मुलीचे जीवन), राडा (बेछूट तरुण व्यक्तित्व), वणवा (नवश्रीमंत व निसर्ग), होमसिक ब्रिगेड (शैक्षणिक विकासाचे प्रकल्प), वॉर्ड नं. ७ सर्जिकल (एका निर्मितीक्षम कलावंताच्या समस्या). प्रत्येक कादंबरीमध्ये मी आहे म्हणून या कादंब-यांमध्ये एक अदृश्य धागा आहे. मी जर पुढे मागे लिहीत राह्यलो तर तो धागा पुढे वाढत चालणार आहे. मी पाह्यल्या त्या मिशनलेस संस्था (कामगार चळवळ, शिक्षण प्रकल्प), घनघोर अंधाराने भरलेले आभाळ (वैतागवाडी, राडा) नव-श्रीमंतांचा उद्दामपणा व आत्मघातकीपणा (वणवा), अस्तित्व विचार (बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर) हे पेश करताना माझ्या व्ह्यू- पॉईंटमध्ये वाचकाला इंटरेस्ट वाटतो की नाही, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मी जे कादंबरीमधून विधान करतो, त्यामुळे वाचक सिरीअसली स्टीम्युलेट होतो की नाही हा प्रश्न आहे. माझी 'होमसिक ब्रिगेड' दादा कोंडकेला दिली. अर्थातच ती त्याला आकलन होण्याच्या पलीकडची आहे, त्यामुळे तो कसा काय स्टीम्युलेट होणार? ते अशक्यच आहे.

वाचकाची समस्या सर्वच चांगल्या रीडर्सना भेडसावणार. अमेरिकेत ३ टक्के लोक वाचतात. ते सिंगर आपल्या मुलाखतीत म्हणतातच, नंबर ऑफ पोटेंशिअल रीडर्स इज डिमीनीशींग. आपल्या वाचकाच्या संदर्भात मी माझी तक्रार पूर्वीही मांडली आहे.

आपल्या वाचकांचा प्रॉब्लेम काय आहे. आपल्याकडे दोन प्रकारचेच वाचक आहेत, एक प्रोफेसरी टीकाकार आणि दुसरे न वाचणारे वाचक. असे वाचक ज्या मराठी समाजामध्ये आहेत; त्या समाजात लिहिण्याचे ब्लडी हार्ड वर्क केल्यानंतर सवाल उभा रहातो तो असा की, कुणासाठी हा खटाटोप? गेल्या दहा वर्षांत मराठीतील वाङ्‌मयीन अ‍ॅक्टीव्हिटीज खतम होत चालल्या आहेत. आणि त्याबद्दल कुणालाही चिंता आहे, असं मला वाटत नाही. प्राध्यापक मंडळी सबस्टॅन्टीव्ह लेखनाची जाणीवपूर्वक दाखल घेण्याचे टाळत आहेत. एक आघाडीची समीक्षिका कुठच्याही व्यासपीठावरून मराठी साहित्याबद्दल रोजचीच तक्रार करत असे- "या देशात विकासाची कामे वगैरे काही चाललंय? पण मराठी वाङ्‌मयात त्याचं दर्शन कुठे आहे?" मला तिला विचारावसं वाटलं- "होमसिक ब्रिगेड हे काय आहे?" पण मला वाटतं, तिला त्या तपशीलात शिरणे सोईचे वाटत नसावे. भाऊ पाध्यांची कादंबरी टाळणेच सोयीस्कर वाटत असावे. प्राध्यापकांची काय कथा! वृत्तपत्रे, दैनिके, नियतकालिके तर साहित्य समीक्षा अंगाबाहेर टाकू लागली आहेत. मराठीतील सर्वाधिक खपाच्या दैनिकाच्या संपादकाला मग भाऊ पाध्येच्या पुस्तकावर लिहिणे म्हणजे आपल्या दैनिकाच्या जागेचा अपव्यय वाटतो. हेमामालिनी किंवा अमिताभ बच्चन यांच्यावरील मजकूर पेईंग वाटतो. परत इतकी मराठी साहित्यविषयक तुच्छता बाळगूनही परत मराठी साहित्याच्या प्लॅटफॉर्मवर मिरवण्याची संधी ते सोडत नाहीतच! त्यातच टीव्हीसारख्या गोष्टीही मराठीतील पोटेंशिअल वाचकाला दूर नेत असतातच!

लिहावे लागते अश्या कुडकुडणा-या मॉर्गसारख्या जगामध्ये. मराठीमध्ये लिहिताना असेच म्हणावे लागते, "ही माझी भाषा आहे. मी सेलेबल असलो काय किंवा नसलो काय, मला निर्धार करून लिहिलेच पाहिजे. वैफल्य वाटून घेता कामा नये. शेंडी तुटो वा पारंबी तुटो. लिहिणे. दुसरं काही नाही! 'वासूनाका' आणि ' बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर' यापलीकडे मी काही लिहिलं आहे की नाही, हेसुद्धा आमच्या तथाकथित पोटेंशिअल रीडरला ठाऊक नसते. नाटके, टीव्ही, चित्रपट कथा- कुठचेच माध्यम आपण गाजवत नाही म्हणजे आपल्या अस्तित्वावरून या तथाकथित पोटेंशिअल रीडरने छेद मारलेला असतो. अर्थात या मुश्कील हालातमध्ये आपली जिंदगी कशी काटणार असे वाटत रहाते. पण तरीसुद्धा एक आशा नेहेमीच लेखकाला वाटावी लागते, आपण युनिक आहोत; आपण निवडलेला विषयही आगळा आहे. . . आय शल नेव्हर ट्राय टू अपील टू द रीडर व्हू हॅज लिटल ऑर नो टेस्ट बट बिग प्रिटेंशन्स! वन डे धिस रीडर इज गोईंग टू व्हॅनिश- आय सिन्सिअरली होप. अखेर लेखकाच्या सेलेबिलिटीची आपल्या समाजात कसोटी लागणार नसून या मिशनलेस समाजाच्या ससेप्टीबिलिटीची कसोटी लागणार आहे.

मिशनलेस सोसायटी इज अ थिंग आणि तिला सामोरे जाण्यात मला स्वारस्य वाटतं. हॅरॉल्ड रॉबिन्स स्टायलीने इथे तिथे चावे घेणे आणि अखेर एस्टॅब्लिश्ड व्हॅल्यूजना शरण जाणे मला मंजूर नाही. आयझॅक सिंगर म्हणतो ते मला यथातथाच वाटते. रिअल रायटर्स स्टे इन देअर इनव्हीरॉनमेंट- इन देअर कॉर्नर. मुंबईकर रहाणे आणि मुंबईकर म्हणून लिहिणे मला मंजूर आहे. एरव्ही माझे रूट्सही मुंबईतच आहेत. कुठच्याही ग्रामीण किंवा इतर समाजाशी नाते मला सांगता येणार नाही. अपघात म्हणून मी दिल्लीला जाईन (होमसिक ब्रिगेड), जंगलात फेरफटका मारीन (वणवा). परंतु मला मुंबईबाहेरच्या जगाबद्दल औत्सुक्य नाही.

मुंबईच्या जीवनाइतकाच लैंगिक संबंधही मी महत्त्वाचा मानतो. माझ्या 'डोंबा-याचा खेळा'पासून 'वॉर्ड नं. ७' पर्यंत माझ्या कादंब-यांमधून लैंगिक जीवनाचे दर्शन नॅचरली पेश केले गेले आहे. आपल्या समाजाच्या लैंगिक जीवनाबद्दल मी काय सांगावे. डॉ. लोहियांनीच आपला समाज लैंगिकदृष्ट्या विकृत आहे असे प्रतिपादन केले आहे. जर डॉ. लोहियांसारखा विचारवंत लैंगिक जीवनावरील भाष्य उघडपणे मांडतो तर ते मी 'वासूनाक्या'तून आणले तेव्हा अनेक प्रोफेसरी समीक्षकांनी, मला लैंगिक जीवनाशिवाय काही दिसतच नाही, अशी बोंबाबोंब केली होती. लैंगिक संबंध व न-संबंध, दोन्ही बाजू मी हाताळल्या आहेत. दुर्गाबाईंच्या मते या दोन्ही बाजू हाताळण्यातच लेखकाचे सामर्थ्य आहे.

मी 'वेडा' (एक सुन्हेरा ख्वाब) नावाची एक बलात्कार विषयावरील कथा माझी पत्नी शोशन्ना हीस वाचावयास दिली होती. ती वाचल्यानंतर शोशन्ना भयंकर अस्वस्थ. ते पाहून मला चित्रण यथार्थ असल्याचे समाधान झाले. लैंगिक चित्रणाचा आस्वाद वाचकांनी अलिप्तपणे घेतला तर ते खरे नव्हे. त्यामुळे वाचक अस्वस्थ झालाच पाह्यजे. तीच त्याची कसोटी होय. मीही हे चित्रण करताना खूपच अस्वस्थ होतो.


सेक्स ही दिलीप चित्रे म्हणतो त्याप्रमाणे एकच गोष्ट लिहिण्यासारखी आहे नि वाचण्यासारखी आहे. आपल्या एरव्ही अ‍ॅक्टीव्हिटीज खूप चालतात. परंतु अखेर आपल्या जीवनाचा ताळेबंद आपल्या लैंगिक जीवनातील यशापयशानेच होतो. मला वाटतं, कादंबरी किंवा कोणतेही लेखन या विषयाच्या संदर्भात असेल तरच ते वर्थ रीडिंग असते. मला ठाऊक आहे, सध्या लैंगिक विषयाकडे वाकड्या नजरेनं पहाण्याची लाट आली आहे. अरुण साधूसारख्या लेखकांना तर हा विषय हाताळताही येत नाही. (हे माझेच मत नाही, एका मोठ्या साहित्यिकाचेही मत आहे!) तरीसुद्धा तो मराठीतील अग्रगामी लेखक ठरतो. मराठी भाषेतच सेक्सशिवाय लिहिणारी माणसे मोठी होतात.
 
सेक्सवर लिहिण्यासारखे आपल्याला दर घडीला दिसून येते म्हणूनच आपण लिहीत आहे. मी सेक्सवरच लिहितो आणि त्याच्याबद्दल मला यत्किंचितही शरमेची बाब नाही. इंग्लंडमध्ये एका जुन्या जमान्यात सेक्स संबंधात स्त्री-पुरुषांना लाजा वाटत- ते त्यांचे लैंगिक संबंध हे कर्तव्यबुद्धीवर आधारलेले असत. मजा अशी की आज जुन्या जमान्याप्रमाणे आपल्या प्रोफेसरांसकट सेक्ससंबंधी टॅबू बाळगणारे लोक पाह्यले की माझ्या लक्षात येते- आपण काही आपल्या समाजासाठी लिहीत नसलो पाहिजे, याची खात्री पटते. सहाजिकच आपण सेलेबल नाही. वि. स. खांडेकरच निरनिराळ्या मुखवट्याखाली या भाषेत जन्म घेतात आणि आपण त्यांचे रोम्यांटिक, अलंकार-भारलेले सुखवस्तू व चमचमीत लेखन हीच त्यांच्या आस्वाद्यमान्यतेची सर्वश्रेष्ठ क्षमता म्हणावी लागेल. . .आय सिन्सिअरली होप, दे विल पास. मगच मला आपला लेखक म्हणवणारी पिढी जन्माला येईल.

Tuesday, October 5, 2010

काही फोटो

भाऊ पाध्ये
***


'वैतागवाडी'च्या तिस-या आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी शोशन्ना पाध्ये, भाऊ पाध्ये, बाबूराव चित्रे आणि भालचंद्र नेमाडे. (१९९५)


'भाऊ पाध्ये यांची श्रेष्ठ कथा' या पुस्तकाच्या कुठल्यातरी एका आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी दुर्गाबाई भागवत, भाऊ पाध्ये, शोशन्ना पाध्ये
भालचंद्र नेमाडे, यु. आर. अनंतमूर्ती, भाऊ पाध्ये, शोशन्ना पाध्ये. (भाऊंच्या वसईतल्या घरी)

(आरती साळुंके यांच्या संग्रहातून)

Friday, October 1, 2010

भाऊचा अखेरचा धक्का

- अशोक शहाणे

(भाऊ पाध्ये वारल्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ३ नोव्हेंबर १९९६ रोजी छापून आलेला हा लेख शहाण्यांच्या परवानगीने इथे.)

'अन् हा भाऊचा धक्का!' आपलं बोट धरून असलेल्या मुलाची भाऊ ओळख करून द्यायचा. 'तसं याचं आणखी एक नाव आहे. अभय. पण खरा हा भाऊचा धक्काच.'

तसा आणखी एक भाऊचा धक्का मुंबईत आहे बहुदा अजून. हा भाऊचा धक्का स्थावर. अन् बापाचं बोट धरून असलेला भाऊचा धक्का जंगम. एवढाच फरक.

हा झाला भाऊचा पहिला धक्का. अन् आता निदान परवा आपल्या पांगळ्या झालेल्या अंगानं एकदम अख्ख्या जगालाच- निदान मराठी जगाला- भाऊचा धक्का खावा लागला. तो बहुदा शेवटचाच. पण आपला तसाच नाही गेला. धक्का देऊनच गेला.

धक्के द्यायची भाऊची सवय तशी जुनीच. त्याची पहिली कादंबरी 'डोंबा-याचा खेळ' (कधी? साठ साली बाहेर पडली होती बहुतेक.) हा भाऊनं मराठी साहित्याला दिलेला पहिला धक्का होता. भाऊला पदरचे निम्मे पैसे घालायला लावून मॅजेस्टिकच्या कोठावळ्यांनी ती काढली होती. ही काहीतरी फार मोठी कादंबरी आहे वगैरे अर्थातच कोठावळ्यांना कल्पना असणं शक्यच नव्हतं. अन् मग त्यानंच का काय मराठीतल्या टीकाकारांचं पण लक्ष 'डोंबा-याच्या खेळा'कडे गेलंच नाही. कुणी फार मोठ्या उत्साहानं परीक्षण वगैरे लिहायच्या फंदात पडलंच नाही. भाऊचे निम्मे पैसे एकूण पाण्यात गेले.

वाचकांच्या या डोळे असून न दिसणा-या आंधळेपणामुळं कुणाच्या लक्षातच आलं नाही की 'डोंबा-याचा खेळ' ही मराठीतली पहिलीच 'मॉडर्न' कादंबरी आहे. तसं कविता लिहून मर्ढेकरांनी मराठीत एकदम 'मॉडर्न'पणा भिनवला होताच. पण कवितेत असल्या गोष्टी सोप्या जात असतील त्या मानानं. पण गद्य लिखाणात 'मॉडर्न' मनोवृत्ती आणणारं पहिलं पुस्तक म्हंजे 'डोंबा-याचा खेळ'च.

म्हंजे 'डोंबा-याचा खेळ'चा नायक युनियनमध्ये कामाला लागतो, त्याचा पहिला दिवस भाऊ एवढा अप्रतिम सांगून जातो. म्हंजे होत काहीच नाही. हा आपला जाऊन ऑफिसमध्ये बसतो. ब-याच वेळानं कुणीतरी येतं नि म्हणतं, चल, बाहेर जाऊन येऊ या. मग ते दोघं तिस-याकडं जातात. काही बोलतात. मग तिथनं आणखी एकाकडं. तिथं पण बोलणं होतं. मग आणखी एकाकडं. नि शेवटी परत ऑफिस. म्हंजे ही भटकंती, बडबड हेच काम. ऑफिसचं काम. रिकामपण हेच काम. हे भाऊनं सांगायच्या आधी मराठीत कुणाला ठाऊकच नव्हतं बहुतेक.

किंवा 'डोंबा-याचा खेळा'तलंच पक्षाचं अधिवेशन. स्वातंत्र्यानंतरची 'पब्लिक लाइफ'ची नस भाऊनं कशी काय बरोबर पकडली कोण जाणे.

पण हे असं फोडून सांगण्यात काहीच गंमत नाही. ही मास्तरकी आमच्या कॉलेजा-विद्यापीठातल्या मास्तरांनाच लखलाभ असो. खरं वर्म तर पुस्तक वाचत असताना आपसुकच भिडायला हवं. त्यातला आपसुकपणा गेला की सगळंच बदलतं.

अन् गंमत अशी होती की भाऊला कादंबरीच्या 'फॉर्म' वगैरेबद्दल अजिबात सोस नव्हता. तो नसल्यामुळंच कदाचित आमच्या टीकाकारांच्या नजरेतनं ती सुटली असेल. कारण तेव्हाचे दिवस 'फॉर्म'च्या बोलबाल्याचे होते. अन् भाषेचा पण तसा काही 'फील' भाऊच्या या कादंबरीत नव्हता. मग कोण लक्ष देणार?
 
आपला पहिला धक्का वाचकांनी लावून घेतलाच नाही, असं बघितल्यावर भाऊनं बारक्या लिखाणाला हात घातला. 'वासूनाक्या'च्या पहिल्या दोन गोष्टी, मला वाटतं ६१ साली. 'रहस्यरंजन'मध्ये छापून आल्या. नि मग तिसरी एक 'जत्रा' नावाच्या वार्षिकात. नि मग एकदम पुस्तकच. ते मात्र गाजलं. म्हंजे आचार्य अत्र्यांनी गाजवलं. त्यांना भाऊचा हा दुसरा धक्का बरोबर लागला होता. आरोप नेहमीचाच. अश्लीलपणाचा. तरी बरं, पुस्तकात ब-यापैकी 'मुद्राराक्षस' होते. म्हंजे 'पोलिसांचे लफडे मागे लागले की समजेल' असं गफलतीनं छापलेलं. मग सरकारपर्यंत पण धक्का पोचला. सरकारला साहित्यात काय गम्य असणार? वसंतराव नाईकांनी पुस्तक ग. दि. माडगूळकरांना वाचायला दिलं. माडगूळकरांनी ते वाचलं नि प्रकरण तिथंच मिटलं.
 
म्हंजे 'वासूनाक्या'चा पण धक्का लागला तो चुकीच्याच अंगानं. रस्त्यावर वेळ काढणा-या पोरांची भंकस म्हंजे काय प्रकार आहे, ते बघावसं कुणालाच वाटलं नाही. जास्तीत जास्त जमेची बाजू काय तर ही एक आतापर्यंत साहित्यात न आलेली मुंबई भाऊनं मराठीत आणली. एवढ्यावरचं भाऊची बोळवण केली गेली. हे परत त्याची पाठराखण करणा-यांकडनंच.
 
अर्थात मुंबई तेव्हासुद्धा अगडबंबच होती. अक्राळविक्राळसुद्धा. कदाचित आत्ताएवढी नसेल; पण तरी होतीच. मर्ढेकरांनी 'जिथे मारते कांदेवाडी, टांग जराशी ठाकुरद्वार' म्हणून एक कोपरा दाखवून ठेवला होताच; पण तेवढ्यानं काय होणार? पठ्ठे बापूरावांनी म्हटल्याप्रमाणं मुंबई खरोखरीची 'रावणाची दुसरी लंका' होती. 'वासूनाका' हा त्यातला एक नाका झाला, इतकंच.
 
अन् अर्थात साक्षात मुंबईवर लिहायचा भाऊचा अधिकार इतर कुणाहीपेक्षा जास्तीच होता. तो अगदी 'ओरिजिनल' मुंबईकर होता. पिढीजात. म्हंजे मुंबईची 'बाँबे' व्हायच्या कैक आधीपास्नं. जेव्हा मुंबईत फक्त कोळी मंडळी रहात होती नि त्यांनी नंतर आवर्जून बोलावून आणलेली, धार्मिक कृत्यं करायला उपयोगी पडणारी ही त्यांची उपाध्ये मंडळी. बस्. कोळ्यांची उपाध्येगिरी करणारे म्हणून हे पाध्ये. तर भाऊची मुंबई ही थेट बापजाद्यांपास्नंची मुंबई होती.

मुंबई काही झालं तरी भाऊमधनं काढता येण्याजोगीच नव्हती. म्हणूनच तर मग 'वैतागवाडी' आली, 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर', 'चांदी', 'राडा' सगळेच तर ह्या अवाढव्य मुंबईच्या बेढब चेह-याचे वेगवेगळ्या 'अँगल्स'मधनं घेतलेले 'क्लोजअप्स' होते. संकल्प सोडलेलं न् लिहून न झालेलं लिखाण पण मुंबईवरच बेतलेलं होतं. अर्थात कुणाही एका लेखकाला मुंबईला म्हणा की मुंबईसारख्या जगड्व्याळ शहराला कवेत घेता येण्याजोगं नसतच. इथंच कशाला, जगात कुठंही. कवी आपले बरे त्या मानानं छोटीछोटी चित्रं काढून ठेवतात. नारायण सुर्वे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नि अर्थातच नामदेव ढसाळ. मलिका अमरशेख पण. लेखक (म्हंजे गद्य लिहिणारे) त्या मानानं इतके नाही निघत. कदाचित ते बिचकत असावेत. मुंबई म्हंजे काही साधीसुधी चीज नव्हेच.

भाऊची भाषा तशी सरधोपट होती. नवे शब्द पाडायचा हव्यास त्याच्यात अजिबात नव्हता; पण भावलेली गोष्ट सांगायची हातोटी मात्र बरोब्बर होती. कुणी दोस्तोयेव्स्की व्हायची इच्छा बाळगणं म्हंजे भलतंच त्रांगडं. पण त्यापेक्षा छोटं कुणी भाऊच्या डोळ्यांसमोर नव्हतंच. अन् परवड तर भाऊच्या पदोपदी अनुभवाची गोष्ट. ट्रेड युनियन, कापडगिरणी, लिहिण्याची हातोटी आहे म्हटल्यावर वर्तमानपत्र. भाऊ कुठंही आनंदातच. 'प्रेस कॉन्फरन्स'ला नेऊन मित्रांना खाऊ घालणं हा परिपाठ.

अन् ह्यातच भाऊ सिनेमाला लागला. पेपरवाल्यांचे आपले कप्पे असतात एकेक. त्यात सिनेमाचा कप्पा भाऊच्या वाट्याला आला. अन् भाऊ पण त्याच्यात रामाला. भाऊच्या आधी काय नि नंतर काय, सिनेमाबद्दल- नि ते पण हिंदी सिनेमांबद्दल- असं कुणी म्हणता कुणीच लिहिलेलं नाही. तेव्हाही नि आत्ताही हिंदी सिनेमांबद्दल लिहायची धोपट पद्धत म्हंजे नाक उडवायचं. हिंदी सिनेमातलं सगळंच बेगडी. त्याचा काय 'सिरीयसली' विचार करणार, असा एकूण आविर्भाव. भाऊ ह्या वाटेला अजिबात फिरकला नाही. त्यानं कशी कोण जाणे पण हिंदी सिनेमाची नेमकी नसच पकडली. 'स्पिरीट' पकडलं. नि त्याचं 'सेलेब्रेशन' दर आठवड्याला आरंभलं. योगायोगानं तेव्हा सिनेमात भाऊला झपाटून टाकणारी माणसं होती. मेहमूद, किशोर, वहिदा, हेलन. मधुबाला अर्थात. पण मीनाकुमारी, नर्गीस वगैरे नाहीत. हिंदी सिनेमातली 'इन्स्टंट' करमणूक भाऊनं अचूक हेरली होती. त्यातला अमुक एक पैलू भाऊला जास्त भावत होता, अशातला भाग नव्हता. तो एकदम नाडीच पकडायचा. म्हंजे 'गाईड'मधलं 'आज फिर जिने की तम्मना है' कसं चांगलं होतं, हे त्याला आपसुक कळायचं. चालबील नाही, टेकिंग-बिकिंग नाही, वहिदाचा  अभिनयबिभिनय नाही, तर हे सगळं मिळून जे एक रसायन तयार व्हायचं, तिथं भाऊ एकदम भिडायचा. विश्लेषण वगैरे करत बसण्यात त्याला अजिबात स्वारस्य नव्हतं. 'भाऊ नंतर नंतर फार कमर्शियल लिहीत गेला' हे आपल्या औरंगाबादकर मित्राचं मत तो हस-या चेह-यानं 'एंजॉय' करत असल्यासारखा ऐकायचा. वैषम्य त्याला कधी शिवलं नाही. टीका कधी त्यानं अंगाला लावून घेतली नाही. सिनेमाबद्दलचं भाऊचं लिहिणं त्याच्या लेखी 'कमर्शियल' नव्हतंच. पगारापोटी लिहिलेलं असं ते राह्यलंच नाही. तो आपला मनापास्नंच लिहीत गेला. नि हिंदी सिनेमा हा काय 'फिनॉमेनन' आहे हे वेगवेगळ्या परींनी सांगत गेला. आता अशा लिखाणाची पुस्तकं काढायचा प्रघात नाही इतकंच. पण ह्याही लिखाणात भाऊ शंभर टक्के हजार आहे.

भाऊनं जन्मात कविता कधीच लिहिल्या नसतील. पण कोणत्याही वयात पोरपण जपायची युक्ती त्याला बेमालूम येऊन गेली होती. मुंबईतल्या रगडा-पॅटिसच्या गाड्या भाऊकरताच रस्त्यावर असतात असं वाटायचं. खाण्यापिण्यात त्याला अगदी लहान पोरासारखा 'इंटरेस्ट' होता. अन् खाण्यापिण्यातच कशाला अगदी हिंदी सिनेमासारख्या गोष्टीतसुद्धा. हे भाऊला जमून गेलं होतं. उपजतच.

आम्ही मराठी माणसं मुर्दाड आहोत. आमचा मख्खपणा एका ज्ञानेश्वरानं जात नाही, एका तुकारामानं जात नाही, एका साने गुरुजीनंसुद्धा जात नाही. भाऊ पाध्येनं तर तसा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. त्यामुळे भाऊचं लिखाण काय प्रतीचं होतं ह्याबद्दल आम्ही अडाणी राह्यलो असलो तर नवल वाटायचं काहीच कारण नाही. 'कधीकाळी कुठंतरी माझा समानधर्मा निपजेल' ही प्रत्येकच लिहिणा-याची आशा असते. अशी काही आशा भाऊ मागं ठेवून गेलाय का नाही कोण जाणे!
***
'लोकवाङ्‌मय गृहा'ने प्रकाशित केलेल्या 'नपेक्षा' या शहाण्यांच्या पुस्तकात हा लेख आहे.
***

Saturday, September 25, 2010

मराठी साहित्यातील 'मवाली' : भाऊ पाध्ये

मुलाखतकार- नारायण बांदेकर

('ललित'च्या एप्रिल १९८८च्या अंकातली ही मुलाखत)



भाऊ, तुमचा जन्म किती सालचा? कुठे झाला?
- २९ नोव्हेंबर, १९२६. दादरच्या पाध्येवाडीत.

तुमच्या बालपणाबद्दल, शिक्षणाबद्दल आणि आवडीनिवडीविषयी सांगाल का?
- प्रत्येक कुटुंबात एकतरी कानफाट्या असतो तसा पाध्ये कुटुंबात मी कानफाट्या होतो. माझे वडील मला 'बैल' म्हणायचे. यावरून माझं शिक्षण, बालपण याची कल्पना यावी. मी खादाड होतो, हा एक अपराध. साठीनंतर 'चवीने खाणारा भाऊ' म्हणून माझ्या बहिणीनं माझ्या खाण्यावर मल्लिनाथी केलेली पाहून म्हटलं, बालपणामधला निदान एक तरी अपराध आपल्या मंडळींनी माफ केला.

त्या वेळी तुमच्या डोक्यात ध्येयबिय होतं का?
- म्हणजे कधी? - अगदी लहान वयात शिवाजी किंवा टारझन होणं, हेच ध्येय. बेचाळीस साल उजाडलं नि आपण मॅड ऊर्फ ध्येयवादी झालो.
 
कॉलेजात तुम्हाला कोणकोण शिकवायला होते? त्या वेळी कोणी मोठे लेखक वगैरे तुमच्या बरोबर वाटे.
- मराठी विषयात म्हणाल तर प्रा. न. र. फाटक, प्रा. द. के. केळकर व प्रा. श्री. पु. भागवत. शिवाय अर्थशास्त्राचे प्रा. फर्नांडिस, वि. ह. कुलकर्णी आणि प्रा. परांजपे. . . माझ्या सहाध्यायांपैकी श्री. राम पटवर्धन, उमाकांत (बाळ) कामात, श्रीनिवास कोर्लेकर व आ. ना. पेडणेकर.

या वेळीच तुम्ही लेखनाला सुरुवात केली?
- या वेळी माझा संबंध लिहिण्याशी आला नाही; परंतु लिहिणा-या मित्रांबद्दल मला आकर्षण होते.

कथा कधी लिहायला सुरुवात केली? आणि पहिली कथा कुठं लिहिली?
- १९५० साली झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाबाबत मी प्रथम एक लेख 'नवयुग'मध्ये लिहिला. त्यानंतर स्वर्गीय दत्तू बांदेकर यांच्या प्रोत्साहनानं मी अधूनमधून 'नवयुग'मध्ये लिहीत असे.
 
'सत्यकथे'चे संपादक होण्यापूर्वी राम पटवर्धन तुमचे कॉलेजमेट होते. 'सत्यकथे'तील कथांच्या निवडीचं काम त्यांच्या हाती आलं त्याच वेळी तुम्ही एक कथा 'सत्यकथे'साठी पाठवली होती. परंतु त्यांनी ती साभार परत पाठवली. कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? कथा परत पाठवली म्हणून तुम्ही पुढं 'सत्यकथे'साठी कधीच लेखन पाठवलं नाही. उलट, 'सत्यकथे'च्या विरोधात राजा ढाले आणि लिटल मॅगझिनवाल्या दोस्तांना तुम्ही साथ दिलीत. हा 'सत्यकथे'वरचा राग म्हणून की प्रस्थापितांविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा म्हणून? -
- हमीद दलवाई त्या वेळी आमच्या कामगार संघटनेच्या कचेरीवर येत असे. माझी एक कथा त्याला पसंत पडली व तो ती रामभाऊंकडं घेऊन गेला. ती त्यांनी परत पाठवली. त्यानंतर 'वासूनाक्या'ची एक कथा रामभाऊंनी परत पाठवल्याचं आठवतं. दोन्हींची कारणं एकच दिली- या कथांचा 'गोळीबंद' परिणाम होत नाही. मी यामुळे रामभाऊंवर आकस धरला नाही. कथा परत आल्याच्या रागामुळे नव्हे- पण, राजा ढाले वगैरे माझ्या इतके जवळ होते की त्यांच्या प्रस्थापितांविरुद्धच्या लढाईमध्ये मी सामील झालो.
 
स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता?
- मी भाग घेतला नाही,- हे स्वातंत्र्य आणण्यासाठी माझा हातभार लागलेला नाही, ही किती समाधानाची गोष्ट आहे!

शोशन्ना कुठे भेटल्या? तुमच्या आणि त्यांच्या मैत्रीचं विवाहात रूपांतर कधी झालं? आंतरधर्मीय विवाह म्हणून तुम्हाला घरातल्यांकडून विरोध झाला का? मैत्रीण आणि पत्नी ही दोन नाती आजपर्यंत तुम्ही कशी जपली? त्याचं रहस्य काय?
- गिरणी कामगारांच्या चळवळीत. आम्ही १९५६ साली विवाह केला. चारपाच वर्षे उशीरच झाला. म्हणजे एवढी 'सेक्स-इअर्स' वाया गेली. घरातल्या मंडळींना मी विश्वासात घेतले नाही. काय झालं की, माझा वडील भाऊ रामचंद्र यानं आईच्या विरोधामुळं एका मुलीला फसवलं. या गोष्टीचा इतका मला धक्का बसला की घरातल्यांना विश्वासात घेणं बरं वाटलं नाही. शोशन्नाच्या घरातून विरोध झाला नाही. दादा कोंडके यांच्या शब्दांत 'मी सुंदर ज्यू मुलीशी लग्न केलं असतं- तर- मला ज्यू लोकांनी जिवंत ठेवलं नसतं!' माझ्या घरातल्या लोकांनी वरपांगी आमचं स्वागत केलं. परंतु त्यांचा माझ्यावर व शोशन्नावर राग होताच. शोशन्नाला हे कधीच समजलं नाही. पण माझ्या लेखी त्यांना पुरून उरणं हे एक ध्येयच बनलं. एरवी रहस्य वगैरे काही नाही.  
 
तुम्ही पदवीधर झाल्यानंतर युनियनचं काम करीत होता. कुणाच्या? 'डोंबा-याचा खेळ' ही तुमची पहिलीवहिली कादंबरी या काळातच लिहून झाली. ती तत्कालीन कामगार चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. त्यातला नायक-नायिका कुणाला समोर धरून लिहिलंत? गिरणी कामगारांचे प्रश्न आजही अनुत्तरीत का राहिले असं तुम्हाला वाटतं? आपल्या येथील युनियन्सचे नेते आणि त्यांची कार्यपद्धती यावर आपले मत काय?
- समाजवाद्यांच्या. गिरणी, रेलवे (अल्पकाळ), इंजिंनिअरिंग संघटनांत, सेवादलात असतानाच मी पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचं स्वप्न पहात होतो. 'डोंबा-याचा खेळ' लिहिण्यास निमित्त एक कार्यकर्ती ठरली. त्यात मी, शोशन्ना, राजा कुळकर्णी अशी अनेक पात्रं झिरमिरीत पडद्याकडे दिसतात. नावं घेणं मला उचित वाटत नाही. गिरणीधंद्याचं, कामगारांचं काय झालं आहे, हे खासदार दत्ता सामंतांनाच विचारायला हवं. सौदेबाजी व हिंसा या कामगार चळवळीच्या दोन कार्यपद्धती आहेत एवढं सांगितलं की पुरे. कामगारांनाही सौदेबाजीची आदत लागली आहे. म्हणजे पगारवाढ करून घेण्यासाठी डॉ. सामंत आणि शाळेमध्ये मुलाला प्रवेश हवा असला की शोशन्ना पाध्येनी वशिला लावायचा. हे कसलाच विचार करणार नाहीत. - अलिकडे फक्त दारूचे ते व्यवस्थित पाहतात.
 
'डोंबा-याचा खेळ', 'करंटा' या कादंब-या लिहिल्यानंतर 'वासूनाक्या'चं खूळ एकदम डोक्यात कसं काय शिरलं? काहीतरी करून समाजात सनसनाटी निर्माण करावी या हेतूनं की प्रामाणिकपणं समाजातील एका वखवखलेल्या व वेगळ्या संस्कृतीचं दर्शन वाचकाला घडावं म्हणून? खरंच, तुम्हाला समाजावर सांस्कृतिक आघात करायचा होता?
- 'डोंबा-याचा खेळ', करंटा'नंतर कामगार चळवळीच्या प्रादेशिक कादंब-या (हमीद दलवाईंचे शब्द) लिहिण्यात मला स्वारस्य नव्हतं. मुंबईतल्या अर्धशिक्षित तरुण पिढीकडं माझं लक्ष होतंच आणि त्यांच्यावर लिहावं म्हणून विचारही करत होतो. १९६० साली 'रहस्यरंजन' मासिकाच्या कथास्पर्धेच्या निमित्तानं त्या लिहिल्या गेल्या. समाजावर या कथांचा आघात झाल्यावर समजलं की, आपल्या या कथांमुळेही आपला ही महान सांस्कृतिक पाया असलेला समाज गडबडला आहे. मला फक्त कथा म्हणूनच त्या लिहायच्या होत्या.

'वासूनाक्या'वर हल्ला झाला; 'विष्ठावादी लेखक' म्हणून तुमची अवहेलना झाली. कुटुंबालाही दहशतीखाली वावरावं लागलं. हे तुम्ही सहन कसं केलंत? 'वासूनाक्या'च्या निमित्तानं विचारस्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झाला. विचारस्वातंत्र्याविषयीची तुमची नेमकी भूमिका कोणती? आपल्याकडील विचारस्वातंत्र्याचे बुद्धिवादी पुरस्कर्ते कधी कधी पक्षपाती आणि बदलती भूमिका का घेत असावेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिशिष्ट प्रकरणी तुम्ही कुणाची बाजू घेतली असती? का?
- 'दहशत' वगैरे मला वाटली नाही. मी आचार्य अत्र्यांच्या हल्ल्यानंतरही 'मराठा' दैनिकाच्या कचेरीवर हमीद दलवाईला भेटायला गेलो होतो. संपूर्ण महाराष्ट्र समितीची 'मराठा'मधील कचेरी शोशन्नाच सांभाळत असे. हां, प्रसिद्धीमुळं काही काळ भांबावलो हे खरं. विचारस्वातंत्र्याच्या बाबतीत माझी भूमिका हीच. कुठच्याही प्रकाशनावरील बंदीची मागणी केली नाही. कशाला हवी बंदी! इथं ब्ल्यू फिल्म्सही अनिर्बंधपणे पाह्यला जातात. बंदीची मागणी करायला जावी की परिणाम नेमका उलटाच होतो. रिडल्स प्रकरणी हीच गोष्ट सिद्ध झाली. कुठल्याही कारणानं कुठच्याही पुस्तकावर बंदीची मागणी न करणारा असा मराठी भाषेत बहुधा मी एकच लेखक असावा. आता दुर्गाबाईंबद्दल असं म्हणता येणार नाही. हा समाज काही बंदी घालून सुधारण्यासारखा नाहीच. उलट, 'तमस'च्या निर्मात्यासारखं बंदीचं नाटक व्हावं म्हणून काही लेखक, प्रकाशक प्रयत्नशीलही असतील.
 
'होमसिक ब्रिगेड' आणि 'धोपेश्वरकर' या कादंब-यांनी मराठी साहित्यात सर्वप्रथम अस्तित्ववादी कादंबरीचा पाया घातला. पण मुळात अस्तित्ववादाकडं तुम्ही वळलात कसे? दुस-या महायुद्धानंतर सार्त्र-कामू यांसारख्या प्रचंड ताकदीच्या प्रतिभावंत कादंबरीकारांनी पाश्चात्य साहित्यात अस्तित्ववादाचं रोपटं लावलं. त्यांचं साहित्य वाचून तुम्ही ते मराठी साहित्यात आणलं की मनातच त्याची सहजपणं जुळवाजुळव झाली? पाश्चात्य साहित्यिकांचे या संदर्भात संस्कार किती?
- अस्तित्ववादावर लिहिण्यास मी पात्र व्यक्ती नाही व अस्तित्ववादाचं मला ग्लॅमरही वाटत नाही. मी 'धोपेश्वरकर' व 'होमसिक ब्रिगेड' अगदी सहज सुचल्या म्हणून लिहिल्या. 'धोपेश्वरकर'वरील पाश्चात्य संस्कारावरून एक सांगतो. 'जॉनी बेमिंडा' या चित्रपटात एका असहाय्य मुलीवर झालेला बलात्कार पाहून मी डिस्टर्ब झालो आणि 'धोपेश्वरकर'मध्ये, तो रिफ्लेक्ट झालाय. एवढंच.
 
तुमच्या पूर्वसुरींपैकी तुमचे आवडते कादंबरीकार कोण? त्यांच्या लेखनाचा काही प्रभाव तुमच्या कादंब-यांवर पडला का? तुमच्या समकालीनांपैकी कोणते कादंबरीकार तुम्हाला आजही आवडतात आणि तोडीस तोड वाटतात? चालू पिढीत आशा बाळगावेत असे किती जण आहेत?
- मी लिहावयास सुरुवात केली तेव्हा मराठीतील चार चांगले लेखक कोण आहेत तेही मला सांगता आलं नसतं. रिचर्ड राईट या निग्रो लेखकाचं 'ब्लॅक बॉय' हे आत्मचरित्र वाचून मी लेखणी हातात घेतली. लिहिता लिहिता कोणी अशा प्रसंगी कसं लिहिलं आहे, यासाठी मराठी-इंग्रजी वाचू लागलो. दोस्तोव्हस्की व झोर्बा धी ग्रीक यासारखं अद्याप काही लिहिलं नाही. त्यामुळं काही लिहिल्यासारखं वाटत नाही. समकालीनांत 'कोसला' व 'बिढार' ह्या ग्रेट वाटतात. कोण चालू लेखक लिहितो हे ठाऊक नाही. . . . वाचन मर्यादित.

आतापर्यंत लिहून झालेल्या कादंब-यांत तुमची सर्वात उत्कृष्ट कादंबरी कोणती?
- 'वणवा'.
 
कादंबरी लेखनात तुम्हाला तुमची आढळणारी वैशिष्ट्ये कोणती?
- सेक्स! सेक्स! आणि सेक्स!

तुमच्या कादंब-यांवर समीक्षकांनी बरंच लिहून ठेवलंय. ही समीक्षा तुम्हाला न्याय देणारी आहे? आपल्या समीक्षकांबद्दल तुमचं काय मत आहे?
- दुर्गाबाई, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे यांनी मला चांगले उचलून धरले. माझ्याबद्दल जे लिहिले आहे त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. सौंदर्यवादी टीकाकारांनी मला समजूनच घेतले नाही. कदाचित मला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना मी 'सनसनाटी' लिहिणारा लेखक वाटलो असेन. आता पहा, आपले समीक्षक भारतात जी विकासाची वगैरे कामं होतात त्यावर लेखक लिहीत नाहीत, असं सर्रास म्हणत होते. मग माझी 'होमसिक ब्रिगेड' काय आहे? ही समजून-उमजून उपेक्षा की हे वाचतच नाहीत? पण मी एक तर दलित लेखक नाही की त्यांनी मला समजून घ्यावे म्हणून मी ;जोगवा' मागेन. दुसरे म्हणजे, मी फार उशिरा लिहिण्यास सुरुवात केली. जेव्हा मी आपल्या समाजाला 'रिजेक्ट' करण्याचा पूर्ण विचार केला होता. . . ज्या देशात उत्तर भारतीयांसारखी माणसं आहेत, त्या देशात काहीही होणार नाही अशा निष्कर्षाला मी येऊन पोहोचलो आहे. 
 
'ऑपरेशन छक्का' हे नाटक लिहिलंत. पण ते रंगभूमीवर आलेलं दिसत नाही. असं का?
- कुणास ठाऊक.

भाऊ, 'नवशक्ति' सोडल्यावर तुम्ही 'झूम' नावाचं सिने-पाक्षिक काढलं, ते कशासाठी? ते बंद कोणत्या कारणानं पडलं? मग पुढं नोकरी धरली का? नुसत्या लेखनावर मराठी लेखक जगू शकतो का?
- 'झूम' काढण्याचं प्रथम ठरवलं आणि मग मी 'नवशक्ति' सोडली. दिनकर गांगल या सद्गृहस्थांनी शैला बेल्ले नामक एका धनदांगड्या महिलेच्या उचलेगिरीच्या योजनेमध्ये मला अडकवून टाकलं. त्या बाईंनीही मला नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. पगारही सुरू केला. तत्पूर्वी जयवंत दळवींच्या सल्ल्यानं मी पु. रा. बेहेरे यांच्याबरोबर बोलून राजीनामा देण्याचं टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु बेहे-यांनी 'दळवी कोण?' अशी आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळं मी ज्यूनिअरच्या हाताखाली काम करण्यापेक्षा राजीनामा देण्याचं ठरवलं. परंतु 'झूम'चे दोन अंक प्रसिद्ध होताच बाईंनी अचानक आर्थिक मदत बंद केली. साहजिकच आम्ही अडचणीमध्ये आलो. या प्रकरणात दिनकर गांगल फारच डर्टी गेम खेळला. पुढं नोकरी कोणी दिली नाही. मराठी लेखनावर जगण्याचा विचार करणे, गिरणी संपातील कामगारांनी जगण्यासारखं आहे. आजच्या लेखकाप्रमाणे सेल्फ टॉर्चरचं भांडवल करून वाचकांसमोर सहानुभूतीचा जोगवा मागणं हे मला मंजूर नाही.
 
अर्थशास्त्रातले पदवीधर असूनही तुम्ही राजीनामा देईपर्यंत 'नवशक्ति'तच का राहिलात? आणि तेही तुटपुंज्या पगारात? 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' या प्रचंड खपाच्या, बड्या पगाराच्या आणि अधिक साहित्यिक वातावरण असलेल्या वृत्तपत्रात का गेला नाहीत? तिथल्या संपादकांची आणि तुमची वेव्ह-लेन्थ जुळली नसती म्हणून की पु. रा. बेहेरेंना सोडणं जमत नव्हतं म्हणून?
- माझं यापूर्वीच करीअर इतकं अस्थिर होतं की मी मोठ्या अपेक्षा बाळगणंच सोडून दिलं होतं. मी 'नवाकाळ'मध्ये होतो. बरं झालं, बेहे-यांनी मला 'नवशक्ति'त आणलं. नाहीतर मी तीन बाय दोनच्या बातम्या करत 'नवाकाळ'मध्येच पिचत राह्यलो असतो. 'वैतागवाडी'ला पारितोषिक मिळाल्यानंतर मला बराच आत्मविश्वास वाटू लागला. 'लोकसत्ते'बद्दल मला आकर्षण नव्हतंच. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये मला बोलावण्यात आलं नाही. (बोलावल्याशिवाय मी गेलो नाही कुठे) त्यांना माझी लेखनशैली आवडली नसती व मलाही त्यांची लेखनशैली आवडत नसे. ती भिकारच असं माझं मत आहे. 'सुनील गावस्करने १६ चौकार ठोकत ठोकत शतक झळकावले!' हे कुठचं मराठी? मला 'नवशक्ति'मध्ये चांगलंच स्वातंत्र्य होतं, त्यामुळे मी खूष होतो. पैसे मिळवण्यासाठी इतरत्र प्रयत्न चालले होते. मी 'चंद्रयुग', 'माणूस', 'सोबत'मध्ये लिहून कमावत होतो.
 
डॉ. लोहियांच्या विचारांनी तुम्ही नेहमी भारलेले असता. लोहियांशी तुमची मैत्री होती का? तुमच्यावर त्यांचा वैचारिक व भावनिक परिणाम झाला आहे का?
- डॉ. लोहियांच्या मानानं मी वयानं लहान होतो. डॉ. लोहिया या देशात पसरलेल्या अंधारात कंदील घेऊन उभा असलेला एकमेव माणूस आहे. त्या प्रकाशामुळं आपल्याला स्वच्छ दिसतं एवढंच. या देशात अंधारात कोणी वाट दाखवत नाही. सगळे वाटमारी करतात. डॉ. लोहियांचा खूप उपयोग होतो की आपल्याला!

लौकिकार्थानं तुम्ही समाजवादी लेखक. साहित्यानं समाजाचं उद्बोधन करावं असं तुम्हाला वाटतं का? साहित्यानं समाजात क्रांती घडवून आणता येईल?
- साहित्यानं का उद्बोधन करू नये?. . . अर्थात 'मनाचे श्लोक', 'दासबोध' लिहू नये हे कबूल. क्रांती जमत असेल तर मीही प्रिन्सिपल्स ऑफ मार्क्सिझम लिहीन. पण मी असेही मार्क्सिस्ट पाह्यले आहेत की बोलतात जहाल; पण खाजगी जीवनात गांडूसारखे वागतात. त्यापेक्षा झेपेल तेवढं लिहावं.
 
भारताचा माओ होऊन आपल्या इच्छेप्रमाणे क्रांती घडवून आणण्याचं स्वप्न तुम्ही बाळगलं होतं. ते का? त्याचं पुढं काय झालं?
- मला कोण माओ होऊ देईल? साधा लेखक झालो तरी मला कोणी विचारत नाही. एक गोष्ट, 'माओ' झालो तर राजीव गांधी, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, बाळ ठाकरे यांचं काय होईल, हे मात्र सांगता येणार नाही.

दलित साहित्याबद्दल व दलित साहित्यिकांबद्दल तुम्ही विचार करता का? दलित साहित्याला भवितव्य आहे? कोणकोणते दलित साहित्यिक तुम्हाला आवडतात?
- दलित साहित्याचा विचार करावाच लागतो. कारण, तो एक चर्चेचा विषय आहे. एक गोष्ट, टी.व्ही. संस्कृती आल्यापासून मध्यमवर्गीयांकडून साहित्याचं काही भलं होणार नाही हे निश्चित दिसू लागलं. अलीकडं पानतावणे यांनी म्हटल्याप्रमाणं दलितांनी दर्जाकडं लक्ष पुरवलं तर त्यांना भवितव्य आहे. बॅकग्राउंड आहे ना!
 
तुमचं जीवनविषयक काही तत्त्वज्ञान आहे का?
- तत्त्वज्ञान वगैरे काही नाही. चार्ली चॅपलिन, दोस्तव्हस्की, झोर्बा, डॉ. लोहिया, या सर्वांच्या मिश्रणामधून माझ्या डोक्यामध्ये एक रसायन तयार झालं आहे. मलाही रोमँटिसिझम आणि इंटेलेक्चुअलिझमही आवडत नाही. 'शिवास रीगल' यासारख्या दारूसाठी आपण आत्माही विकायला तयार आहोत.

तुम्ही एवढं कसदार लिहून मराठी साहित्यात फार मोलाची भर घातलीत. पण त्या प्रमाणात पैसा, प्रतिष्ठा आणि सरकारकडून मिळावा तितका मान तुम्हाला मिळाला नाही. त्याबद्दल खंत वाटते का?
- माझं नाव झालं आहे, तेवढं तरी कुणाचं झालंय! पैसा मिळाला नाही. 'जेल बर्ड्स'सारख्या कादंबरीवर सिनेमा काढण्यास आपले गांडू निर्माते धजत नाहीत, याची चीड आहेच. सरकारकडं मी कधीच गेलो नाही. जो डॉ. लोहियांना मानतो त्याच्याकडून ही अपेक्षा कशी करता?

'पुस्तक छापणे हा लेखक-प्रकाशक आणि धंदेवाईक टीकाकार यांच्यामधील 'चोर-शिपायांचा खेळ'च बनला आहे. पैसा मिळण्याची शक्यता असली तरी आमचे संपादक आणि प्रकाशक झारीतील शुक्राचार्याप्रमाणे ते उदक आमच्या हातापर्यंत पोहोचू नये, याची तजवीज करतच असतात' असे तुम्ही एके ठिकाणी विधान केलं आहे. असा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतला आहे का? तुमचे प्रकाशक तुमच्याशी कसे वागतात?
- प्रकाशन व्यवसायाचा स्टार्टिंग पॉईंट लेखक आहे. पण प्रकाशक त्याला कधी पैसे देतात? छापखानेवाले, कागदवाले वगैरे वगैरेंचे समाधान झाल्यावर. म्हणजे पैसे घेण्याच्या रांगेत लेखकाचा नंबर शेवटचा असतो. मला भेटलेल्या प्रत्येक प्रकाशकानं संपादकांनं असाच स्टान्स घेतला आहे की, आम्ही त्याला उभं करावं, सहाय्य करावं, प्रतिष्ठा मिळवून द्यावी. मग हा गणपतवाणी आपली माडी उभी करील. पण जर लेखक कठीण प्रसंगात सापडला तर. . . त्या वेळी त्याचा स्टान्स असा असतो की बार्गेनिंगमध्ये तुमच्या वाट्याचं काही असेल ते तुम्हाला मिळेल. 'वासूनाक्या'मुळं लाभलेल्या प्रसिद्धीपासून, मग प्रसिद्धीचा सवालच राह्यला नाही. त्यामुळं मला प्रकाशक-संपादकांशी फटकून राह्यला काहीच अडचण नव्हती. आणि मी तसाच वागतो. पण विवेक मोहन राजापुरेनं 'अभिरुची'चा दिवाळी अंक काढायला घेतला तेव्हा त्याला मी साहित्य फुकट दिलं, मल्लिकाला 'नंतर'साठी दिले. मी फरक करतो. मी प्रकाशक-संपादकांचे 'ब्लॅक लिस्ट' बनवली आहे.

तुम्ही हल्ली विनोदी लेखनाकडं वळलेले आहात. दोन वर्षांपूर्वी एका विनोदी कथेला पारितोषिकही मिळालं होतं. विनोदाकडं वळण्याचं कारण रुचीपालट की सिनेम्यावर लिहून लिहून तयार झालेल्या आयत्या मिष्कील व तीक्ष्ण खोचक शैलीने विनोदी साहित्यात चांगल्या विनोदाची भर पडावी म्हणून? की पु. ल., जयवंत दळवी, रमेश मंत्री, बाळ गाडगीळ, गंगाधर गाडगीळ या मातब्बर विनोदी लेखकांची जिरवावी म्हणून?
- मला विनोद आवडतो. चार्ली चॅपलिनला संपूर्ण पाह्यलाखेरीज मरायचं नाही अशी मी प्रतिज्ञा केली होती. पण विनोद करणं विनोदी अभिनयाप्रमाणं कठीण असावं असं समजून मी विनोदापासून दूर राह्यलो. पण विनोदी लेखकांनी चांगला विनोद केला तर (मिडल क्लास बायकांवरचा नसावा) तो मला का आवडणार नाही? आचार्य अत्र्यांचे जोक्स नेहमी आमच्या गप्पांमध्ये असतात. अश्लील जोक्स तर अतिशयच आवडतात. मी ज्या घरामध्ये जन्माला आलो त्या घरामध्ये हसण्यावर बंदी होती. माझा मोठा भाऊ रामचंद्र याला हसताही येत नाही. या परिस्थितीत आयुष्य गेल्यामुळं कॉन्फीडन्स नव्हता. काही वर्षांपूर्वी मी इंदूरला गेलो होतो. बरोबर मल्लिका ढसाळ, नितीन दादरावाला, सतीश काळसेकर होते. त्या प्रवासात मला मल्लिका म्हणाली, "भाऊ तुम्ही वाट चुकलात. खरं तर तुम्ही विनोदी लेखक व्हायचं!" त्यानंतर मला सुभाष भेंडेसारख्या लेखकानं विनोदी लेखासाठी पुरस्कार दिला. त्या वेळी चकितच झालो. अलीकडं 'मुंबई सकाळ'नं लेखनाची मागणी केली, तेव्हा आपण करावेच काही विनोदी लिहिण्याचे प्रयत्न, म्हणून होकार दिला. बरोबर क्रिकेट-सिनेमाही चालू ठेवला. नाहीतर स्तंभ कोसळायचा.
 
'वासूनाक्या'सारखं पुस्तक लिहिल्यावर वाचकांच्या मनात तुमची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण झालेली आहे. परंतु वास्तव जीवनात तुम्ही एक सभ्य, कौटुंबिक असल्याचं ऐकिवात येतं. म्हणजे तुमचं लेखन वास्तववादी की तुम्ही वास्तववादी? ही दाखवेगिरी का?
- 'वासूनाक्या'वरील आचार्य अत्र्यांच्या लेखात मला 'मवाली' म्हटलं व भटकळांनी बदनामीचा खटला करण्यास मला मदत करण्याचं आश्वासन दिलं. पण मला वाटलं, आचार्य अत्र्यांनी मला ही बेस्ट पदवी दिली. माझी वास्तव जीवनातील प्रतिमा का आली कुणास ठाऊक- मी घर उघड्यावर टाकलं नाही एवढ्यावरून-? बाकी सगळं केलं, (म्हणजे बाई, बाटली वगैरे!) मला वाटतं- माझा चष्मा, शोशन्नाचं सामाजिक कार्य आणि समाजवादी बॅकग्राउंड यामुळं ही गफलत झाली असावी. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण कॉलेज जीवनात काही मुलींनी मला खरोखरच 'मवाली' ठरवलं होतं!
***

वसंत सरवट्यांनी काढलेलं स्केच


भाऊ पाध्यांचं हे स्केच वसंत सरवटे ह्यांनी काढलेलं. जयवंत दळवी 'ठणठणपाळ' ह्या टोपण नावाने जे सदर 'ललित'मध्ये लिहायचे, त्यात भाऊंसंबंधीच्या मजकुराबरोबर हे स्केच प्रसिद्ध झालं होतं. 'ठणठणपाळ'मधली सदरं मॅजेस्टिक प्रकाशनाने पुस्तकरूपात काढलेयत.

Friday, September 24, 2010

१९६५ साली भाऊ

('ललित' मासिकाच्या 'स्वागत' या सदरात १९६५च्या मे महिन्यात प्रसिद्ध झालेला हा भाऊंचा मजकूर.)

नांव प्रभाकर नारायण पाध्ये. केव्हां तरी जो - तो मला 'भाऊ पाध्ये' म्हणूं लागला. तेंच नांव सुटसुटीत वाटलें म्हणून पुढें चालविलें. वय अडतीस. डोळ्याला चष्मा लागलाय, डोक्याची चांदी झाली आहे. शिक्षण बी. ए. - विषय अर्थशास्त्र.
कौटुंबिक जीवन : एकूण वैवाहिक जीवन वैतागाचें. पत्नी सौ. शोशन्ना पाध्ये (माजगांवकर). धर्माने बेने इस्त्राएल. संयुक्त समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्या. लेखक लोकांशी त्याच संबंध ठेवतात. त्यामुळें माझी त्यांच्या भुणभुणींतून सुटका होते. मुलें दोन- भाऊचा धक्का आणि वैतागवाडी.
आतां दै. 'नवशक्ती'मध्ये सहसंपादक. पूर्वी कारकून, मास्तर, कामगार कार्यकर्ता वगैरे उपद्व्याप झाले. खरे म्हणजे बेकार राहणेंच मला पसंत आहे.
प्रकाशित वाङ्मय : कादंब-या- डोंबा-याचा खेळ, करंटा, वैतागवाडी. अप्रकाशित- वासूनाका (कथासंग्रह). याशिवाय दोन कादंब-यांचे खर्डे आणि पॅगोडा आणि बेने इस्त्राएल समाजावरील कादंबरींचीं काहीं प्रकरणें लिहून तयार आहेत. मराठी साहित्यांत रोज भलीबुरी भर घातली जातेय, मीहि लिहितोंच आहें. त्यामुळें मराठी साहित्याची काय परिस्थिती होत असेल कोण जाणे! कसेंही असलें तरी मराठी साहित्याचे भलें किंवा बुरें घडत असता आपला हातभार हा लागला पाहिजेच.
राजकारणांत लुडबुड करण्याचा छंद. पूर्वी राजकारण सोडलें होतें, परंतु, डॉ. राममनोहर लोहिया या चक्रम माणसाच्या आकर्षणामुळे पुन्हा राजकारणांत पाऊल टाकलें. आतां हा असामी जोंपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत आपणहि राजकारणांत लुडबूड करत राहणार.
पी. टी. आय.चा टेलिप्रिंटर हा आवडता लेखक.
बीअर, टेबल-टेनिस आणि वहिदा रेहमान या आवडत्या गोष्टी. (दुर्दैवाने या तिन्ही गोष्टींपर्यंत माझा हात पोहोचूं शकणार नाहीं.) नावडत्या गोष्टी: जयप्रकाशांचे राजकारण, प्रा. गंगाधर गाडगीळ यांचे लिखाण आणि व्ही. शांताराम यांचे सिनेमे.
स्पर्धेस पुस्तक पाठविण्याच्या वेळी मी 'साधना'वाल्यांना  म्हणालों होतों कीं आपले तकदीर इतकें भिकार आहे की आपल्याला बक्षीस म्हणून कधीं मिळणारच नाहीं. परंतु, मार्च महिन्यांत कन्या राशीच्या भाग्यस्थानी गुरू आला होता. 'वैतागवाडी'ला बक्षीस हा बहुधा त्याचा परिणाम असावा. ठीक आहे. कपडे अगदींच फाटायला आले होते, तर नवे शिवतां येतील. परंतु म्हणून कांहीं जागेच्या प्रश्नाचा वैताग संपणार नाहीं. माझे कांही हितचिंतक म्हणतात कीं भावड्याला पुन्हा बक्षीस मिळतां कामा नये अशी तजवीज केली पाहिजे. त्यांना मी सुयश चिंतितो.

Thursday, September 23, 2010

दोन फोटो




भाऊंचे हे दोन भन्नाट
  फोटो  
'रुची'च्या एका अंकातले,
 देविदास बागूल  
यांनी काढलेले.
हा खालचा फोटो भाऊ 'नवशक्ति'च्या ऑफिसात बसलेले असतानाचा-

Sunday, August 29, 2010

'टीकास्वयंवर'मधला उतारा

- भालचंद्र नेमाडे

('टीकास्वयंवर' या 'साकेत प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या नेमाड्यांच्या पुस्तकातील 'मराठी कादंबरी' या प्रकरणातील हा भाऊंविषयीचा उतारा, नेमाड्यांच्या परवानगीने इथे.)

डोंबा-याचा खेळ (१९६०) आणि करंटा (१९६१) ह्या कामगार चळवळीच्या किचकट आशयापासून वणवा (१९७९) ह्या अत्याधुनिक उच्चवर्गीय जोडप्यांच्या अरण्यातल्या लैंगिक व्यवहारावर लिहिलेल्या कादंबरीपर्यंत आधुनिकतेचा विशाल आशय जिद्दीने, निर्व्याजपणे, कुठेही दांडी न मारता मांडणारे भाऊ पाध्ये ह्यांनी नव्या कादंबरीचा सर्वोत्त्कृष्ट आविष्कार केला. खुल्या संरचना मांडून नाना त-हेचे वास्तव आशय निवडून पाध्यांनी अभिरुचीचा नवा प्रांत निर्माण केला. त्यांची मुंबईची भाषाही त्यांच्या नव्या वास्तववादातूनच जन्मली. तिच्यात काव्यात्मकतेचा मागमूसही नसतो. 'पोट एकदम टायरसारखं गच्च झाल्यासारखं वाटलं मला.' (वैतागवाडी), 'गप्पा एमनी एम चाललेल्या', 'त्याचा आता सरकलाय त्या पोरीपायी' (वासूनाका)- अशा लोकांच्या वाक्प्रचारांनी ती निवेदन स्पष्ट करते. त्यांच्या कादंब-यांत नावापासून निवडीचे वास्तव द्रव्य सुरू होते. (धोपेश्वरकर, आझादचाचा, प्रियवंदा-मालविका-शर्मिष्ठा-आयव्ही-क्लारा, डाफ्या-मामू-धोश्या, इ. कोरेटा, फरी, इ. बॅम्फोर्ड-रोशन-नीलिमा इ.) पाध्ये हे मुळात समाजवादी नैतिकता असलेले गंभीर लेखक आहेत. (भुकेले आदिवासी जग विरुद्ध निव्वळ लैंगिक चाळे करणारी आधुनिक जोडपी- वणवा, स्त्रीमुक्ती- अग्रेसर, हिंदू जातीयता- वैतागवाडी, लग्नसंस्था, अनौरस संतती- बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर, वालपाखाडी नीतिमत्ता, वेश्यांबद्दल आदर- वासूनाका, इ.). कुठल्याही अन्य मराठी साहित्यिकांपेक्षा पाध्यांच्या कादंबरीत मुंबईबद्दल मातृभूमीसदृश प्रेम आहे, मुंबईतल्या सर्व समाजांबद्दल पोटतिडिकेचं प्रेम आहे. मुंबईतल्या भूगोलाला जिवंत उठाव मिळालेले आहेत. ही माणुसकीची दृष्टी मराठीत साने गुरुजींनंतर कोणात दिसत नाही. पाध्यांचे कोणतेही पात्र फ्लॅशबॅक तंत्राचा उपयोग करत नाही की स्वप्नरंजनात शिरत नाही. त्यांच्या गद्यशैलीलाही ह्यामुळेच जाडेभरडे भक्कम पोत आहे. ह्यातूनच वासूनाक्यावरच्या मवाली बेकार मुलांपासून अत्याधुनिक स्त्री-पुरुषांपर्यंत सर्व प्रकार कादंबरीत येणे शक्य होते. वालपाखाडीपासून मलबारहिलपर्यंतचे नैतिक जीवनही व्यक्त होते. ("तुम्हाला दारू प्यायची असेल तर प्या. नका पिऊ. तो तुमचा प्रश्न आहे." "उन्हे उलटली म्हणजे आमची कंपनी वुलन पँट्स चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. दुसरा धंदाच नव्हता. क्रिकेटचे अंग नव्हते की आर. एस. एस. मध्ये जाऊन 'दहिने रुख बाए रुख' करायला आम्ही भट नव्हतो.") चांगले जुने झाडाझुडांचे घर सोडून आधुनिक वसाहतीत फ्लॅट घ्यायला लावणारी बायको बॅरिस्टर धोपेश्वरकरला तुच्छ वाटते. ह्या जबर नैतिकतेचा परिणाम म्हणून राडा ह्या शिवसेनेवरच्या कादंबरीची संपूर्ण आवृत्ती कोणालाच वाचायला मिळाली नाही अशी गडप केली गेली. लैंगिकता हे आशयसूत्र असलेल्या कादंब-यांतूनही पाध्ये नैतिक मूल्यविचारच मांडत असतात.

Wednesday, August 25, 2010

फुल्याफुल्यांच्या वादग्रस्त वाङ्मयाचा जनक

- चंद्रकान्त पाटील

भाऊ पाध्येवर पुन्हा एकदा लिहायची वेळ आली आहे. भाऊ पाध्ये नावाचा एक श्रेष्ठ साहित्यिक, पत्रकार, चित्रपट समीक्षक आणि नव्या विद्रोही लेखकांचा आवडता हीरो दहा-पंधरा दिवसांपासून बॉम्बे इस्पितळातल्या पाचव्या मजल्यावर पाचशे तेवीस क्रमांकाच्या खोलीत विकलांग अवस्थेत पडून आहे. ज्यानं आयुष्यभर मुंबईचं दर्शन आपल्या सगळ्या साहित्यांतून वाचकांना करून दिलं, मुंबईच्या सगळ्या ठसठसत्या नसांना अचूक पकडण्याच प्रयत्न केला त्या भाऊला मुम्बईची नैतिकता व्यक्त करायची होती. कन्नमवारपासून अधोगतीला लागलेल्या मुंबईला गँगवॉरपर्यंत येतायेता पक्षाघाताचा झटका वाढतच गेला, आणि तो आपल्या सगळ्या लेखनातून प्रभावीपणे मांडू पाहणा-या भाऊलाच अर्धांगवायूचा झटका आला ही दैवदुर्विलासाचीच बाब आहे! भाऊची वाचा गेली आहे. एरवीही भाऊनं आपल्या वाचेचा आयुष्यात फारच कमी उपयोग केला होता, पण त्याचे पाय विकलांग झाले हे वाईटच झालं. ज्या अफाट मुंबईत भाऊ वणवण भटकत लहानाचा मोठा झाला, ज्यानं आयुष्याची सगळी वर्षं मुंबईच्या राज्यरस्त्यांवरून ते गल्लीबोळापर्यंत भटकण्यात घालवली त्या भाऊचा एक पाय गेला ही वाईटच गोष्ट झाली! डॉक्टर म्हणतायत् भाऊ बरा होईल, आणि तो बोलू लागेल, हिंडू-फिरू लागेल, आणि तो बरा होणं आवश्यक आहे. आम्ही सगळे, ज्यांच्यावर भाऊचं ऋण आहे कधीही न फिटणारं, त्याच्या ब-या होण्याची वाट पाहात आहोत, पण नुस्तं बरं होणं फारसं उपयोगाचं नाही. भाऊला लिहिता आलं पाहिजे. लिहिण्यासाठी पुरेसं सामर्थ्य टिकवता आलं पाहिजे- आणि मला खात्री आहे की भाऊची जगण्यावरची विलक्षण श्रद्धा आणि धैर्य त्याला पुन्हा लिहितं करील. त्याला स्वतःला संपूर्ण समाधान होईल अशी एक महान कादंबरी भाऊच्या डोक्यात आहे, किती तरी वर्षांपासूनच. भाऊची अदम्य जीविताकांक्षा नक्कीच त्याला तारून नेईल, आणि तो कादंबरी लिहीलच! आम्ही तिची वाट पाहात आहोत.

भाऊ पाध्ये या अफलातून माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. फिल्म क्रिटिक म्हणून जगत असताना त्यानं मायावी मुम्बईचं दर्शनी रूप पाहिलं, इम्पोर्टेड गाड्यांमधून फिरत पंचतारांकित हॉटेलांचं स्वर्गसुखही पाहिलं, पण भाऊ खडतर व्रत घेतल्यासारखा फुटपाथवरचा माणूसच राहिला. हे सगळं त्याच्या आतल्या एका प्रखर नैतिकतेमुळेच शक्य झालं. भाऊनं आपली व्यक्तिगत नैतिकता आत जपून ठेवली. वादळातून जाताना दिवा जपत न्यावा तशी. प्रस्थापित समाजातली खोटी दांभिक दिखाऊ नैतिकता चव्हाट्यावर मांडताना भाऊनं पददलितांची आणि फुटपाथवरून चालत जाणा-या सर्वसामान्यांची बाजू ताणून धरली. हे करीत असताना भाऊला अनेक धक्के खावे लागले, पण त्यानं सहजपणे, कुठलीही कुरकुर न करता, कुठल्याही व्रणाशिवाय, जखमांशिवाय ते सहन केले. एका परीनं हे भाऊचे धक्केच पुढं येणार्यांयना संरक्षक ठरले. भाऊचं महत्त्व असं शॉक अ‍ॅब्सॉर्बर म्हणून नक्कीच वाङ्मयीन संस्कृतीत मोलाचं आहे. त्यातून जसं अस्सल साहित्यकारांना सुरक्षित राहता आलं तसं कुठलीही नैतिक भूमिका न घेता प्रायोगिकतेसाठी विषयवासना उगाळणार्यात चंद्रकांत खोतांसारखे आमचे नकली मित्रही सुरक्षितपणे तरून गेले. भाऊचं अख्खं साहित्यच मागच्या-पुढच्यांनी आणि समकालिनांनी रफ-नोट्ससारखं वापरलं आणि त्यावर ते गब्बरही झाले. गब्बर सिंग म्हणून गाजले. भाऊचं मात्र काहीच झालं नाही- काही होण्यासाठी म्हणून भाऊनं हा खटाटोप केलाच नव्हता. त्याच्यामागे एक तीव्रतर यातनामय संवेदना होती, एक सहवेदना होती, विशाल मानवी करूणा होती, करुणेशिवाय भाऊसारखं लिहूनच होत नाही हे आम्ही भाऊकडूनच शिकलो. भाऊच्या वाङ्मयानं अनेक वाद झाले, वादळं उठली, भाऊनं खरं तर मराठीत पहिल्यांदाच फुल्याफुल्यांचं वादग्रस्त वाङ्मय निर्माण केलं. पण अशी वाङ्मयीन वादळं आणि वाङ्मयीन वाद क्षणजीवी असतात. वादळं ओसरल्यावरही आणि विसरल्यावरही अस्सल वाङ्मय मागे उरतंच. भाऊचं वाङ्मय उरलंच आहे आणि म्हणूनच भाऊच्या जवळ बॉम्बे हॉस्पिटलातल्या खोलीत रात्रंदिवस अनेक नवे लेखक, सहकारी आणि आत्मीय लोक बसून असतात, आणि भाऊच्या पत्नीला, शोषण्णालाही आधार देत असतात. भाऊकडून मी परतलो तेव्हा माझ्या एका तरूण मित्रानं सांगितलं, ‘‘भाऊला नामदेव ढसाळनं बॉम्बे हॉस्पिटलात दाखल केलं, मी रोज एक फेरी टाकतो, मलिका- नामदेव- अशोक- सतीश- मन्या- सुधाकर- प्रदीप- मुळे- भाऊचा मुलगा- सून- शोषन्नाचे नातेवाईक असे कितीतरी लोक कायम तिथं असतात, पण आज पंधरा दिवस होऊन गेले, एकही समाजवादी भाऊकडे फिरकलासुद्धा नाही. भाऊचे सोडा, निदान शोषन्नामुळे तरी-’’ अर्थात मला याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. भाऊसोबतचे सर्व समाजवादी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माहित आहेत, पण माझ्या त्या तरुण मित्राला अजून बरंचसं माहित व्हायचं आहे, म्हणून त्यावर मी भाष्य केलं नाही. वस्तुस्थितीच अशी आहे की जे लोक गेल्या पंचवीस-तीस वर्षांत समाजवादाकडेसुद्धा फिरकले नाहीत ते भाऊकडे काय जाणार. समाजवादाचं हृदय असणं आणि समाजवादाचे सदरे घालणं यातला फरक आपण ओळखायलाच हवा. भाऊच्या वयाला साठ वर्षं पूर्ण झाली तेव्हा भाऊच्या मुंबईपासून दूर वेरूळच्या लेण्यांजवळच्या एका निवांत आर्ट गॅलरीत आम्ही पंचवीस-तीस मित्रांनी भाऊची साठी अत्यंत अनौपचारिकतेनं आणि आत्मीयतेनं साजरी केली होती. त्या कार्यक्रमाची चक्रमुद्रित पत्रिका भाऊच्या दारावर अजूनही चिकटवलेली आहे असं शोषन्ना मला सांगत होती. भाऊच्या असंख्य चाहत्यांना त्यावेळी बोलवता आलं नाही याची हळहळ आम्हाला आहे. भाऊ लवकर बरा होईल, तो पुन्हा लिहू लागेल, त्याच्या हातून त्याची महाकादंबरी पूर्ण होईल, आणि त्याच्या सत्तरीच्या वेळी आम्ही प्रचंड मोठा सोहळा करू अशी आम्हा सगळ्यांची तीव्रतर इच्छा आहे, एवढंच तूर्त.
***
('साकेत प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या 'विषयांतर' या चंद्रकान्त पाटीलांच्या पुस्तकात हा लेख आहे.)

Wednesday, July 28, 2010

भाऊंचं एक चित्र


३०. १०. १९९६

रेखाचित्रकार - मनोज आचार्य




(आरती साळुंके यांच्या संग्रहातून.)

Monday, July 26, 2010

एक स्केच

भाऊंचं हे स्केच राजा ढालेंनी काढलंय. 'ललित'च्या एका अंकात छापून आलं होतं.

Tuesday, July 20, 2010

अग्रलेख

- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

('वासूनाका' प्रसिद्ध झाल्यानंतर आचार्य अत्र्यांनी दै. मराठामध्ये पुस्तकावर टीका करणारा अग्रलेख लिहिला. ह्या गाजलेल्या आणि पुस्तकाला 'गाजवणाऱ्या' अग्रलेखातला इथे प्रसिद्ध होतोय तो मजकूर 'वासूनाका सांगोपांग' ह्या डिंपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या आणि वसंत शिरवाडकरांनी संपादित केलेल्या पुस्तकातून घेतला आहे, त्यात अग्रलेखाचं शीर्षक दिलेले नाही, त्यामुळे पोस्टला नुसतं 'अग्रलेख' असंच म्हटलंय.
मूळ अग्रलेखाबरोबर भाऊंचा एक फोटो छापला होता, तो इथे दिलेला नाहीये, त्यामुळे त्या फोटोच्या संदर्भात अग्रलेखाची सुरुवात आहे हे समजून घ्यावे.)

हा बाजूला ज्याच्या चित्राचा ठसा आम्ही छापलेला आहे ना, त्याचे नाव प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये. त्याच्या चेहेऱ्यावरून तो चांगलाच मवाली दिसतोय. वासूनाका नावाचा एक कथासंग्रह लिहून ह्या इसमाने मराठी वाङ्मयात जी बीभत्स आणि गलिच्छ डाकूगिरी केलेली आहे, तिला तोड नाही. अशा तऱ्हेच्या हिडीस मवालगिरीला मराठी साहित्यात रथचक्रचे कर्ते श्री. ना. पेंडसे, चक्र बनविणारे जयवंत दळवी, माणूसचे लेखक मनोहर तल्हार, बाईविना बुवा बनलेले उद्धव शेळके आणि कोसलाचे निर्माते भालचंद्र नेमाडे ह्यांनी यापूर्वीच सुरुवात केलेली आहे. तथापि ह्या हिडिस बीभत्सपणावर जर सर्वांत कोणी किळसवाणा कळस चढविला असेल, तर तो भाऊ पाध्ये ह्याच्या वासूनाकाने. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताशी पैजा जिंकणारी आमची मराठी भाषा निर्माण केल्यानंतर गेल्या सात शतकांत ह्या मराठी भाषेत चांगले वाईट लिखाण करणारे पुष्कळ लेखक अन् कवी होऊन गेले. पण भाऊ पाध्ये ह्याच्यासारखा घाणेरडा कागदखराब्या ह्या महाराष्ट्रभूमीत आजपर्यंत कधई जन्माला आला नसेल. ह्याचा जन्म आपल्या मातेच्या कुशीत झालेला नसून, कोठल्या तरी बावनखणीच्या वा फोरास रोडच्या गटारात झाला असला पाहिजे, ह्याबद्दल आता आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. संडासात आपली लेखणी बुडवून भाऊ पाध्याने जेव्हा हे भयानक वासूनाका लिहिले, तेव्हा त्याची बोटे महारोगाने का झडली नाहीत किंवा त्याच्या मेंदूला कॅन्सर का झाला नाही, असे ते चोपडे वाचताना वाचकांना वाटू लागते. वासूनाका लिहिणाऱ्या लेखकाला आई नसावी. बहीण नसावी. बायको नसावी किंवा मुलगी नसावी असे वाटते. कारण, असे जवळच्या जिव्हाळ्याचे कोणी नातेवाईक त्याला जर असते, तर धंदेवाईक वेश्यांच्या दुकानांतसुद्धा जी भाषा त्यांच्या गिऱ्हाईकांना उच्चारण्याचे कधी धाडस होणार नाही, असा गटारबोलीत वासूनाका लिहिण्याचे धैर्य ह्या भाऊ पाध्याला कदापि झाले नसते. आम्हाला गंमत वाटते ती ही, की हा भाऊ पाध्ये पूर्वी साधारण बऱ्यापैकी लेखक होता. त्याने आमच्याकडेही पूर्वी थोडेसे लेखन केलेले आहे. आम्ही त्याला कधी पाहिले नसले किंवा त्याची व्यक्तिगत अशी काहीही माहिती आम्हाला जरी नसली, तरी आम्हाला परिचित असलेल्या त्याच्या पत्नीला तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी आम्ही स्वतः दीडशे रुपयांची मदत केलेली आहे. तोच भाऊ पाध्ये कालांतराने ज्ञानेश्वराच्या अमृतमधुर मराठी भाषेत मांजराचे मूत्र आणि कुत्र्याची विष्ठा कालवील असा त्यावेळी आम्हाला सुतराम् देखील संशय आला नाही. वासूनाका ह्या चोपड्याच्या अस्तित्वाची आम्हाला कालपरवापर्यंत जाणीवदेखील नव्हती. पण राजश्री मासिकाने त्या चोपड्यातील गलिच्छपणा आपल्या एका अंकात उघडकीस आणल्यानंतर, त्याकडे आमचे लक्ष वेधले. तेव्हा ताबडतोब आम्ही वासूनाका मागवून तासाभरात घाईघाईने ते वाचून टाकले. ते वाचून आमच्या सर्वांगाचा भडका उडाला. आमच्या निकटच्या मित्रमंडळींना त्यातले काही उतारे जेव्हा आम्ही वाचून दाखविले, तेव्हा ते तर हतबुद्ध झाले. ते उद्गारले, अशा तऱ्हेचे गलिच्छ पुस्तक मराठी भाषेत प्रसिद्ध कसे होऊ शकते?’ आम्ही त्यांना सांगितले की, अहो, भाऊ पाध्यासारख्या फोरास रोडवरच्या एखाद्या भडव्याने मराठी भाषेत काय वाटेल तो मात्रागमनीपणा केला असेल. पण ते बेवारशी पाप मुंबईच्या पॉप्युलर प्रकाशनसारख्या नामवंत आणि प्रतिष्ठित प्रकाशनकाने आपल्या अंगाखांद्यावर खेळवून लोकांच्या हाती ठेवण्याचा बेजबाबदार पागलपणा काय म्हणून करावा? भरबाजारात देहविक्रिय करणाऱ्या धंदेवाईक वेश्येला कुटुंबवत्सल गृहस्थाने आपल्या घरात हळदीकुंकवाला वा सत्यनारायणाला काय म्हणून बोलवावे? आमचे वाचक आम्हांला विचारतील की तुम्ही वासूनाका हे चोपडे हिडीस आहे, गलिच्छ आहे, बीभत्स आहे, असे घसा खरडून आतापर्यंत या अग्रलेखात जे सांगितलेत, त्याचा एखादा काही तरी पुरावा द्या की! तर त्याबाबत आम्हाला एवढेच सांगावयाचे आहे की ह्या वासूनाक्यातला काही बीभत्स भाग इतका हिडीस आणि गलिच्छ आहे की त्याचा सामान्य नामनिर्देश देशील करणे आम्हाला शक्य नाही. स्त्री जातीच्या शरीराच्या सर्व अंगोपांगाची आणि तिच्याशी होणाऱ्या पुरुषसंबंधांची साद्यंत वर्णने कधी एखाद्या शब्दात, एखाद्या वाक्यात वा टप्प्यात पुनःपुन्हा मिटक्या मारीत ह्या भाऊ पाध्याने केलेली आहेत. आई आणि बहीण ह्यांच्या संदर्भातल्या हिडीस शिव्यांची तर समग्र पुस्तकात खैरात केलेली आहे. भ्यांचोद, मादरचोद, आणि च्यायला ह्या शिव्या वाक्या वाक्यागणिक लेखकाने उधळलेल्या आहेत. भ्यांचोद ही शिवी तर आम्ही ह्या पुस्तकात दीडशे वेळा मोजली. अन् च्यायला सव्वाशे वेळा. ती मुलगी बारा ** ची आहे, तिचा ** फारच भरलेला किंवा टरारला होता, (फुल्या आमच्या). असली या चोपड्यातली महाबीभत्स शिमगा वाक्ये वाचताना वाचकांच्या माना शरमेने खाली मोडून पडतील आणि त्यांच्या मनात असाही विचार येऊन जाईल की ती वाक्ये भाऊ पाध्येच्या कुटुंबातील स्त्रियांच्या संदर्भाने कोणी तरी वापरावीत. हे चोपडे वाचून आमच्या सर्वांगाचा असा काही भटका उडाला की, केशवसुतांच्या जन्मोत्सव सभेत बोलताना ह्या भाऊ पाध्याला जोड्याने मारावयाला पाहिजे, असे आम्ही संतापाने म्हणालो. तेव्हा भाऊ पाध्येचे काही पाठीराखे त्याच्या मदतीला मोठ्या हिरीरीने धावून आले हे पाहून आम्हांला खरोखरच त्यांची कीव आली. भाऊ पाध्यांचे हे समर्थक काही सामान्य साहित्यिक नाहीत. मराठी साहित्यात ज्यांनी नावलौकिक आणि प्रतिष्ठा मिळवलेली आहे असे ते वजनदार आणि जबाबदार लोक आहेत. त्यांची नावेच सांगितली तरी पुरे. दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर आणि वसंत शिरवाडकर, ह्यांनी अनुक्रमे अभिरुची, महाराष्ट्र टाईम्स आणि वीणा ह्या नियतकालिकांत हा हिडीस वासूनाका अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचविलेला आहे. दुर्गा भागवत ह्या तर मराठी भाषेतल्या नामांकित लेखिका आहेत. अभिजात आणि शैलीदार लेखन करण्यात त्यांचा हात धरणारे मराठीत फारच थोडे लेखक किंवा लेखिका सापडतील. असे असून त्यांनी वासूनाकाची विष्ठा चिवडून चिवडून त्यातून एक गंधर्वसृष्टी शोधून काढली आहे. वासूनाक्यातल्या सर्व कथा पोरवयातच बिघडलेल्या माणसांच्या अतृप्त लैंगिक वासनेच्या आहेत. वासनेच्या भुकेचे बळी आहेत सारे. ते लोक उंडगे म्हणजे मनाचे दुबळे आहेत. ते दारूडे, व्यसनी व बीभत्स चलनी भाषा बोलणारे आणि लोकांची टिर्रेबाजी करणारे आहेत, असे कबूल करूनही दुर्गाबाईंनी, ह्या गुंडांच्या मनात स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल फार मोठा आदर असून तरुण, सौंदर्य, चारित्र्य व प्रेमळपणा या चार गुणांचा साज ह्या मवाल्यांनी आपल्याला मनातून पूज्य वाटणाऱ्या स्त्रीच्याभोवती चढविलेला आहे, असा अजब शोध लावलेला आहे. वस्तुतः कोणीही सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री हे वासूनाका चोपडे हातातसुद्धा धरणार नाही. पण ज्याअर्थी गटाराच्या घाणीत कोपरापर्यंत हात बुडवून दुर्गाबाई तो आपल्या नाकाजवळ नेऊन हुंगीत आहेत आणि हाताला गुलाबाचा वास येत असल्याचे त्या सोंग करीत आहेत, त्या अर्थी स्वरूपाच्या अभावामुळे दीर्घकालीन अविवाहित स्थितीत राहाणे आजपर्यंत त्यांना भागच पडल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या मनात भलभलते अविचार सध्या येत असावेत आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीचा, भावनेचा आणि अभिरुचीचा तोल ढळला असावा, असा तर्क करणे क्रमप्राप्त आहे. दुर्गाबाईंपेक्षा अधिक पोटतिडकीने तेंडुलकर ह्यांनी वासूनाक्याचे समर्थन केले आहे. त्यांनी वासूनाक्यातील काही नमुनेच आपल्या समालोचनात दिले आहेत. त्यातले काही नमुने येथे देण्यासारखे आहेत. १) उन्हे उतरली म्हणजे आमची कंपनी वुलन पँटस् चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. आम्हाला च्यायला मधुबालेसारखी पणती पकडणे शक्य आहे का?’ २) परवा संक्रांतीची गोष्ट. सकाळी तिचा भाऊ तिळगूळ घेऊन आला. त्याने मला चिठ्ठी दिली. भ्यांचोद काय काय लिहिलं होतं त्यांत! काय म्हणे मला फक्त तुम्ही हवेत. दुसरे कोणी नको! भ्यांचोद काय ती बडबडते!’ ३) साला हिच्याबरोबर दोन घंटे टाईमपास होतो आहे ना! ही सगळी हिरव्या नोटेची पावर!’
हे तीन उतारे वाचले म्हणजे वासूनाक्यामधील गुंडांना स्त्रीच्या इज्जतीबद्दल विलक्षण आदर वाटतो आणि त्यामुळे ह्या सर्व वर्णनात हृदयस्पर्शी उद्विग्नता वाटते असा शोध लावणाऱ्या विजय तेंडुलकरांचे डोके ठाणे येरवड्याच्या तज्ज्ञ डॉक्टरकरडून तपासून घ्यावे असेच वाटल्यावाचून राहणार नाही. वसंत शिरवाडकरांनी त्याच्यापुढे जाऊन वासूनाक्यातील गलिच्छ भाषेचे आणि अश्लीलतेचे बेशरमपणे समर्थन केले आहे. ते म्हणतात, ‘‘बकाल जीवनाचे प्रत्यंतर घडविण्यासाठी लेखकाने जर पांढरपेशी सुसंस्कृत भाषेचे माध्यम वापरले असते, तर त्याच्या आशयाचा अस्सलपणाच तो हरवून बसला असता. या बकाल बोलीत अर्वाच्यता भरपूर असली तरी तिचेही एक सामर्थ्य आहे. वासूनाक्यावरील बकाल जीवन (जे लेखकाने चितारले आहे) ते खरे आहे. आणि ते खरे असल्याचे तुम्हाला शंभर टक्के जाणवावे म्हणून लेखकाने ते तेथील चालू बोलीतून तुम्हाला सांगितलेले आहे. त्याची ही सत्यता हेच त्याचे समर्थन आणि तेच त्याचे आव्हान. वासूनाक्यात आचरट किंवा अश्लिल काही नाही. त्यात जे बीभत्स दिसते, ते काही लेखकाच्या डोक्यातले नाही. ते त्याच्या वर्ण्य विषय असलेल्या जीवना आहे. त्या जीवनात तसे असेल, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, आम्हाला ते पहावयाचेही नाही असा विश्वामित्री आविर्भाव ज्यांचा असेल त्यांच्याशी या मुद्द्याबाबत वाद घालणे व्यर्थच आहे!’’ वाङ्मय म्हणजे काय, वाङ्मयात भाषेचे स्थान काय किंवा वाङ्मयातील वास्तववादाचे स्वरूप आणि व्याप्ती काय असावी, ह्याची सुतराम माहिती नसलेल्या वसंत शिरवाडकरासारख्या एका मूर्ख, अडाणी आणि वेडगळ माणसाशी काय वाद घालावा?
फायनॅन्शल एक्सप्रेसमधे जे-वॉकर ह्या नावाने (कोणी आम्हांला सांगितले की अडाणेश्वर नावाचे मराठी लेखकच आहेत.) एका लेखकाने व्यक्तिशः आमच्याविरुद्ध हंबरडा फोडला आहे, की भाऊ पाध्येसारख्या युगप्रवर्तक (Epochmaking) कादंबरीकाराविरुद्ध लोकमत प्रक्षुब्ध करून आणि सरकारी कायद्याला चिथावून अत्रे हे त्यांचा निष्कारण बळी घेण्याच्या प्रयत्नात आहेत!’ म्हणून त्यांचे लोकांना असे आवाहन आहे की, त्यांनी वासूनाक्याकडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने पाहावे आणि सरकारला त्यांचे असे सांगणे आहे, की त्याने वासूनाक्यावर जर काही कारवाई केली तर ती अन्याय्य आणि अविचाराची होईल. वासूनाक्याकडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने कसे पाहावयाचे ते फक्त ह्या अडाणेश्वरांनाच माहीत! मग शौचकूपाकडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने का पाहू नये बरे?  ह्या गचिच्छ चोपड्यावर कायदेशीर कारवाई महाराष्ट्र सरकार काय करील ते काही आम्हाला माहीत नाही. कारण, सरकारच्या वाङ्मयीन सल्लागार मंडळींत दुर्गा भागवत किंवा अडाणेश्वर ह्यांचेच भाऊबंद घुसलेले आहेत. म्हणूनच गलिच्छ चोपड्यांना महाराष्ट्र सरकार सालोसाल पारितोषिके देते. झोपडपट्टींतल्या किंवा खालच्या थरांतल्या लोकांच्या जीवनाचे वास्तववादी वर्णन करण्याचा आव आणून लैंगिक महारोगाने सडलेले बरेचसे मराठी लेखक आजकाल अत्यंत बीभत्स आणि हिडीस लिखाण करून मराठी भाषेत नि साहित्यांत अक्षरशः मूत्र आणि विष्ठा कालवीत आहेत. अशा त्या लिखाणाचा बहुसंख्य सभ्य आणि सुसंस्कृत मराठी जनतेने शक्य त्या उपायांनी नायनाट करावा हाच इशारा तिला आम्ही देतो.
***
(दै. मराठा, अग्रलेख, दि. २४ एप्रिल १९६६)