Wednesday, July 7, 2010

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर

- दुर्गा भागवत

भाऊ पाध्ये यांची ही कादंबरी 'वासूनाक्या'हून अगदी वेगळ्या प्रकारची आहे. या कादंबरीत एकप्रकारची वेगळीच गती आहे. पण ती गती धावेसारखी व त्यातल्या त्यात वाटोळ्या धावेसारखी आहे. वाटोळी धाव घेरी आणणारी असते. हीच भावनेच्या अकाल सुसाट धावेनंतर येणारी ग्लानी भाऊ पाध्ये यांच्या कलामनाने अचूक हेरून तिचे आलेखन केलेले आहे.

अवनायकी कादंबरीत नायक असतो व नसतोही. अशा कादंबरीचे तंत्र कथानकप्रधान अगर पात्रप्रधान कादंबरीप्रमाणे ठरीव साच्यातले नसते. तरीपण एक अतीव शब्दातीत वैफल्य अशा कादंब-यांत हमखास आढळते. ते कलात्मक झाले तर त्या कादंबरीला तंत्र व आत्माही लाभतो. ती कलात्मकता तसूभर जरी ढळली तरी कादंबरी आकाराला येत नाही. मग राहातो तो फक्त योगायोगाने उत्पन्न झालेल्या घटितांचा कंटाळवाणा तपशील. भाऊ पाध्ये यांच्या या कादंबरीचे तंत्र तिच्या त्या तिरक्या पण वर्तुळाकार गतीत आहे, असे मी प्रारंभी म्हटले; परंतु ही आंधळी गती भावात्मक गती नव्हे, तर गतीचा आभास आहे, असे म्हटले तर ते जास्त योग्य होईल. आभास निर्माण करण्यास भावात्मक सत्याच्या आविष्कारापेक्षाही अधिक जाण लागते. ही जाण जीवनाच्या कलांपासून आपण सदाचेच व ही वंचना परिस्थितीने नव्हे तर आपल्यातल्याच आंतरिक पोकळीने निर्माण केलेली असते, हे विसाव्या शतकार्धानंतरच्या काळात नागर शिक्षिताला आपली नैतिक नपुंसकता जाणवल्याचे चिन्ह आहे व ते सत्य बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकराच्या जीवनातल्या दोनतीन वर्षांपेक्षाही कमी काळातल्या घटनांतून कादंबरीकाराने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भावात्मक व्यक्तिमत्त्व रेखाटणे फार कठीण असते. माणसातला बदबदीतपणा त्याच्याच तोंडून सत्य स्वरूपात वदवणे हे खचित सोपे नव्हे. आतापर्यंत जुन्या वळणाच्या कादंबरीत व्यक्तीला दुष्ट-सुष्ट तरी ठरवले जात असे किंवा सामाजिक उणिवांमुळे व्यक्तीचे बलिदान होऊन, माणूस दोषाकडे झुकत जातो, असे तरी मानसशास्त्रीय गणित असे. साहित्यिक न्यायदान या ना त्या रीतीने बरेचसे कथालेखक करीतच असतात. स्खलनाच्या कल्पनाबंधाला या बाबतीत फार महत्त्व असते. परंतु या कादंबरीत स्खलनाचे स्थान गौण आहे. फक्त लौकिकदृष्ट्या अनिरुद्धाच्या स्खलनाचे नाटक रचले गेले आहे. इथे आभासाच्या द्वारे वास्तवाला अवास्तव, व अवास्तवालाही साफ होमून शेवटी विफलतेची राख शिल्लक ठेवून, कायमच्या वर्तमानाच्या गूढ आवरणाचा पडदा पाडून अनिरुद्ध आपल्या नजरेआड होतो. मरून माणूस चितेत अगर थडग्यात जातो तेव्हा आपले त्याच्याबद्दलचे कुतूहल संपते. बायकोला कायमची टाळण्याच्या निमित्ताने अनिरुद्ध चालत्या गाडीतून उडी टाकतो. इथेच कादंबरी संपते. पण शेवट इतका झपकन आणि अचानक येतो की तो अनिरुद्धाचे आयुष्य न तोडता त्याच्या जीवनाचे स्वारस्यच कायम तोडतो असा भास निर्माण करतो. एकेरी अचानक व विपरीत घटना या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक घटनेच्या शेवटी एक धक्का येतो. तो धक्का अनिरुद्धाला बसत नाही. तो बसतो इतर पात्रांना व त्यामुळेच वाचकाला. हेच अनिरुद्धाच्या अनिरुद्ध सूत्रबद्ध भग्नतेचे दर्शन या कादंबरीत घडते.

या भग्नतेची कारणे आहेत; प्रत्येक भग्नतेला कारण असते, त्याप्रमाणेच. अनिरुद्ध दुबळा आहे हे उघडच आहे; पण त्याच्या दुबळेपणातही एक जिद्द आहे. त्यामुळे आपण त्याची कीव करू शकत नाही की त्याला वाखाणू पण शकत नाही. दुबळ्या व्यक्तीच्या आयुष्यात योगायोगाला फार महत्त्व असते, नव्हे ते आपोआपच येते. जिथे नायक दुबळा तिथे परिस्थिती बलवत्तर हे ठरलेलेच असते. माणूस व परिस्थितीचा संघर्ष दाखवताना अनेक घटना योगायोगानेच घडत असतात. पण त्या घटनेची सूत्रे व्यक्तींच्या परस्परसंबंधांतून अगर काही अपरिहार्य बाह्य कारणांमुळे निर्माण झालेली असतात. परिस्थितीसापेक्षत्व व परिस्थिती-संघर्ष या दोन्ही तंत्रांचा वापर कादंबरीकार बहुश: सढळपणे करता. पण भाऊ पाध्ये यांनी आभासाचे जे आगळे तंत्र वापरले आहे त्यामुळे या दोन्ही तंत्रांच्या सीमारेषेवर फार धूसरपणे कथावस्तू म्हणजेच अनिरुद्धाचे जीवन हेलकावते आहे. पण नवल हे की, हा हिंदकळा जाणवत असूनही अनिरुद्ध, आपल्यात जे स्थिर जीवनाचे भान तयार होते आहे, त्याला जपण्यासाठी सारे काही अशाश्वत, फोलपट समजून ते सुखाने सोडतो आहे. अर्थात हे त्याचे सुटे होणे अध्यात्मिक पातळीवरचे नाही हे खरे; तरी पण माणसाच्या जाण समजाच्या नि स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाच्या मुक्ततेच्या ध्यासाचे द्योतक खचित आहे. या कादंबरीची सुरुवात या मुक्ततेच्या धडपडीपासूनच होते नि शेवट चालत्या गाडीतून टाकलेल्या उडीत होतो. मुक्ततेची धडपड तीव्र असावी लागते. ही तीव्रता थोडक्यात घटनांचे निवेदन करण्यात आणि तेही अती अलिप्तपणे केल्यानेच प्रतीत होते.

हे संक्षेपी पण साक्षेपी लेखन भाऊ पाध्ये यांना जमले आहे. त्यामुळे गतिमानतेची जाणीव कुठेही भंगत नाही. कादंबरीची सुरुवातच भ्रमनिरासापासून झालेली आहे. पहिला व्यावसायिक सिद्धीचा. केसमध्ये अपेश अनिरुद्धाने जणू मुद्दाम घडवून आणलेले असते. दुसरा भ्रम पत्नीप्रेमाचा. कॉलेजातल्या सुंदरीवर कुणीही प्रेम करतो नि पैसेवाल्या हुशार पोरावर पोरी भाळतातच. पण व्यवहारी स्त्रिया असा भ्रतार मिळाला की चारी बाजूंनी व्यवहाराचे खोल खंदक खणून त्या त्याला अनेक संमोहनांनी काबूत ठेवतात. बहुसंख्य नागर, शिक्षित महिलांची ही सवंग मनीषा असते; त्या मनीषेचे उत्कृष्ट उदाहरण अगदी रोजच्याच घडामोडी घेऊन प्रियवंदेच्या स्वरूपात लेखकाने दाखविले आहे. प्रियवंदा सार्वजनिक महत्त्वाकांक्षेने भारलेली नाही. तरी पण त्या हव्यासाचा सोस तिच्या सामाजिक व खाजगी जीवनाच्या प्रत्येक हालचालीत भाऊ पाध्ये यांनी कौशल्याने दाखवला आहे. प्रथमच नव-याला बायकोच्या बाबतीत आलेला थंडपणा हा लैंगिक पातळीवरचा नसून सांस्कृतिक आहे, हे लेखकाने आपल्या साध्या, संक्षिप्त आणि तरल पद्धतीने निवेदन केले आहे. व्यावहारिक दृष्टीने पाहिले तर अनिरुद्धाचे मन बायाकोवरून उडायला, घण बसल्यासारखे उडायला जे कारण झाले ते फारच क्षुल्लक. तिने गोड गळा असून संगीताचा रियाझ सोडला, हे कारण कला-संवेदनालाच उमगाणारे आहे. लैंगिक सुख तिच्याकडून भरपूर व खुशीने मिळणारे असूनही या धक्क्यापासून अनिरुद्धाने नव्हे तर त्याच्या आत्म्यानेच घ्यायचे नाकारले. शरीर आत्म्याचे ऐकू लागले. त्याचे मन म्हणू लागले, "हे तू लाथाड! धिक्कार!--- त्याच्या आहारी गेलास तर स्वत:ला विकशील- स्पर्श केलास तर आत्मा गमावून बसशील!"

वकिली सोडण्याची घटना आणि कारण देखील अगदी थोडक्यात पण प्रभावीपणे लेखकाने मांडले आहे. 'निरागस' म्हणजे काय, हे भणंगपणाचे कुठलेही लक्षण त्यात येऊ न देता अगदी सामान्य माणसाच्या तोंडून योगायोगाच्या संकेताने मांडणे ही गोष्टच मुळी अपवादात्मक आहे. भाऊ पाध्ये यांनी अपवादाला श्रेष्ठ वास्तवाचे स्वरूप दिले आहे. आणि शिळी रांगोळी पुसावी तितक्या सहजतेने अनिरुद्धाने नाकारलेल्या व यद्दच्छेने स्वीकारलेल्या गोष्टी घोळ न घालता सरळ मांडल्या आहेत.

"अँबिशन्स- प्रगती- पुरुषाचं लक्षण- हे असलं भयंकर ती बोलते. म्हणून वैताग येतो. मी जबाबच देत नाही- मग, ती अधिकच चेकाळते." यात प्रियवंदा हीच अनिरुद्धाच्या मानसिक संघर्षाची पार्श्वभूमी झाली आहे; आणि ही पार्श्वभूमी लोकदृष्टया पूर्ण भावात्मक असूनही संपूर्ण अभावात्मक दाखवण्याचा कलात्मक प्रयत्न लेखकाचा आहे. अनिरुद्धाचे वडील हा प्रियवंदेच्या प्रतीकाचा पुरुषी टेकू. तितकाच गतानुगतिक; तितकाच दांभिक; पण व्यवहारी दृष्टीने पूर्ण निखोड असा.

या मानवरूपी पार्श्वभूमीशी मुकाबला करताना अक्षरश: सोंगाडी विनोद, व तोही अगदी बरड पातळीवरचा भाऊ पाध्ये यांनी वापरला आहे. अनिरुद्ध खोट्या मिश्या लावून व नकली पोशाख करून शेजारच्या बि-हाडात जातो. हशा पिकवतो. स्वत:चे हसे करून बायकोला व बापाला वैतागवतो. अशाच मिश्या लावून तो आयव्हीकडे जातो. पण तिथली प्रतिक्रिया वेगळी व खेळकर असते. तिथे ही गंमत गंमतच राहाते. पण गमतीतूनच पुढल्या विदारक घटना घडतात. हा विनोद भ्रमनिरास माणसाचे जे स्वरूप असते त्याच्या व्यावहारिक वृत्तीच्या विडंबनासाठी वापरलेला आहे हे उघड आहे.

आयव्हीला रायसाहेबांपासून गर्भ राहातो. पुढे जगाला तर राहोच, पण बापाला व बायकोला हे कर्तुत्व अनिरुद्धाचेच असा बावळट संशय येतो. पण हा काही त्याचे निराकरण करीत नाही. प्रथम वकिली सोडल्यानंतर वेळ जरा मजेत घालवावा म्हणून आयव्ही व क्लारा या दोघी मोलकरणीच्याच पेशातल्या, पण जरा शिकलेल्या अशा उनाड मैनांच्या सहवासात तो पत्ते खेळायला व मद्यपान करायला येतो. आयव्हीला गर्भपात करावा लागला तर ते घृणास्पद आहे, असे अनिरुद्धाला तीव्रतेने जाणवते, आणि प्रारंभापासून तिच्याबद्दल कुठलेही विशेष आकर्षण नसले तरी सामान्य स्नेहाच्या भूमिकेवरून तो तिचे मायावी नवरेपण नाकारतो. प्रियवंदेला मूल नसते, पण म्हणून हा मुलाच्या लालसेने आयव्हीला मदत करतो असेही नव्हे. पण तिला घेऊन तो सरळ मनमाडला चक्रपाणीकडे जातो. तिथे आयव्ही इस्पितळात बाळंतपणात मरते.
"प्रत्येक माणसाचं प्रेत मला असंच उद्ध्वस्त करत आलं आहे." असं म्हणतो. हे उद्गार फार बोलके आहेत. आयव्हीसारख्या अडचणीत सापडलेल्या गरीब मुलीला मदत करणे यात कुठलाही पुरुषार्थ आहे असे तो मानीत नव्हता. त्याचा उद्देश एवढाच की, केवळ अशाच कृत्यांनी विचारांचे निरर्थक कल्लोळ शांत होतील, "डोक्यातली विचारचक्रं थंड होतील. क्षणभर डोक्यात काहीच असणार नाही. कसलाच विचार, कसलीच जाणीव, कसलीही स्मृती- काही नाही. सारं रिकामं असेल- अगदी मशिदीच्या डे-यासारखं. सारं शून्य असेल-खोल-खोल- अंधारासारखं. अशा गूढ संवेदनांच्या अनुभूतीसाठी मी हपापलेला असतो. बाकी सगळा फालतूपणा. . . ." हाच अंधार आगगाडीतून उडी टाकलेल्या क्षणी त्याला गवसला. अनिरुद्धाच्या मनोरेखनातले हेच असाधारण यश.

तांत्रिकदृष्ट्या पाहिले तर चक्रपाणीची बायको, जनार्दन वगैरे पात्रे व त्यांच्याबद्दलचे निवेदन निरुपयोगी वाटते. जनार्दनाचे आयव्हीच्या मृत्यूनंतरच्या वागण्याचे वर्णन 'सानेगुरुजी टाईप' झाले आहे. जनार्दन पुढे प्रियवंदेबद्दलच्या, ती आई होणार असूनही कायम टिकलेल्या स्वत:च्या नावडीत, सामील करण्यापुरता उपयोगी पडतो. वेडा खरा शहाणा व शहाणा खरा वेडा असतो, हे तंत्र आता फारसे नवे राहिलेले नाही. हे टाळता आले असते व त्यामुळे कथानकात वैगुण्य राहिले नसते.
 
या कादंबरीचा गुण म्हणजे तिचे पूर्ण आधुनिकत्व. आधुनिकाची नाडी पकडण्यात भाऊ पाध्ये यशस्वी झाले आहेत.
***
(दुर्गाबाईंच्या 'आस्वाद आणि आक्षेप' या 'डिंपल पब्लिकेशन्स'ने प्रकाशित केलेल्या पुस्तकातून.)

पूर्वप्रसिद्धी: सत्यकथा, ऑक्टोबर १९६८.

No comments:

Post a Comment