Thursday, June 24, 2010

'राडा'ची प्रस्तावना

- भालचंद्र नेमाडे

भाऊंच्या 'राडा' कादंबरीच्या 'अक्षर प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या दुस-या आवृत्तीची प्रस्तावना नेमाड्यांच्या परवानगीने येथे प्रसिद्ध होत आहे.

भाऊ पाध्ये यांचं 'राडा'सारखं एकेक पुस्तक दुस-या-तिस-या आवृत्तीत येऊ लागल्याचा माझ्यासारख्या समीक्षकाला अत्यंत आनंद होतो. याचं कारण ते 'वासूनाका' लिहायला लागल्यापासून त्यांच्या डोक्यात एकामागून एक धाडसी कथानकं घोळत असतानापासूनचा मी या पुस्तकांचा साक्षीदार आहे. खरं तर भाऊ पध्यांच्या डोक्यात नेहमीच कादंबरी असे. रोज पाहिलेले मुंबईतल्या तळाशी घडत असणारे प्रसंग, ऐकलेले हिंसक संवाद, महानगरीय वास्तवातले दबावजन्य लैंगिक व्यवहार एकवटून त्यांची कथानकं आपोआप तयार होत असत. 'अमेरिकन वार्ताहर'च्या पाठको-या कागदांवर भराभरा उतरून काढलेली, विरामचिन्हांची शिस्त न पाळता मांडलेली त्यांची हस्तलिखितं माझ्या परीक्षेचा अभ्यास बाजूला ठेवून ताबडतोब वाचण्याइतकी मला प्रचंड आवडणारी होती. 'डोंबा-याचा खेळ' आणि 'करंटा' ही आमची ओळख होण्याआधीची त्यांची पुस्तकं मला अजिबात आवडली नव्हती. त्यामुळे नंतरच्या या हस्तलिखितांना मी ग्रेट म्हणताच भाऊ पाध्ये आपल्या कोंबड्याच्या पिसा-यासारख्या केसांवरून हात फिरवून संतोष प्रकट करी. मिळतील ते नवे-जुने प्रकाशक, वितरणाचे वांधे, त्यात अश्लील म्हणून बदनामी- अशा अनेक अडचणींमधून ही धाडसी पुस्तकं येत गेली. १९६०च्या सुमारास चटपटीत हुशार नवकथांच्या अतिवृष्टीच्या काळात मुक्त वास्तवता गुदमरवणारी फळी तोडणा-या आघाडीच्या लेखकांमध्ये भाऊ पाध्ये अग्रेसर होते. त्या काळातल्या ललित कलात्मक जातीच्या तलम, झिरझिरीत, कमकुवत रीतिवादी गद्याच्या कलाकुसरीला धुडकावणारं जाडंभरडं दणकट पोत त्यांनी बेदरकारपणे मराठी कथनशैलीत सुरू केलं. त्यामुळे ते फार मोठे लेखक ठरावे, असा आमच्या पिढीतल्या सर्वच लेखकांचा दावा आहे.

भाऊ पाध्ये यांचा दर्जा "जागतिक वाङ्‌मयात कायम मान्यता मिळावी असा आहे," असं रा. दिलीप चित्रे 'भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा' (लोकवाङ्‌मय गृह, १९९५) या लघुकथा संकलनाच्या प्रस्तावनेत म्हणतात. रा. श्याम मनोहर यांनी मराठी वाङ्‌मयीन संस्कृतीच्या आशयसूत्रावर लिहिलेल्या एका लघुकथेत वेगवेगळ्या थरांतल्या मराठी लोकांना "भाऊ पाध्ये कोण हे तुम्हाला माहीत आहे काय?" असे प्रश्न विचारून शेवटी कोणालाच त्यांची काहीही माहिती नाही असं दाखवलं आहे. फक्त एकच मित्र आनंदाने उद्गारतो, "हां, ते अश्लील लिहिणारे!" एवढंच. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या रा. राजन गवस यांच्या 'कळप' (शब्दालय प्रकाशन, १९९७) या कादंबरीत शाळेतला कारकून नायक ऑफिसात एकदा 'राडा' हेच पुस्तक वाचत असतो. त्यावरचं भडक चित्र पाहून हेडमास्तर ओरडतो;" इथे नोकरी करायला येतोस का असली घाणेरडी पुस्तकं वाचायला?. . . ही शाळा आहे. इथे बिनधास्त सेक्सची पुस्तकं वाचतोस?" आणखी एक उदाहरण : सुप्रिया जोशी यांच्या 'मराठीतील महानगरीय कादंबरी' या नुकत्याच मान्य झालेल्या पीएच.डी. प्रबंधात (शिवाजी विद्यापीठ, १९९७) असं विधान आहे- "भाऊ पाध्यांसारखा एखादाच लेखक विलक्षण ताकदीने महानगरीय समाजातल्या सर्व स्तरांतल्या व्यक्तिरेखा समर्थपणे चित्रित करताना आढळतो."

हे आजच्या वेगवेगळ्या वयोगटांतल्या गंभीर अभ्यासकांच्या भाऊ पाध्ये यांच्या कामगिरीसंबंधीचे ठळक नमुने अशासाठी दिले की एकाच वाङ्‌मयीन संस्कृतीतले साहित्यिक आणि सर्वसामान्य वाचक यांच्यात केवढी मोठी दरी पडली आहे हे सिद्ध व्हावं. विशाल वाचकवर्गाकडून भाऊ पाध्यांना मिळणारा प्रतिसाद त्या मानाने निराश करणारा ठरला, याची कारणं कोणती? ही दरी वाढत गेली की काय संकट कोसळतं याचं आपल्यासमोर घडलेलं मराठी सिनेमाचं उदाहरण मराठी लोकांना चांगलं परिचित आहे. भाऊ पाध्यांसारख्या सकस लेखकाचा स्वीकार मराठी वाचकांनी उत्साहाने करू नये- ही सर्वच साहित्यप्रेमी लोकांना चिंता करायला लावणारी बाब आहे. मराठी संस्कृती आपण समजतो तितकी एकजिनसी नसावी, असं निदान केलं तर मराठीला लागलेल्या एका रोगाची चिकित्सा सोपी होईल.

१९६० ते १९९६ या आपल्या काळातच या रोगाची मुळं असतील असं नाही. ती फार मागेही असतील. यात "लैंगिकतेबद्दल काही लिहू नये," असा एक मराठी वाङ्‌मयीन रिवाज भाऊ पाध्ये यांना सर्वाधिक भोवला. त्यांच्यासारखे ५-१० समर्थ लेखक पुढे आल्याशिवाय हा आपल्या साहित्याला लागलेला छुपा रोग बारा होईल, असं वाटत नाही. माधव ज्युलियन, बा. सी. मर्ढेकर या मोठ्या लेखकांनाही या ढोंगी उच्चभ्रूंच्या रोगाने सतावलं होतं. खरं तर जे लोक खाजगी आयुष्यांत लैंगिकतेने पछाडलेले असतात तेच लोक याविरुद्ध जाहीरपणे बोलत असतात. याची दोन उदाहरणं भाऊ पाध्ये यांच्याच संदर्भात घेतली तर प्रल्हाद अत्रे आणि शं. गो. तुळपुळे ही ठरतील. अत्रे यांनी तर 'मराठा'त दैनिक आघाडी उघडून खपाऊ मराठी वर्तमानपत्राचे माजलेले संपादक किती खालच्या पातळीत जाऊ शकतात या आजही चालू असलेल्या वृत्तपत्री गुंडगिरीचा एक पुरावा सादर केला. तुळपुळे यांनी 'रहस्यरंजन'मध्ये छापलेल्या भाऊंच्या एका गोष्टीत "अमुक पानावरचा अमुक शब्द सुसंस्कृतपणाला धरून आहे काय?" असं पत्र संपादकाला पाठवलं होतं. एकंदरीने अशा निंद्य चारित्र्याच्या ढोंगी संस्कृतीरक्षकांचा रोग मराठी साहित्यात वास्तव प्रकट होऊ देण्याचा प्रमुख अडथळा ठरला आहे. निदान अशा भंपक लोकांच्या हाती अभिरुची जोपासण्याची साधनं असू नयेत. कारण मराठी साहित्याचं भवितव्य यावर अवलंबून आहे. मराठीचं हे गलिच्छ सोवळं संपवण्यासाठी आज ना उद्या भाऊ पाध्ये संप्रदाय वाढणं निर्णायक ठरेल. 'राडा'ची ही दुसरी आवृत्ती मराठी वाचक गंभीरपणे वाचतील तर या दृष्टीने तेही महत्त्वाचं ठरेल.

सृजनशीलतेच्या मुक्त विकासासाठी आवश्यक अशा जाणवल्या त्या निषिद्ध गोष्टीसुद्धा बोलून दाखवणं हे धाडस भाऊ पाध्ये यांनी यशाची पर्वा न करता शेवटपर्यंत दाखवलं, यामुळे सर्वच नवे लेखक त्यांचा आदर करतात. दुर्दैवाने त्यांच्या एकूण साहित्यकृतींमध्ये उंच-सखलपणा फार आहे. परंतु त्यांच्या सर्वोत्कृष्ट कथा या प्रस्तुत काळातल्या सर्वोत्कृष्ट कथा ठरतात हे विसरता येत नाही. 'वासूनाका' (पॉप्युलर, १९६५), 'वैतागवाडी' (साधना, १९६५), बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर (पॉप्युलर, १९६७), 'अग्रेसर' (जी. एम. प्रभू, १९६८) या लागोपाठ आलेल्या कादंब-यांनी भाऊ पाध्ये यांच्या कथनशैलीचा उच्चांक गाठला.

मराठीच्या मध्यवर्ती अभिरुचीला हे आव्हान पेलवणारं नव्हतं, म्हणून या काळात दुसरी गोंजारता येतील आणि परवडतील अशी आव्हानं अधिक चर्चेचा विषय बनली. या निमित्ताने का होईना, मध्यवर्ती मराठी अभिरुची-संस्था थोड्या तरी उदार झाल्या, हे अपरोक्षपणे चांगलं घडलं.

'राडा' (पहिली आवृत्ती : फॉरवर्ड, १९७५; प्रस्तुत दुसरी आवृत्ती, १९९७) आपल्या राजधानीतल्या महानगरीय औद्योगिक जगात नैसर्गिकता हरवून बसलेल्या तरुण माणसाची लघुकादंबरी आहे. आर्थिक विकास लादल्या गेलेल्या भोगवादी वर्गातल्या वरवरून भरभराट होणा-या कुटुंबातली नाती कशी आपोआपच ठिसूळ होत जातात, याचं हे कथानक आहे. अशा शहरी संबंधांची भाऊ पाध्ये यांना अनेक उदाहरणं माहीत होती. या दबावात बिघडलेल्या तरुण पिढीचं त्यांना जबरदस्त भान होतं. ते त्यांच्या बहुतेक सर्वच कथा-कादंब-यांच्या बुडाशी असलेलं ध्यानात येतं. परंतु समाजशास्त्रीय तत्त्वचिंतन किंवा मनोविश्लेषणाची परिभाषा या दोन्ही गोष्टी त्यांच्या वृत्तीत नव्हत्या. असे सामाजिक दबाव कोणते विकार उत्पन्न करतात याचं व्यवहारातलं वर्णन करण्याचं अजब तंत्र त्यांनी स्वत: विकसित केलं आहे. त्यामुळे लैंगिकतेचे महानगरीय दबाव कशा अनैसर्गिक वर्तनातून प्रकट होतात हे त्यांनी न कचरता अस्सल लैंगिक भाषेतूनच मांडलं. आडदांड, आडमुठा मंदार हा प्रस्तुत लघुकादंबरीचा नायक मोजक्या दृश्य अशा सिनेमातंत्राने शेवटपर्यंत सुसूत्रपणे उभा करत आणला आहे. भिकार पटकथांवर सिनेमे काढणा-या मराठी सिनेमा निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना खरं तर ही अस्सल पटकथा वाटायला पाहिजे होती, परंतु हे लोक वर्तमानपत्रं फक्त वाचत असावेत. मुंबईच्या गल्लीबोळांतली, गुत्त्या-हॉटेलांतली, बागा-ऑफिसातली दृष्टिहर दृश्यं भाऊ पाध्यांच्या कथनातून स्फटिकासारखी अनेक वर्षांच्या निरीक्षणातून निर्माण झाल्याने अनेक पैलूंनी उमटत असतात. 'राडा'मधली सगळीच माणसं या महानगरी भोव-यात दिशा हरवून सरळ रस्ता गाठण्यासाठीसुद्धा आडरस्त्यांनी कुठलं तरी हेतुशून्य अंतर कापत एका नियोजित ठिकाणी पोहोचत असतात. हे नियोजित ठिकाण पाध्ये यांनाच फक्त दिसत असतं- ते म्हणजे या बेटावरच्या अत्याधुनिक नागरी संस्कृतीखाली दडपलेलं अराजक, वेगवेगळ्या सांस्कृतिक नावांखाली उदात्तीकरण केलेलं हे अराजकच इथल्या प्रत्येक पात्राचा शेवट ठरतो.

त-हेत-हेचे गुन्हे, अनैतिक धंदे, दु:ख, दारिद्र्य, लैंगिक अत्याचार, राडे, खूनखराबी, अशा वर्तुळांमधून हे अफाट अराजक बिनबोभाट फोफावत असतं. विकृती आणि कृती यांच्या सीमारेषा स्पष्ट नसल्यामुळे पोलीस आणि गुंड, जीव घेणारे आणि जीव देणारे, पिडणारे आणि पीडित, श्रीमंत आणि दरिद्री, उद्योजक आणि मजूर - हे सगळे एकाच पातळीवर सपाट करणारी मुंबई महानगरी हे पाध्ये यांचं वास्तवद्रव्य आहे.

'राडा' ही लघुकादंबरी असल्याने मंदार या तरुणाची तारुण्यातली बिघडलेली मनोदशा एवढंच एक सूत्र नीटपणे व्यक्त झालेलं दिसतं. यात पार्श्वभूमीवर अधूनमधून येणारी सुरुवातीच्या काळातली शिवसेना त्यामुळे पूर्ण प्रकारे चित्रित केलेली दिसत नाही. ठिकठिकाणी मुंबईत नैसर्गिकपणेच उगवणा-या गुंडापासून जनतेला उपद्रव होऊ नये म्हणून मराठीपणाचं अमोघ शस्त्र वापरणारी शिवसेनेची माणसं फुटपाथवरच्या मोडक्या-तोडक्या शाखांवर उत्स्फूर्तपणे जमत असत. आपलं अस्तित्व उमटवण्यासाठी मोर्चे, राडे अशी अनेक नवी प्रतीकं त्यांनी शोधली. थिएटरांमध्ये कोल्हापूरचा मराठी सिनेमा लावण्यासाठी हिंदी फिल्म बंद पाडणारे तेव्हाचे शिवसैनिक. "शिवसेनेला इमोशनल अपील आहे. पुढे-मागे तो ओसरला की तिची संयुक्त महाराष्ट्र समिती व्हायला वेळ लागणार नाही." तेव्हा शिवसेनेत बरं राहील असा उद्योजक सदानंदशेठला सल्ला देणारा प्रॉडक्टिविटी कौन्सिलचा डायरेक्टर एस. व्ही. भटसाहेब अर्थातच आज भोळसट वाटेल. दाक्षिणात्य विरोध, मराठीचं प्रेम, गुन्हेगारीविरोधी कार्यक्रम, सामान्य मराठी माणसांना या महानगरी अराजकात दिलासा देणारं नि:स्वार्थी संघटन ही शिवसेनेची त्या सुरुवातीच्या काळातली प्रतिमा आठवून आज मराठी लोकांची चांगलीच करमणूक होईल. 'राडा'चं आशयसूत्र लघुकादंबरीमुळे मर्यादित असल्याने हा भाग अर्थातच तुटपुंजा आलेला आहे.

'राडा'चं मुख्य केंद्र तरुणांची सृजनशीलता या महानगरी वातावरणात कशी आपोआप विकृत स्वरूप धारण करते हे आहे. कुठेतरी आपल्या मूलभूत सौंदर्यकल्पना छाटल्या जातात, मूल्यांची आपोआप खच्ची होते. मूळ स्वातंत्र्यशील असलेल्या आडदांड व्यक्तिमत्त्वाला हाकलत-ढकलत एका पूर्वनियोजित पिंजा-यात कोंडलं जातं आणि त्यात मिळेल त्या जागेवर हा पशू खोट्या ऐटीत येरझा-या घालत राहतो. 'राडा'च्या नायकाचा निरोगी उमदेपणापासून विकृत गुंडगिरीकडे आणि तिथून खुनाच्या सावलीतून विरेचन होऊन घुमजाव करत कुटुंबप्रणीत भौतिक विकासाकडे घडत आलेला हा प्रवास नवश्रीमंत घराण्यांमध्ये आपोआप घडतो. मध्येमध्ये पृष्ठझोताचं तंत्र टाकत भाऊ पाध्ये यांनी या दीर्घकथेत बरीच खोली आणण्याचा प्रयत्न केला आहे. या तारुण्यसुलभ बंडाचा उद्रेक होण्याची गरज या दृश्यांमधून घडते. घरामागचे सुंदर माड तोडून तिथे गोडाऊन बांधल्याने मंदारचं निरोगीपण उद्ध्वस्त होतं. मग तो शक्य तितका घराचा दुस्वास करत जातो. प्रेम, माया, बंधुभाव विसरून प्रत्यक्ष आई, बहीण, काकू या नात्यांचेही अर्थ नाहीसे होण्याइतका त्याच्या मनावरचा दबाव वाढत जातो. सृजनशीलतेला वाव नसल्याने दारू, नशा, कृत्रिम प्रेरणास्थानं वाढत जातात आणि ते अनैसर्गिक मार्गांनी आत्माविष्कार करत जातात. स्त्रीत्वाचं अवमूल्यन हा या सगळ्यातला सर्वात विकृत आविष्कार असतो.

'राडा'च्या सूत्रातून या महानगरी दबावाचं समर्थ वास्तव समोर येतं. भाऊ पाध्ये हे मुंबईचे एक मोठे इतिहासकार आहेत याचीही 'राडा' साक्ष देते.
***

No comments:

Post a Comment