Sunday, August 29, 2010

'टीकास्वयंवर'मधला उतारा

- भालचंद्र नेमाडे

('टीकास्वयंवर' या 'साकेत प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या नेमाड्यांच्या पुस्तकातील 'मराठी कादंबरी' या प्रकरणातील हा भाऊंविषयीचा उतारा, नेमाड्यांच्या परवानगीने इथे.)

डोंबा-याचा खेळ (१९६०) आणि करंटा (१९६१) ह्या कामगार चळवळीच्या किचकट आशयापासून वणवा (१९७९) ह्या अत्याधुनिक उच्चवर्गीय जोडप्यांच्या अरण्यातल्या लैंगिक व्यवहारावर लिहिलेल्या कादंबरीपर्यंत आधुनिकतेचा विशाल आशय जिद्दीने, निर्व्याजपणे, कुठेही दांडी न मारता मांडणारे भाऊ पाध्ये ह्यांनी नव्या कादंबरीचा सर्वोत्त्कृष्ट आविष्कार केला. खुल्या संरचना मांडून नाना त-हेचे वास्तव आशय निवडून पाध्यांनी अभिरुचीचा नवा प्रांत निर्माण केला. त्यांची मुंबईची भाषाही त्यांच्या नव्या वास्तववादातूनच जन्मली. तिच्यात काव्यात्मकतेचा मागमूसही नसतो. 'पोट एकदम टायरसारखं गच्च झाल्यासारखं वाटलं मला.' (वैतागवाडी), 'गप्पा एमनी एम चाललेल्या', 'त्याचा आता सरकलाय त्या पोरीपायी' (वासूनाका)- अशा लोकांच्या वाक्प्रचारांनी ती निवेदन स्पष्ट करते. त्यांच्या कादंब-यांत नावापासून निवडीचे वास्तव द्रव्य सुरू होते. (धोपेश्वरकर, आझादचाचा, प्रियवंदा-मालविका-शर्मिष्ठा-आयव्ही-क्लारा, डाफ्या-मामू-धोश्या, इ. कोरेटा, फरी, इ. बॅम्फोर्ड-रोशन-नीलिमा इ.) पाध्ये हे मुळात समाजवादी नैतिकता असलेले गंभीर लेखक आहेत. (भुकेले आदिवासी जग विरुद्ध निव्वळ लैंगिक चाळे करणारी आधुनिक जोडपी- वणवा, स्त्रीमुक्ती- अग्रेसर, हिंदू जातीयता- वैतागवाडी, लग्नसंस्था, अनौरस संतती- बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर, वालपाखाडी नीतिमत्ता, वेश्यांबद्दल आदर- वासूनाका, इ.). कुठल्याही अन्य मराठी साहित्यिकांपेक्षा पाध्यांच्या कादंबरीत मुंबईबद्दल मातृभूमीसदृश प्रेम आहे, मुंबईतल्या सर्व समाजांबद्दल पोटतिडिकेचं प्रेम आहे. मुंबईतल्या भूगोलाला जिवंत उठाव मिळालेले आहेत. ही माणुसकीची दृष्टी मराठीत साने गुरुजींनंतर कोणात दिसत नाही. पाध्यांचे कोणतेही पात्र फ्लॅशबॅक तंत्राचा उपयोग करत नाही की स्वप्नरंजनात शिरत नाही. त्यांच्या गद्यशैलीलाही ह्यामुळेच जाडेभरडे भक्कम पोत आहे. ह्यातूनच वासूनाक्यावरच्या मवाली बेकार मुलांपासून अत्याधुनिक स्त्री-पुरुषांपर्यंत सर्व प्रकार कादंबरीत येणे शक्य होते. वालपाखाडीपासून मलबारहिलपर्यंतचे नैतिक जीवनही व्यक्त होते. ("तुम्हाला दारू प्यायची असेल तर प्या. नका पिऊ. तो तुमचा प्रश्न आहे." "उन्हे उलटली म्हणजे आमची कंपनी वुलन पँट्स चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. दुसरा धंदाच नव्हता. क्रिकेटचे अंग नव्हते की आर. एस. एस. मध्ये जाऊन 'दहिने रुख बाए रुख' करायला आम्ही भट नव्हतो.") चांगले जुने झाडाझुडांचे घर सोडून आधुनिक वसाहतीत फ्लॅट घ्यायला लावणारी बायको बॅरिस्टर धोपेश्वरकरला तुच्छ वाटते. ह्या जबर नैतिकतेचा परिणाम म्हणून राडा ह्या शिवसेनेवरच्या कादंबरीची संपूर्ण आवृत्ती कोणालाच वाचायला मिळाली नाही अशी गडप केली गेली. लैंगिकता हे आशयसूत्र असलेल्या कादंब-यांतूनही पाध्ये नैतिक मूल्यविचारच मांडत असतात.

No comments:

Post a Comment