Showing posts with label maharashtra times. Show all posts
Showing posts with label maharashtra times. Show all posts

Friday, October 1, 2010

भाऊचा अखेरचा धक्का

- अशोक शहाणे

(भाऊ पाध्ये वारल्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ३ नोव्हेंबर १९९६ रोजी छापून आलेला हा लेख शहाण्यांच्या परवानगीने इथे.)

'अन् हा भाऊचा धक्का!' आपलं बोट धरून असलेल्या मुलाची भाऊ ओळख करून द्यायचा. 'तसं याचं आणखी एक नाव आहे. अभय. पण खरा हा भाऊचा धक्काच.'

तसा आणखी एक भाऊचा धक्का मुंबईत आहे बहुदा अजून. हा भाऊचा धक्का स्थावर. अन् बापाचं बोट धरून असलेला भाऊचा धक्का जंगम. एवढाच फरक.

हा झाला भाऊचा पहिला धक्का. अन् आता निदान परवा आपल्या पांगळ्या झालेल्या अंगानं एकदम अख्ख्या जगालाच- निदान मराठी जगाला- भाऊचा धक्का खावा लागला. तो बहुदा शेवटचाच. पण आपला तसाच नाही गेला. धक्का देऊनच गेला.

धक्के द्यायची भाऊची सवय तशी जुनीच. त्याची पहिली कादंबरी 'डोंबा-याचा खेळ' (कधी? साठ साली बाहेर पडली होती बहुतेक.) हा भाऊनं मराठी साहित्याला दिलेला पहिला धक्का होता. भाऊला पदरचे निम्मे पैसे घालायला लावून मॅजेस्टिकच्या कोठावळ्यांनी ती काढली होती. ही काहीतरी फार मोठी कादंबरी आहे वगैरे अर्थातच कोठावळ्यांना कल्पना असणं शक्यच नव्हतं. अन् मग त्यानंच का काय मराठीतल्या टीकाकारांचं पण लक्ष 'डोंबा-याच्या खेळा'कडे गेलंच नाही. कुणी फार मोठ्या उत्साहानं परीक्षण वगैरे लिहायच्या फंदात पडलंच नाही. भाऊचे निम्मे पैसे एकूण पाण्यात गेले.

वाचकांच्या या डोळे असून न दिसणा-या आंधळेपणामुळं कुणाच्या लक्षातच आलं नाही की 'डोंबा-याचा खेळ' ही मराठीतली पहिलीच 'मॉडर्न' कादंबरी आहे. तसं कविता लिहून मर्ढेकरांनी मराठीत एकदम 'मॉडर्न'पणा भिनवला होताच. पण कवितेत असल्या गोष्टी सोप्या जात असतील त्या मानानं. पण गद्य लिखाणात 'मॉडर्न' मनोवृत्ती आणणारं पहिलं पुस्तक म्हंजे 'डोंबा-याचा खेळ'च.

म्हंजे 'डोंबा-याचा खेळ'चा नायक युनियनमध्ये कामाला लागतो, त्याचा पहिला दिवस भाऊ एवढा अप्रतिम सांगून जातो. म्हंजे होत काहीच नाही. हा आपला जाऊन ऑफिसमध्ये बसतो. ब-याच वेळानं कुणीतरी येतं नि म्हणतं, चल, बाहेर जाऊन येऊ या. मग ते दोघं तिस-याकडं जातात. काही बोलतात. मग तिथनं आणखी एकाकडं. तिथं पण बोलणं होतं. मग आणखी एकाकडं. नि शेवटी परत ऑफिस. म्हंजे ही भटकंती, बडबड हेच काम. ऑफिसचं काम. रिकामपण हेच काम. हे भाऊनं सांगायच्या आधी मराठीत कुणाला ठाऊकच नव्हतं बहुतेक.

किंवा 'डोंबा-याचा खेळा'तलंच पक्षाचं अधिवेशन. स्वातंत्र्यानंतरची 'पब्लिक लाइफ'ची नस भाऊनं कशी काय बरोबर पकडली कोण जाणे.

पण हे असं फोडून सांगण्यात काहीच गंमत नाही. ही मास्तरकी आमच्या कॉलेजा-विद्यापीठातल्या मास्तरांनाच लखलाभ असो. खरं वर्म तर पुस्तक वाचत असताना आपसुकच भिडायला हवं. त्यातला आपसुकपणा गेला की सगळंच बदलतं.

अन् गंमत अशी होती की भाऊला कादंबरीच्या 'फॉर्म' वगैरेबद्दल अजिबात सोस नव्हता. तो नसल्यामुळंच कदाचित आमच्या टीकाकारांच्या नजरेतनं ती सुटली असेल. कारण तेव्हाचे दिवस 'फॉर्म'च्या बोलबाल्याचे होते. अन् भाषेचा पण तसा काही 'फील' भाऊच्या या कादंबरीत नव्हता. मग कोण लक्ष देणार?
 
आपला पहिला धक्का वाचकांनी लावून घेतलाच नाही, असं बघितल्यावर भाऊनं बारक्या लिखाणाला हात घातला. 'वासूनाक्या'च्या पहिल्या दोन गोष्टी, मला वाटतं ६१ साली. 'रहस्यरंजन'मध्ये छापून आल्या. नि मग तिसरी एक 'जत्रा' नावाच्या वार्षिकात. नि मग एकदम पुस्तकच. ते मात्र गाजलं. म्हंजे आचार्य अत्र्यांनी गाजवलं. त्यांना भाऊचा हा दुसरा धक्का बरोबर लागला होता. आरोप नेहमीचाच. अश्लीलपणाचा. तरी बरं, पुस्तकात ब-यापैकी 'मुद्राराक्षस' होते. म्हंजे 'पोलिसांचे लफडे मागे लागले की समजेल' असं गफलतीनं छापलेलं. मग सरकारपर्यंत पण धक्का पोचला. सरकारला साहित्यात काय गम्य असणार? वसंतराव नाईकांनी पुस्तक ग. दि. माडगूळकरांना वाचायला दिलं. माडगूळकरांनी ते वाचलं नि प्रकरण तिथंच मिटलं.
 
म्हंजे 'वासूनाक्या'चा पण धक्का लागला तो चुकीच्याच अंगानं. रस्त्यावर वेळ काढणा-या पोरांची भंकस म्हंजे काय प्रकार आहे, ते बघावसं कुणालाच वाटलं नाही. जास्तीत जास्त जमेची बाजू काय तर ही एक आतापर्यंत साहित्यात न आलेली मुंबई भाऊनं मराठीत आणली. एवढ्यावरचं भाऊची बोळवण केली गेली. हे परत त्याची पाठराखण करणा-यांकडनंच.
 
अर्थात मुंबई तेव्हासुद्धा अगडबंबच होती. अक्राळविक्राळसुद्धा. कदाचित आत्ताएवढी नसेल; पण तरी होतीच. मर्ढेकरांनी 'जिथे मारते कांदेवाडी, टांग जराशी ठाकुरद्वार' म्हणून एक कोपरा दाखवून ठेवला होताच; पण तेवढ्यानं काय होणार? पठ्ठे बापूरावांनी म्हटल्याप्रमाणं मुंबई खरोखरीची 'रावणाची दुसरी लंका' होती. 'वासूनाका' हा त्यातला एक नाका झाला, इतकंच.
 
अन् अर्थात साक्षात मुंबईवर लिहायचा भाऊचा अधिकार इतर कुणाहीपेक्षा जास्तीच होता. तो अगदी 'ओरिजिनल' मुंबईकर होता. पिढीजात. म्हंजे मुंबईची 'बाँबे' व्हायच्या कैक आधीपास्नं. जेव्हा मुंबईत फक्त कोळी मंडळी रहात होती नि त्यांनी नंतर आवर्जून बोलावून आणलेली, धार्मिक कृत्यं करायला उपयोगी पडणारी ही त्यांची उपाध्ये मंडळी. बस्. कोळ्यांची उपाध्येगिरी करणारे म्हणून हे पाध्ये. तर भाऊची मुंबई ही थेट बापजाद्यांपास्नंची मुंबई होती.

मुंबई काही झालं तरी भाऊमधनं काढता येण्याजोगीच नव्हती. म्हणूनच तर मग 'वैतागवाडी' आली, 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर', 'चांदी', 'राडा' सगळेच तर ह्या अवाढव्य मुंबईच्या बेढब चेह-याचे वेगवेगळ्या 'अँगल्स'मधनं घेतलेले 'क्लोजअप्स' होते. संकल्प सोडलेलं न् लिहून न झालेलं लिखाण पण मुंबईवरच बेतलेलं होतं. अर्थात कुणाही एका लेखकाला मुंबईला म्हणा की मुंबईसारख्या जगड्व्याळ शहराला कवेत घेता येण्याजोगं नसतच. इथंच कशाला, जगात कुठंही. कवी आपले बरे त्या मानानं छोटीछोटी चित्रं काढून ठेवतात. नारायण सुर्वे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नि अर्थातच नामदेव ढसाळ. मलिका अमरशेख पण. लेखक (म्हंजे गद्य लिहिणारे) त्या मानानं इतके नाही निघत. कदाचित ते बिचकत असावेत. मुंबई म्हंजे काही साधीसुधी चीज नव्हेच.

भाऊची भाषा तशी सरधोपट होती. नवे शब्द पाडायचा हव्यास त्याच्यात अजिबात नव्हता; पण भावलेली गोष्ट सांगायची हातोटी मात्र बरोब्बर होती. कुणी दोस्तोयेव्स्की व्हायची इच्छा बाळगणं म्हंजे भलतंच त्रांगडं. पण त्यापेक्षा छोटं कुणी भाऊच्या डोळ्यांसमोर नव्हतंच. अन् परवड तर भाऊच्या पदोपदी अनुभवाची गोष्ट. ट्रेड युनियन, कापडगिरणी, लिहिण्याची हातोटी आहे म्हटल्यावर वर्तमानपत्र. भाऊ कुठंही आनंदातच. 'प्रेस कॉन्फरन्स'ला नेऊन मित्रांना खाऊ घालणं हा परिपाठ.

अन् ह्यातच भाऊ सिनेमाला लागला. पेपरवाल्यांचे आपले कप्पे असतात एकेक. त्यात सिनेमाचा कप्पा भाऊच्या वाट्याला आला. अन् भाऊ पण त्याच्यात रामाला. भाऊच्या आधी काय नि नंतर काय, सिनेमाबद्दल- नि ते पण हिंदी सिनेमांबद्दल- असं कुणी म्हणता कुणीच लिहिलेलं नाही. तेव्हाही नि आत्ताही हिंदी सिनेमांबद्दल लिहायची धोपट पद्धत म्हंजे नाक उडवायचं. हिंदी सिनेमातलं सगळंच बेगडी. त्याचा काय 'सिरीयसली' विचार करणार, असा एकूण आविर्भाव. भाऊ ह्या वाटेला अजिबात फिरकला नाही. त्यानं कशी कोण जाणे पण हिंदी सिनेमाची नेमकी नसच पकडली. 'स्पिरीट' पकडलं. नि त्याचं 'सेलेब्रेशन' दर आठवड्याला आरंभलं. योगायोगानं तेव्हा सिनेमात भाऊला झपाटून टाकणारी माणसं होती. मेहमूद, किशोर, वहिदा, हेलन. मधुबाला अर्थात. पण मीनाकुमारी, नर्गीस वगैरे नाहीत. हिंदी सिनेमातली 'इन्स्टंट' करमणूक भाऊनं अचूक हेरली होती. त्यातला अमुक एक पैलू भाऊला जास्त भावत होता, अशातला भाग नव्हता. तो एकदम नाडीच पकडायचा. म्हंजे 'गाईड'मधलं 'आज फिर जिने की तम्मना है' कसं चांगलं होतं, हे त्याला आपसुक कळायचं. चालबील नाही, टेकिंग-बिकिंग नाही, वहिदाचा  अभिनयबिभिनय नाही, तर हे सगळं मिळून जे एक रसायन तयार व्हायचं, तिथं भाऊ एकदम भिडायचा. विश्लेषण वगैरे करत बसण्यात त्याला अजिबात स्वारस्य नव्हतं. 'भाऊ नंतर नंतर फार कमर्शियल लिहीत गेला' हे आपल्या औरंगाबादकर मित्राचं मत तो हस-या चेह-यानं 'एंजॉय' करत असल्यासारखा ऐकायचा. वैषम्य त्याला कधी शिवलं नाही. टीका कधी त्यानं अंगाला लावून घेतली नाही. सिनेमाबद्दलचं भाऊचं लिहिणं त्याच्या लेखी 'कमर्शियल' नव्हतंच. पगारापोटी लिहिलेलं असं ते राह्यलंच नाही. तो आपला मनापास्नंच लिहीत गेला. नि हिंदी सिनेमा हा काय 'फिनॉमेनन' आहे हे वेगवेगळ्या परींनी सांगत गेला. आता अशा लिखाणाची पुस्तकं काढायचा प्रघात नाही इतकंच. पण ह्याही लिखाणात भाऊ शंभर टक्के हजार आहे.

भाऊनं जन्मात कविता कधीच लिहिल्या नसतील. पण कोणत्याही वयात पोरपण जपायची युक्ती त्याला बेमालूम येऊन गेली होती. मुंबईतल्या रगडा-पॅटिसच्या गाड्या भाऊकरताच रस्त्यावर असतात असं वाटायचं. खाण्यापिण्यात त्याला अगदी लहान पोरासारखा 'इंटरेस्ट' होता. अन् खाण्यापिण्यातच कशाला अगदी हिंदी सिनेमासारख्या गोष्टीतसुद्धा. हे भाऊला जमून गेलं होतं. उपजतच.

आम्ही मराठी माणसं मुर्दाड आहोत. आमचा मख्खपणा एका ज्ञानेश्वरानं जात नाही, एका तुकारामानं जात नाही, एका साने गुरुजीनंसुद्धा जात नाही. भाऊ पाध्येनं तर तसा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. त्यामुळे भाऊचं लिखाण काय प्रतीचं होतं ह्याबद्दल आम्ही अडाणी राह्यलो असलो तर नवल वाटायचं काहीच कारण नाही. 'कधीकाळी कुठंतरी माझा समानधर्मा निपजेल' ही प्रत्येकच लिहिणा-याची आशा असते. अशी काही आशा भाऊ मागं ठेवून गेलाय का नाही कोण जाणे!
***
'लोकवाङ्‌मय गृहा'ने प्रकाशित केलेल्या 'नपेक्षा' या शहाण्यांच्या पुस्तकात हा लेख आहे.
***

Monday, July 19, 2010

'वासूनाक्या'बद्दल

- विजय तेंडुलकर

('वासूनाका' प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू झालेल्या वादादरम्यान तेंडुलकरांनी 'वासूनाका'बद्दल 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये लिहिलेला हा लेख. 'वासूनाका सांगोपांग' ह्या डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या आणि वसंत शिरवाडकरांनी संपादित केलेल्या पुस्तकातून हा मजकूर घेतला आहे. तिथे ह्या लेखाचं शीर्षक दिलेलं नाही, म्हणून नुसतं ''वासूनाक्या'बद्दल' असं म्हणून ठेवलंय.)

१९६१च्या एका वाङ्मयीन आणि नव्याच दिवाळी अंकात ‘धमाल’ नावाची एक कथा प्रसिद्ध झाली; आणि साहित्यात रस घेणाऱ्या, साहित्याविषयी आस्था असणाऱ्या अनेकांना तिने धक्का दिला, सुन्न केले आणि मग विचार करायला लावले.
या कथेने धक्का दिला तो तिच्या विषयापेक्षा तिच्या शैलीने. नेहमीहून पार वेगळ्या, विक्षिप्त आणि सद्भिरुचीच्या रूढ व्याख्येला पूर्णतया सोडून अशा या ‘त्रेपन्न टिकल्यां’च्या भाषेने मी मी म्हणणाऱ्या वाचकांना गोंधळवून टाकले. अनेक चुकीचे, अशुद्ध इंग्रजी वाक्प्रचार, पूर्णतया अपरिचित असे सूचक मराठी शब्द, शब्दप्रयोग आणि काही वेळा सरळ सरळ गचिच्छ शब्द आणि वाक्ये, यांनी भरलेल्या या भाषेचे त्या आधीच्या कोणत्याही ललितकृतीतल्या कोणत्याही भाषाशैलीशी नखाएवढेही साम्य नव्हते.
ही भाषा आली होती ‘वासूनाक्या’वरून. ‘वासूनाके’ मुंबईमध्ये जागोजाग होते. त्यावरचे डाफ्या, पोक्या, मामू येताजाता सभ्य आणि सुसंस्कृत मराठी वाचकाने ऐकले-बघितलेही असतील. परंतु ही मनस्वी संकोच आणणारी भाषाशैली आणि ही माणसे वाङ्मयाच्या प्रतिष्ठित पीठावर ‘धमाल’च्या निमित्ताने प्रथमच येऊन बसत होती.
एवढ्या एका कथेपुरतेच हे थांबेल अशी अपेक्षाही खोटी ठरली आणि पुढल्याच वर्षीच्या आणखी एका दिवाळी अंकात याच लेखकाची, अशाच विषयावरची, वासूनाक्याच्याच विलक्षण विश्वातली आणि तशाच चमत्कारिक, असभ्य परंतु अत्यंत बोलक्या शैलीतली ‘इष्क’ ही कथा प्रसिद्ध झाली आणि हा ‘वासूनाका’ एखाददुसऱ्या गोष्टीपुरता मराठी वाङ्मयात फिरकण्यासाठी आला नसून याचे ‘आक्रमण’ अधिक टिकाऊ आहे हे जागरूक जाणकारांच्या ध्यानी आले; आणि मराठी वाङ्मयात येऊ घातलेल्या या नव्या प्रवाहाची इष्टानिष्टता, त्याचे कलात्मक मूल्यमापन ते मनाशी ठरवू लागले. या प्रवाहाची अपरिहार्यता तर गृहीतच होती.
‘वासूनाका’ हे भाऊ पाध्यांचे नवे पुस्तक त्या पहिल्या-वहिल्या दोन कथांची अपरिहार्य परिणती म्हटली पाहिजे. एकाच विषयावरच्या, एकाच जगाशी निगडित, त्याच त्या प्रमुख व्यक्तिरेखांतून उलगडणाऱ्या, एकाच शैलीच्या या अनेक कथा आहेत. या सामायिक भागांमुळे त्यांना कादंबरीसदृश स्वरूपही आले आहे. कादंबरीला लागते ते सलग, पूर्वनियोजित उलगडते कथानक यांना नाही, एवढेच.
या कथांतल्या ‘वासूनाका’नामक जगाविषयी तेथल्याच भाषेत सांगायचे म्हणजेः
‘उन्हे उतरली म्हणजे आमची ‘कंपनी’ वुलन पँटस् चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. दुसरा धंदाच नव्हता. क्रिकेटचे अंग नव्हते की आर.एस.एस.मध्ये जाऊन ‘दहिने रुख-बाए रुख’ करायला आम्ही भट नव्हतो. एस्.एस्.सीच्या कोचिंग क्लासेसमध्ये हल्ली पोरी फार येतात. त्यांच्यावर पत मारावी, तर आमच्य कंपनीमध्ये एक मी सोडून; दुसऱ्या कोणाचेही हात एस.एस.सी.ला पोहोचले नव्हते. शिकणे जमतच असे कोणाला! शिकून तरी काय उपयोग? माणूस नोकरीच करतो आणि वुलन पँटस् शिवतो. आमच्या बापांनी आम्हाला वुलन पँटस् शिवून ठेवल्याच आहेत. आम्हाला, च्यायला मधुबालेसारखी ‘पणती’ पकडणे शक्य आहे का? खरंच, च्यायला ‘हायवे 301’ सारखा एक दणदणीत दरोडा टाकला तरच आमच्या आयुष्याचे कल्याण होईल. जाना दो. तूर्त भंकसगिरी करूनच वालपाखडीमधल्या कोणल्याही ‘दिवटी’चा आसरा झाला तरी भले.’
यावरून हे लक्षात येईल की कोणतेही रूढ अर्थाने उच्च, उदात्त, सात्विक अथवा साधे सुसंस्कृत देखील एखादे उद्दिष्ट आयुष्याला नसलेली ही तरुण मुले आहेत. यांचे जगणे हेतूहिन आहे, मने मूलतः निकोप असली तरी रिकामी आहेत आणि आदर्श आजच्या (खरे म्हणजे तशा कालच्याच) ‘मधुबाला’ आणि ‘हायवे 301’ संस्कृतीने पुरवलेले आहेत. वुलन पँटस् आणि ‘भंकसगिरी’ हा यांची यांच्याच मते दोन मोठी वैशिष्ट्ये आहेत. यातल्या अनेकांचे लग्न झाले आहे. ‘आम्ही पण रंडीबाज असलो तरी आमच्या घरातल्या बायकोची इज्जत करत असतो’. . . असे ते सांगतात. कुणाकुणाला सहासहा मुले झालेली आहेत. ‘आता कशात काही राम नाही राहिला या कलीमध्ये’ असे म्हणणारी म्हातारी आई कुणाकुणाला आहे. यातील कुणाचा रोजगार इलेक्ट्रिक मेकॅनिकसारखा रीतसर आहे; तर कोणी सट्टा-बेटिंगवर पैसे करून ‘पोरी फिरवतो’. चोरटी दारू गाळण्याचाही अनुभव या तरुण मुलांना आहे. परंतु या सर्वांचा मिळून मुख्य उद्योग एकच – भंकसगिरी. आपल्या विषयीच्या लौकिक समजाची कल्पना यांना आहे. एके ठिकाणी यातला एक म्हणतो, ‘अरे, पोरीनं इज्जत घेतली, त्यात काय एवढं मरायचं?. . . आपला धर्मच आहे! दुनियेनं आपली इज्जत केव्हाच केली आहे! सगळी वालपाखडी आपल्याला ‘ओवाळून टाकलेली’ मानते!’ ‘इज्जत’ जाणे आणि घालवणे हा त्यांना ‘धर्म’ वाटतो.
तसे पाहिले तर ‘इज्जत’ (ऑनर) या गोष्टीची चाड अशी ना तशी या तरुणांच्या बोलण्यातून या पुस्तकात पानोपानी व्यक्त होते. आणि तिला एक प्रांजळपणा आहे. मनःपूर्वकता आहे. बायकोची इज्जत, कोणातरी ‘सू’ची इज्जत, पापामियाच्या चाळीतल्या पोरींची इज्जत, ‘बायजी’ची इज्जत अशी भोवतालच्या अनेकांची इज्जत हा त्यांचा चिंतेचा आणि चर्चेचा एक महत्त्वाचा विषय आहे. कोणी इज्जतीला न जागणे हे त्यांना भयंकर पापकर्म वाटते, अक्षम्य गुन्हा वाटतो. याने ते उद्विग्न आणि संतप्त होतात. अनेकदा आपला रिकामटेकडेपणा झुगारून कृतीला प्रवृत्त होतात; ‘इज्जत’ शिकवू जातात. या संदर्भात आपली गेलेली आणि जाणारी इज्जत हा त्यांचा ‘धर्म’ वाटतो. त्याहीपेक्षा ती त्यांची एक फार मोठी खंत वाटते. या गोष्टीपुढे स्वतःपुरते ते असह्य, हतबल दिसतात आणि एक प्रकारे याचीच तीव्र प्रतिक्रिया म्हणून इतरांच्या इज्जतीची काळजी ते पोटतिडकीने वहातात.
यातही एक विलक्षण गोष्ट घडत असते. कोणाकोणाची इज्जत सांभाळू जाताना सुक्तसूक्त विचार त्यांना रहात नाही, सार्वजनिक आणि खासगी यातल्या मर्यादा ते धर्मयोद्ध्याच्या तडफेने पाहाता पाहाता ओलांडतात. प्रसंगी हिंस्रदेखील बनतात. परंतु एवढे सगळे इतक्या हिरीरीने केल्यावर शेवटी त्यांना आढळते ते हे की, इज्जत कुणालाच आणि कुठेच नाही! सगळा एकजात बेइज्जतीचा, बनावट, नकली, ढोंगी, खोटा सोयिस्कर मामला आहे! सगळीच ‘भंकस’ आहे! उदाहरणार्थ, जिच्या इज्जतीची वासूनाक्यावरच्या पोक्याला फार चाड, आणि जिला बश्याने तिच्या लग्नात पन्नास रुपयाची साडी सदिच्छांसह दिली, तिच्याविषयी हा बश्याचा नंतरचा अनुभव पाहाः ‘परवा संक्रातीची गोष्ट. सकाळी तिचा भाऊ तिळगुळ घेऊन आला. त्याने मला चिठी दिली. भ्यांचोद काय काय लिहिलं होतं त्यात ते वाचायला कोणीतरी प्रोफेसरच आणायला पाहिजे. काय म्हणे ‘मला फक्त तुम्ही हवेत; दुसरं कोणी नको!’ भ्यांचोद ती काय बडबडते ते मला काय समजत नाही. . .’
तशाच प्रकारचा हा आणखी एक अनुभवः ‘इतक्यात मागल्या दारावर टकटक. तशाच ओल्या अंगाने दार उघडले. पाहतो तो ककी- हातात आमंत्रणपत्रिका. मी तिला आत घेतले आणि लग्नाबद्दल तिचे काँग्रॅच्युलेशन्स केले. ती काही बोलली नाही. इतक्यात तिने दार लोटले आणि मला घट्ट आवळून धरले. म्हणते काय माहीत आहे, ‘पोक्या. . . पोक्या तुझ्यापासून मला मूल व्हावे अशी इच्छा आहे माझी! करशील ना रे पुरी?’
पोक्या यापुढे सांगतो, ‘बंद केलेल्या दाराकडे पहात मी मनातल्या मनात म्हणालो, च्यायला!’
बश्याची अशाच अनुभवाविषयीची प्रतिक्रिया काहीशी वेगळी आहे. तो म्हणतो, ‘साला हिच्याबरोबर दोन घंटे टाइमपास होतो आहे ना! . . . ही सगळी हिरव्या नोटेची पावर आहे.’
‘इज्जती’च्या नावानं जिथे तिथे दिसणाऱ्या अशा खोटेपणावर, विपरीत प्रकारांवर, हलक्या वागणुकीवर या तरुण मुलांच्या मनात एक तर स्तिमित गोंधळलेपणा आहे किंवा एखादा त्यांच्या मते नेमका निष्कर्ष आहेः हिरव्या नोटेची पावर!
ही प्रसंगी हिंस्र आहेत. असभ्य आहेत, गचिच्छ आहेत, दिशाहिन जगणारी आहेत, परंतु मुर्दाड नाहीत. ‘फिरकी कथेत ‘बायजी’चा ‘रावजी’ अपघातात वारल्याचे धक्कादायक वर्तमान कळल्यावर या मुलांच्यात घडते ते संभाषण भावनेने विलक्षण थबथबलेले आहे; किंबहुना भावविशच आहे. त्यांच्या मनातून काहीतरी ‘उफाळून’ येते, डोळे ‘भिजतात’, मन ‘गहिवरते’, ‘आपली वासूनाक्यावरची कंपनीच हलकट!’ असे चिडीने मनात येते. ही तरुण मुले वासूनाक्यावर दरसाल सत्यनारायण घालतात, डोंगरीच्या विद्याधर बाबाकडेही यातला कोणी कोणा जाऊन ‘पश्चाताप’ करतो.
परंतु विद्याधर बाबा, बायजी, सू, बकुळा, केशरवडी, भानू, ऍडव्होकेट पंडित आणि त्याचे घरंदाज कुटुंब, अशा सर्वांच्या बाबतीत या तरुण मुलांचा अनुभव एकच एक आहे. त्याचे नकलीपण, खोटेपण, ढोंग, भंकस! सगळ्या चांगल्या गोष्टींची अर्थहीनता आणि तकलादूपण! आणि यातली सफाई!
याने ती गोंधळतात, मनापासून उबगता. क्वचित संतापतात. हा संताप, उबग मग निघतो त्यांच्यामागून त्यांच्याच वळणाने येणाऱ्या पोरांच्या बाबतीत.
पोक्या म्हणतो, ‘या वयात या पोरांची ही लाइन म्हणजे ही पोरं पुढे काय करणार हे दिसत होतं. या पोरांना खानदानीत नोकरी धंदा करायचा नाही, लाइनशीर राहायचं नाही, लोफर व्हायचं आहे आणि एक दिवस व्हॅगॉबॉण्ड नाहीतर रोडसाइड रोमिओ म्हणून लॉकपमध्ये जाऊन इज्जतीचं खोबरं करून घ्यायचं हे. . .’
ही उद्विग्नता दिखाऊ नव्हे, ही काळजापासूनची आहे, उत्स्फूर्त आहे. ही बाळगणारांच्या स्वतःच्या आयुष्याचे खोबरे पार्श्वभूमीवर असल्याने ही क्षणभर हास्योत्पादक ठरली तरी त्याहून ती हृदयस्पर्शी आहे, अस्वस्थ करणारी आहे.
इज्जत नावाच्या गोष्टीमागचा खोटेपणा, नकलीपणा, दांभिकता, मुलायम सफाई हा या कथांतून सातत्याने व्यक्त होणारा विषय कितपत खरा, व्यापक आणि महत्त्वाचा आहे हे ज्याने त्याने स्वतःपुरते ठरवायचे आहे. यापोटचा उबग, चीड यांचा वांझपणा आणि एकूणच सगळ्या जीवनाची अर्थहीनता प्रत्येकाने स्वतःशी पडताळून पाहाण्याची बाब आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थोड्याफार फरकाने असले ‘वासूनाके’ आज अस्तित्वात आहेत हे मात्र एक निर्विवाद सत्य आहे आणि त्यांचे कमालीचे स्पष्ट, निरर्गल, उबगवाणे तरीही हृद्य दर्शन भाऊ पाध्यांनी त्यांच्या पुस्तकात घडवले आहे.
कलात्मकतेत या कथांत डावे-उजवे करता येईल; परंतु त्यामागची हृद्यता उपेक्षून केवळ निरर्गलतेकडे पाहाणे मात्र भाऊ पाध्यांना, या कथांना आणि एकूण वाङ्मयनिर्मितीच्या उद्देशालाच अन्यायाचे तसेच हानिकारक ठरणार आहे.
***
(महाराष्ट्र टाईम्स, ३ मार्च १९६६)