Sunday, July 3, 2022

भाऊंच्या तीन कादंबऱ्यांच्या नवीन आवृत्त्या

भाऊ पाध्ये यांच्या 'डोंबऱ्याचा खेळ', 'जेलबर्ड्स' आणि 'वॉर्ड नं. ७ सर्जिकल' या तीन कादंबऱ्यांच्या नवीन आवृत्त्या नुकत्याच शब्द पब्लिकेशनाने प्रकाशित केल्या आहेत. 

Friday, May 27, 2022

भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा: नवीन आवृत्ती

 'भाऊ पाध्ये यांच्या श्रेष्ठ कथा' या दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाची नवीन, चौथी आवृत्ती नुकतीच लोकवाङ्मय गृहातर्फे प्रसिद्ध झाली आहे.Wednesday, October 21, 2020

दावेदार : नवीन आवृत्ती

भाऊ पाध्ये यांच्या 'दावेदार' या कथासंग्रहाची नवीन आवृत्ती शब्दालय प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झाल्याचं कळतं. मुखपृष्ठ असं:
Friday, July 8, 2016

भाऊ पाध्यांची कविता

भाऊ पाध्ये कविता करत होते, हे माहीत नव्हतं. पण अलीकडंच ते कळलं. त्यांची एक कविता मूळ 'शब्द' या अनियतकालिकात, आणि नंतर 'अबकडइ' या चंद्रकांत खोत संपादित अंकात प्रसिद्ध झाल्याची माहिती अलीकडंच आपल्याला मिळाली. या माहितीचा स्त्रोत असा: नीतीन रिंढे यांनी या कवितेच्या छापील प्रतीचा फोटो १७ मे २०१६ रोजी फेसबुकवरच्या त्यांच्या भिंतीवर प्रसिद्ध केला होता. तोच फोटो खाली त्यांच्या परवानगीनं चिकटवला आहे. ही कविता त्यांना सतीश काळसेकर यांच्या कात्रणसंग्रहात मिळाली, असं त्यांनी कळवलं आहे. 'अबकडइ'च्या नक्की कुठल्या अंकात ही कविता प्रसिद्ध झाली होती, याची माहिती अजून मिळालेली नाही, पण 'शब्द' या अनियतकालिकाचा हा अंक १९५५पासून पुढच्या दोनेक वर्षांमधला कधीतरीचा असावा, असा अंदाज फक्त इथं नोंदवून ठेवू.

Tuesday, February 11, 2014

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर : नवीन आवृत्ती

भाऊ पाध्यांच्या 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर' या कादंबरीची नवीन आवृत्ती 'शब्द पब्लिकेशन'तर्फे नुकतीच बाजारात आली आहे. या आवृत्तीत कादंबरीचं मुखपृष्ठ नितीन दादरावाला यांनी केलंय. पुस्तकाची किंमत एकशेपंचवीस रुपये आहे.

या पुस्तकाच्या मागच्या बाजूला भाऊंचा एक फोटोही छापलेला आहे. हा फोटोही दादरावाला यांनीच काढल्याची नोंद पुस्तकात आहेच. तो फोटोही या नोंदीत चिकटवतो आहे.

भाऊ पाध्ये


('मुक्त शब्द' मासिकाच्या जानेवारी २०१४च्या अंकामधे या नवीन आवृत्तीची जाहिरात आली आहे. 'फेसबुक'वरती 'मुक्त शब्द'च्या खात्यावरती या जाहिरातीचा फोटो सापडला. त्या जाहिरातीतून कापून हे मुखपृष्ठ व हा फोटो इथे चिकटवला, त्यामुळे इथे मुखपृष्ठावर लेखकाचं नाव दिसत नाहीये, ते मूळ पुस्तकावर अर्थातच आहे - उजवीकडे खाली कोपऱ्यात जिथं इंग्रजी अक्षरं दिसतायंत तिथं-, पण जाहिरातीच्या त्या फोटोमधे काही तांत्रिक घोटाळा झाला असेल, शिवाय इथेही तांत्रिक अडचणीमुळे मूळ पुस्तकाचं कव्हर स्कॅन करून इथे टाकता आलेलं नाहीये, पण शक्य होईल तेव्हा तसं करण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत वाचकांना नवीन आवृत्तीची माहिती मिळावी एवढा हेतू तरी यात पूर्ण व्हावा. फोटोच्या बाबतीतही चांगल्या पद्धतीनं स्कॅन करून टाकता यायला हवा, तेही शक्य झालेलं नाही.)

Tuesday, July 2, 2013

भाऊ पाध्ये : नवीन आवृत्त्या

भाऊ पाध्यांची सगळ्या पुस्तकांच्या नव्या आवृत्त्या 'शब्द पब्लिकेशन' काढणार आहे, अशी जाहिरात पूर्वीच आली होती. जाहिरातीवेळी 'राडा'ची नवीन आवृत्ती बाजारात आली होती. आत्ताच्या मे महिन्यात. 'करंटा', 'अग्रेसर' आणि 'वासूनाका' यांच्या नव्या आवृत्त्याही बाजारात आलेल्या आहेत. 'वासूनाका'च्या तरी आवृत्त्या निघाल्या होत्या, पण 'करंटा' आणि 'अग्रेसर' यांच्या पहिल्या आवृत्त्या अनुक्रमे १९६१ (मॅजेस्टिक बुक स्टॉल) आणि १९६९ (जी. एम. प्रभू, गोवा) अशा निघाल्या होत्या. त्यानंतर या कादंबऱ्या गेली कित्येक वर्षं बाजारात नव्हत्या. या दोन कादंबऱ्यांच्या नवीन आवृत्त्याही आता वाचकांना उपलब्ध होतायंत. या तीनही पुस्तकांची मुखपृष्ठं बाळ ठाकूर यांनी केलेली आहेत.Sunday, January 8, 2012

'राडा'ची नवीन आवृत्ती

भाऊ पाध्यांची 'राडा' कादंबरी 'शब्द पब्लिकेशन'ने पुन्हा प्रसिद्ध केलेय. डिसेंबर २०११ची ही या कादंबरीची तिसरी आवृत्ती बाजारात उपलब्ध झालेली आहे.

कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीला असलेली भालचंद्र नेमाडे यांची प्रस्तावना तिसऱ्या आवृत्तीतसुद्धा आहे आणि ती आपण ह्या ब्लॉगवरसुद्धा नेमाड्यांच्या परवानगी प्रसिद्ध करून ठेवलेय, तर तीपण पुन्हा वाचावी वाटली तर इथे - 'राडा'ची प्रस्तावना
***

'राडा'शिवाय भाऊंची बाकीची पुस्तकंपण 'शब्द'वाले काढणार आहेत, अशी जाहीरात 'लोकसत्ता'च्या 'लोकरंग' पुरवणीतल्या पान नंबर सहावर आलेय (८ जानेवारी २०११), ती अशी आहे. 

***

Monday, April 25, 2011

'वासूनाका'ची नवीन आवृत्ती

'वासूनाका'ची नवीन आवृत्ती बाजारात आली आहे. पॉप्युलर प्रकाशनाने काढलेल्या या आवृत्तीची किंमत रु. १६० आहे. पहिली जी आवृत्ती पॉप्युलरने काढली होती, त्याचंच हे पुनर्मुद्रण आहे, त्यामुळे डीटीपीसुद्धा जुनाट, चित्रं, मुखपृष्ठ सगळंच तेव्हाचं. तरी कुणाला घ्यायची असेल आणि माहिती नसेल तर ही पोस्ट.


Saturday, October 30, 2010

व्यष्टीच्या कोषामधून समष्टीचे दर्शन घडवण्याचे भाऊ पाध्यांचे कलात्मक कौशल्य हाच त्यांच्या श्रेष्ठत्वाचा गाभा आहे. भाऊंच्या लेखनात निवेदक ते स्वत: आहेत आणि नाहीतही. त्यांचे प्रत्येक पात्र निवेदनात आपला रास्त हिस्सा घेते, आपली बाजू मांडते. न्यायाधीशाशिवाय चाललेले हे खटले आहेत. परस्परविरोधी दावे करणारे आणि स्वत:ची वकिली करणारे लोक, आरोप करणारे, अपराध करणारे, साक्ष देणारे, निकाल देणारे असे अनेक निवेदकांचे स्वर भाऊंच्या लेखनात आपल्याला ऐकू येतात. मग कळते की हा एक समाजाचा गलबला आणि त्यातून येणारा मानवतेचा आवाजच आहे.
- दिलीप पुरुषोत्तम चित्रे


आम्ही मराठी माणसं मुर्दाड आहोत. आमचा मख्खपणा एका ज्ञानेश्वरानं जात नाही, एका तुकारामानं जात नाही, एका साने गुरुजीनंसुद्धा जात नाही. भाऊ पाध्येनं तर तसा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. त्यामुळे भाऊचं लिखाण काय प्रतीचं होतं ह्याबद्दल आम्ही अडाणी राह्यलो असलो तर नवल वाटायचं काहीच कारण नाही. 'कधीकाळी कुठंतरी माझा समानधर्मा निपजेल' ही प्रत्येकच लिहिणा-याची आशा असते. अशी काही आशा भाऊ मागं ठेवून गेलाय का नाही कोण जाणे!
(महाराष्ट्र टाइम्स, ३ नोव्हेंबर १९९६)


The new literature (that began in 1960s) dedicated itself to looking at life with the naked eye and recording what it saw in ruthless detail. Bhau Padhye took the short story out of its cosy, middle-class environs onto the streets, gutters and public parks of the big city where loafers and layabouts, clerks and coolies, struggled to survive. Padhye's language too was of the streets, paying no heed to the niceties that had, until then, separated literature from life. Conservatives rose up in arms against him, but the young recognised their world in his.
- Shanta Gokhale
(The Hindu, 7 March 2010 )


Every great city creates its own great writer and Bhau Padhye — the Marathi fiction-writer— was created by Bombay. I consider him the greatest writer of Bombay in any language.
- Dilip Chitre
(Tehelka, 02 July 2005)


पात्रचित्रणाच्या तंत्रात 'नमुने' हे वास्तववादी साहित्याचे लक्षण आणि घटक समजले गेले आहेत (लुकाच). ह्या नमुन्यांत व्यक्तीचे सामान्यत्व व विशेषत्व हे दोन्ही गुण असावे लागतात, दोन्हीचा संयोग व्हावा लागतो. मराठीतल्या व्यक्तिप्रधान कादंब-यांत, विशेषत: लैंगिकता हेच आशयसूत्र असलेल्या कादंब-यांत, वास्तवाभिमुख असा हा संयोग घडत नाही. ह्याशिवाय नव्या समाजात भावनिक व बौद्धिक अशा दोन्ही वृत्ती माणसांमध्ये सापडतात. पात्रे विचार करणारीही असावी लागतात. नुसती भोगणारी, भोग देणारी, असहाय अशी नसतात. वेश्या झालेली स्त्रीही आधीची एक असह्य चौकट मोडून वेश्या होते, ही वस्तुस्थिती मांडली गेली पाहिजे. ह्या बाबतीत भाऊ पाध्ये यांची पात्रे ठळकपणे समोर येतात (अग्रेसर, वैतागवाडी, बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर, वासूनाका). म्हणून भाऊ पाध्ये आजचे सर्वश्रेष्ठ कादंबरीकार आहेत असे मानावे लागते.
- भालचंद्र नेमाडे
(टीकास्वयंवर, पान २२८)  
ज्यांना भाऊंच्या ह्या दस्तावेजाविषयी इतरांना सांगायचंय त्यांना हे पत्रक ई-मेलने पाठवता येईल, किंवा प्रिंट काढून नोटीस बोर्डावर लावता येईल, किंवा नुसतं वाटता येईल.
***

Thursday, October 28, 2010

चित्र्यांचा एक मजकूर

(भाऊंबद्दल चित्र्यांनी खूप वेळा खूप ठिकाणी खूप काही लिहिलंय. इथे जो मजकूर प्रसिद्ध होतोय तो चित्र्यांच्या खाजगी संग्रहातला विजया चित्र्यांनी दिलेला- कुठेच छापून वगैरे न आलेला.)


 मुंबई: पठ्ठे बापूरावांपासून थेट नामदेव ढसाळांपर्यंत, मर्ढेकरांपासून थेट विवेक मोहन राजापुरेपर्यंत, नारायण सुर्व्यांपासून थेट प्रकाश जाधवांपर्यंत मराठीत तिचा वाङ्मयीन व्याप आहे. पण ह्या वाङ्मयीन मुंबईच्या थेट केंद्रापाशी एकच मराठी कथा-कादंबरीकार उभा आहे, तो म्हणजे भाऊ पाध्ये. मराठी संस्कृतीतलं हे मूळ महानगर त्याच्या सर्व सामाजिक गतिमत्तेसकट आणि नीतिमत्तेसकट भाऊंच्या विश्वात साकार झालंय. मार्क्वेझ, कुंदेरा, रश्दी यांसारखे अनेक लेखक गेल्या दहा-वीस वर्षांत जगभर गाजले. भाऊ ह्या लेखकांच्या इयत्तेचे, वैश्विक महत्त्वाचे लेखक आहेत. पण मराठीतही त्यांना पुरेसं ओळखलं गेलेलं नाही. मराठी साहित्या संस्कृतीच्या कोतेपणाचीच ही खूण आहे. आणखी दहा-वीस वर्षांनी भाऊंच्या कर्तबगारीची ओळख सर्वांनाच पटेल, अशी मला खात्री आहे.
मराठीतच नव्हे, जगात कोठेही, महानगरीय माणसाचं जीवन अस्तित्व आणि अनस्तित्वाच्या हिंसक आणि विक्राळ सीमेवरल्या अतिवास्तवसदृश वास्तवात जगलं जातं. त्याच्या दैनंदिन जीवनातल्या साध्यासुध्या घटनांमध्ये अमानुष हिंसेचा ओघ प्रकटत रहातो. संपूर्णपणे मानवनिर्मित जगात, जिथे नियती हे मानवी समाजाच्याच सामूहिक आत्माक्रमणाचं फळ आहे, माणसं एक चमत्कारिक जीवन जगत असतात. त्यांनी सामूहिकरित्या दडपलेला निसर्ग आणि त्यांनी स्वीकार केलेली जीवनशैली यांच्या दरम्यान त्यांच्या वैयक्तिक जीवनाची तारेवरली कसरत चालू असते. भाऊ पाध्यांच्या कथा-कादंब-यांच्या विश्वात ही कसरत आणि तिच्यातल्या दारुण विसंगती प्रकट झाल्या आहेत. नोबेल पुरस्कारासाठी एखाद्या भारतीय लेखकाचं नाव सुचवायचं झालं तर बिनदिक्कत मी भाऊंचं नाव सुचवीन. दुर्दैव हेच की मराठीतही भाऊंचं महात्म्य कोणी ओळखत नाही.
***
हा मजकूर लिहिला गेला त्याला बुडाला बाजार दहा-वीस वर्षं तरी नक्कीच झाली असतील.
***