Wednesday, August 25, 2010

फुल्याफुल्यांच्या वादग्रस्त वाङ्मयाचा जनक

- चंद्रकान्त पाटील

भाऊ पाध्येवर पुन्हा एकदा लिहायची वेळ आली आहे. भाऊ पाध्ये नावाचा एक श्रेष्ठ साहित्यिक, पत्रकार, चित्रपट समीक्षक आणि नव्या विद्रोही लेखकांचा आवडता हीरो दहा-पंधरा दिवसांपासून बॉम्बे इस्पितळातल्या पाचव्या मजल्यावर पाचशे तेवीस क्रमांकाच्या खोलीत विकलांग अवस्थेत पडून आहे. ज्यानं आयुष्यभर मुंबईचं दर्शन आपल्या सगळ्या साहित्यांतून वाचकांना करून दिलं, मुंबईच्या सगळ्या ठसठसत्या नसांना अचूक पकडण्याच प्रयत्न केला त्या भाऊला मुम्बईची नैतिकता व्यक्त करायची होती. कन्नमवारपासून अधोगतीला लागलेल्या मुंबईला गँगवॉरपर्यंत येतायेता पक्षाघाताचा झटका वाढतच गेला, आणि तो आपल्या सगळ्या लेखनातून प्रभावीपणे मांडू पाहणा-या भाऊलाच अर्धांगवायूचा झटका आला ही दैवदुर्विलासाचीच बाब आहे! भाऊची वाचा गेली आहे. एरवीही भाऊनं आपल्या वाचेचा आयुष्यात फारच कमी उपयोग केला होता, पण त्याचे पाय विकलांग झाले हे वाईटच झालं. ज्या अफाट मुंबईत भाऊ वणवण भटकत लहानाचा मोठा झाला, ज्यानं आयुष्याची सगळी वर्षं मुंबईच्या राज्यरस्त्यांवरून ते गल्लीबोळापर्यंत भटकण्यात घालवली त्या भाऊचा एक पाय गेला ही वाईटच गोष्ट झाली! डॉक्टर म्हणतायत् भाऊ बरा होईल, आणि तो बोलू लागेल, हिंडू-फिरू लागेल, आणि तो बरा होणं आवश्यक आहे. आम्ही सगळे, ज्यांच्यावर भाऊचं ऋण आहे कधीही न फिटणारं, त्याच्या ब-या होण्याची वाट पाहात आहोत, पण नुस्तं बरं होणं फारसं उपयोगाचं नाही. भाऊला लिहिता आलं पाहिजे. लिहिण्यासाठी पुरेसं सामर्थ्य टिकवता आलं पाहिजे- आणि मला खात्री आहे की भाऊची जगण्यावरची विलक्षण श्रद्धा आणि धैर्य त्याला पुन्हा लिहितं करील. त्याला स्वतःला संपूर्ण समाधान होईल अशी एक महान कादंबरी भाऊच्या डोक्यात आहे, किती तरी वर्षांपासूनच. भाऊची अदम्य जीविताकांक्षा नक्कीच त्याला तारून नेईल, आणि तो कादंबरी लिहीलच! आम्ही तिची वाट पाहात आहोत.

भाऊ पाध्ये या अफलातून माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. फिल्म क्रिटिक म्हणून जगत असताना त्यानं मायावी मुम्बईचं दर्शनी रूप पाहिलं, इम्पोर्टेड गाड्यांमधून फिरत पंचतारांकित हॉटेलांचं स्वर्गसुखही पाहिलं, पण भाऊ खडतर व्रत घेतल्यासारखा फुटपाथवरचा माणूसच राहिला. हे सगळं त्याच्या आतल्या एका प्रखर नैतिकतेमुळेच शक्य झालं. भाऊनं आपली व्यक्तिगत नैतिकता आत जपून ठेवली. वादळातून जाताना दिवा जपत न्यावा तशी. प्रस्थापित समाजातली खोटी दांभिक दिखाऊ नैतिकता चव्हाट्यावर मांडताना भाऊनं पददलितांची आणि फुटपाथवरून चालत जाणा-या सर्वसामान्यांची बाजू ताणून धरली. हे करीत असताना भाऊला अनेक धक्के खावे लागले, पण त्यानं सहजपणे, कुठलीही कुरकुर न करता, कुठल्याही व्रणाशिवाय, जखमांशिवाय ते सहन केले. एका परीनं हे भाऊचे धक्केच पुढं येणार्यांयना संरक्षक ठरले. भाऊचं महत्त्व असं शॉक अ‍ॅब्सॉर्बर म्हणून नक्कीच वाङ्मयीन संस्कृतीत मोलाचं आहे. त्यातून जसं अस्सल साहित्यकारांना सुरक्षित राहता आलं तसं कुठलीही नैतिक भूमिका न घेता प्रायोगिकतेसाठी विषयवासना उगाळणार्यात चंद्रकांत खोतांसारखे आमचे नकली मित्रही सुरक्षितपणे तरून गेले. भाऊचं अख्खं साहित्यच मागच्या-पुढच्यांनी आणि समकालिनांनी रफ-नोट्ससारखं वापरलं आणि त्यावर ते गब्बरही झाले. गब्बर सिंग म्हणून गाजले. भाऊचं मात्र काहीच झालं नाही- काही होण्यासाठी म्हणून भाऊनं हा खटाटोप केलाच नव्हता. त्याच्यामागे एक तीव्रतर यातनामय संवेदना होती, एक सहवेदना होती, विशाल मानवी करूणा होती, करुणेशिवाय भाऊसारखं लिहूनच होत नाही हे आम्ही भाऊकडूनच शिकलो. भाऊच्या वाङ्मयानं अनेक वाद झाले, वादळं उठली, भाऊनं खरं तर मराठीत पहिल्यांदाच फुल्याफुल्यांचं वादग्रस्त वाङ्मय निर्माण केलं. पण अशी वाङ्मयीन वादळं आणि वाङ्मयीन वाद क्षणजीवी असतात. वादळं ओसरल्यावरही आणि विसरल्यावरही अस्सल वाङ्मय मागे उरतंच. भाऊचं वाङ्मय उरलंच आहे आणि म्हणूनच भाऊच्या जवळ बॉम्बे हॉस्पिटलातल्या खोलीत रात्रंदिवस अनेक नवे लेखक, सहकारी आणि आत्मीय लोक बसून असतात, आणि भाऊच्या पत्नीला, शोषण्णालाही आधार देत असतात. भाऊकडून मी परतलो तेव्हा माझ्या एका तरूण मित्रानं सांगितलं, ‘‘भाऊला नामदेव ढसाळनं बॉम्बे हॉस्पिटलात दाखल केलं, मी रोज एक फेरी टाकतो, मलिका- नामदेव- अशोक- सतीश- मन्या- सुधाकर- प्रदीप- मुळे- भाऊचा मुलगा- सून- शोषन्नाचे नातेवाईक असे कितीतरी लोक कायम तिथं असतात, पण आज पंधरा दिवस होऊन गेले, एकही समाजवादी भाऊकडे फिरकलासुद्धा नाही. भाऊचे सोडा, निदान शोषन्नामुळे तरी-’’ अर्थात मला याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. भाऊसोबतचे सर्व समाजवादी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माहित आहेत, पण माझ्या त्या तरुण मित्राला अजून बरंचसं माहित व्हायचं आहे, म्हणून त्यावर मी भाष्य केलं नाही. वस्तुस्थितीच अशी आहे की जे लोक गेल्या पंचवीस-तीस वर्षांत समाजवादाकडेसुद्धा फिरकले नाहीत ते भाऊकडे काय जाणार. समाजवादाचं हृदय असणं आणि समाजवादाचे सदरे घालणं यातला फरक आपण ओळखायलाच हवा. भाऊच्या वयाला साठ वर्षं पूर्ण झाली तेव्हा भाऊच्या मुंबईपासून दूर वेरूळच्या लेण्यांजवळच्या एका निवांत आर्ट गॅलरीत आम्ही पंचवीस-तीस मित्रांनी भाऊची साठी अत्यंत अनौपचारिकतेनं आणि आत्मीयतेनं साजरी केली होती. त्या कार्यक्रमाची चक्रमुद्रित पत्रिका भाऊच्या दारावर अजूनही चिकटवलेली आहे असं शोषन्ना मला सांगत होती. भाऊच्या असंख्य चाहत्यांना त्यावेळी बोलवता आलं नाही याची हळहळ आम्हाला आहे. भाऊ लवकर बरा होईल, तो पुन्हा लिहू लागेल, त्याच्या हातून त्याची महाकादंबरी पूर्ण होईल, आणि त्याच्या सत्तरीच्या वेळी आम्ही प्रचंड मोठा सोहळा करू अशी आम्हा सगळ्यांची तीव्रतर इच्छा आहे, एवढंच तूर्त.
***
('साकेत प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या 'विषयांतर' या चंद्रकान्त पाटीलांच्या पुस्तकात हा लेख आहे.)

No comments:

Post a Comment