१९८८च्या मार्च-एप्रिल महिन्यांतल्या 'रुची'च्या अंकांमध्ये चित्र्यांचा 'समकालीन आणि बाकी सगळे' हा लेख दोन टप्प्यांत प्रकाशित झाला होता. त्यात भाऊ पाध्ये, भालचंद्र नेमाडे, नामदेव ढसाळ नि अरुण कोलटकरांबद्दल त्यांनी लिहिलेलं. त्यातला हा भाऊंबद्दलचा भाग.
***
भाऊ आमच्यात मोठ्यात मोठा. माझी त्याच्याशी ओळख झाली हाफपँटीत मी आणि सोशालिस्ट पार्टीत तो होता.
हमीद त्याच्याच वयाचा. समता आणि बाया ह्या दोन तत्त्वांचा शोध घेत आणि भक्ती करत हे जगत होते. पूर्ण वेळ काम करणारे पार्टी वर्कर पण रात्रीचे रसिक. ह्यातच आमचे रमेश समर्थ, रघू दंडवते असेही समाजवादी होऊन गेले. रमेश तर गोव्यात सत्याग्रह करून झाल्यानंतर इतक्या वर्षांनी स्वातंत्र्यसैनिकाचं पेन्शन घेतोय.
माझ्या नशिबात लहानपणापासून कम्युनिस्ट, सोशालिस्ट, रॉयिस्ट आणि ह्युमॅनिस्ट लिहिलेले. आणि आता दलित पँथर. मात्र श्रीकांत वर्मा आणि सुनिल दत्त वगळल्यास काँग्रेसवाले नाहीतच. ह्या सर्व राजकीय जाणिवेत भाऊ आला तो राजकीय लेखक होऊनच. दोस्तोयेव्हस्कीच्या तोडीचा मराठी कादंबरीकार व्हायचं तेव्हा भाऊचं ध्येय होतं. त्यातून बेने इस्त्रायली शोशन्ना माझगांवकरशी त्याने लग्न केलेलं. भाऊला त्याचं स्वतःचं ग्लॅमर होतंच. शिवाय पिक्चरातला दर्दी प्रेक्षक. म्हणजे लेव्हलच पकडलेला माणूस.
‘डोंबा-याचा खेळ’चं हस्तलिखित भाऊनं मला वाचायला दिलं आणि मला कळलं की हा सुरवातीपासूनच मोठा लेखक आहे. परळ- लालबाग- चिंचपोकळी- डिलाईल रोड- प्रभादेवी- वरळी ह्या भागातल्या हजारो गिरणी कामगारांचा अशोक मेहता यांच्या नेतृत्वाखाली प्रजासमाजवादी पक्षाने संप घडवून आणला होता. तो संप सुरू होण्यापासून तुटेपर्यंतच्या घटनेचा आलेख ह्या कादंबरीत नाना पातळ्यांवर आहे. ह्या प्रचंड मानवी अवकाशात ती घडते. मुख्य स्थानी संप आहे. बाकी पटावर पुढारी, युनियनवाले आणि कामगार. त्यातल्या काहींचं खाजगी चरित्र. आणि एकमेकांमुळे ह्या सा-यांचाच दारुण पराभव. उपाशी पोटी शरण येऊन गेटच्या आत शिरणं.
भाऊच्या पुढल्या कथा-कादंब-यांमध्ये शहराच्या वांझ अवकाशातून भटकणारी वखवखलेली लैंगिकता आहे, मूर्ख आणि क्रूर लोकांची मर्दानगी आहे, जंटलमन तत्वज्ञान आहे, रांडविवाद आहे, रोडवरचे रूल आहेत, धपापलेलं शहरी जिणं आहे, शेजारधर्म, मत्सर, दुस्वास, रोमान्स आणि डेरींग आहे.
फेदेरिको फेल्लिनीच्या चित्रपटातला गजबजलेला रंगीबेरंगी इतालियन अवकाश जसा फक्त प्रचंड पल्ल्याची दृष्टी असलेला दिग्दर्शकच कवेत घेऊ शकला असता, तसं भाऊचं आहे. इतकंच नव्हे तर इतालियनांच्या एपिक रियॅलिस्ट स्टाइलचंच भाऊचं बघणं आहे. त्यांचीच सिनिकल पार्थिवता आणि इरसाल रंगेलपणा भाऊमध्ये आहे. मुळात भाऊ मानवप्रेमी आहे, पण माणसाच्या अटळ नैतिकतेमुळे निराशही आहे. जीवनातली औपरोधिकता त्याच्या फाटकन ध्यानात येते आणि ती त्याच्या फ्रेममध्ये घेतलेलीच असते. इतकं असून ओबडधोबड असली तरी भाऊची शैली कधी कंटाळवाणी झालीच नाही कारण ती सलगीनं बोलणारी होती. तिला सांगणाराचा खास आवाज होता. मुख्य सेट सतत डोळ्यांवर ठसवणारा, नाटकांतून सिनेमात आलेला, घटनांमधून तपशिलात आलेला, तपशिलात मानवी ऊब बघणारा दिग्दर्शकच जणू भाऊ आहे.
भाऊचं लेखन कथनशील, घटनाप्रधान, क्रमबद्ध आहे. प्राचीन कथावाङ्मयापासून थेट अत्याधुनिक कथाकृतींपर्यंत चालू असलेली जी अव्याहत, मुख्य नॅरेटिव्ह आणि ड्रॅमॅटिक-नॅरेटिव्ह परंपरा आहे तिच्यात भाऊ बसतो. त्यामुळे भाऊच्या कथा-कादंब-या वरकरणी सोप्या वाटतात आणि टाईमपास म्हणून वाङ्मय वाचणा-या शेजारपाजारच्या वाचकांनाही ते वाचताना आपण साहित्य वाचतोय का काय असं वाटून बिचकायला होत नाही. साने गुरुजींमधलं मातृत्व पुष्कळसं कमी असतं, दयाळूपणाऐवजी त्यांच्यात सिनिकल वाटण्याजोगा मिस्किलपणा असता, त्यांच्यात प्रकर्षाने लैंगिकता असती, आणि जर त्यांना प्रदेशाचं निरंतर भान असतं आणि नीतीरेषेखालचं जीवन पहाण्याची हिंमत असती, तर त्यांनी जवळजवळ भाऊ पाध्येसारखं लिहिलं असतं आणि बहुधा त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन जीव दिला नसता. एके काळी भाऊ सेवादल आणि समाजवाद्यांच्या भावविवश आणि क्रांतिकारक कळपातच होता. पण यदुनाथ थत्ते किंवा वसंत बापट होऊन प्रौढ वयातही कायम बेचाळीस सालच्या नशेत असल्यासारखं वावरणं त्याला कठिण गेलं असतं. पैकी बापटांचं ठीक आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांच्या हाती मराठी कविसंमेलनांचा पेशवाई मायक्रोफोन आला. पण इतर सोशालिस्टांचं झालं ते सैगल-पंकज मलिकच्या रेकॉर्डी नॉस्टल्जिकपणे ऐकणा-या काळाशी संपर्क तुटलेल्या ध्येयवादी म्हाता-यांसारखं. ह्यांच्या डोळ्यासमोर जुने सिनेमे दिसावेत तसे जे. पी., अच्युतराव वगैरे किंवा ते आततायी लिहिणारे लोहियावादी. जॉर्ज काय, राजनारायण काय. ह्यांना तुरुंग कायम तीर्थक्षेत्र वाटणार आणि कोणतंही सरकार परकीय सत्तेसमान भासणार. ह्यामुळेच भारतातले समाजवादी म्हटले की आमच्या एकूण दंडवते बंधूंनी एकेक पक्ष काढला आणि त्यांच्या प्रत्येक पक्षात स्वतंत्र गट काढला तर जसं होईल त्यातला प्रकार. तरी दंडवते बंधूंमध्ये भाऊबंदकी नाही. ते खेळीमेळीनं एकत्र नांदू शकतात. इतर सोशालिस्टांत तो बंधुत्वभावसुद्धा नाहीच. भाऊ पाध्ये किंवा हमीद दलवाई हे ह्या लोकांमध्ये राहिले असते तर त्यांच्या हातून जी काही महाराष्ट्रात दैदिप्यमान कामगिरी झाली ती होणं शक्यच नव्हतं.
देशाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भाऊ वीस-एकवीस वर्षांचा होता. वस्तुतः ही गोची झालेलीच पिढी. ह्यांनी शाळा-कॉलेजं बंद पाडण्याचेच प्रयत्न केले. स्वातंत्र्यलढ्याचा त्यातल्या त्यात फायदा एकच. तो म्हणजे सेवादलात मुली असायच्या. संघासारखं शेंडीवाल्या समाजाचं स्वप्न नव्हतं ते. पुन्हा सेवादलातलं वातावरणसुद्धा घोटुलवजा होतं म्हणे. ‘झंडा ऊंचा रहे हमारा’चा उपयोग मंगलाष्टकांसारखा केला जायचा.
म्हटलं तर हा काळ रक्तरंजितच. मुंबईत गोदित स्फोट, आरमारात बंड, जातीय दंगे असल्या घटना नियमितपणे घडता घडता स्वातंत्र्यदिन उगवला. मी त्यानंतर चार वर्षांनी मुंबईत स्थायिक व्हायला आलो पण दर वर्षी मुंबईला येत होतोच. त्यामुळे तो काळ डोळ्यापुढे आणणं कठिण जात नाही. युद्धात सुरू झालेल्या रेशनिंग कचे-या, त्यात प्रथमच मोठ्या संख्येने नोकरी करायला लागलेल्या मराठी बाया, अँग्लो-इंडियन संस्कारांच्या बळावून विझणा-या ज्योतीतलं मुंबईचं कल्चर- म्हणजे मेट्रो, एरॉस, एम्पायरमधले सिनेमे, व्हाइटवे लेडलॉ, एव्हन्स फ्रेझर, आर्मी अँड नेव्ही स्टोर्ससारखी विलायती छापाची दुकानं; माँजिनी, गूर्दां, बॉम्बेली, मरोसासारखी खाण्यापिण्याची स्थळं; पारशी, अँग्लो-इंडियन बोहरा, गोंयकर, किरिस्तांव, भंडारी, पाचकळशी, पाठारे, भाटिया, गुजराती लोकांचा ठळकपणा. हा मुंबईचा तेव्हाचा अठरापगडपणा आजही आहे पण जमाती बदलल्यात. बेस्ट कंपनीत तेव्हा इतके बिहारी, उत्तरप्रदेशी नव्हते. सिंध्या पंजाब्यांच्या वस्त्या अन् दुकानं नंतर आली. आंध्रातले बांधकाम कामगार उशिरा आले. मद्रासी – म्हणजे तामीळ आणि मल्याळी- माटुंग्यभोवतीच सापडत होते आणि निमूटपणे टायपिंग करून किंग्ज सर्कलला किंवा माटुंगा स्टेशनपाशी डोसे खात होते. त्यामुळे शिवसेना पण नव्हती. बाळ ठाकरे दलाल स्ट्रीटवर कार्टून काढत होते की आर्ट स्कुलात होते, आठवत नाही. श्रीकांत ठाकरे श्रीधर पार्सेकरांकडे व्हायलिन शिकत असेल. थोडक्यात, मुंबई आवाक्यात होती. आतासारखी फुटलेलं वारुळ झालेली नव्हती.
मराठी साहित्यात मर्ढेकर, गंगाधर गाडगीळ नुकते आलेले होते. नवसाहित्याचा जमाना आलेला होता. श्री. पु. भागवत, ग. रा. कामत हे मुंबईच्या रुईया कॉलेजातले न. र. फाटकांचे शिष्य खटाववाडीत ‘सत्यकथे’चा बालेकिल्ला बांधण्याच्या मार्गावर होते. व्यंकटेश माडगूळकर, अरविंद गोखले, पु. भा. भावे, श्री. ना. पेंडसे ही मंडळी बॅटिंगसाठी पॅड बांधून सज्ज होत होती.
क्रिकेटचं रुपक वापरलं, तर खुद्द क्रिकेटमध्ये काय चाललं होतं? बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ भारतात अठ्ठेचाळीसमध्ये आला. जुन्या पिढीतले हजारे, मर्चंट, मोदी, मुश्ताक, अमरनाथ, मंकड लवकरच मावळले. नव्या पिढीत फडकर, मांजरेकर, सुभाष गुप्ते नुकतेच उगवले. पंचरंगी सामन्यांच्या जागी रणजी ट्रॉफी आली. शिवाजी पार्क, दादर युनियनमध्ये कसोटीवीरांची अंडी उबू लागली.
ह्याच काळात मुंबईत गँग आल्या. तेव्हा राजकीय पक्ष त्यांना सामावण्याइतके मुरब्बी झाले नव्हते. भास्कर वायंगणसारखे दादा लोकसुद्धा मुंबईत फोक हिरोच होते.
स्वातंत्र्य चळवळीची जागा हिंदी सिनेमा घेऊ लागला. दिलीपकुमार, राजकपूर, देव आनंद यांचा काळ आला. तलत, मुकेश, रफी, लता, आशा, शमशाद. एकास एक वरचढ संगीतकार आले. मुंबईच्या नागरी जनसंस्कृतीचं सुवर्णयुग सुरू झालं होतं.
१९५३साली आम्ही शीवहून दादरला रहायला आलो आणि १९५४ साली, म्हणजे मी कविता करायला लागलो त्याच वर्षी माझी भाऊ पाध्येशी ओळख झाली. रमेश समर्थ, भाऊ पाध्ये, हमीद दलवाई हे तिघे लोहियावादी आणि वृंदावन दंडवते हाही समाजवादीच, हे जवळपास एकाच सुमारास ओळखीचे झाले. कोल्हापुराहून आलेला अरुण कोलटकर, मूळ सावंतवाडीचा बंडू वझे, रमेश समर्थ आणि मी ह्यांनी ‘शब्द’ नावाचं निव्वळ कवितांचं अनियतकालिका सुरू केलं. अरुणच्या आणि माझ्या कविता नुकत्याच ‘सत्यकथे’त आल्या होत्या आणि शिवाय अरुण ‘सत्यकथे’साठी इलस्ट्रेशनसुद्धा करत होता. हमीदच्या कथा ‘सत्यकथे’त येत होत्या. भाऊचं काहीच कुठेच अजून छापून आलं नव्हतं.
लेखन- प्रकाशनाच्या दृष्टीनं आम्ही एका पिढीचे मानले जातो. पण हे सर्व लोक माझ्यापेक्षा वयानं मोठे. भाऊ, रमेश, बंडू साठी पार केलेले किंवा आसपास. हमीद अकाली वारला पण आज असता तर पन्नाशीच्या पुढेच. अरुणची पन्नाशी उलटलेली. मी पुढल्या वर्षी पन्नाशी गाठीन. आमच्यापैकी भालचंद्र नेमाडे आणि अशोक शहाणे हे जवळपास माझ्या वयाचे. पण तेव्हा मुंबईच्य सीनमध्ये ते नव्हते. ते १९६०च्या आसपास आम्हाला ठाऊक झाले.
त्यावेळच्या माझ्या ओळखीच्या लेखक कलावंत मंडळींमध्ये भाऊ पाध्ये सर्वस्वी वेगळा होता कारण तो इंटेलेक्चुअल, कलावंत, साहित्यिक टाईपच्या माहोलमध्ये नसायचाच. सिनेमा, क्रिकेट, हिंदी गाणी, आणि राजकारण या विषयांत तो रमलेला असे. क्राऊडबरोबर जगणं, सर्व काही क्राऊडच्या नजरेनं पाहू शकणं आणि मध्येच क्राऊडपासून अलग होऊन तेच जास्त नीट पाहू शकणं हे त्याचे गुण तेव्हापासून तसेच आहेत. चाळ, मोहल्ला, वसाहत, शहर यांच्या आकृतीबंधात तो व्यक्तीचं जीवन सहजपणे पाहू शकत होता. स्वतःला लेखक कलावंतांमधला मानण्याऐवजी क्राऊडमधलाच एक अदृश्य, संवेदनाक्षम घटक मानत होता. ही त्याची एम्पथी, हा रापो, हा प्रतिस्पंदी सलगपणा भाऊच्या कथाकादंबरी विश्वाचा प्राण आहे. समाजाशी एकरूप व्हायला त्याला कण्हावे-कुंथावे लागत नाही आणि पराकोटीच्या व्यक्तिवादातून निर्माण होणारा तणाव जसा अलग पडलेल्या बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकरलाही कधीच जाणवत नाही तसा भाऊला जाणवत नाही. मराठीत असा लेखक ह्या संबध काळात विरळाच आहे. मुंबईच्या आम माणसाला भाषा आणि निवेदनक्षमता लाभली तर तो भाऊच्या जवळ पोचेल इतका भाऊ सामान्य माणसाच्या जवळ असलेला पण असामान्य लेखक आहे.
भाऊच्या कथा-कादंब-या व्यक्तिजीवनाच्या बाबतीत फारशा खोलात कधीच शिरत नाहीत. बाह्य वर्तणुकीचं चित्रण त्या मार्मिकपणे करतात. माणसांची मनं, त्यांचा आत्मा यांच्या बाबतीत भाऊचं लेखन उदासीन असतं आणि जेव्हा तो ‘तत्त्वज्ञान’ मांडतो तेव्हा ते सपाट आणि सरधोपट असतं. शहरातल्या अनुभवी, शहाण्या माणसांनी हिंदी चित्रपटाच्या पातळीवर एखाद्या गहन प्रश्नाची उकल करून सांगावी तसला तो प्रकार आहे. वैचारिक पातळीवर भाऊ हा कच्चाच लेखक आहे. समाजजीवनाच्या नोंदण्यातसुद्धा भाऊ हा ‘मास्टर’ मानावा लागेल. वर्तनाचे टिपलेले तपशील, वातावरणाचे छायाचित्रवजा तपशील-सिनेमाच्या भाषेत खोल फोकस लावून पार्श्वभूमीसकट सगळ्या अॅ क्शनचा एकात्म सीन चित्रित करणं- हे भाऊचं वैशिष्ट्य. भाऊच्या कथा-कादंब-या वाचताना ह्या पैलूमुळेच फेलिनीसारख्या महान दिग्दर्शकाची आठवण होते. शहरातल्या निर्दय जीवनातले अनेक अमानुष तपशील विदाऊट कॉमेंट भाऊच्या चित्रणात झोतासारखे येत राहतात. त्याची सर्वच पात्रं मानवी आकाराची आहेत आणि त्यामुळे त्यांच्या धडपडी, त्यांच्या शोकांतिकासुद्धा कॉमिक वाटतात. ‘अग्रेसर’सारख्या उत्कृष्ट लघुकादंबरीत स्वतःच्या सेक्सचं भांडवल करायला शिकून सोकावलेली कनिष्ठवर्गीय शहरी मुलगी वर्गीय सोपानरचनेचा जिना धाडधाड चढत यशस्वी होते त्यातही सिनिकल विनोदबुद्धीने लेखक चवीने तिची हकीकत सांगतो. याचा परिणाम मात्र वाचक अंतर्मुख होऊन भयावह एलिअनेशनचा विचार करू लागावा असाच होतो. ‘वणवा’मधील उच्चवर्गीय मुख्य पात्र म्हटलं तर कळसूत्री आहेत.
जाहिरात एजन्सीचा पारशी मालक, त्याची अँग्लो-इंडियन बायको, पंजाबी सिनेनट, माजी मराठी हिंदी सिनेतारका वगैरे लोक लेखकाच्या परिचयाच्या जगातले नाहीत हे पहिल्यापासून स्पष्टच कळतं. ही पात्रं आपल्याला दिसतात ती वस्तुतः कनिष्ठ मध्यमवर्गाच्या दृष्टीतूनच जी वाचकाच्या व्दिपरिणामात्मक दृष्टीला जवळची आहेत. पण या पात्रांचे परस्परसंबंध दोघा पुरुषांनी बायकांची अदलाबदल करून अरण्यात जाऊन एकमेकांच्या बायकांशी व्यभिचार करण्याचा रचलेला डाव हे सूत्र एकदा पकडलं की पुढे जी शोकांतिका अटळपणे घडत जाते ती चंगळवादी संस्कृतीचा भीषण वैराणपणा प्रत्ययकारी रीतीने उभा करते आणि आपण पात्रांचा सपाटपणा, सांकेतिकपणा विसरून जातो.
भाऊच्या कथा-कादंब-यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मानवी जीवनातल्या घटना ह्या दृष्टीने त्यांची विश्वसनीयता. खरं तर विचित्र आणि विकृत, जवळजवळ दुःस्वप्नवत अतिवास्तवाच्या पातळीवरल्या कित्येक गोष्टी त्याच्या कथाविश्वात आहेत. पण अपवाद वगळले तर लाखात एक अशी पात्रं त्यात नाहीत आणि जे घडतं त्याला सामाजिक यथार्थाचे नियम लागू आहेत. संपूर्णपणे मानवनिर्मित अशा, यंत्रयुगीन भांडवलशाही आणि वसाहतवादी संस्कृतीचा बळी ठरलेल्या भारतीय शहरातल्या, मुळात पारंपरिक पण झपाट्याने बदलणा-या अवकाशात आणि काळात त्याच्या कहाण्या घडतात. कनिष्ठ आणि मध्यम वर्गाची माणसं, आणि त्यांची आडनावं पाहिली तर सगळं चातुर्वर्ण्य व्यापणा-या शहरी वस्तीतले नमुने, हे आपल्याला भाऊच्या विश्वात भेटतात. सर्वसाधारणपणे १९४५ ते १९६५च्या दरम्यानची मुंबई आणि तिच्यातले लोक भाऊच्या कथावाङ्मयात जास्त प्रमाणात आहेत. १९७० ते १९८०च्या काळात शहरात जे बदल झाले ते त्या मानाने कमी दिसतात. ‘डोंबा-याचा खेळ’(१९६०), ‘करंटा’ (१९६१), ‘वैतागवाडी’ (१९६४), ‘वासूनाका’ (१९६५), ‘बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर’ (१९६६), ‘अग्रेसर’ (१९६८), ‘राडा’ (१९७५), ‘वॉर्ड सर्जिकल नं. ७’ (१९८०), आणि ‘जेलबर्ड्स’ (१९८२) ह्या भाऊच्या कादंब-या आणि ‘एक सुन्हेरा ख्वाब’ (१९८०) आणि ‘मुरगी’ (१९८१) हे त्याचे कथासंग्रह वरील कालखंडातल्या मुंबईचे मुख्यतः चित्रण करतात. ‘राडा’तले राजकारण अर्थातच बव्हंशी १९७०नंतरचे आहे म्हणून काहीचा अपवाद तर ‘होमसिक ब्रिगेड’ (१९७४) आणि ‘वणवा’ (१९७८) ह्या मुंबईबाहेर घडणा-या घटनांबाबतच्या म्हणून त्यांचा अपवाद. यात अकरा कादंब-या आणि दोन कथासंग्रह मिळून नाही म्हटलं तरी जवळपास तीन हजार पृष्ठांची कथनात्मक वाङ्मयरचना आली. ह्या सर्व लेखनाचा काळ १९५५ ते १९८० धरला तर पंचवीस वर्षांत वर्षाकाठी सव्वाशे पानं सरासरी होतात. गल्लाभरू लेखकांच्या मानाने हा किरकोळ मजकूर झाला. गंभीर लेखकांच्या मानाने हा मजकूर लेखकाचं सातत्य सिद्ध करणारा आहे. तुलनेदाखल आमचेच मित्र घ्या. आमच्या मित्रांत कादंबरीकार दोनच. एक भाऊ आणि दुसरा भालचंद्र नेमाडे. पैकी नेमाडे ‘कोसला’ (१९६३)पासून ‘बिढार’, ‘झूल’, ‘जरीला’पर्यंत एकूण सुमारे बारा वर्षांच्या लेखकी कारकिर्दीत जवळपास बाराशे पानं मजकूर निर्माण करता झाला. म्हणजे त्याचीही सरासरी वर्षाला शंभर गंभीर पानांच्या आसपास पडली. याचा अर्थ हे लोक रोज किंवा वर्षभर लिहीत असतात असा नसून साधारणपणे वर्षभराच्या जागरुक जगण्यातून ते शंभर-सव्वाशे पानांचा मजकूर रचतात असा होतो. पण ह्या रचनेत त्यांच्या काळातल्या संस्कृतीची साक्ष खोल उमटलेली दिसते आणि मानवतेच्या कीर्दीतच तो मजकूर जमा होत असतो म्हणून ह्यांना थोर लेखक म्हणायचं.
ह्या कथा-कादंब-यांखेरीज भाऊंच्या वाचकांनी अवश्यच वाचावं असं पुस्तक म्हणजे ‘सजती है यूँ ही महफिल’ (१९८१) हे हिन्दी सिनेमा आणि सिनेमावाल्यांबद्दलचे लेख. गप्पाटप्पा आणि सांस्कृतिक समीक्षा एकाच वाचनीयपातळीवर आणणारा हा निबंधसंग्रह हिंदी सिनेमे बघता-बघता मराठी संस्कृतीचाही विचार करणा-या प्रत्येक माणसाला बोधक आणि मनोरंजक वाटेल. वर्तमानपत्राचं माध्यम आधुनिक लेखक सर्जनशीलपणे कसं वापरू शकतो याचा हे पुस्तक हा उत्तम नमुना आहे.
भाऊच्या ‘गुदाम’ कथेवरून ‘गोदाम’ चित्रपट तयार करताना एका परीनं मी भाऊच्या मूळ कथेची समीक्षाच करत होतो. मूळ कथेतील येसू ही बाई लग्नानंतर षंढ नवरा आणि लंपट सास-याची संभोगलोलुपता हे दोन्ही नैतिक आणि नैसर्गिक अन्याय सहन करते आणि पुरती विटल्यावरच सास-याचा कपाळमोक्ष करून पळून गुदामात लपते. गुदामाचा अधिकारी येडेकर आणि शिपाई धर्मा तिच्यामुळे चळतात. येडेकरची ती रखेली बनते आणि तिच्यापुढे तो अगतिक होऊन जातो. . . अशा बाईनं आत्महत्या करणं मला संभवनीय वाटलं नाही आणि भाऊच्या मूळ कथेतली पात्रं आणि त्यांच्या वागणुकीचं मानसशास्त्रीय सत्य यांच्या बाबतीत मी साशंक होतो. इतकं असूनही ‘गुदाम’ ह्या कथेची मूलभूत कथनरेषा मला एखाद्या आदिकथेसारखी, मिथसारखी बहुमुखी वाटत होती. मी भाऊच्या पात्रांना व्यक्तिमत्व देताना, संवाद देताना, त्यांचे परस्परसंबंध रचताना पटकथालेखक आणि दिग्दर्शक या नात्यानं पूर्ण स्वातंत्र्य घेतलं. तरीही कथेच्या कथातत्वाचा मी मुळाबरहुकूम मागोवा घेतला. दोन्ही कृती लोकांपुढे आहेतच. पण हीच अडचण मला ‘वणवा’, ‘जेलबर्ड्स’ ह्या कादंब-यांच्या पटकथा बनवताना आलेली आहे. भाऊच्या कथा-कादंब-यांच्या मूलाकृती जितक्या ताकदवान आणि अर्थगर्भ असतात तितकंच भाऊचं रंगकाम, तपशिलांना आकार देणं जुजबी किंवा निष्काळजी असतं. भाऊच्या जोड्यांपाशीसुद्धा उभं रहायची लायकी नसलेले मराठी कथाकार आणि कादंबरीकार निव्वळ झिलईदार वाङ्मयीन पृष्ठभागांच्या बळावर मराठीत गेली तीन वर्षं गाजून गेले. ह्याबद्दल बरेचदा चीडसुद्धा येते. तत्त्वासाठी प्रॉपर्टीवर पाणी सोडणारा भाऊ आम्हाला वंद्य असला तरी कथा-कादंब-यांचं लेखन हलगर्जीपणे आणि प्रकाशन बेजबाबदारपणे करणारा भाऊ आम्हाला शिरसावंद्य वाटणं शक्यच नाही. पण भाऊपुढे इलाज नाही.
भाऊपुढे इलाज नाही याचं कारण भाऊसारखा फक्त भाऊच आहे. आणखी ती हजार वर्षांनी मुंबईचे बाकी कोणतेही अवशेष न सापडता फक्त भाऊची पुस्तकं मिळाली तरी हे शहर आता आहे तसं डोळ्यांसमोर आणता येईल. गुजराती, हिंदी किंवा इंग्रजी या तीन भाषांत तरी मुंबईचं इतकं खोल चित्रण माझ्या पाहण्यात नाही. बंगाल्यांनी कलकत्त्याचं भरपूर करून ठेवलेलं असलं तरी मुंबईचा जोश, मुंबईची मस्ती, मुंबईचा मोकळेपणा वेगळाच आहे. भारतातल्या गरीबांचं मुंबई हे न्यूयॉर्क शहरच आहे जणू. जसं न्यूयॉर्क सिटीला ‘बिग अॅईपल’ म्हणतात तसं मुंबईला हापूस म्हणता येईल. उगाच देशभरची गर्दी इकडे लोटत नाही. पण एकदा मुंबईचा मोह पडला की कोणाही भारतीयाच्या संस्कृतीचं धोतर पुरतं फेडलं जाऊन तो औद्योगिक भांडवलशाहीच्या चंगळवादी घाण्याला नागव्यानंच जुंपला जाणार. भाऊची माणसं मुंबईचीच आहेत. मराठी संस्कृतीपासून दुभंगून ह्या बेटावरल्या नियमांनुसार ही माणसं चिवटपणे जगतायत. ही सर्व माणसं मराठीच आहेत. आधुनिक औद्योगिक शहरात भारतीय जीवनाचा जो पुनर्जन्म झालेला आहे आणि त्यामुळे त्याचे पारंपरिक सांधे बदलून जी एक नवीन आणि आजतागायत अनौरस संस्कृती निर्माण होत आहे, तिचं चित्रण भाऊच्या कथाविश्वात आहे. ह्या विश्वातल्या माणसांची आणि खुद्द लेखकाचीही भाषा एक निराळ्या प्रकारची मराठी बोली आहे. तिच्यात बंबई-हिन्दी, इंग्रजी आणि इतरही भाषांतून आलेले शब्द आहेत आणि फक्त मुंबईच्या अवकाशातच प्रचलित असलेले वाक्प्रचार आहेत. इथे निसर्ग नाही तर चहूबाजूंनी मानवनिर्मित व्यवस्था, बांधकामं, रहदा-या, व्यवहार ह्यांचीच गर्दी आहे. ह्या माणसांच्या मनाला, आत्म्याला आंतरिक ओसरी नाही, पैसा नाही. ह्यांच्या शरीरांच्या सभोवारसुद्धा पुरेसा अवकाश नाही. ह्याचं खासगीपण हिरावून घेतलं गेलेलं आहे. एका पब्लिक धक्काबुक्कीतून ही माणसं आपली चरित्रं रेटत चालली आहेत आणि तरीही त्यांना मानवी इच्छा, वासना, आशाआकांक्षा आहेत. भाऊची माणसं दारिद्र्यरेषेखालची झोपडपट्ट्यांमधली किंवा त्याहीपेक्षा तळाच्या पाशवी पातळीवर निव्वळ टिकण्यीच धडपड करणारी नाहीत. भाऊची माणसं दारिद्र्यरेषेच्या वरची, गरिबीतून कनिष्ठ मध्यमवर्गापर्यंत पोचलेली किंवा मध्यमवर्गातून उच्च वर्गाच्या दिशेने धडपडणारी माणसं आहेत. त्यातली बहुसंख्य माणसं व्यवहारी आणि इहलोकनिष्ठ आहेत, चैनचंगळीची संधी कमी मिळत असली तरी तिच्यासाठी भुकेलेली आहेत. खाणं-पिणं, लैंगिक सुख ही त्यांची धाडसी ध्येयं आहेत. ह्यात बेकारांच्या बरोबरीनं नाना कामं, नोक-या, काळे-गोरे धंदे करणारे लोक आहेत. औद्योगिक लोकशाही ही समानतेचं प्रलोभन आणि विषमतेची फूस देणारी एक विरोधाभासात्मक शर्यत आहे. भाऊच्या विश्वातले लोक सत्तास्पर्धेत अडकलेले लोक आहेत. त्यांचं भावजीवनसुद्धा आक्रमक आणि संरक्षक पवित्र्यांच्याच स्वरूपात दिसतं. एकूण समाज म्हणून ही माणसं अगतिक आहेत. परस्परांवर आक्रमण करणारे गट आणि व्यक्ती म्हणूनच त्यांना उद्दीष्टं आणि ध्येयं आहेत. लैंगिकता आणि स्त्री-पुरुषसंबंध ह्या बाबतींतही हाच आक्रमकपणा त्यांच्या वर्तणुकीत आहे. बलात्कार, व्यभिचार, रंडीबाजी आणि प्रेमानं शृंगारलेला लैंगिक किंवा भावनात्मक स्वार्थ ह्यांत भाऊ मूलभूत साम्य पाहतो ते मानवी स्वार्थतत्त्वाचं. परंपरागत संस्कृतीत रीतरिवाजांनी घालून दिलेल्या म-यादांमध्ये मानवी स्वार्थ झाकलेला राहतो. स्पर्धिष्णु संस्कृतीत जेत्यांना सर्व काही माफ असतं आणि चांगुलपणा फक्त गांडू ठरत असतो. जेते नागव्यानं हिंडले तरी ती त्यांची मर्दुमकी मानली जाते. अशा समाजाचं विदारक सत्यस्वरूप भाऊ तटस्थपणे किंवा कित्येकदा रसभरितपणेसुद्धा दाखवत राहतो. वरकरणी आपल्याला भाऊचं लेखन लोकप्रिय आणि रंजक कथावाङ्मयासारखं वाटेल कारण त्यात शैलीबाजी नाही, भाषेचे किंवा निवेदनाचे खास खेळ नाहीत. वर्तमानपत्री भाषा, गल्लोगल्ली बोलली जाणारी भाषा, बाजारू चित्रपटातल्या संवादांसारखी सवंग सांकेतिक भाषा भाऊ वापरतो खरा पण ही त्याच्या विश्वातल्या माणसांची बोली आहे आणि निवेदक त्यांच्यापासून वेगळा होऊन ति-हाईतपणे त्यांच्याकडे बघू इच्छित नाही. भाऊचा मानवतावाद त्याच्या क्राऊडबरोबर राहण्याच्या निश्चयात दिसतो. आधुनिक आणि आधुनिकोत्तर काळातले अनेक लेखक-कलावंत आपल्या कलेला किंवा लेखनाला एक स्पेशलाईझ्ड किंवा विशारदीय क्षेत्र मानून किंवा स्वतःच्या प्रतिभेला एक खाजगी आणि स्वयंपूर्ण क्षेत्र समजून आपापलं काम करतात. त्यांचे रसिक, वाचक आणि समीक्षक हेसुद्धा स्वतःला विशेषज्ञ मानतात. भाऊ आम पब्लिकची बोली बोलणारा आणि आम पब्लिकचीच बांधिलकी मानणारा लेखक आहे. अर्थात् आम पब्लिक काही भाऊच्या कादंब-या वाचणार नाही हे भाऊलाही ठाऊक असायला हरकत नाही. उलट तथाकथित स्पेशालिस्ट वाचक-समीक्षक भाऊकडे ढुंकून पहाणार नाहीत हेही दुर्दैवच आहे. राजाभाऊ पाटणकर, तात्या उर्फ गो. मा. पवार, म. द. हातकणंगलेकर वगैरे सध्याचे वडीलधारे आणि समंजस समीक्षक. पण त्यांनी कधीच एवढा मोठा कादंबरीकार मराठीत असू आणि त्याची एव्हाना साठी उलटलेली असूनही त्याची नीट दखलसुद्धा घेतलेली नाही. आमच्या पिढीत तर मुळातच समीक्षकांची उणीव. उत्तम वाचक असून आणि पेशाने वाङ्मयाचेच प्राध्यापक असूनसुद्धा चंद्रशेखर जहागीरदार किंवा रवींद्र किंबहुनेसारखे लोक भाऊकडे वळलेले नाहीत. भालचंद्र नेमाडे हा कादंबरीकारच. अधूनमधून सेमिनार किंवा भाषणांच्या निमित्ताने थोडीफार समीक्षा करणारा आणि त्यात जास्त करून तात्त्विक जनरलायझेशन करून खळबळजनक मूल्यमापनं मांडणारा. नेमाडेनं भाऊबद्दल गंभीरपणे लिहिलंय पण ते त्रोटक आणि सूत्रबद्ध. उरला उत्तम क्षीरसागर हा कुशाग्र टीकाकार. त्यानंही अजून भाऊवर लिहिलेलं नाही. मुंबईच्या अनेक तरूण लेखक-वाचकांत भाऊचे चाहते खूप पण त्यानीही समीक्षेचा आवश्यक हमरस्ता टाळून आपली आवड खाजगीतच ठेवलेली. मराठी वाङ्मयीन संस्कृतीच्या ह्या असल्या दीनवाण्या वातावरणात घाणेरडे कादंबरीकार सत्कार करून घेणार, एकमेकांच्या पाठी थोपटणार. ह्यांना चांगला लेखक फुकट लाभला तरी ते त्या लेखकाचंच दुर्दैव, कारण स्वतःच्या सुदैवानं ज्यांना भान नाही ते बिनशेपटीच्या जनावरांच्या पातळीवर येतात, हेही त्यांना कळत नाही.
‘डोंबा-याचा खेळ’ ही भाऊची पहिली प्रकाशित कादंबरी मी मुंबईच्य भायखळा तुरुंगात हस्तलिखित स्वरूपात वाचली. ही गोष्ट १९५६ किंवा १९५७ सालची. भाऊच्याच नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सत्याग्रह करून मी, वृंदावन दंडवते, रमेश समर्थ वगैरे जेलमध्ये गेलो होतो. सुटल्यावर भाऊची एक अजून अप्रकाशित असलेली, ‘जोजफ आणि लिली’ ही कादंबरीसुद्धा वाचून काढली. मी भलताच प्रभावित झालो. ‘मौज’, ‘सत्यकथे’त माझं छापून येत होतं, ओळख होती, त्या आधारावर भाबडेपणानं मी ‘डोंबा-याचा खेळ’ वाचण्याचा श्री. पु. भागवतांना आग्रह केला. त्यांनी ती वाचणं किंवा वाचून छापणं शक्य नव्हतं हे मला कळायला आणखी दहा वर्षं जावी लागली. मराठीतल्या तथाकथित प्रतिष्ठितांचं भाऊकडे लक्ष जायला १९६५-६६ उजाडावं लागलं. प्रल्हाद केशव अत्र्यांनी ‘वासूनाका’वर अग्रलेखांतून घाणेरडे हल्ले चढवले. मग दुर्गाबाई भागवतांनी तरातरा ‘वासूनाका’चं समर्थन करणारा एक उत्तम लेख लिहिला. वादग्रस्त आणि ‘अश्लिल’ ठरल्यामुळे ‘वासूनाका’ गाजलं. ‘वैतागवाडी’ आणि ‘करंटा’ यांच्याकडे त्या मानानं दुर्लक्षच झालं. हिन्दी चित्रपटांनी जसा एक वैतागवाणा गॉसिप जर्नलिझम पोसलाय तसलाच विनोदाच्या नावाने वाङ्मयीन क्षेत्रात देवयानी चौबळचाच अवतार घेणारे ‘ठणठणपाळ’, आमचे मित्र जयवंत दळवी यांनी. ‘ललित’च्या पातळीवर यांनी अधूनमधून भाऊवर लिहायला सुरुवात केली. आता पु. ल. देशपांड्यांना गुरुस्थानी मानणारे हे ‘ठणठणपाळ’ भाऊच्या कादंब-यांची त्यांना लायकी कशी कळावी? मराठी वाङ्मय हा निव्वळ गॉसिपचाच विषय मानणा-या मुंबईतल्या आम धंदेवाईक पण कलात्मकतेच्या गप्पा मारणा-या आणि छपाईच्या शाईचीच नशा करणा-या लोकांना तेवढ्यामुळे भाऊचं नाव ठाऊक झालं, एवढंच. ‘मौज’ किंवा ‘पॉप्युलर’चा टिळा वेळीच कपाळी लागता तर भाऊला ताबडतोब समीक्षकसुद्धा पावले असते. पुढे ह्याच नात्यागोत्यांच्या आधारे ‘महाराष्ट्र टाईम्स’चे परीक्षणकार किंवा ‘प्रतिभा आणि प्रतिमा’चे निर्माते त्याच्याकडे वळले असते. दलित लेखकांची भरमसाट कौतुकं झाली ती ह्या उच्चभ्रू, उच्चवर्णीयांच्या जातीय अपराध-भावनेतून, वाङ्मयीन समजदारीतून नव्हे. खरे वेशीबाहेर ठेवले गेलेले मराठी लेखक वेगळेच आहेत आणि त्यांत भाऊ शीर्षस्थानी आहे. काँग्रेस पक्ष जसा दलितांचा कैवारी म्हणवतो पण त्यांना शक्य तो पुढारी होऊ देत नाही तसाच मराठीतल्या तथाकथित उच्चभ्रू समीक्षकांचा माफिया एकीकडे चिं. त्र्यं. खानोलकर, शिरुभाऊ पेंडसे, जी. ए. कुलकर्णी तर दुसरीकडे दया पवार, बाबूराव बागूल ह्यांना वेगवेगळ्या कप्प्यांत ठेवून त्यांची मानभावीपणे स्तुती करतो. आम्ही समाईक वाङ्मयीन परंपरेचा संदर्भ मानत असतो तर हे शक्य नव्हतं. भाऊच्या कादंब-यांचा मानदंड ‘दलित’ आणि ‘सवर्ण’ अशा दोन्ही मराठी कथनात्मक वाङ्मयाला लावता येतो कारण महानगरीय मराठी साहित्यातल्या स्टँडर्ड कादंब-या आणि कथा भाऊच्याच आहेत. पण लक्ष्यात कोण घेतो?
आज १९८७ साली मराठी वाङ्मयीन संस्कृती पूर्णपणे विस्कळित झालेली दिसते. वाङ्मयीनच नव्हे, एकूणच संस्कृती विस्कळित झालेली आहे. वेगवेगळ्या वसाहती करून आपापल्या कुंपणात लोकांनी रहावं तसं झालेलं आहे. एकीकडे साक्षरता वाढली, वाचकवर्ग वाढला, टाइमपास करण्याची साधनं वाढली. पण वर्तमानपत्रं, दूरदर्शन, आकाशवाणी, नियतकालिकं, व्यासपीठं, सभासंमेलनं अशा वाढत्या प्रमाणांत उपलब्ध झालेल्या माध्यमांतही वाङ्मयीन व्यवहार दिशाहीन झालेले आहेत. वाङ्मयावर कोणाचा वाढता विश्वास असावा अशी परिस्थितीच दिसत नाही. एक तर वाङ्मय शिकवणा-या शिक्षक- प्राध्यापकांचाच वाङ्मयावर विश्वास नसावा, वाङ्मयाच्या विद्यार्थ्यांनाही हा दिशाहीन व्यवहारच वाटत असावा. दुसरं म्हणजे मराठी लेखक-समीक्षकांत सवंग लोकप्रियतेसाठी आणि खोट्या प्रतिष्ठेसाठी चालणा-या चढाओढीपायी एकूण वाङ्मयीन क्षेत्राचंच पब्लिकच्या दृष्टीने अवमूल्यन झालं असावं. उदाहरणार्थ यंदा आनंद यादव, वसंत कानेटकर, गंगाधर गाडगीळ या पात्रांद्वारा झालेलं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकांचं दयनीय नाटक. वस्तुतः ह्यापैकी कोणाकडूनच मराठी साहित्याचं फार मोठं भलं आजवर झालेलं नाही आणि पुढे होण्याची शक्यता नाही. गाडगिळांचं कथालेखन संपलं पण ते शिडीसारखं वापरून काही काळ ते समीक्षक म्हणून वावरले. १९६०नंतरचं मराठी वाङ्मय त्यांनी वाचलं असावं याचाही प्रकाशित पुरावा उपलब्ध नाही. अर्थतज्ञ म्हणून ते इंग्रजी-मराठीत स्तंभलेखन करत नसते तर त्यांचं छापील नावसुद्धा आपल्या नजरेस पडण्याचं कारण नव्हतं. पन्नासेक चांगल्या कथांच्या भांडवलावर, त्यांचा सांस्कृतिक गुंतवणूक म्हणून लाभ घेत आजवर ते वाङ्मयात टिकतात त्या अर्थी अर्थतज्ञ तर ते असलेच पाहिजेत. यादवांनी तर त्याहून कमी प्रमाणात चांगलं लिहिलं. पुढे त्यांनी ग्रामीण वाङ्मयाचा झेंडा उभारून जमवाजमव केली, व्यंकटेश माडगूळकरांसारख्या स्वतःहून जास्त महत्त्वाच्या लेखकावर चिखलफेक करून सनसनाटी निर्माण केली. कानेटकरांनी काही वाईट आणि लोकप्रिय नाटकं लिहून प्रसिद्धी मिळवली. आणखी दहा वर्षांनी, पन्नास वर्षांनी, शंभर वर्षांनी त्यांचं काय उरेल? मराठी संस्कृती इतकीच खालावलेली राहून टिकणं मला तरी अशक्यच वाटतं. म्हणजेच सामाजिक विस्मरणाच्या काठावर उभी असलेली ही माणसं आहेत. त्या दृष्टीने समीक्षकांनी आणि माध्यमांच्या मुकादमांनी वेशीबाहेर ठेवलेला भाऊ पाध्येसारखा समर्थ लेखक आज ना उद्या नव्या पिढ्या पुन्हा पुन्हा गंभीरपणे वाचतील कारण भाऊच्या साहित्यात औद्योगिक शहरी संस्कृतीतल्या मानवी जीवनाचा क्रायसिस ज्या व्यापक आणि गहि-या स्वरूपात प्रकट झालेला आहे ते स्वरूप बघणं सर्वांनाच अटळ आहे. एका समाजाचाच तो आत्मप्रत्यय आहे आणि एका प्रतिभावंत लेखकाचं ते ऐतिहासिक यश आहे.
भाऊचं कथा-कादंबरीवाङ्मयाचं, विशेषतः इंग्रजीद्वारा इंग्रजी तसंच युरोपीय वाङ्मयाचं, वाचन बरंच आहे. आधुनिक फारसं नसेल पण एकोणिसाव्या शतकाअखेरपर्यंतच्या अभिजात आणि श्रेष्ठ रशियन, फ्रेंच लेखकांपर्यंत तरी. एके काळी दोस्तोयेवस्की हा भाऊचा मानदंड आणि मार्गदर्शक होता. भाऊचा सिनेमाचा व्यासंग वाचनाहून दांडगा आहे. पण अर्थशास्त्राची पदवी घेतलेला, समाजवादी राजकारणात पडलेला भाऊ हा वाङ्मयाच्या पंडिती पठडीतला लेखक नव्हे. तो पुढे व्यवसायाने पत्रकार झाला हेही त्याच्या स्वभावाल धरूनच होतं. कामगार चळवळ, इराण्याच्या हॉटेलातल्या चर्चा-विवाद, पाध्येवाडीच्या नाक्यावरली गॉसिप, हुतूतूपासून क्रिकेटपर्यंतच्या मॅचेस बघणं, सर्व वयाच्या आणि वर्गाच्या माणसांत मिसळणं, बिल्डींगपासून सबंध शहरापर्यंतच्या भानगडींमध्ये रस घेणं, गुत्त्यांत किंवा बैठकीत दारू पिणं, दंगली-मारामा-यांचा काळजीग्रस्त जागरूक नागरिकाप्रमाणे छडा लावणं, सिनेमे बघणं आणि सिनेमांना होणा-या प्रतिक्रियांवरून आपल्या सभोवारच्या लोकांची नाडी ओळखणं, शहरातल्या जाहीर सभांना जाणं, लोकमताचे आणि लोकाभिरूचीचे प्रवाह समजून घेणं, बाजारहाट करणं, क्वचित स्वैपाकसुद्धा करणं आणि त्या पातळीवर दैनंदिन आर्थिक जीवनाच्या धुमश्चक्रीचा अनुभव घेणं, मित्रांचे आणि शेजा-यापाजा-यांचे प्रश्न ऐकणं, त्यांना आधार द्यायला धावत जाणं, कायम सामाजिक कार्यकर्तीचा रोल निभावणा-या बायकोद्वारा अनेक समस्या ऐकत त्यांचा विचार करणं हे भाऊचे सोर्सेस. ते मुळात मुख्यत्त्वे वाङ्मयीन नाहीत. त्याच्या आस्थासुद्धा मुळात निव्वळ तात्विक, आयडियालॉजिकल, नैतिक, वैचारिक अशा विशेषाग्रही नाहीत. प्रत्येकाच्या आणि एकेकाच्या, गटागटाच्या आणि सर्व समूहाच्या, एकूण जीवनाकडे तो पहात असतो. त्याच्या ह्या पहाण्यात एक तटस्थ आपुलकीत त्याचं कलात्मक सामर्थ्य आहे. वासू पेठे नावाचा भाऊचा एक अत्यंत जुना, जवळचा मित्र आहे. पाध्येवाडीच्या दिवसांपासून आणि लोहियावादी राजकारणाच्या काळापासून. वासू पेठे हा लेखक किंवा विचारवंत माणूस नाही. वासू पेठे हा भाऊ पाध्ये ह्या लेखकाचा जवळचा मित्र आहे. ही गोष्ट भाऊच्या वैयक्तिक मूल्यव्यवस्थेवर प्रकाश टाकणारी आहे. लेखकाचा मित्र प्रकाशक किंवा समीक्षक असणं, दिग्दर्शकाची मैत्रिण नटी असणं, काँट्रॅक्टरचा मित्र आर्किटेक्ट असणं, राजकारण्याच मित्र वृत्तपत्राच संपादक असणं, मेडिकल विक्रेत्याचा मित्र केमिस्ट असणं ह्यापेक्षा ही मूल्यव्यवस्था वेगळी आहे.
जगातल्या घडामोडींच्या बातम्या तपशीलवार वाचून त्यांचा दररोज अन्वय लावणं हाही भाऊचा स्वभाव. हे मुद्दाम सांगण्याचं कारण म्हणजे आमचे काही मित्र तत्व म्हणून रोजचं वर्तमानपत्रसुद्धा वाचत नाहीत. का तर म्हणे त्याचा आपल्या जीवनाशी प्रत्यक्ष संबंध नसतो. जीवनाविषयीच्या चौफेर कुतूहलपूर्ण आस्थेमुळे भाऊ ब-यापैकी पत्रकार झाला, उत्तम चित्रपट समीक्षक झाला आणि कादंबरीकार म्हणून त्याला ह्याच आस्थेने विशाल पट दिला. संकुचित नैतिक जगात वावरणारी मिशनरी किंवा उद्दीप्त प्रेषित भाऊ कधीच नव्हता. तो एक जागरूक समतावादी, लोकशाही वृत्तीचा नागरीक आहे. माणसांच्या नैसर्गिक मर्यादा आणि मानवनिर्मित वैगुण्ये यांतला फरक करणारा तो क्लासिकल जीवनदृष्टीवाला लेखक आहे. रंगेल आणि ट्रॅजिक ही दोन्ही परिमाणं त्याला दिसतात. थोर कॉमिक लेखकांप्रमाणे तो चौकटी सैल करून जीवनानुभव सामावणारा कलावंत आहे.