Thursday, June 24, 2010

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर

- चंद्रकान्त पाटील

('वाचा' ह्या अनियतकालिकाच्या भालचंद्र नेमाडे यांनी संपादित केलेल्या जानेवारी १९६८च्या अंकातील हे परीक्षण चंद्रकान्त पाटीलांच्या परवानगीने इथे.)

बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर एका गरीब विधवेची इस्टेटीची केस चालवायला घेतो व हरतो. त्याचा दलाल त्याला धीर द्यायचा प्रयत्न करतो. तर  बॅरिस्टर चक्क प्रॅक्टिस सोडल्याचे सांगून त्याला घालवतो इथून कादंबरी सुरू होते.

नंतर धोपेश्वरकरांचं आयुष्य स्पष्ट करणा-या ब-याच गोष्टी घडतात. धोपेश्वरकर पब्लिक प्रॉसिक्यूटरचा एकुलता एक मुलगा. इस्टेट खूप. त्याला एक उच्च मध्यमवर्गियांच्या सवयी असलेली व प्रतिष्ठेच्या आवर्तात गुरफटलेली प्रेमविवाही बायको असते. तो हुषार म्हणून गाजलेला. फॉरेन रिटर्न. प्रॅक्टिस चालत नाही. त्यात काही रसही नसतो. जायचं म्हणून कोर्टात जातो. वेळ संपली की घरी परत. पुढंपुढं हेही सोडून देतो. रस्त्यावरच भटकून घरी परत. हे घरी माहीत नसतं. एकदा रस्त्यात लहानपणीची मोलकरीण आयव्ही आणि तिची मैत्रीण क्लारा भेटते. हा त्यांच्या घरी जातो. मग हे रोजचंच होऊन बसतं. याला सुरुवातीला कलाच्या सुडौल बांध्याचं आकर्षण असतं. क्लारा त्याच्यावर प्रेम असल्याचं सांगते तेव्हा ते मरून गेलेलं असतं. राय नावाच्या ऑफिसराकडून आयव्ही गर्भार राहते. दोघींना विलक्षण धक्का बसतो. क्लारा मदतीसाठी याच्याकडे येते तर हा कुणाला नकळत तिला घेऊन दूर खेड्यावर जातो व ती आपल्यामुळेच गर्भार असल्याचं सांगतो. हे खेडं त्याच्या दोस्ताचं. दोस्ताकडं राहून ही दोघं त्याला मदत करतात. भाषणं लिहून काढ, कायद्याची भाषांतरं कर असं. आयव्ही बाळंतपणात मरते. काही दिवसांनी खरी बायको येते. ती पण गर्भार. मी चुकत गेले म्हणते. परत चालायला सांगते. निघतात. गाडीत बसतात. हा एकदम् खाली उडी घेतो आणि गाडी सुरू. हा हात हालवून तिला निरोप देतो. पुन्हा रिकामा.

असं हे कथानक. धोपेश्वारकराला कसल्याच भावभावना उरल्या नाहीत. कसलं वैफल्यही नाही. हा सगळ्याच व्यवहाराबद्दल आणि आयुष्याबद्दल उदासीन आहे. याला कशात बांधून घेणं असह्य होतं. बायको, घर, वकिली, सार्वजनिक आयुष्य या व्यवहारी पातळीवर ठेवणा-या गोष्टींचीच उबग येते. तरीही हा दिवस ढकलीत जगत असतोच. शीड तुटलेल्या गलबतासारखा. दिशाहीन.

विलक्षण साध्या व सरळ निवेदनामुळं कादंबरी प्रथमदर्शनीच जिंकून टाकते. घटना प्रभावितपणे मांडल्यात. हे पहिलं यश. दुसरं कादंबरीच्या गाभ्याचं. विषय मराठी कादंब-यात एकदम वेगळा व महत्त्वाचा. सुखवस्तू घराण्यातल्या व सगळं जसंच्या तसं मिळालेल्या धोपेश्वरकरला आयुष्यात कसलाच उत्साह वाटत नाही. नेहमी 'मी का जन्मलो? मी कशाकरता जगतो आहे' असे प्रश्न पडतात. हे प्रश्न मूलगामी, एकदम आजच्या पिढीचे आणि म्हणून वास्तव आहेत. जगण्याच्या प्रयोजनाचा प्रश्न वैयक्तिक पातळीवर न राहता सार्वत्रिक होत जातो.

कादंबरीतल्या घटना अनपेक्षित व कथानकाला गतिमान ठेवणा-या आहेत. धोपेश्वरकरला अलिप्तपणामुळे आलेली अवस्था पाहिजे तेवढ्या तीव्र स्वरूपात व्यक्त झालेली नाही हा त्यातला उणेपणा. धोपेश्वरकरला प्रश्न पडतात पण त्यांची उत्तरं शोधण्याचा तो कधीच प्रयत्न करत नाही. धोपेश्वरकर असं का वागतो याचं कारण भाऊरावांना कुठेच दाखवता किंवा किमान सुचवता आलं नाही. एकूण विषयावरचं चिंतनच कमी पडतंय असंही जाणवतं. अपवाद: एकशे तेवीस/चोवीस पानांवर आलेले मृत्यू व संभोगासंबंधीचे उल्लेख. 

धोपेश्वरकरसारख्या माणसाचं असं आयुष्यातून उठून जाणं, अस्तित्वावरची श्रद्धाच तुटून जाणं हा कदाचित नेहमी भेडसावत असणा-या मृत्यूच्या जाणिवेचा परिणाम असावा, असं आयव्हीच्या मृत्यूनंतरच्या धोपेश्वरकरच्या विचारांवरून वाटायला लागतं. तसं असेल तर (कदाचित तसं असेलही. कारण असाच महत्त्वाकांक्षा हरवून बसलेला. जीवनावरची श्रद्धा उडून गेलेला 'कोसला'तला पांडुरंग सांगवीकरसुद्धा बहिणीच्या मृत्यूनं असाच आतून बाहेरून ढवळून निघालेला असतो.)  धोपेश्वरकरच्या मनावरचा मृत्यूचा पगडा आणि त्यामुळं होणारा मनातला विलक्षण संघर्षही भाऊरावांना मांडता आला नाही, हे भाऊरावांचं अपयश नोंदवावं लागतं.

म्हंजे मग जमेच्या बाजूचं नुसतं कथानक उरतं. तर ते सुद्धा शेवटी शेवटी सांकेतिक कथाकादंब-यांसारखं बंदिस्त वाटायला लागतं. म्हंजे आयव्हीला घेऊन खेड्यात जाणं, आयव्हीची प्रसूती व मरण, बायकोचं त्या खेड्यात येणं इत्यादी. कादंबरीची अखेरही काहीच परिणाम करीत नाही. (आणि फणीश्वरनाथ रेणूच्या एका अतिशय चांगल्या कथेची अखेरीची उगीचच आठवण येते.)

मग नुसत्या प्रभावी निवेदनानं आणि कथानकानं कादंबरी यशस्वी होते का. तर तिला यशस्वी व्हायला अजूनही काही लागतं. आणि ते भाऊरावांच्यातल्या सर्जक लेखकाला कधी तरी नक्कीच सापडेल.

तोपर्यंत भाऊरावांना चांगले कथाकार म्हणून म्हणू.

No comments:

Post a Comment