Saturday, July 10, 2010

महानगरी नाक्यावरचा वासू- भाऊ पाध्ये

- राजन गवस

(हा लेख 'मुक्त शब्द'च्या मे २०१२ मधल्या अंकातून इथे प्रसिद्ध केला आहे. गवस यांची फोनवरून परवानगी घेतली. त्यांनी भाऊंच्या लेखनावर पीएच.डी. केली आहे).

एक
कॉलेजच्या पहिल्या वर्षात असताना गडहिंग्लजच्या सार्वजनिक वाचनालयात नावनोंदणी केली. कारण काय तर कॉलेजात ग्रंथपाल म्हणून एक पैलवानगडी काम करत होता. त्याचा आणि पुस्तकाचा काडीचाही संबंध नव्हता. पुस्तकमागणीसाठी गेलं की विद्यार्थ्यांच्या अंगावर धावून यायचा. असाच माझ्या अंगावर धावून आला. आणि आमची जोरदार भांडणं झाली. म्हणजे एकमेकाची गळपट धरण्यापर्यंत प्रकरणानं गंभीर वळण घेतलं. कॉलेजच्या नोटीसबोर्डावर आमचं नाव झळकलं. कार्ड जप्त केलं. येथून पुढे ग्रंथालयातून पुस्तके मिळणार नाहीत. इत्यादी इत्यादी.पहिले काही दिवस असेच गेले. वाचायचं आहेच कोणाला? ग्रंथपाल गेला उडत. अशा बाता मारण्यात. पण ते काही टिकलं नाही. मग सार्वजनिक वाचनालयाची वाट धरली. तर तिथं अजब प्रकार.


तिथला ग्रंथपाल शंभरभर पुस्तकं टेबलावर टाकून ठेवायचा. येणाऱ्या वाचकानं त्यातलं पुस्तक निवडून घ्यायचं. पुस्तक मागायचं नाही. असल्या ढिगात पुस्तकं शोधायचा कंटाळा यायचा. मग हाताला येईल ते पुस्तक घेऊन जायचं. अशात एकदा ‘डोंबाऱ्याचा खेळ’ हाताला लागलं. एका रात्रीत वाचून काढलं. कारण काय तर सगळं चळवळीत घडणारं त्या पुस्तकात. मी त्या वेळी देवदासी चळवळीत काम करत होतो. त्या चळवळीत आणि कामगार चळवळीत सारखंच घडतंय, या धाग्यानं त्या पुस्तकानं मला खिळवून ठेवलं. त्या वेळी भाऊ पाध्ये या लेखकाचं नाव मला ठाऊक झालं.

आम्ही चळवळीतली पोरं आठवड्याला एकत्र येऊन एखाद्या पुस्तकावर, वर्तमानपत्रातल्या बातमीवर चर्चा करायचो. त्या ग्रुपमध्ये मी ह्या पुस्तकाबाबत सांगितलं तर आमच्यातले ज्येष्ठ माझ्यावर उखडलेच. तो काय लेखक आहे काय? असं काय काय बरळले. मला त्यांचा भयंकरच राग आला. इतकं ते पुस्तक मला आवडलं होतं. नंतर भाऊ पाध्यांचं पुस्तक मिळावं म्हणून मी रोज ढीग चाळायचो. पण मिळायचं काहीच नाही. एकदा धाडस करून ग्रंथपालाकडे गेलो. लेखकाचं नाव सांगितलं. यांची आणखी कुठली पुस्तकं असतील तर वाचायची आहेत असं म्हटलं. तर त्याच्या चेहऱ्यावरची रेघही हलली नाही. त्यांनी तसंच हाकलंल बाहेर. कॉलेजचं ग्रंथालय बंद झालंच होतं, आता हेही बंद होईल या भीतीनं न बोलताच पायऱ्या उतरलो. पण मनात भाऊ पाध्ये हे नाव घर करून बसलं.

कॉलेज संपल्यावर एम.ए. करताना पुन्हा. ‘बॅ. खर्डेकर’ ग्रंथालयात भाऊ पाध्यांचा शोध सुरू झाला. तिथं ‘वासूनाका’ हातात पडलं. पाने पाने सुटी झालेल्या अवस्थेत. पोक्या आणि गँग एकदम भन्नाट. अशात दुसऱ्या पुस्तकांचा शोध सुरू झाला. तर पुन्हा निराशा. ‘वैतागवाडी’ अभ्यासाला नेमलेली पण पुस्तकच मिळायचे नाही. त्या वेळी विभागप्रमुख गो. मा. पवार सर होते. त्यांच्यासमोर जायची हिंमत नव्हती. अशात एके दिवशी नोटीसबोर्डावर नोटीस लागली. भाऊ पाध्ये दहा दिवस व्याख्याने देण्यासाठी विद्यापीठात येत आहेत. नोटीस वाचल्या वाचल्या एकदम उंच उडी मारली. दिवसभर एकदम हवेत. मनात घर करून बसलेला लेखक बघायला, ऐकायला मिळणार. त्या वेळी किंवा आताही साहित्यातलं फार कळलं असं नाही. पण मनात एखादं पुस्तक, लेखक बसला की मन पाठलाग करत राहतं. ही सवयच.

भाऊ पाध्यांना घेऊन पवार सर वर्गात आले. त्यांना बघितल्या बघितल्या मी उडालोच. चिटाचिटाचा शर्ट, एकदम थेट माणूस. मास्तरांसारखी व्याख्यानंबिख्यानं देणार नाही. आपण काहीही बोलत जाऊ. सिनेमापासून राजकारणापर्यंत, असं पहिल्यांदाच त्यांनी सांगून टाकलं. आम्ही खूश. मग कशा वाट्टेल त्याच्यावर चर्चा. त्या चर्चेतूनच त्यांच्या सगळ्या पुस्तकांची नावं माझ्या हातात आली. त्या दहा दिवसांत भाऊ पाध्ये आमचे ‘हिरो’ झाले. आमच्या वर्गातले आम्ही आठ-दहा जण त्यांच्याबरोबर कुठंही भटकायचो. राजाराम तलाव, रंकाळा ते राजवाडा. भटकताना विषयाला तोटा नसायचा. त्यांच्या बोलण्याची आगळी वेगळी रीत. सगळं कळायचं असं नाही. पण त्यांचा शब्द न् शब्द ऐकत राहावं असं सगळं.

एम.ए. झाल्या झाल्या ठरवून टाकलं, आपण पाध्ये यांच्या साहित्यावरच काम करायचं. एकदा बिनधास्तपणे पवार सरांना सांगून टाकलं, मला भाऊ पाध्ये यांच्या साहित्यावर पीएच.डी. करायचीय. तर सर हसले. म्हणाले, वाचलंस काय काय? तर फक्त तीन कादंबऱ्या. आणि ‘सोबत’मधले लेख. म्हणाले, पहिलं सगळं वाचून काढ. सरांना सांगायचं तरी कसं, एकही पुस्तक मिळत नाही. आठ दिवस कोल्हापुरातली बहुतेक ग्रंथालये पालथी घातली. तर फक्त ‘बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर’, ‘वासूनाका’, ‘वैतागवाडी’ ह्या तीनच कादंबऱ्या. बाकी काहीच नाही. पुस्तकं मिळत नाहीत, हे सांगण्याची सरांसमोर सोय नव्हती. नंतर पीएच.डी.चा विचार सोडून दिला. तीन-चार वर्षे फिरकलोच नाही विद्यापीठात. नंतर कधीतरी ‘श्री’ साप्ताहिकात ‘खुबसूरत काकू’ पाध्यांनी क्रमशः लिहायला सुरुवात केली. पहिली पाच-सहा प्रकरणं वाचल्या-वाचल्या पुन्हा डोक्यात किडा वळवळायला लागला. पवार सरांच्याकडे गेलो. त्यांनी सांगितलं, दोन वर्षं जागा होणार नाही. एम.फिल. करतो का बघ. पण भाऊंच्या कादंबऱ्या न घेता कथासंग्रह घेऊ.

‘मुरगी’, ‘थालीपीठ’, ‘थोडी सी जो पी ली’, ‘एक सुन्हेरा ख्वाब’ हे मिळवणं तर महाकठीण. म्हणजे आपलं आणि भाऊ पाध्ये यांचं काही जमत नाही. त्यात सरांनी दम दिलेला. आपण एम.फिल.चं काम करतोय किंवा पीएच.डी. करणार आहे असं भाऊ पाध्यांना सांगायची गरज नाही. म्हणजे त्यांच्याकडे जाऊन पुस्तकं आणण्याचा मार्ग बंद. अशात मनोहर कदम या मित्रानं माझे सगळेच प्रश्न निकालात काढले. मिळतील तेवढी पुस्तकं आणि दुर्मीळ असणाऱ्या पुस्तकांच्या झेरॉक्स पदरखर्चानं गारगोटीस पाठवल्या. सगळे प्रश्न निकालात. परंतु संताप याचा येत होता की नको त्यांच्या भाराभर प्रती माझ्या अवतीभोवती आणि या लेखकाची पुस्तकं मिळवण्यासाठी एवढा खटाटोप ह्याला काय ग्रंथव्यवहार म्हणायचा. पण याचा पाध्येच जबाबदार आहेत, हे नंतर ध्यानात येऊ लागलं. यांचा एकच एक प्रकाशक नाही. एक ‘मॅजेस्टिक’कडे दुसरं ‘पॉप्युलर’कडे तर तिसरं भलतीकडेच. त्या प्रकाशकाचं नावही शोधणं कठीण. असला सगळा बेफिकिरपणा. ‘जी. एम. प्रभू प्रकाशन, गोवा’तर्फे ‘अग्रेसर’ काढलेली. तर ‘थोडी सी जो पी ली’ कथासंग्रह ‘सरल प्रकाशन, वसई रोड’. असंग्रहित कथा शोधाव्यात तर कोणत्याही साप्ताहिकात पाध्यांनी कथा लिहिलेल्या. कोणी साप्ताहिक ‘किल्ले रायगड’चं नाव सांगायचा तर दुसरा कोणी भलतंच. मराठीतला एक महत्त्वाचा लेखक हे सगळं जाणून बुजून करत आपली तत्कालीन प्रकाशन व्यवहारावर प्रतिक्रिया तर देत नव्हता? अर्थात याचं उत्तर निर्णायकपणे देणे कठीणच.

उपरोक्त कथा भाऊ पाध्ये यांच्या पुस्तकाच्या जमवाजमवीची. तर त्यांच्यावरील समीक्षा शोधणं हा वेगळाच अनुभव. लेखकाचा अभ्यास करायचा तर सुरुवात लेखकाच्या ग्रंथांची जमवाजमव करण्यापासून. भाऊ पाध्यांवर लिहून आलेलं खूप आहे हो! असं प्रत्येक जण म्हणायचा. प्रत्यक्षात त्यांच्या डोक्यात ‘वासूनाका’वर आलेलं तेवढंच असायचं. बाकी काहीच नाही. एखाददुसरा लेख ‘बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर’वर.
वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड शोधावे तर भाऊ पाध्यांच्या वाट्याला दोन ओळी. प्रदक्षिणा खंड पहिला चाळावा तर भाऊ पाध्ये या लेखकाचा नामनिर्देशही नाही. ‘मराठी कथा उगम आणि विकास’ वाचावे तर पान नंबर २७८वर ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’कर्ते भाऊ पाध्ये, एवढाच उल्लेख. भाऊ पाध्यांनी कथा लिहिल्या आहेत याचा उल्लेखही नाही. अशी सगळी बहात्तरच्या दुष्काळापेक्षा भयाण परिस्थिती. अशातही भाऊ पाध्ये यांच्या कथा-कादंबऱ्यांना मी जोडून राहिलो, याचं कारण भाऊ पाध्ये यांची अफाट प्रतिभाशक्ती.

दोन
भाऊ पाध्ये यांच्या लेखनाचे विश्व मुंबई ही महानगरी आहे. या शहरात, शहराच्या उपनगरात त्यांच्या सर्व कथा-कादंबऱ्या आकाराला येतात. भाऊ पाध्यांच्या ‘करंटा’ (१९६१), ‘वैतागवाडी’ (१९६४), ‘वासूनाका’ (१९६५), ‘डोंबाऱ्याचा खेळ’ (१९६७), ‘अग्रेसर’ (१९६८), ‘होमसिक ब्रिगेड’ (१९७४), ‘राडा’ (१९७५), ‘वणवा’ (१९७८), ‘वॉर्ड नं. सात सर्जिकल’ (१९८०), ‘जेलबर्ड्स’ (१९८२) या कादंबऱ्या आणि ‘एक सुन्हेरा ख्वाब’ (१९८०), ‘मुरगी’ (१९८१), ‘थालीपीठ’ (१९८४), ‘थोडी सी जो पी ली’ (१९८६), ‘दावेदार’ (१९९२) हे कथासंग्रह उपलब्ध आहेत. पाध्यांची प्रत्येक कादंबरी आणि कथा वैशिष्ट्यपूर्ण आणि त्यांच्या लेखक म्हणून असणाऱ्या भूमिकेचा वेगळा पैलू दर्शविणारी आहे. आशयसूत्राचं अफाट वैविध्य हे पाध्यांचं खास वैशिष्ट्य. कधी कामगार चळवळीचं अंतरंग मांडणारी आशयसूत्रे (डोंबाऱ्याचा खेळ, करंटा), तर ‘वासूनाका’, ‘अग्रेसर’, ‘वॉर्ड नंबर सात सर्जिकल’ या स्त्री-पुरुष संबंधाचे मुख्य आशयसूत्र मांडता मांडता अनेक उपआशयसूत्रांनी भरघोस असणाऱ्या कादंबऱ्या. घराचा प्रश्न घेऊन ‘वैतागवाडी’ आकारत जाते तर शिवसेनेची दहशत आणि महानगर ‘राडा’त मध्यवर्ती आशयसूत्र बनते. मध्यमवर्गीय नैतिकतेचा छेद घेणाऱ्या ‘बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर’, ‘होमसिक ब्रिगेड’ या कादंबऱ्या तर जेलचे आयुष्य, संघटनांचे अनैतिक वर्तन, खोल्या, भंपक दाखवेगिरीचा तिरस्कार आणि सच्चेपणाने जगू इच्छिणाऱ्या व्यक्तीचे वर्तमान जगणे, कुटुंबनियोजन, कलावंतांचे भावविश्व इत्यादी अनेकविध आशयसूत्रे पाध्यांच्या आधीच्या कादंबरीत-कथेत एका बाजूला मध्यमवर्गीय आदर्शवादी भूमिकेतून आशयसूत्रांची मांडणी केली जात होती तर दुसऱ्या बाजूला रंजनप्रधान भूमिकेतून व्याज रोमँटिक आशयसूत्रे मांडली जात होती. या साचेबंद आशयसूत्रातून मराठी कादंबरीला, कथेला मुक्त करणाऱ्या लेखकांत भाऊ पाध्यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. पाध्ये आशयसूत्राची व तपशिलाची निवड वास्तवातून करतात. या निवडीमागे त्यांची स्वतंत्र मूल्यदृष्टी कार्यरत असते. त्यामुळे त्यांच्या तपशिलाला आशयाचे परिमाण प्राप्त होते. तपशील निवडीमागे असणाऱ्या या लेखकाच्या मूल्यदृष्टीमुळे कथा-कादंबरीच्या आशयसूत्रातून आविष्कृत होणारी जीवनदृष्टी त्यांच्या लेखनाचे सामर्थ्यस्थल आहे.

‘मुंबई’ पाध्यांच्या साहित्याचे चित्रणक्षेत्र. त्यांच्या कथा-कादंबऱ्या मुंबईच्या पार्श्वभूमीवर घडतात. त्यामुळे या महानगरीच्या अंगोपांगाचे सूक्ष्म तपशील त्यांच्या कथात्मक साहित्यात आशयाचे अंग बनून येतात. मुंबईचा भूगोल, इतिहास, तेथील मानवी जीवन, ताण-तणाव या सर्वांचे चित्रण त्यांच्या साहित्यात नैसर्गिक स्वरूपात येते. मुळात महानगरीय जीवन व्यक्तिकेंद्री. या जगण्यातील कमालीची व्यक्तिकेंद्रितता ही समूह म्हणून आकारण्यास असमर्थ असते. त्यामुळे महानगरात गर्दी असते. पण गर्दीला चेहरा नसतो. येथे माणसांचे समूह एकत्र राहत असले तरी समुहाचे भावबंध निर्माण होणे कठीण. त्यामुळे महानगरात व्यक्ती समुहात राहात असूनही कमालीची एकटी असते. या व्यक्तिकेंद्रित्वामुळे अर्थ, काम या बाबींना अवास्तव महत्त्व प्राप्त होते. व्यक्तिकेंद्रित जगण्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी कामभावना प्रबळ होते. तर भौतिक संपन्नता मिळवणे, एकटेपणा घालविण्यासाठी विविध प्रकारच्या चंगळवादांना खतपाणी घालणाऱ्या गोष्टी करत राहणे आणि त्याची प्रतिष्ठा मिरवणे यातून हे वातावरण आकाराला आले आहे. पाध्यांच्या कथा-कादंबरीत ते तसेच नैसर्गिक आकारले जाते. त्यासाठी त्यांना क्लृप्त्या वापराव्या लागत नाहीत. खटाटोप करावा लागत नाही. मुंबई शहराच्या स्वतःच्या खास समस्या आहेत. येथे रोज येऊन धडकणाऱ्या माणसांच्या लोंढ्यामुळे बिकट बनलेला जागेचा प्रश्न, नगर-उपनगर झोपडपट्टीतून मुंग्यांसारखी माणसांची प्रचंड गर्दी आणि या गर्दीचे खास प्रश्न, वाढत्या गर्दीमुळे वाढलेल्या चोऱ्या, मारामाऱ्या, खून, दहशत, गुंडांचे स्वतंत्र जग, त्यांना गोंडस तत्त्वज्ञान देऊन पोसलेल्या संघटना, त्यांचे जुगार अड्डे, दारू गुत्ते, तस्करी तळ, त्यांचं काळं जग, यामुळे शहरात निर्माण झालेले प्रश्न हे सारेच भाऊ पाध्यांच्या कथा-कादंबरीत थेटपणे चित्रित झालेलं दिसेल.

आपण जेव्हा कोकणावर लिहिलेली, सदाशिव पेठेवर लिहिलेली, मुंबईवर लिहिलेली कथा-कादंबरी असे म्हणतो तेव्हा वास्तविक ती मुंबईत, कोकणात, खेड्यात, सदाशिव पेठेत राहणाऱ्या माणसाविषयीची कथा-कादंबरी असते. कारण मुंबईचे अथवा कोणत्याही शहराचे, गावाचे वास्तव मुंबईत अथवा त्या शहरात, गावात राहणाऱ्या माणसांच्या जगण्यातून आकारत असते. कारण त्या गावचे रस्ते, शहराचे रस्ते, गल्ल्या, चौक, इमारती, झोपड्या, देवळं इत्यादी सर्वांना अस्तित्व असतं परंतु त्या अस्तित्वात आशय आणि अर्थ माणसांच्या व्यवहारामुळे भरला जातो. याचे कमालीचे भान पाध्यांच्या साहित्यकृतीतून दिसते; जे अपवादात्मक आहे. त्यामुळे त्यांच्या कथा-कादंबरीतून उच्चवर्गीयांचे भौतिक साधनांनी व्यापलेले जग, त्यांचे उंची उंची जगणे, मध्यमवर्गीयांची तुटपुंजी साधने, चाळीचे विश्व, ऑफिसचे वातावरण, पार्ट्या, प्रेस कॉन्फरन्स, फ्लॅट संस्कृती, कलावंतांचे जग, हॉस्पिटलं या साऱ्याचे चित्रण ते व्यापक सहानुभावाने व मानवतावादी दृष्टिकोनातून करतात. पाध्यांना माणसाविषयी प्रचंड आत्मीयता आणि तितकेच कुतूहलही. त्यामुळे कोणताच पूर्वग्रह नाही. एक प्रकारचा मोकळाचाकळा थेटपणा. हा थेटपणा मराठी लेखकांत क्वचितच प्रत्ययास येतो.

तीन
भाऊ पाध्यांनी कादंबरीक्षेत्रात नायक-नायिकाचित्रणाबाबतच्या ज्या रूढ कल्पना होत्या, म्हणजे ज्याचे वर्णन साचेबंद सांकेतिक कल्पना असे करता येईल; त्या पार बदलून टाकल्या.

नायक म्हटला की सरासरी वय तीस. त्यामुळे तरुण, सद्गुणी, रुबाबदार, सुंदर, आकर्षक, प्रभावी, सतत यशस्वी, अवगुणाला जागाच नाही. नायिका म्हटली की तरुण, सुंदर, गुणाने देवी. त्यामुळे या लेखकांना पुढचे सोपस्कार निर्विघ्नपणे पार पाडणे सोपे. या पार्श्वभूमीवर पाध्यांचे नायक-नायिका वास्तवातले, सामान्यांचे प्रतिनिधी. घराच्या समस्येने पोखरलेला श्रीकांत सोहनी हा कारकून (वैतागवाडी), सामान्य कामगारांच्या हितासाठी झटणारा सामान्य आणि सच्चा कार्यकर्ता असलेला मधू (डोंबाऱ्याचा खेळ), वकिली बंद करून एक क्षण तरी सच्चेपणाने अंतःप्रेरणेने जगता यावं म्हणून वावरणारा बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर (बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर), प्राध्यापकाची नोकरी सोडून बसलेला निळू (होमसिक ब्रिगेड), तुरुंगातून शिक्षा भोगून आलेले प्रा. उकिडवे (जेल बर्ड्स), बापाच्या पैशावर लाथ मारून नैसर्गिकपणे जगू पाहणारा मंदार (राडा), बकाल वस्तीत सेक्सचा झेंडा मिरवणारी तरुण पोरे (वासूनाका) अशा विविध प्रकारच्या, परंपरागत साच्यांना बगल देणाऱ्या नायकांचे चित्रण पाध्यांच्या कादंबरीत दिसेल. ही सर्व माणसे सामान्य तर आहेतच पण अवतीभवती वावरणारी आहेत. या नायकांकडे अपेक्षित असणारे नायकत्वाचे कोणतेच गुण नाहीत. सद्गुणाचे पुतळे नाहीत, नेत्रदिपक यश मिळवलेले नाहीत. त्यांच्या अंगात आदर्शाचे वारे संचारलेले नाही. समाजात उठून दिसणारे, ओळखणारे असे नाहीत. पाध्यांनी चित्रित केलेल्या नायिकाही अशाच. अत्यंत सामान्य स्त्रियांसारख्या त्या आहेत. त्यांच्या ‘अग्रेसर’ कादंबरीची नायिका वैजू स्वतःच म्हणते, ‘खरंच लोक माझ्यावर इतके का मरतात? इतकी का मी ब्युटी आहे. मी त्यांना कोण सायराबानू की वहिदा रहेमान का साधना वाटते. कुणास ठाऊक? मला तर आश्चर्यच वाटतं बाई, आपल्या लोकांचं.’ या निवेदनात ही नायिका आपलं सामान्यत्त्व सांगून टाकते.
येथे परंपरागत नायिकांसाठी जे जे गुण आवश्यक मानले जात होते. त्या सर्व गुणांचा, आदर्शवण खोटेपणाचा पाध्यांच्या नायकांना तिटकारा आहे. ह्याबाबत त्यांच्या भावना तीव्र असतात. पाध्यांच्या कथात्मक साहित्यातील नायक-नायिका थोर काही करायला जात नाहीत. कोणत्याही ग्रंथावर हात ठेवून शपथ घेऊन चळवळ करण्याचा विडा उचलत नाहीत. जग बदलण्याचा मक्ता घेऊन समाजसेवेचे व्रत घेण्यात त्यांना रस नाही. हे नायक आपले नेहमीचे जीवन सच्चेपणाने, अंतःप्रेरणेने जगण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना एखादा क्षण तरी या अनैतिक वातावरणापासून मुक्ती मिळावी असे वाटत असते. ते जपण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न चाललेला असतो.

पाध्यांचे नायक प्रथमदर्शनी विक्षिप्त वाटतात. त्यांच्या कृतीतील अथवा बोलण्यातील विक्षिप्तपणा रूढ कादंबरीला न शोभणारा. पाध्यांच्या कादंबरीतील नायक फुलांचा हार आणि मिळालेले गोल्ड मेडल गळ्यात अडकवून त्यावर ‘आयडियल हजबंड’ असे लिहून वसाहतीतून फिरतो. (बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर), रोज वर्तमानपत्र विकत घेतो पण वाचत नाही. हे तो स्वच्छपणे सांगतो. बायकोला सकाळी चहाऐवजी ताक करण्याचा सल्ला देतो (वैतागवाडी), आपला बाप गोऱ्या साहेबावर मरण्यापेक्षा फोरास रोडच्या रांडेवर मेला असता तर त्याला मानले असते, असे स्वतःच्या बापाविषयी म्हणतो (राडा), आपल्याला मुंबई, महाराष्ट्र वगैरे फालतू गोष्टींचा अभिमान नसल्याचे निळू स्पष्टपणे सांगतो (होमसिक ब्रिगेड). वरवर पाहता ह्या साऱ्या गोष्टी विक्षिप्त वाटाव्यात अशा, पण त्या तशा नाहीत. त्या पाठीमागे एक व्यापक जीवनदृष्टी आहे. या व्यापक जीवनदृष्टीचा प्रत्यय त्यांच्या कृतीतून, प्रतिक्रियेतून लेखक वाचणाऱ्यास घडवतो. या नायक-नायिकांच्या चित्रणापाठीमागे कार्यरत असणारा पाध्यांचा व्यापक मूलभाव त्यांच्या जगण्यातून ठसठशीतपणे वाचकासमोर येतो. त्यामुळे या नायक-नायिका नव्या आणि परंपरेला छेद देणाऱ्या आहेत, याचा प्रत्यय येतो. पाध्यांनी मराठी कथात्मक वाङ्मयातील नायकाची संकल्पना बदलण्याचे केलेले काम महत्त्वपूर्णच. कादंबरीचा नायक कोणत्याही थरातील, वर्गातील, जातीतील, वस्तीतील व्यक्ती होऊ शकते, हे नवे भान त्यांनी निर्माण केले. त्यामुळे पाध्यांच्या समकालीन व नंतरच्या कादंबरीतील नायक चाकोरीबद्ध थरातले येऊ लागले. पाध्यांनी सलग पंचवीस वर्षे गंभीर वाङ्मयीन भूमिका घेऊन लेखन केल्याचे हे वाङ्यमयीन फलित म्हटले पाहिजे.

चार
भाऊ पाध्यांनी आपल्या कथात्मक साहित्यात स्त्रीच्या जगण्याचा, तिच्या भावविश्वाचा अखंड शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांच्या साहित्यात चित्रित झालेली स्त्री, रूढ परंपरावादी साहित्यात चित्रित झालेल्या स्त्रीपेक्षा वेगळी आहे. पाध्ये स्त्रीच्या जगण्याचे आकलन नवनैतिकतावाद भूमिकेतून आणि समग्र स्वरूपाने मांडतात. त्यामुळे ते सर्वस्वी भिन्न व परंपरेपेक्षा वेगळे ठरते.

मराठी कथात्मक साहित्यात सुरुवातीपासून स्त्रीजीवनाचे चित्रण काही ठिकाणी स्त्रीच्या परंपरागत दुय्यम भूमिकेचे समर्थन करणारे. तर काही ठिकाणी तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचे, दुःखाचे भडक चित्र रेखाटल्याचे दिसते. बदलत्या काळानुसार स्त्रीकडे बघण्यात उदारता येत गेल्याचे दिसत असले तरी मूळ पुरुषप्रधान भूमिकेशी चिकटून उदार भूमिक घेतल्याचे स्पष्ट जाणवते. स्त्रीवरील अन्यायाचे चित्रण करीत असताना आपण सुधारणावादी नवमतवादी आहोत अशी भूमिका दिसते. किंवा तिचे दुःख भयानक असा भावविवश कळवळा, आक्रोश, अन्यायाचे परिमार्जन झालेच पाहिजे, अशी स्वतःकडे श्रेष्ठतेची भूमिका घेऊन पुन्हा स्त्रीकडे दुय्यमपणे पाहण्याची भूमिका दिसते.

पाध्ये स्त्रीविश्वाचे चित्रण मानवतावादी भूमिकेतून करतात. स्त्रीचे अमुक वर्तन वाईट, अमुक चांगले; अशी भूमिका ते घेत नाहीत. स्त्री-पुरुष संबंधाकडे ते नैसर्गिक व्यवहार म्हणून पाहतात. स्त्रियांवरील अन्यायाचे, अत्याचाराचे चित्रण दिखाऊ, कळवळा-अन्यायनिवारण थाटात न करता, ‘हे घडते असे’ चित्रित करून वाचकांच्या मनात एक तीव्र प्रतिक्रिया संघटित होत जावी असे तपशील निवडतात. त्यामुळे भाष्य करण्याची गरज त्यांच्या निवेदकाला भासत नाही. त्यामुळे चित्रणाला कृत्रिमतेचा स्पर्शही होत नाही. त्यांच्या कथात्मक साहित्यात वेगवेगळ्या थरातील, वर्गातील स्त्रियांची चित्रणे आलेली आहेत. अविवाहित, विवाहित, विधवा, कुमारीमाता, रखडलेल्या, घटस्फोटित, मुक्त लैंगिक संबंध स्वीकारणारी, गरीब, प्रामाणिक, वेश्या इत्यादी साऱ्या स्त्रियांची चित्रणे ते व्यापक सहानुभावाने करतात.

या चित्रणातून स्त्रीबद्दलची असणारी आत्मीयता, त्यांच्या जगण्याचा मानवतावादी विचार करण्याची भूमिका, त्यांचे चित्रण करत असताना पक्षकार न होता वाचकालाच विचारप्रवण करणारी चित्रणशैली विशेष उल्लेखनीय आहे. या स्त्रीचित्रणातून त्यांची जीवनविषयक भूमिका अधिक नेमकेपणाने वाचकांसमोर येते.

पाच
भाऊ पाध्ये यांच्या साहित्यात चित्रित झालेली ‘हिंसा’ आजच्या संदर्भात विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. त्यांच्या साहित्यातील हिंसेचे चित्र वरवरचे अथवा जुजबी स्वरूपाचे नाही. पाध्ये कथा-कादंबरीतून हिंसा चित्रित करत असताना माणसाच्या स्वभावाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या स्वभावातील दुवे शोधतात, त्यांना जोडून अन्वय लावतात व मगच हिंसेचे चित्रण करतात. पाध्यांच्या साहित्यात चित्रित झालेली हिंसा ही त्यांच्या मानवी जीवनाच्या आकलनपद्धतीचे सामर्थ्य दर्शविणारी आहे.

माणूस हिंसक केव्हा बनतो? आणि नेहमीच्या जीवनात जी माणसे अत्यंत सामान्य ठरलेली असतात, ज्यांना समाजात कोणतेच स्थान नसते, अशी माणसे एकाएकी हिंसक का बनतात? या प्रश्नांची उत्तरे शोधत असताना आपल्याला हिंसेचा उगम कळतो. हिंसेबाबत ज्यां पॉल सार्त्र याने मूलगामी विधान केलेले आहे. तो म्हणतो, ‘व्हायोलन्स कम्स फ्रॉम पॉवरलेसनेस. इट इज द एक्स्प्लोजन ऑफ इम्पोटन्स’. आपण सर्वस्वी कुचकामी आहोत, या जगात आपल्याला काडीचीही किंमत नाही, आपल्या हातून बरे अथवा वाईट काहीही घडू शकणार नाही. आपले आयुष्य निरर्थक आहे, आपण षंढ, नपुंसक आहोत. ही भावना असह्य झाली की कित्येकदा अगतिक क्षणी माणूस हिंसक बनतो, असे सार्त्रचे म्हणणे. सार्त्रच्या या विश्लेषणातून आपल्याला माणसातील हिंसकतेच्या प्रवृत्ती शोधता येतात. अगतिकता जशी माणसाला हिंसक बनवते तसेच माणसाला सतत जर सत्ता गाजवण्याची सवय असेल आणि अचानक त्याची सत्ता नाहीशी झाली तर तो हिंसक बनतो. सत्तेवर प्रतिष्ठा अवलंबून असते. जेव्हा सत्ता जाते तेव्हा प्रतिष्ठेच्या भीतीने त्याच्यात अगतिकता येण्याची शक्यता असते व तो हिंसक बनतो. याबरोबरच एखाद्या व्यक्तीवर सातत्याने अन्याय होत असेल तर अशा व्यक्तीत आपण कुचकामी ठरत असल्याची भावना प्रबळ होते व जेव्हा अन्यायाची परिसीम गाठली जाते तेव्हा एखाद्या विशिष्ट क्षणी त्या व्यक्तीच्या अन्याय सहन करण्याच्या मानसिकतेचा स्फोट होऊन ती हिंसक बनण्याची शक्यता असते. काही माणसांना चेतवून हिंसक बनवले जाते. तसेच एखाद्या प्रलोभनाला बळी पडूनही तो हिंसक बनू शकतो. कारण सामान्य किंवा असामान्य माणसालाही आपल्याला मान असावा, आपल्याला कोणीतरी घाबरतो असे वाटत असते. यातूनही हिंसकता जन्मास येऊ शकते. या विविध हिंसेच्या प्रवृत्ती पाध्यांच्या साहित्यात चित्रित झालेल्या आहेत.

त्यांच्या ‘वणवा’ कादंबरीतील रोशन, मल्ली या आदिवासी बाईचा एका विशिष्ट क्षणी गळा दाबून खून करतो. याचे चित्रण करीत असताना पाध्ये त्याच्यातील या अचानक उगम पावलेल्या हिंसेची कारणमीमांसा कादंबरीत मांडतात. रोशन सुखलोलुप, उच्चवर्गीय, विविध प्रकारच्या बायकांशी लैंगिक संबंध ठेवण्यात रस वाटत असलेला. तो अनेक स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवत असतो. मल्लिकाशी सहलीत सतत थैमान घालणारी त्याच्या डोक्यातील लैंगिकता अत्युच्च क्षणी नैसर्गिक अडचणींनी बाधित होते तेव्हा तो अब्दुलला पैसे देऊन आदिवासी स्त्री- मल्ली मिळवतो. पण त्याचे इंद्रियच त्याला साथ देत नाही या भावनेने तो बेचैन होतो. निलिमाजवळ पुरुषत्व आजमावून पाहतो. पण मल्लीसमोर लुळा पडतो, तेव्हा हिंसक होऊन तिचा गळा दाबतो. षंढत्वाची भावना त्याला हिंसक बनवते. त्याचबरोबर त्याची ‘पुरुष’पणाची सत्ता संपुष्टात आल्यामुळे तो हिंसक बनतो.
अशाच प्रकारच्या पण पुन्हा आशयाचे वेगळे पदर असणाऱ्या हिंसेचे चित्रण पाध्ये ‘मुरगी’ कथेत करतात. केरू गाबल्या जो मेलेली मुरगी खाताना तोंडातून गळणाऱ्या लाळेची तमा न बाळगता समाधानी; तेवढाच वखवखलेला असतो. पदीशी संभोग करताना त्याला इंद्रिय साथ देत नाही, तेव्हा त्याला नामर्द म्हणणारी वेश्या आठवते. आणि पदीला वेश्या समजून तो तिचा खून करतो. पदीचे निर्जीव शरीर पाहून त्याच्या इंद्रियाला जान येऊ लागते. येथे वखवखून मुरगी खाणारा आणि मेलेल्या स्त्रीशी संभोग करणारा केरू काहीतरी मिळवण्यासाठी वखवखतो पण जेव्हा ती मिळते तेव्हा अगतिक होतो. त्याच वेळी आपल्या सत्ताधीशपणाला तडा जाणार म्हटल्यावर हिंसक  होतो. येथे पाध्ये हिंसेचा वेगळाच प्रत्यय देतात.

त्यांच्या ‘फाईव्ह गार्डन’ कथेतील माई टुकरूळ, आबा टुकरूळ ह्या नवऱ्याचा गळा दाबून खून करते. येथे पुन्हा हिंसेच्या नव्या रूपाचे चित्र येते. नोकरी गेलेला आबा, बायकोला वेश्या व्यवसायास लावून जगू लागतो. तिच्या धंद्यामुळे मुलगा घर सोडतो. ती गरीब स्त्री आबाचे असंख्य अन्याय सहन करते पण तिला जेव्हा तिच्याशी जीव लावणाऱ्या जवानावर आबानेच मारेकरी घातल्याचे कळते; तेव्हा ती सहनशक्ती संपल्याने हिंसक बनून त्याचा खून करते. तेव्हा पाध्ये नव्या हिंसेचा प्रत्यय वाचकास देतात. त्यांच्या ‘एक सुन्हेरा ख्वाब’ कथेतील बंड्या प्रलोभनाने हिंसक बनतो. ‘वासूनाका’तील बाबल सत्ता व पैसा संपल्याने अगति होऊन हिंसक बनतो. ‘वैतागवाडी’त श्रीकांतच्या मनात हतबलतेतून पत्नीच्या खुनाचे विचार येतात. पाध्ये या साऱ्या चित्रणातून माणूस हिंसक कसा बनतो, केव्हा बनतो याचे सूचन करत माणसातील हिंसेचे चित्रण करतात. नीट कारणपरंपरेसह ही हिंसा अवतरते. त्यामुळे ती आगंतुक ठरत नाही. पाध्ये हिंसेचा मानसशास्त्रीय शोध घेतात. माणसांचे हे वागणे म्हणजे वाईटच ही शेरेबाजी त्यांच्या लेखनात येत नाही किंवा आपण साहित्यातील ‘हिंसा’ मांडणारे मक्तेदार असा अवाजवी आवाजही ते करत नाहीत. ते आपल्याला पडलेले प्रश्न, मानवी आकलनाबाबतचे गुंते आणि माणसांच्या प्रवृत्तीचे कोडे मानवतावादी दृष्टिकोनातून सोडवण्याचा व साहित्यात मांडण्याचा प्रयत्न करतात.

सहा
भाऊ पाध्यांनी कथा-कादंबरीच्या रूढ कल्पनेला धक्का दिला. तत्कालीन रूपबंधाच्या कल्पना बाजूस सारून त्यांनी आपल्या कथा-कादंबऱ्यांवर नव्या वाटा धुंडाळल्या. तत्कालीन कथानक म्हणजे विशिष्ट परिणाम साधण्याच्या दृष्टीने केलेले घटना-प्रसंगांचे संघटन असा सर्वसामान्य समज होता. कोणते तरी एक कथाबीज फुलवत न्यायचे. प्रारंभ, मध्य, अंत या कल्पनांशी हे कथानक बांधलेले होते. गुंतागुंत, निरगाठ, उकल यांच्या प्रभावाने वाकलेल्या काळात एकेरी आशयसूत्रात कथानक बंदिस्त करण्याची चढाओढ चाललेली. पाध्यांनी या तांत्रिक चौकटीला छेद दिला. त्यांच्या पहिल्याच कादंबरीत (डोंबाऱ्याचा खेळ) बांधेसूद, कुतूहलजनक व उत्कंठावर्धक तंत्रास बाजूस सारून कामगारवर्गातील अत्यंत गुंतागुंतीचे कथानक आपल्या अनुत्कट शैलीत मांडले. मुख्य आशयसूत्रास भरघोस करणारी उप-आशयसूत्रे वापरून एकेरी आशयसूत्रातून कथा-कादंबरीला मुक्त केले. त्यांनी आपल्या कादंबरीचा साचा होऊ दिला नाही. सामाजिक आशय त्यांना मांडायचा असल्यामुळे त्यांची प्रत्येक कादंबरी स्वतःचा आकार घेऊन आली. हे सारे ते जाणीवपूर्वक करतात असे मात्र नाही. ते होऊन जाते, हे मात्र खरे.

पाध्यांच्या जीवनदृष्टीचा प्रत्यय त्यांच्या कथानकातून प्रभावीपणे येतो हे महत्त्वाचे. ते नवनैतिक जाणीव आपल्या लेखनातून मांडतात त्यांच्या कथा-कादंबरीच्या संरचनेतूनच ती आविष्कृत होते. उदाहरणार्थ, ‘बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर’ या कादंबरीतून खोटेपणा, दिखाऊगिरी याचा तिटकारा अनिरुद्धला वाटणे व त्याला सच्चेपणाने, व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवणे महत्त्वाचे वाटते. ही त्यांची जीवनधारणा कथानकातून अधिक प्रभावी व थेटपणे वाचकासमोर येते. त्यांच्या सर्वच कादंबऱ्यांतून ही नवी नैतिक जाणीव थेटपणे समोर येते.
त्यांच्या साहित्याची भाषा अनुत्कट आहे. उत्कंठावर्धक कादंबऱ्यांच्या पसाऱ्यात न बसणारी अशी. पाध्ये साध्या, सरळ, सोप्या भाषेचा वापर करतात. चित्रणात थेटपणा असतो. त्यामुळे आपोआपच त्यांच्या भाषेला अनुत्कटता प्राप्त होते. पाध्यांची भाषा अनलंकृत आहे. तिला उपमा, अलंकार, प्रतिमा, प्रतिके यांचा सोस नाही. त्यासाठी त्यांना भाषा कमवावी अथवा घडवावी लागत नाही. सहजता हा त्यांच्या भाषेचा विशेष. सामान्य माणूस ज्या सहजतेने भाषा वापरतो त्याच सहजतेने पाध्ये आपल्या साहित्यात भाषेचा वापर करतात. ती विलक्षण चित्रमय आहे. चलत् चित्रपटासारखे प्रसंग वाचकासमोरून सरकत असतात. वाचकाच्या मनावर खोलवर परिणाम करतात. पाध्यांनी मुंबईच्या बोलीचे सामर्थ्य पचवून आपली शैली निर्माण केली. पाध्ये ‘आम पब्लिक’च्या भाषेत लिहितात. समूहबोली, वर्गबोली, व्यक्तिबोलीचा त्यांनी केलेला वापर आश्चर्यकारक आहे. त्यांची शैली कलाकृतीनुरूप रूप धारण करते. ती नैसर्गिक बनते. नैसर्गिक निर्मळपणा हा भाऊ पाध्यांचा स्वभावच.

सात
पाध्यांनी कथात्मक साहित्यात केलेली ही कामगिरी अफाटच. पण तिची मराठीत दखल घेण्यास 1982 साल उजाडावे लागले. रा. भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या कादंबरीवरील निबंधात भाऊ पाध्ये यांच्या कादंबऱ्यांची गुणवत्ता नेमकेपणाने अधोरेखित केल्यानंतर सुजाण म्हणवले जाणारे वाचक पाध्यांच्या लेखनाचा विचार गंभीरपणे करू लागले. हे आपले वाङ्मयीन पर्यावरण! पण ह्या पर्यावरणाचा विचार पाध्यांनी कधीच केला नाही. चौफेर लेखन ही त्यांची व्यक्तिगत गरज होती. त्यांनी लिहिलेली सिनेमावरील परिक्षणे, वर्तमानपत्रातील सदरे आणि वेळोवेळीचे स्फुट मध्यंतरी जमा करीत होतो. थोडं फार मिळालं की मला वाटायचं बहुतेक पूर्ण होत आलं आता. तर एखादा नवीनच कुठल्यातरी लेखनाचा उल्लेख करतो. स्वतःच लिहिलेलं, छापलेलं जपून ठेवण्यात पाध्यांना रस कमीच. त्यांच्याइतका बेफिकीर लेखक मराठीत सापडणे कठीण.

मध्यंतरी एकदा मी लिहिलेलं सारं भाऊ पाध्यांनी वाचावं म्हणून (सतीश) काळसेकरांकडे पाठवलं. मुंबईतून परतण्याआधी त्यांनी वाचावं ही माझी इच्छा. तर ते म्हणाले, ‘एवढ्या कमी वेळात एवढं वाचायचं! माझ्या लेखनावर असलं म्हणून काय झालं?’ एरवी संपादकांच्या, समीक्षकांच्या दारात उंबरे झिजवणाऱ्या लेखकजमान्यात हा लेखक काही औरच!

भाऊ पाध्यांच्या कादंबऱ्या-कथांइतकंच त्यांचं स्फुटलेखन महत्त्वाचं आणि गुणवत्तापूर्ण. त्यावर काम करताना लाभणारा अपरिमित आनंद शब्दांत सामावणं कठीण. एका बिनधास्त लेखकाचा शब्द न् शब्द आपण वाचतो आहोत; याइतके सुख दुसरे कशात? पाध्ये माझे ‘हिरो’ आहेतच. पण त्यांचा शब्द न् शब्द माझ्या जगण्याचा भाग बनून मलाही सळसळत ठेवतो आहे एवढे भाग्य वाचक म्हणून रग्गड!

(हा लेख मेघना पेठे यांनी संपादित केलेल्या ‘शब्द दीपोत्सव २००५’मध्ये छापून आलेला. त्यानंतर ‘मुक्त शब्द’च्या मे २०१२च्या अंकात पुनर्मुद्रित.)

3 comments:

  1. अगदी खरे आहे तुमचा ब्लोग वाचून सुरुवातीला मी वासू नका विकत घेतली पण बाकीची पुस्तके आणि मन लावून वाचन हे भालचंद्र नेमाडेंनी केलेली स्तुती वाचल्या नंतर चालू केले.

    ReplyDelete
  2. भारतात कधी येईन आणि पाध्यांची पुस्तके वाचून काढेन असे झाले आहे.

    ReplyDelete
  3. खरोखर भाऊ पाध्ये हे नैसर्गिक रीत्या वरदहस्त लाभलेले लेखक आहेत.जे भोगल ते त्याच शब्दात त्यांनी मांडलं. शेवटपर्यंत ते आपल्या लिखानाशी प्रामाणिक राहिले.त्यांच्या वासुनाका ने वादळ उठविल होत. अजूनही ते शमल नाही. खंत एकच आहे की वर दिल्याप्रमाणे मराठी साहित्यसृष्टीनी त्यांची दखल घेतली नाही.

    ReplyDelete