Friday, September 24, 2010

१९६५ साली भाऊ

('ललित' मासिकाच्या 'स्वागत' या सदरात १९६५च्या मे महिन्यात प्रसिद्ध झालेला हा भाऊंचा मजकूर.)

नांव प्रभाकर नारायण पाध्ये. केव्हां तरी जो - तो मला 'भाऊ पाध्ये' म्हणूं लागला. तेंच नांव सुटसुटीत वाटलें म्हणून पुढें चालविलें. वय अडतीस. डोळ्याला चष्मा लागलाय, डोक्याची चांदी झाली आहे. शिक्षण बी. ए. - विषय अर्थशास्त्र.
कौटुंबिक जीवन : एकूण वैवाहिक जीवन वैतागाचें. पत्नी सौ. शोशन्ना पाध्ये (माजगांवकर). धर्माने बेने इस्त्राएल. संयुक्त समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्या. लेखक लोकांशी त्याच संबंध ठेवतात. त्यामुळें माझी त्यांच्या भुणभुणींतून सुटका होते. मुलें दोन- भाऊचा धक्का आणि वैतागवाडी.
आतां दै. 'नवशक्ती'मध्ये सहसंपादक. पूर्वी कारकून, मास्तर, कामगार कार्यकर्ता वगैरे उपद्व्याप झाले. खरे म्हणजे बेकार राहणेंच मला पसंत आहे.
प्रकाशित वाङ्मय : कादंब-या- डोंबा-याचा खेळ, करंटा, वैतागवाडी. अप्रकाशित- वासूनाका (कथासंग्रह). याशिवाय दोन कादंब-यांचे खर्डे आणि पॅगोडा आणि बेने इस्त्राएल समाजावरील कादंबरींचीं काहीं प्रकरणें लिहून तयार आहेत. मराठी साहित्यांत रोज भलीबुरी भर घातली जातेय, मीहि लिहितोंच आहें. त्यामुळें मराठी साहित्याची काय परिस्थिती होत असेल कोण जाणे! कसेंही असलें तरी मराठी साहित्याचे भलें किंवा बुरें घडत असता आपला हातभार हा लागला पाहिजेच.
राजकारणांत लुडबुड करण्याचा छंद. पूर्वी राजकारण सोडलें होतें, परंतु, डॉ. राममनोहर लोहिया या चक्रम माणसाच्या आकर्षणामुळे पुन्हा राजकारणांत पाऊल टाकलें. आतां हा असामी जोंपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत आपणहि राजकारणांत लुडबूड करत राहणार.
पी. टी. आय.चा टेलिप्रिंटर हा आवडता लेखक.
बीअर, टेबल-टेनिस आणि वहिदा रेहमान या आवडत्या गोष्टी. (दुर्दैवाने या तिन्ही गोष्टींपर्यंत माझा हात पोहोचूं शकणार नाहीं.) नावडत्या गोष्टी: जयप्रकाशांचे राजकारण, प्रा. गंगाधर गाडगीळ यांचे लिखाण आणि व्ही. शांताराम यांचे सिनेमे.
स्पर्धेस पुस्तक पाठविण्याच्या वेळी मी 'साधना'वाल्यांना  म्हणालों होतों कीं आपले तकदीर इतकें भिकार आहे की आपल्याला बक्षीस म्हणून कधीं मिळणारच नाहीं. परंतु, मार्च महिन्यांत कन्या राशीच्या भाग्यस्थानी गुरू आला होता. 'वैतागवाडी'ला बक्षीस हा बहुधा त्याचा परिणाम असावा. ठीक आहे. कपडे अगदींच फाटायला आले होते, तर नवे शिवतां येतील. परंतु म्हणून कांहीं जागेच्या प्रश्नाचा वैताग संपणार नाहीं. माझे कांही हितचिंतक म्हणतात कीं भावड्याला पुन्हा बक्षीस मिळतां कामा नये अशी तजवीज केली पाहिजे. त्यांना मी सुयश चिंतितो.

No comments:

Post a Comment