Friday, October 1, 2010

भाऊचा अखेरचा धक्का

- अशोक शहाणे

(भाऊ पाध्ये वारल्यानंतर 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ३ नोव्हेंबर १९९६ रोजी छापून आलेला हा लेख शहाण्यांच्या परवानगीने इथे.)

'अन् हा भाऊचा धक्का!' आपलं बोट धरून असलेल्या मुलाची भाऊ ओळख करून द्यायचा. 'तसं याचं आणखी एक नाव आहे. अभय. पण खरा हा भाऊचा धक्काच.'

तसा आणखी एक भाऊचा धक्का मुंबईत आहे बहुदा अजून. हा भाऊचा धक्का स्थावर. अन् बापाचं बोट धरून असलेला भाऊचा धक्का जंगम. एवढाच फरक.

हा झाला भाऊचा पहिला धक्का. अन् आता निदान परवा आपल्या पांगळ्या झालेल्या अंगानं एकदम अख्ख्या जगालाच- निदान मराठी जगाला- भाऊचा धक्का खावा लागला. तो बहुदा शेवटचाच. पण आपला तसाच नाही गेला. धक्का देऊनच गेला.

धक्के द्यायची भाऊची सवय तशी जुनीच. त्याची पहिली कादंबरी 'डोंबा-याचा खेळ' (कधी? साठ साली बाहेर पडली होती बहुतेक.) हा भाऊनं मराठी साहित्याला दिलेला पहिला धक्का होता. भाऊला पदरचे निम्मे पैसे घालायला लावून मॅजेस्टिकच्या कोठावळ्यांनी ती काढली होती. ही काहीतरी फार मोठी कादंबरी आहे वगैरे अर्थातच कोठावळ्यांना कल्पना असणं शक्यच नव्हतं. अन् मग त्यानंच का काय मराठीतल्या टीकाकारांचं पण लक्ष 'डोंबा-याच्या खेळा'कडे गेलंच नाही. कुणी फार मोठ्या उत्साहानं परीक्षण वगैरे लिहायच्या फंदात पडलंच नाही. भाऊचे निम्मे पैसे एकूण पाण्यात गेले.

वाचकांच्या या डोळे असून न दिसणा-या आंधळेपणामुळं कुणाच्या लक्षातच आलं नाही की 'डोंबा-याचा खेळ' ही मराठीतली पहिलीच 'मॉडर्न' कादंबरी आहे. तसं कविता लिहून मर्ढेकरांनी मराठीत एकदम 'मॉडर्न'पणा भिनवला होताच. पण कवितेत असल्या गोष्टी सोप्या जात असतील त्या मानानं. पण गद्य लिखाणात 'मॉडर्न' मनोवृत्ती आणणारं पहिलं पुस्तक म्हंजे 'डोंबा-याचा खेळ'च.

म्हंजे 'डोंबा-याचा खेळ'चा नायक युनियनमध्ये कामाला लागतो, त्याचा पहिला दिवस भाऊ एवढा अप्रतिम सांगून जातो. म्हंजे होत काहीच नाही. हा आपला जाऊन ऑफिसमध्ये बसतो. ब-याच वेळानं कुणीतरी येतं नि म्हणतं, चल, बाहेर जाऊन येऊ या. मग ते दोघं तिस-याकडं जातात. काही बोलतात. मग तिथनं आणखी एकाकडं. तिथं पण बोलणं होतं. मग आणखी एकाकडं. नि शेवटी परत ऑफिस. म्हंजे ही भटकंती, बडबड हेच काम. ऑफिसचं काम. रिकामपण हेच काम. हे भाऊनं सांगायच्या आधी मराठीत कुणाला ठाऊकच नव्हतं बहुतेक.

किंवा 'डोंबा-याचा खेळा'तलंच पक्षाचं अधिवेशन. स्वातंत्र्यानंतरची 'पब्लिक लाइफ'ची नस भाऊनं कशी काय बरोबर पकडली कोण जाणे.

पण हे असं फोडून सांगण्यात काहीच गंमत नाही. ही मास्तरकी आमच्या कॉलेजा-विद्यापीठातल्या मास्तरांनाच लखलाभ असो. खरं वर्म तर पुस्तक वाचत असताना आपसुकच भिडायला हवं. त्यातला आपसुकपणा गेला की सगळंच बदलतं.

अन् गंमत अशी होती की भाऊला कादंबरीच्या 'फॉर्म' वगैरेबद्दल अजिबात सोस नव्हता. तो नसल्यामुळंच कदाचित आमच्या टीकाकारांच्या नजरेतनं ती सुटली असेल. कारण तेव्हाचे दिवस 'फॉर्म'च्या बोलबाल्याचे होते. अन् भाषेचा पण तसा काही 'फील' भाऊच्या या कादंबरीत नव्हता. मग कोण लक्ष देणार?
 
आपला पहिला धक्का वाचकांनी लावून घेतलाच नाही, असं बघितल्यावर भाऊनं बारक्या लिखाणाला हात घातला. 'वासूनाक्या'च्या पहिल्या दोन गोष्टी, मला वाटतं ६१ साली. 'रहस्यरंजन'मध्ये छापून आल्या. नि मग तिसरी एक 'जत्रा' नावाच्या वार्षिकात. नि मग एकदम पुस्तकच. ते मात्र गाजलं. म्हंजे आचार्य अत्र्यांनी गाजवलं. त्यांना भाऊचा हा दुसरा धक्का बरोबर लागला होता. आरोप नेहमीचाच. अश्लीलपणाचा. तरी बरं, पुस्तकात ब-यापैकी 'मुद्राराक्षस' होते. म्हंजे 'पोलिसांचे लफडे मागे लागले की समजेल' असं गफलतीनं छापलेलं. मग सरकारपर्यंत पण धक्का पोचला. सरकारला साहित्यात काय गम्य असणार? वसंतराव नाईकांनी पुस्तक ग. दि. माडगूळकरांना वाचायला दिलं. माडगूळकरांनी ते वाचलं नि प्रकरण तिथंच मिटलं.
 
म्हंजे 'वासूनाक्या'चा पण धक्का लागला तो चुकीच्याच अंगानं. रस्त्यावर वेळ काढणा-या पोरांची भंकस म्हंजे काय प्रकार आहे, ते बघावसं कुणालाच वाटलं नाही. जास्तीत जास्त जमेची बाजू काय तर ही एक आतापर्यंत साहित्यात न आलेली मुंबई भाऊनं मराठीत आणली. एवढ्यावरचं भाऊची बोळवण केली गेली. हे परत त्याची पाठराखण करणा-यांकडनंच.
 
अर्थात मुंबई तेव्हासुद्धा अगडबंबच होती. अक्राळविक्राळसुद्धा. कदाचित आत्ताएवढी नसेल; पण तरी होतीच. मर्ढेकरांनी 'जिथे मारते कांदेवाडी, टांग जराशी ठाकुरद्वार' म्हणून एक कोपरा दाखवून ठेवला होताच; पण तेवढ्यानं काय होणार? पठ्ठे बापूरावांनी म्हटल्याप्रमाणं मुंबई खरोखरीची 'रावणाची दुसरी लंका' होती. 'वासूनाका' हा त्यातला एक नाका झाला, इतकंच.
 
अन् अर्थात साक्षात मुंबईवर लिहायचा भाऊचा अधिकार इतर कुणाहीपेक्षा जास्तीच होता. तो अगदी 'ओरिजिनल' मुंबईकर होता. पिढीजात. म्हंजे मुंबईची 'बाँबे' व्हायच्या कैक आधीपास्नं. जेव्हा मुंबईत फक्त कोळी मंडळी रहात होती नि त्यांनी नंतर आवर्जून बोलावून आणलेली, धार्मिक कृत्यं करायला उपयोगी पडणारी ही त्यांची उपाध्ये मंडळी. बस्. कोळ्यांची उपाध्येगिरी करणारे म्हणून हे पाध्ये. तर भाऊची मुंबई ही थेट बापजाद्यांपास्नंची मुंबई होती.

मुंबई काही झालं तरी भाऊमधनं काढता येण्याजोगीच नव्हती. म्हणूनच तर मग 'वैतागवाडी' आली, 'बॅरिस्टर अनिरुद्ध धोपेश्वरकर', 'चांदी', 'राडा' सगळेच तर ह्या अवाढव्य मुंबईच्या बेढब चेह-याचे वेगवेगळ्या 'अँगल्स'मधनं घेतलेले 'क्लोजअप्स' होते. संकल्प सोडलेलं न् लिहून न झालेलं लिखाण पण मुंबईवरच बेतलेलं होतं. अर्थात कुणाही एका लेखकाला मुंबईला म्हणा की मुंबईसारख्या जगड्व्याळ शहराला कवेत घेता येण्याजोगं नसतच. इथंच कशाला, जगात कुठंही. कवी आपले बरे त्या मानानं छोटीछोटी चित्रं काढून ठेवतात. नारायण सुर्वे, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, नि अर्थातच नामदेव ढसाळ. मलिका अमरशेख पण. लेखक (म्हंजे गद्य लिहिणारे) त्या मानानं इतके नाही निघत. कदाचित ते बिचकत असावेत. मुंबई म्हंजे काही साधीसुधी चीज नव्हेच.

भाऊची भाषा तशी सरधोपट होती. नवे शब्द पाडायचा हव्यास त्याच्यात अजिबात नव्हता; पण भावलेली गोष्ट सांगायची हातोटी मात्र बरोब्बर होती. कुणी दोस्तोयेव्स्की व्हायची इच्छा बाळगणं म्हंजे भलतंच त्रांगडं. पण त्यापेक्षा छोटं कुणी भाऊच्या डोळ्यांसमोर नव्हतंच. अन् परवड तर भाऊच्या पदोपदी अनुभवाची गोष्ट. ट्रेड युनियन, कापडगिरणी, लिहिण्याची हातोटी आहे म्हटल्यावर वर्तमानपत्र. भाऊ कुठंही आनंदातच. 'प्रेस कॉन्फरन्स'ला नेऊन मित्रांना खाऊ घालणं हा परिपाठ.

अन् ह्यातच भाऊ सिनेमाला लागला. पेपरवाल्यांचे आपले कप्पे असतात एकेक. त्यात सिनेमाचा कप्पा भाऊच्या वाट्याला आला. अन् भाऊ पण त्याच्यात रामाला. भाऊच्या आधी काय नि नंतर काय, सिनेमाबद्दल- नि ते पण हिंदी सिनेमांबद्दल- असं कुणी म्हणता कुणीच लिहिलेलं नाही. तेव्हाही नि आत्ताही हिंदी सिनेमांबद्दल लिहायची धोपट पद्धत म्हंजे नाक उडवायचं. हिंदी सिनेमातलं सगळंच बेगडी. त्याचा काय 'सिरीयसली' विचार करणार, असा एकूण आविर्भाव. भाऊ ह्या वाटेला अजिबात फिरकला नाही. त्यानं कशी कोण जाणे पण हिंदी सिनेमाची नेमकी नसच पकडली. 'स्पिरीट' पकडलं. नि त्याचं 'सेलेब्रेशन' दर आठवड्याला आरंभलं. योगायोगानं तेव्हा सिनेमात भाऊला झपाटून टाकणारी माणसं होती. मेहमूद, किशोर, वहिदा, हेलन. मधुबाला अर्थात. पण मीनाकुमारी, नर्गीस वगैरे नाहीत. हिंदी सिनेमातली 'इन्स्टंट' करमणूक भाऊनं अचूक हेरली होती. त्यातला अमुक एक पैलू भाऊला जास्त भावत होता, अशातला भाग नव्हता. तो एकदम नाडीच पकडायचा. म्हंजे 'गाईड'मधलं 'आज फिर जिने की तम्मना है' कसं चांगलं होतं, हे त्याला आपसुक कळायचं. चालबील नाही, टेकिंग-बिकिंग नाही, वहिदाचा  अभिनयबिभिनय नाही, तर हे सगळं मिळून जे एक रसायन तयार व्हायचं, तिथं भाऊ एकदम भिडायचा. विश्लेषण वगैरे करत बसण्यात त्याला अजिबात स्वारस्य नव्हतं. 'भाऊ नंतर नंतर फार कमर्शियल लिहीत गेला' हे आपल्या औरंगाबादकर मित्राचं मत तो हस-या चेह-यानं 'एंजॉय' करत असल्यासारखा ऐकायचा. वैषम्य त्याला कधी शिवलं नाही. टीका कधी त्यानं अंगाला लावून घेतली नाही. सिनेमाबद्दलचं भाऊचं लिहिणं त्याच्या लेखी 'कमर्शियल' नव्हतंच. पगारापोटी लिहिलेलं असं ते राह्यलंच नाही. तो आपला मनापास्नंच लिहीत गेला. नि हिंदी सिनेमा हा काय 'फिनॉमेनन' आहे हे वेगवेगळ्या परींनी सांगत गेला. आता अशा लिखाणाची पुस्तकं काढायचा प्रघात नाही इतकंच. पण ह्याही लिखाणात भाऊ शंभर टक्के हजार आहे.

भाऊनं जन्मात कविता कधीच लिहिल्या नसतील. पण कोणत्याही वयात पोरपण जपायची युक्ती त्याला बेमालूम येऊन गेली होती. मुंबईतल्या रगडा-पॅटिसच्या गाड्या भाऊकरताच रस्त्यावर असतात असं वाटायचं. खाण्यापिण्यात त्याला अगदी लहान पोरासारखा 'इंटरेस्ट' होता. अन् खाण्यापिण्यातच कशाला अगदी हिंदी सिनेमासारख्या गोष्टीतसुद्धा. हे भाऊला जमून गेलं होतं. उपजतच.

आम्ही मराठी माणसं मुर्दाड आहोत. आमचा मख्खपणा एका ज्ञानेश्वरानं जात नाही, एका तुकारामानं जात नाही, एका साने गुरुजीनंसुद्धा जात नाही. भाऊ पाध्येनं तर तसा प्रयत्नसुद्धा केला नव्हता. त्यामुळे भाऊचं लिखाण काय प्रतीचं होतं ह्याबद्दल आम्ही अडाणी राह्यलो असलो तर नवल वाटायचं काहीच कारण नाही. 'कधीकाळी कुठंतरी माझा समानधर्मा निपजेल' ही प्रत्येकच लिहिणा-याची आशा असते. अशी काही आशा भाऊ मागं ठेवून गेलाय का नाही कोण जाणे!
***
'लोकवाङ्‌मय गृहा'ने प्रकाशित केलेल्या 'नपेक्षा' या शहाण्यांच्या पुस्तकात हा लेख आहे.
***

2 comments: