- भालचंद्र नेमाडे
('टीकास्वयंवर' या 'साकेत प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या नेमाड्यांच्या पुस्तकातील 'मराठी कादंबरी' या प्रकरणातील हा भाऊंविषयीचा उतारा, नेमाड्यांच्या परवानगीने इथे.)
डोंबा-याचा खेळ (१९६०) आणि करंटा (१९६१) ह्या कामगार चळवळीच्या किचकट आशयापासून वणवा (१९७९) ह्या अत्याधुनिक उच्चवर्गीय जोडप्यांच्या अरण्यातल्या लैंगिक व्यवहारावर लिहिलेल्या कादंबरीपर्यंत आधुनिकतेचा विशाल आशय जिद्दीने, निर्व्याजपणे, कुठेही दांडी न मारता मांडणारे भाऊ पाध्ये ह्यांनी नव्या कादंबरीचा सर्वोत्त्कृष्ट आविष्कार केला. खुल्या संरचना मांडून नाना त-हेचे वास्तव आशय निवडून पाध्यांनी अभिरुचीचा नवा प्रांत निर्माण केला. त्यांची मुंबईची भाषाही त्यांच्या नव्या वास्तववादातूनच जन्मली. तिच्यात काव्यात्मकतेचा मागमूसही नसतो. 'पोट एकदम टायरसारखं गच्च झाल्यासारखं वाटलं मला.' (वैतागवाडी), 'गप्पा एमनी एम चाललेल्या', 'त्याचा आता सरकलाय त्या पोरीपायी' (वासूनाका)- अशा लोकांच्या वाक्प्रचारांनी ती निवेदन स्पष्ट करते. त्यांच्या कादंब-यांत नावापासून निवडीचे वास्तव द्रव्य सुरू होते. (धोपेश्वरकर, आझादचाचा, प्रियवंदा-मालविका-शर्मिष्ठा-आयव्ही-क्लारा, डाफ्या-मामू-धोश्या, इ. कोरेटा, फरी, इ. बॅम्फोर्ड-रोशन-नीलिमा इ.) पाध्ये हे मुळात समाजवादी नैतिकता असलेले गंभीर लेखक आहेत. (भुकेले आदिवासी जग विरुद्ध निव्वळ लैंगिक चाळे करणारी आधुनिक जोडपी- वणवा, स्त्रीमुक्ती- अग्रेसर, हिंदू जातीयता- वैतागवाडी, लग्नसंस्था, अनौरस संतती- बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर, वालपाखाडी नीतिमत्ता, वेश्यांबद्दल आदर- वासूनाका, इ.). कुठल्याही अन्य मराठी साहित्यिकांपेक्षा पाध्यांच्या कादंबरीत मुंबईबद्दल मातृभूमीसदृश प्रेम आहे, मुंबईतल्या सर्व समाजांबद्दल पोटतिडिकेचं प्रेम आहे. मुंबईतल्या भूगोलाला जिवंत उठाव मिळालेले आहेत. ही माणुसकीची दृष्टी मराठीत साने गुरुजींनंतर कोणात दिसत नाही. पाध्यांचे कोणतेही पात्र फ्लॅशबॅक तंत्राचा उपयोग करत नाही की स्वप्नरंजनात शिरत नाही. त्यांच्या गद्यशैलीलाही ह्यामुळेच जाडेभरडे भक्कम पोत आहे. ह्यातूनच वासूनाक्यावरच्या मवाली बेकार मुलांपासून अत्याधुनिक स्त्री-पुरुषांपर्यंत सर्व प्रकार कादंबरीत येणे शक्य होते. वालपाखाडीपासून मलबारहिलपर्यंतचे नैतिक जीवनही व्यक्त होते. ("तुम्हाला दारू प्यायची असेल तर प्या. नका पिऊ. तो तुमचा प्रश्न आहे." "उन्हे उलटली म्हणजे आमची कंपनी वुलन पँट्स चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. दुसरा धंदाच नव्हता. क्रिकेटचे अंग नव्हते की आर. एस. एस. मध्ये जाऊन 'दहिने रुख बाए रुख' करायला आम्ही भट नव्हतो.") चांगले जुने झाडाझुडांचे घर सोडून आधुनिक वसाहतीत फ्लॅट घ्यायला लावणारी बायको बॅरिस्टर धोपेश्वरकरला तुच्छ वाटते. ह्या जबर नैतिकतेचा परिणाम म्हणून राडा ह्या शिवसेनेवरच्या कादंबरीची संपूर्ण आवृत्ती कोणालाच वाचायला मिळाली नाही अशी गडप केली गेली. लैंगिकता हे आशयसूत्र असलेल्या कादंब-यांतूनही पाध्ये नैतिक मूल्यविचारच मांडत असतात.
Sunday, August 29, 2010
Wednesday, August 25, 2010
फुल्याफुल्यांच्या वादग्रस्त वाङ्मयाचा जनक
- चंद्रकान्त पाटील
भाऊ पाध्येवर पुन्हा एकदा लिहायची वेळ आली आहे. भाऊ पाध्ये नावाचा एक श्रेष्ठ साहित्यिक, पत्रकार, चित्रपट समीक्षक आणि नव्या विद्रोही लेखकांचा आवडता हीरो दहा-पंधरा दिवसांपासून बॉम्बे इस्पितळातल्या पाचव्या मजल्यावर पाचशे तेवीस क्रमांकाच्या खोलीत विकलांग अवस्थेत पडून आहे. ज्यानं आयुष्यभर मुंबईचं दर्शन आपल्या सगळ्या साहित्यांतून वाचकांना करून दिलं, मुंबईच्या सगळ्या ठसठसत्या नसांना अचूक पकडण्याच प्रयत्न केला त्या भाऊला मुम्बईची नैतिकता व्यक्त करायची होती. कन्नमवारपासून अधोगतीला लागलेल्या मुंबईला गँगवॉरपर्यंत येतायेता पक्षाघाताचा झटका वाढतच गेला, आणि तो आपल्या सगळ्या लेखनातून प्रभावीपणे मांडू पाहणा-या भाऊलाच अर्धांगवायूचा झटका आला ही दैवदुर्विलासाचीच बाब आहे! भाऊची वाचा गेली आहे. एरवीही भाऊनं आपल्या वाचेचा आयुष्यात फारच कमी उपयोग केला होता, पण त्याचे पाय विकलांग झाले हे वाईटच झालं. ज्या अफाट मुंबईत भाऊ वणवण भटकत लहानाचा मोठा झाला, ज्यानं आयुष्याची सगळी वर्षं मुंबईच्या राज्यरस्त्यांवरून ते गल्लीबोळापर्यंत भटकण्यात घालवली त्या भाऊचा एक पाय गेला ही वाईटच गोष्ट झाली! डॉक्टर म्हणतायत् भाऊ बरा होईल, आणि तो बोलू लागेल, हिंडू-फिरू लागेल, आणि तो बरा होणं आवश्यक आहे. आम्ही सगळे, ज्यांच्यावर भाऊचं ऋण आहे कधीही न फिटणारं, त्याच्या ब-या होण्याची वाट पाहात आहोत, पण नुस्तं बरं होणं फारसं उपयोगाचं नाही. भाऊला लिहिता आलं पाहिजे. लिहिण्यासाठी पुरेसं सामर्थ्य टिकवता आलं पाहिजे- आणि मला खात्री आहे की भाऊची जगण्यावरची विलक्षण श्रद्धा आणि धैर्य त्याला पुन्हा लिहितं करील. त्याला स्वतःला संपूर्ण समाधान होईल अशी एक महान कादंबरी भाऊच्या डोक्यात आहे, किती तरी वर्षांपासूनच. भाऊची अदम्य जीविताकांक्षा नक्कीच त्याला तारून नेईल, आणि तो कादंबरी लिहीलच! आम्ही तिची वाट पाहात आहोत.
भाऊ पाध्ये या अफलातून माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. फिल्म क्रिटिक म्हणून जगत असताना त्यानं मायावी मुम्बईचं दर्शनी रूप पाहिलं, इम्पोर्टेड गाड्यांमधून फिरत पंचतारांकित हॉटेलांचं स्वर्गसुखही पाहिलं, पण भाऊ खडतर व्रत घेतल्यासारखा फुटपाथवरचा माणूसच राहिला. हे सगळं त्याच्या आतल्या एका प्रखर नैतिकतेमुळेच शक्य झालं. भाऊनं आपली व्यक्तिगत नैतिकता आत जपून ठेवली. वादळातून जाताना दिवा जपत न्यावा तशी. प्रस्थापित समाजातली खोटी दांभिक दिखाऊ नैतिकता चव्हाट्यावर मांडताना भाऊनं पददलितांची आणि फुटपाथवरून चालत जाणा-या सर्वसामान्यांची बाजू ताणून धरली. हे करीत असताना भाऊला अनेक धक्के खावे लागले, पण त्यानं सहजपणे, कुठलीही कुरकुर न करता, कुठल्याही व्रणाशिवाय, जखमांशिवाय ते सहन केले. एका परीनं हे भाऊचे धक्केच पुढं येणार्यांयना संरक्षक ठरले. भाऊचं महत्त्व असं शॉक अॅब्सॉर्बर म्हणून नक्कीच वाङ्मयीन संस्कृतीत मोलाचं आहे. त्यातून जसं अस्सल साहित्यकारांना सुरक्षित राहता आलं तसं कुठलीही नैतिक भूमिका न घेता प्रायोगिकतेसाठी विषयवासना उगाळणार्यात चंद्रकांत खोतांसारखे आमचे नकली मित्रही सुरक्षितपणे तरून गेले. भाऊचं अख्खं साहित्यच मागच्या-पुढच्यांनी आणि समकालिनांनी रफ-नोट्ससारखं वापरलं आणि त्यावर ते गब्बरही झाले. गब्बर सिंग म्हणून गाजले. भाऊचं मात्र काहीच झालं नाही- काही होण्यासाठी म्हणून भाऊनं हा खटाटोप केलाच नव्हता. त्याच्यामागे एक तीव्रतर यातनामय संवेदना होती, एक सहवेदना होती, विशाल मानवी करूणा होती, करुणेशिवाय भाऊसारखं लिहूनच होत नाही हे आम्ही भाऊकडूनच शिकलो. भाऊच्या वाङ्मयानं अनेक वाद झाले, वादळं उठली, भाऊनं खरं तर मराठीत पहिल्यांदाच फुल्याफुल्यांचं वादग्रस्त वाङ्मय निर्माण केलं. पण अशी वाङ्मयीन वादळं आणि वाङ्मयीन वाद क्षणजीवी असतात. वादळं ओसरल्यावरही आणि विसरल्यावरही अस्सल वाङ्मय मागे उरतंच. भाऊचं वाङ्मय उरलंच आहे आणि म्हणूनच भाऊच्या जवळ बॉम्बे हॉस्पिटलातल्या खोलीत रात्रंदिवस अनेक नवे लेखक, सहकारी आणि आत्मीय लोक बसून असतात, आणि भाऊच्या पत्नीला, शोषण्णालाही आधार देत असतात. भाऊकडून मी परतलो तेव्हा माझ्या एका तरूण मित्रानं सांगितलं, ‘‘भाऊला नामदेव ढसाळनं बॉम्बे हॉस्पिटलात दाखल केलं, मी रोज एक फेरी टाकतो, मलिका- नामदेव- अशोक- सतीश- मन्या- सुधाकर- प्रदीप- मुळे- भाऊचा मुलगा- सून- शोषन्नाचे नातेवाईक असे कितीतरी लोक कायम तिथं असतात, पण आज पंधरा दिवस होऊन गेले, एकही समाजवादी भाऊकडे फिरकलासुद्धा नाही. भाऊचे सोडा, निदान शोषन्नामुळे तरी-’’ अर्थात मला याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. भाऊसोबतचे सर्व समाजवादी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माहित आहेत, पण माझ्या त्या तरुण मित्राला अजून बरंचसं माहित व्हायचं आहे, म्हणून त्यावर मी भाष्य केलं नाही. वस्तुस्थितीच अशी आहे की जे लोक गेल्या पंचवीस-तीस वर्षांत समाजवादाकडेसुद्धा फिरकले नाहीत ते भाऊकडे काय जाणार. समाजवादाचं हृदय असणं आणि समाजवादाचे सदरे घालणं यातला फरक आपण ओळखायलाच हवा. भाऊच्या वयाला साठ वर्षं पूर्ण झाली तेव्हा भाऊच्या मुंबईपासून दूर वेरूळच्या लेण्यांजवळच्या एका निवांत आर्ट गॅलरीत आम्ही पंचवीस-तीस मित्रांनी भाऊची साठी अत्यंत अनौपचारिकतेनं आणि आत्मीयतेनं साजरी केली होती. त्या कार्यक्रमाची चक्रमुद्रित पत्रिका भाऊच्या दारावर अजूनही चिकटवलेली आहे असं शोषन्ना मला सांगत होती. भाऊच्या असंख्य चाहत्यांना त्यावेळी बोलवता आलं नाही याची हळहळ आम्हाला आहे. भाऊ लवकर बरा होईल, तो पुन्हा लिहू लागेल, त्याच्या हातून त्याची महाकादंबरी पूर्ण होईल, आणि त्याच्या सत्तरीच्या वेळी आम्ही प्रचंड मोठा सोहळा करू अशी आम्हा सगळ्यांची तीव्रतर इच्छा आहे, एवढंच तूर्त.
***
('साकेत प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या 'विषयांतर' या चंद्रकान्त पाटीलांच्या पुस्तकात हा लेख आहे.)

Subscribe to:
Posts (Atom)