Saturday, September 25, 2010

मराठी साहित्यातील 'मवाली' : भाऊ पाध्ये

मुलाखतकार- नारायण बांदेकर

('ललित'च्या एप्रिल १९८८च्या अंकातली ही मुलाखत)



भाऊ, तुमचा जन्म किती सालचा? कुठे झाला?
- २९ नोव्हेंबर, १९२६. दादरच्या पाध्येवाडीत.

तुमच्या बालपणाबद्दल, शिक्षणाबद्दल आणि आवडीनिवडीविषयी सांगाल का?
- प्रत्येक कुटुंबात एकतरी कानफाट्या असतो तसा पाध्ये कुटुंबात मी कानफाट्या होतो. माझे वडील मला 'बैल' म्हणायचे. यावरून माझं शिक्षण, बालपण याची कल्पना यावी. मी खादाड होतो, हा एक अपराध. साठीनंतर 'चवीने खाणारा भाऊ' म्हणून माझ्या बहिणीनं माझ्या खाण्यावर मल्लिनाथी केलेली पाहून म्हटलं, बालपणामधला निदान एक तरी अपराध आपल्या मंडळींनी माफ केला.

त्या वेळी तुमच्या डोक्यात ध्येयबिय होतं का?
- म्हणजे कधी? - अगदी लहान वयात शिवाजी किंवा टारझन होणं, हेच ध्येय. बेचाळीस साल उजाडलं नि आपण मॅड ऊर्फ ध्येयवादी झालो.
 
कॉलेजात तुम्हाला कोणकोण शिकवायला होते? त्या वेळी कोणी मोठे लेखक वगैरे तुमच्या बरोबर वाटे.
- मराठी विषयात म्हणाल तर प्रा. न. र. फाटक, प्रा. द. के. केळकर व प्रा. श्री. पु. भागवत. शिवाय अर्थशास्त्राचे प्रा. फर्नांडिस, वि. ह. कुलकर्णी आणि प्रा. परांजपे. . . माझ्या सहाध्यायांपैकी श्री. राम पटवर्धन, उमाकांत (बाळ) कामात, श्रीनिवास कोर्लेकर व आ. ना. पेडणेकर.

या वेळीच तुम्ही लेखनाला सुरुवात केली?
- या वेळी माझा संबंध लिहिण्याशी आला नाही; परंतु लिहिणा-या मित्रांबद्दल मला आकर्षण होते.

कथा कधी लिहायला सुरुवात केली? आणि पहिली कथा कुठं लिहिली?
- १९५० साली झालेल्या गिरणी कामगारांच्या संपाबाबत मी प्रथम एक लेख 'नवयुग'मध्ये लिहिला. त्यानंतर स्वर्गीय दत्तू बांदेकर यांच्या प्रोत्साहनानं मी अधूनमधून 'नवयुग'मध्ये लिहीत असे.
 
'सत्यकथे'चे संपादक होण्यापूर्वी राम पटवर्धन तुमचे कॉलेजमेट होते. 'सत्यकथे'तील कथांच्या निवडीचं काम त्यांच्या हाती आलं त्याच वेळी तुम्ही एक कथा 'सत्यकथे'साठी पाठवली होती. परंतु त्यांनी ती साभार परत पाठवली. कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? कथा परत पाठवली म्हणून तुम्ही पुढं 'सत्यकथे'साठी कधीच लेखन पाठवलं नाही. उलट, 'सत्यकथे'च्या विरोधात राजा ढाले आणि लिटल मॅगझिनवाल्या दोस्तांना तुम्ही साथ दिलीत. हा 'सत्यकथे'वरचा राग म्हणून की प्रस्थापितांविरुद्धच्या लढ्याला पाठिंबा म्हणून? -
- हमीद दलवाई त्या वेळी आमच्या कामगार संघटनेच्या कचेरीवर येत असे. माझी एक कथा त्याला पसंत पडली व तो ती रामभाऊंकडं घेऊन गेला. ती त्यांनी परत पाठवली. त्यानंतर 'वासूनाक्या'ची एक कथा रामभाऊंनी परत पाठवल्याचं आठवतं. दोन्हींची कारणं एकच दिली- या कथांचा 'गोळीबंद' परिणाम होत नाही. मी यामुळे रामभाऊंवर आकस धरला नाही. कथा परत आल्याच्या रागामुळे नव्हे- पण, राजा ढाले वगैरे माझ्या इतके जवळ होते की त्यांच्या प्रस्थापितांविरुद्धच्या लढाईमध्ये मी सामील झालो.
 
स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता?
- मी भाग घेतला नाही,- हे स्वातंत्र्य आणण्यासाठी माझा हातभार लागलेला नाही, ही किती समाधानाची गोष्ट आहे!

शोशन्ना कुठे भेटल्या? तुमच्या आणि त्यांच्या मैत्रीचं विवाहात रूपांतर कधी झालं? आंतरधर्मीय विवाह म्हणून तुम्हाला घरातल्यांकडून विरोध झाला का? मैत्रीण आणि पत्नी ही दोन नाती आजपर्यंत तुम्ही कशी जपली? त्याचं रहस्य काय?
- गिरणी कामगारांच्या चळवळीत. आम्ही १९५६ साली विवाह केला. चारपाच वर्षे उशीरच झाला. म्हणजे एवढी 'सेक्स-इअर्स' वाया गेली. घरातल्या मंडळींना मी विश्वासात घेतले नाही. काय झालं की, माझा वडील भाऊ रामचंद्र यानं आईच्या विरोधामुळं एका मुलीला फसवलं. या गोष्टीचा इतका मला धक्का बसला की घरातल्यांना विश्वासात घेणं बरं वाटलं नाही. शोशन्नाच्या घरातून विरोध झाला नाही. दादा कोंडके यांच्या शब्दांत 'मी सुंदर ज्यू मुलीशी लग्न केलं असतं- तर- मला ज्यू लोकांनी जिवंत ठेवलं नसतं!' माझ्या घरातल्या लोकांनी वरपांगी आमचं स्वागत केलं. परंतु त्यांचा माझ्यावर व शोशन्नावर राग होताच. शोशन्नाला हे कधीच समजलं नाही. पण माझ्या लेखी त्यांना पुरून उरणं हे एक ध्येयच बनलं. एरवी रहस्य वगैरे काही नाही.  
 
तुम्ही पदवीधर झाल्यानंतर युनियनचं काम करीत होता. कुणाच्या? 'डोंबा-याचा खेळ' ही तुमची पहिलीवहिली कादंबरी या काळातच लिहून झाली. ती तत्कालीन कामगार चळवळीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली आहे. त्यातला नायक-नायिका कुणाला समोर धरून लिहिलंत? गिरणी कामगारांचे प्रश्न आजही अनुत्तरीत का राहिले असं तुम्हाला वाटतं? आपल्या येथील युनियन्सचे नेते आणि त्यांची कार्यपद्धती यावर आपले मत काय?
- समाजवाद्यांच्या. गिरणी, रेलवे (अल्पकाळ), इंजिंनिअरिंग संघटनांत, सेवादलात असतानाच मी पूर्णवेळ कार्यकर्ता होण्याचं स्वप्न पहात होतो. 'डोंबा-याचा खेळ' लिहिण्यास निमित्त एक कार्यकर्ती ठरली. त्यात मी, शोशन्ना, राजा कुळकर्णी अशी अनेक पात्रं झिरमिरीत पडद्याकडे दिसतात. नावं घेणं मला उचित वाटत नाही. गिरणीधंद्याचं, कामगारांचं काय झालं आहे, हे खासदार दत्ता सामंतांनाच विचारायला हवं. सौदेबाजी व हिंसा या कामगार चळवळीच्या दोन कार्यपद्धती आहेत एवढं सांगितलं की पुरे. कामगारांनाही सौदेबाजीची आदत लागली आहे. म्हणजे पगारवाढ करून घेण्यासाठी डॉ. सामंत आणि शाळेमध्ये मुलाला प्रवेश हवा असला की शोशन्ना पाध्येनी वशिला लावायचा. हे कसलाच विचार करणार नाहीत. - अलिकडे फक्त दारूचे ते व्यवस्थित पाहतात.
 
'डोंबा-याचा खेळ', 'करंटा' या कादंब-या लिहिल्यानंतर 'वासूनाक्या'चं खूळ एकदम डोक्यात कसं काय शिरलं? काहीतरी करून समाजात सनसनाटी निर्माण करावी या हेतूनं की प्रामाणिकपणं समाजातील एका वखवखलेल्या व वेगळ्या संस्कृतीचं दर्शन वाचकाला घडावं म्हणून? खरंच, तुम्हाला समाजावर सांस्कृतिक आघात करायचा होता?
- 'डोंबा-याचा खेळ', करंटा'नंतर कामगार चळवळीच्या प्रादेशिक कादंब-या (हमीद दलवाईंचे शब्द) लिहिण्यात मला स्वारस्य नव्हतं. मुंबईतल्या अर्धशिक्षित तरुण पिढीकडं माझं लक्ष होतंच आणि त्यांच्यावर लिहावं म्हणून विचारही करत होतो. १९६० साली 'रहस्यरंजन' मासिकाच्या कथास्पर्धेच्या निमित्तानं त्या लिहिल्या गेल्या. समाजावर या कथांचा आघात झाल्यावर समजलं की, आपल्या या कथांमुळेही आपला ही महान सांस्कृतिक पाया असलेला समाज गडबडला आहे. मला फक्त कथा म्हणूनच त्या लिहायच्या होत्या.

'वासूनाक्या'वर हल्ला झाला; 'विष्ठावादी लेखक' म्हणून तुमची अवहेलना झाली. कुटुंबालाही दहशतीखाली वावरावं लागलं. हे तुम्ही सहन कसं केलंत? 'वासूनाक्या'च्या निमित्तानं विचारस्वातंत्र्याचा प्रश्न निर्माण झाला. विचारस्वातंत्र्याविषयीची तुमची नेमकी भूमिका कोणती? आपल्याकडील विचारस्वातंत्र्याचे बुद्धिवादी पुरस्कर्ते कधी कधी पक्षपाती आणि बदलती भूमिका का घेत असावेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिशिष्ट प्रकरणी तुम्ही कुणाची बाजू घेतली असती? का?
- 'दहशत' वगैरे मला वाटली नाही. मी आचार्य अत्र्यांच्या हल्ल्यानंतरही 'मराठा' दैनिकाच्या कचेरीवर हमीद दलवाईला भेटायला गेलो होतो. संपूर्ण महाराष्ट्र समितीची 'मराठा'मधील कचेरी शोशन्नाच सांभाळत असे. हां, प्रसिद्धीमुळं काही काळ भांबावलो हे खरं. विचारस्वातंत्र्याच्या बाबतीत माझी भूमिका हीच. कुठच्याही प्रकाशनावरील बंदीची मागणी केली नाही. कशाला हवी बंदी! इथं ब्ल्यू फिल्म्सही अनिर्बंधपणे पाह्यला जातात. बंदीची मागणी करायला जावी की परिणाम नेमका उलटाच होतो. रिडल्स प्रकरणी हीच गोष्ट सिद्ध झाली. कुठल्याही कारणानं कुठच्याही पुस्तकावर बंदीची मागणी न करणारा असा मराठी भाषेत बहुधा मी एकच लेखक असावा. आता दुर्गाबाईंबद्दल असं म्हणता येणार नाही. हा समाज काही बंदी घालून सुधारण्यासारखा नाहीच. उलट, 'तमस'च्या निर्मात्यासारखं बंदीचं नाटक व्हावं म्हणून काही लेखक, प्रकाशक प्रयत्नशीलही असतील.
 
'होमसिक ब्रिगेड' आणि 'धोपेश्वरकर' या कादंब-यांनी मराठी साहित्यात सर्वप्रथम अस्तित्ववादी कादंबरीचा पाया घातला. पण मुळात अस्तित्ववादाकडं तुम्ही वळलात कसे? दुस-या महायुद्धानंतर सार्त्र-कामू यांसारख्या प्रचंड ताकदीच्या प्रतिभावंत कादंबरीकारांनी पाश्चात्य साहित्यात अस्तित्ववादाचं रोपटं लावलं. त्यांचं साहित्य वाचून तुम्ही ते मराठी साहित्यात आणलं की मनातच त्याची सहजपणं जुळवाजुळव झाली? पाश्चात्य साहित्यिकांचे या संदर्भात संस्कार किती?
- अस्तित्ववादावर लिहिण्यास मी पात्र व्यक्ती नाही व अस्तित्ववादाचं मला ग्लॅमरही वाटत नाही. मी 'धोपेश्वरकर' व 'होमसिक ब्रिगेड' अगदी सहज सुचल्या म्हणून लिहिल्या. 'धोपेश्वरकर'वरील पाश्चात्य संस्कारावरून एक सांगतो. 'जॉनी बेमिंडा' या चित्रपटात एका असहाय्य मुलीवर झालेला बलात्कार पाहून मी डिस्टर्ब झालो आणि 'धोपेश्वरकर'मध्ये, तो रिफ्लेक्ट झालाय. एवढंच.
 
तुमच्या पूर्वसुरींपैकी तुमचे आवडते कादंबरीकार कोण? त्यांच्या लेखनाचा काही प्रभाव तुमच्या कादंब-यांवर पडला का? तुमच्या समकालीनांपैकी कोणते कादंबरीकार तुम्हाला आजही आवडतात आणि तोडीस तोड वाटतात? चालू पिढीत आशा बाळगावेत असे किती जण आहेत?
- मी लिहावयास सुरुवात केली तेव्हा मराठीतील चार चांगले लेखक कोण आहेत तेही मला सांगता आलं नसतं. रिचर्ड राईट या निग्रो लेखकाचं 'ब्लॅक बॉय' हे आत्मचरित्र वाचून मी लेखणी हातात घेतली. लिहिता लिहिता कोणी अशा प्रसंगी कसं लिहिलं आहे, यासाठी मराठी-इंग्रजी वाचू लागलो. दोस्तोव्हस्की व झोर्बा धी ग्रीक यासारखं अद्याप काही लिहिलं नाही. त्यामुळं काही लिहिल्यासारखं वाटत नाही. समकालीनांत 'कोसला' व 'बिढार' ह्या ग्रेट वाटतात. कोण चालू लेखक लिहितो हे ठाऊक नाही. . . . वाचन मर्यादित.

आतापर्यंत लिहून झालेल्या कादंब-यांत तुमची सर्वात उत्कृष्ट कादंबरी कोणती?
- 'वणवा'.
 
कादंबरी लेखनात तुम्हाला तुमची आढळणारी वैशिष्ट्ये कोणती?
- सेक्स! सेक्स! आणि सेक्स!

तुमच्या कादंब-यांवर समीक्षकांनी बरंच लिहून ठेवलंय. ही समीक्षा तुम्हाला न्याय देणारी आहे? आपल्या समीक्षकांबद्दल तुमचं काय मत आहे?
- दुर्गाबाई, भालचंद्र नेमाडे, दिलीप चित्रे यांनी मला चांगले उचलून धरले. माझ्याबद्दल जे लिहिले आहे त्याबद्दल मी त्यांचा कृतज्ञ आहे. सौंदर्यवादी टीकाकारांनी मला समजूनच घेतले नाही. कदाचित मला मिळालेल्या लोकप्रियतेमुळे त्यांना मी 'सनसनाटी' लिहिणारा लेखक वाटलो असेन. आता पहा, आपले समीक्षक भारतात जी विकासाची वगैरे कामं होतात त्यावर लेखक लिहीत नाहीत, असं सर्रास म्हणत होते. मग माझी 'होमसिक ब्रिगेड' काय आहे? ही समजून-उमजून उपेक्षा की हे वाचतच नाहीत? पण मी एक तर दलित लेखक नाही की त्यांनी मला समजून घ्यावे म्हणून मी ;जोगवा' मागेन. दुसरे म्हणजे, मी फार उशिरा लिहिण्यास सुरुवात केली. जेव्हा मी आपल्या समाजाला 'रिजेक्ट' करण्याचा पूर्ण विचार केला होता. . . ज्या देशात उत्तर भारतीयांसारखी माणसं आहेत, त्या देशात काहीही होणार नाही अशा निष्कर्षाला मी येऊन पोहोचलो आहे. 
 
'ऑपरेशन छक्का' हे नाटक लिहिलंत. पण ते रंगभूमीवर आलेलं दिसत नाही. असं का?
- कुणास ठाऊक.

भाऊ, 'नवशक्ति' सोडल्यावर तुम्ही 'झूम' नावाचं सिने-पाक्षिक काढलं, ते कशासाठी? ते बंद कोणत्या कारणानं पडलं? मग पुढं नोकरी धरली का? नुसत्या लेखनावर मराठी लेखक जगू शकतो का?
- 'झूम' काढण्याचं प्रथम ठरवलं आणि मग मी 'नवशक्ति' सोडली. दिनकर गांगल या सद्गृहस्थांनी शैला बेल्ले नामक एका धनदांगड्या महिलेच्या उचलेगिरीच्या योजनेमध्ये मला अडकवून टाकलं. त्या बाईंनीही मला नोकरी सोडण्याचा सल्ला दिला. पगारही सुरू केला. तत्पूर्वी जयवंत दळवींच्या सल्ल्यानं मी पु. रा. बेहेरे यांच्याबरोबर बोलून राजीनामा देण्याचं टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु बेहे-यांनी 'दळवी कोण?' अशी आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळं मी ज्यूनिअरच्या हाताखाली काम करण्यापेक्षा राजीनामा देण्याचं ठरवलं. परंतु 'झूम'चे दोन अंक प्रसिद्ध होताच बाईंनी अचानक आर्थिक मदत बंद केली. साहजिकच आम्ही अडचणीमध्ये आलो. या प्रकरणात दिनकर गांगल फारच डर्टी गेम खेळला. पुढं नोकरी कोणी दिली नाही. मराठी लेखनावर जगण्याचा विचार करणे, गिरणी संपातील कामगारांनी जगण्यासारखं आहे. आजच्या लेखकाप्रमाणे सेल्फ टॉर्चरचं भांडवल करून वाचकांसमोर सहानुभूतीचा जोगवा मागणं हे मला मंजूर नाही.
 
अर्थशास्त्रातले पदवीधर असूनही तुम्ही राजीनामा देईपर्यंत 'नवशक्ति'तच का राहिलात? आणि तेही तुटपुंज्या पगारात? 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' या प्रचंड खपाच्या, बड्या पगाराच्या आणि अधिक साहित्यिक वातावरण असलेल्या वृत्तपत्रात का गेला नाहीत? तिथल्या संपादकांची आणि तुमची वेव्ह-लेन्थ जुळली नसती म्हणून की पु. रा. बेहेरेंना सोडणं जमत नव्हतं म्हणून?
- माझं यापूर्वीच करीअर इतकं अस्थिर होतं की मी मोठ्या अपेक्षा बाळगणंच सोडून दिलं होतं. मी 'नवाकाळ'मध्ये होतो. बरं झालं, बेहे-यांनी मला 'नवशक्ति'त आणलं. नाहीतर मी तीन बाय दोनच्या बातम्या करत 'नवाकाळ'मध्येच पिचत राह्यलो असतो. 'वैतागवाडी'ला पारितोषिक मिळाल्यानंतर मला बराच आत्मविश्वास वाटू लागला. 'लोकसत्ते'बद्दल मला आकर्षण नव्हतंच. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये मला बोलावण्यात आलं नाही. (बोलावल्याशिवाय मी गेलो नाही कुठे) त्यांना माझी लेखनशैली आवडली नसती व मलाही त्यांची लेखनशैली आवडत नसे. ती भिकारच असं माझं मत आहे. 'सुनील गावस्करने १६ चौकार ठोकत ठोकत शतक झळकावले!' हे कुठचं मराठी? मला 'नवशक्ति'मध्ये चांगलंच स्वातंत्र्य होतं, त्यामुळे मी खूष होतो. पैसे मिळवण्यासाठी इतरत्र प्रयत्न चालले होते. मी 'चंद्रयुग', 'माणूस', 'सोबत'मध्ये लिहून कमावत होतो.
 
डॉ. लोहियांच्या विचारांनी तुम्ही नेहमी भारलेले असता. लोहियांशी तुमची मैत्री होती का? तुमच्यावर त्यांचा वैचारिक व भावनिक परिणाम झाला आहे का?
- डॉ. लोहियांच्या मानानं मी वयानं लहान होतो. डॉ. लोहिया या देशात पसरलेल्या अंधारात कंदील घेऊन उभा असलेला एकमेव माणूस आहे. त्या प्रकाशामुळं आपल्याला स्वच्छ दिसतं एवढंच. या देशात अंधारात कोणी वाट दाखवत नाही. सगळे वाटमारी करतात. डॉ. लोहियांचा खूप उपयोग होतो की आपल्याला!

लौकिकार्थानं तुम्ही समाजवादी लेखक. साहित्यानं समाजाचं उद्बोधन करावं असं तुम्हाला वाटतं का? साहित्यानं समाजात क्रांती घडवून आणता येईल?
- साहित्यानं का उद्बोधन करू नये?. . . अर्थात 'मनाचे श्लोक', 'दासबोध' लिहू नये हे कबूल. क्रांती जमत असेल तर मीही प्रिन्सिपल्स ऑफ मार्क्सिझम लिहीन. पण मी असेही मार्क्सिस्ट पाह्यले आहेत की बोलतात जहाल; पण खाजगी जीवनात गांडूसारखे वागतात. त्यापेक्षा झेपेल तेवढं लिहावं.
 
भारताचा माओ होऊन आपल्या इच्छेप्रमाणे क्रांती घडवून आणण्याचं स्वप्न तुम्ही बाळगलं होतं. ते का? त्याचं पुढं काय झालं?
- मला कोण माओ होऊ देईल? साधा लेखक झालो तरी मला कोणी विचारत नाही. एक गोष्ट, 'माओ' झालो तर राजीव गांधी, मधू लिमये, जॉर्ज फर्नांडिस, बाळ ठाकरे यांचं काय होईल, हे मात्र सांगता येणार नाही.

दलित साहित्याबद्दल व दलित साहित्यिकांबद्दल तुम्ही विचार करता का? दलित साहित्याला भवितव्य आहे? कोणकोणते दलित साहित्यिक तुम्हाला आवडतात?
- दलित साहित्याचा विचार करावाच लागतो. कारण, तो एक चर्चेचा विषय आहे. एक गोष्ट, टी.व्ही. संस्कृती आल्यापासून मध्यमवर्गीयांकडून साहित्याचं काही भलं होणार नाही हे निश्चित दिसू लागलं. अलीकडं पानतावणे यांनी म्हटल्याप्रमाणं दलितांनी दर्जाकडं लक्ष पुरवलं तर त्यांना भवितव्य आहे. बॅकग्राउंड आहे ना!
 
तुमचं जीवनविषयक काही तत्त्वज्ञान आहे का?
- तत्त्वज्ञान वगैरे काही नाही. चार्ली चॅपलिन, दोस्तव्हस्की, झोर्बा, डॉ. लोहिया, या सर्वांच्या मिश्रणामधून माझ्या डोक्यामध्ये एक रसायन तयार झालं आहे. मलाही रोमँटिसिझम आणि इंटेलेक्चुअलिझमही आवडत नाही. 'शिवास रीगल' यासारख्या दारूसाठी आपण आत्माही विकायला तयार आहोत.

तुम्ही एवढं कसदार लिहून मराठी साहित्यात फार मोलाची भर घातलीत. पण त्या प्रमाणात पैसा, प्रतिष्ठा आणि सरकारकडून मिळावा तितका मान तुम्हाला मिळाला नाही. त्याबद्दल खंत वाटते का?
- माझं नाव झालं आहे, तेवढं तरी कुणाचं झालंय! पैसा मिळाला नाही. 'जेल बर्ड्स'सारख्या कादंबरीवर सिनेमा काढण्यास आपले गांडू निर्माते धजत नाहीत, याची चीड आहेच. सरकारकडं मी कधीच गेलो नाही. जो डॉ. लोहियांना मानतो त्याच्याकडून ही अपेक्षा कशी करता?

'पुस्तक छापणे हा लेखक-प्रकाशक आणि धंदेवाईक टीकाकार यांच्यामधील 'चोर-शिपायांचा खेळ'च बनला आहे. पैसा मिळण्याची शक्यता असली तरी आमचे संपादक आणि प्रकाशक झारीतील शुक्राचार्याप्रमाणे ते उदक आमच्या हातापर्यंत पोहोचू नये, याची तजवीज करतच असतात' असे तुम्ही एके ठिकाणी विधान केलं आहे. असा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेतला आहे का? तुमचे प्रकाशक तुमच्याशी कसे वागतात?
- प्रकाशन व्यवसायाचा स्टार्टिंग पॉईंट लेखक आहे. पण प्रकाशक त्याला कधी पैसे देतात? छापखानेवाले, कागदवाले वगैरे वगैरेंचे समाधान झाल्यावर. म्हणजे पैसे घेण्याच्या रांगेत लेखकाचा नंबर शेवटचा असतो. मला भेटलेल्या प्रत्येक प्रकाशकानं संपादकांनं असाच स्टान्स घेतला आहे की, आम्ही त्याला उभं करावं, सहाय्य करावं, प्रतिष्ठा मिळवून द्यावी. मग हा गणपतवाणी आपली माडी उभी करील. पण जर लेखक कठीण प्रसंगात सापडला तर. . . त्या वेळी त्याचा स्टान्स असा असतो की बार्गेनिंगमध्ये तुमच्या वाट्याचं काही असेल ते तुम्हाला मिळेल. 'वासूनाक्या'मुळं लाभलेल्या प्रसिद्धीपासून, मग प्रसिद्धीचा सवालच राह्यला नाही. त्यामुळं मला प्रकाशक-संपादकांशी फटकून राह्यला काहीच अडचण नव्हती. आणि मी तसाच वागतो. पण विवेक मोहन राजापुरेनं 'अभिरुची'चा दिवाळी अंक काढायला घेतला तेव्हा त्याला मी साहित्य फुकट दिलं, मल्लिकाला 'नंतर'साठी दिले. मी फरक करतो. मी प्रकाशक-संपादकांचे 'ब्लॅक लिस्ट' बनवली आहे.

तुम्ही हल्ली विनोदी लेखनाकडं वळलेले आहात. दोन वर्षांपूर्वी एका विनोदी कथेला पारितोषिकही मिळालं होतं. विनोदाकडं वळण्याचं कारण रुचीपालट की सिनेम्यावर लिहून लिहून तयार झालेल्या आयत्या मिष्कील व तीक्ष्ण खोचक शैलीने विनोदी साहित्यात चांगल्या विनोदाची भर पडावी म्हणून? की पु. ल., जयवंत दळवी, रमेश मंत्री, बाळ गाडगीळ, गंगाधर गाडगीळ या मातब्बर विनोदी लेखकांची जिरवावी म्हणून?
- मला विनोद आवडतो. चार्ली चॅपलिनला संपूर्ण पाह्यलाखेरीज मरायचं नाही अशी मी प्रतिज्ञा केली होती. पण विनोद करणं विनोदी अभिनयाप्रमाणं कठीण असावं असं समजून मी विनोदापासून दूर राह्यलो. पण विनोदी लेखकांनी चांगला विनोद केला तर (मिडल क्लास बायकांवरचा नसावा) तो मला का आवडणार नाही? आचार्य अत्र्यांचे जोक्स नेहमी आमच्या गप्पांमध्ये असतात. अश्लील जोक्स तर अतिशयच आवडतात. मी ज्या घरामध्ये जन्माला आलो त्या घरामध्ये हसण्यावर बंदी होती. माझा मोठा भाऊ रामचंद्र याला हसताही येत नाही. या परिस्थितीत आयुष्य गेल्यामुळं कॉन्फीडन्स नव्हता. काही वर्षांपूर्वी मी इंदूरला गेलो होतो. बरोबर मल्लिका ढसाळ, नितीन दादरावाला, सतीश काळसेकर होते. त्या प्रवासात मला मल्लिका म्हणाली, "भाऊ तुम्ही वाट चुकलात. खरं तर तुम्ही विनोदी लेखक व्हायचं!" त्यानंतर मला सुभाष भेंडेसारख्या लेखकानं विनोदी लेखासाठी पुरस्कार दिला. त्या वेळी चकितच झालो. अलीकडं 'मुंबई सकाळ'नं लेखनाची मागणी केली, तेव्हा आपण करावेच काही विनोदी लिहिण्याचे प्रयत्न, म्हणून होकार दिला. बरोबर क्रिकेट-सिनेमाही चालू ठेवला. नाहीतर स्तंभ कोसळायचा.
 
'वासूनाक्या'सारखं पुस्तक लिहिल्यावर वाचकांच्या मनात तुमची एक विशिष्ट प्रतिमा निर्माण झालेली आहे. परंतु वास्तव जीवनात तुम्ही एक सभ्य, कौटुंबिक असल्याचं ऐकिवात येतं. म्हणजे तुमचं लेखन वास्तववादी की तुम्ही वास्तववादी? ही दाखवेगिरी का?
- 'वासूनाक्या'वरील आचार्य अत्र्यांच्या लेखात मला 'मवाली' म्हटलं व भटकळांनी बदनामीचा खटला करण्यास मला मदत करण्याचं आश्वासन दिलं. पण मला वाटलं, आचार्य अत्र्यांनी मला ही बेस्ट पदवी दिली. माझी वास्तव जीवनातील प्रतिमा का आली कुणास ठाऊक- मी घर उघड्यावर टाकलं नाही एवढ्यावरून-? बाकी सगळं केलं, (म्हणजे बाई, बाटली वगैरे!) मला वाटतं- माझा चष्मा, शोशन्नाचं सामाजिक कार्य आणि समाजवादी बॅकग्राउंड यामुळं ही गफलत झाली असावी. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, पण कॉलेज जीवनात काही मुलींनी मला खरोखरच 'मवाली' ठरवलं होतं!
***

वसंत सरवट्यांनी काढलेलं स्केच


भाऊ पाध्यांचं हे स्केच वसंत सरवटे ह्यांनी काढलेलं. जयवंत दळवी 'ठणठणपाळ' ह्या टोपण नावाने जे सदर 'ललित'मध्ये लिहायचे, त्यात भाऊंसंबंधीच्या मजकुराबरोबर हे स्केच प्रसिद्ध झालं होतं. 'ठणठणपाळ'मधली सदरं मॅजेस्टिक प्रकाशनाने पुस्तकरूपात काढलेयत.

Friday, September 24, 2010

१९६५ साली भाऊ

('ललित' मासिकाच्या 'स्वागत' या सदरात १९६५च्या मे महिन्यात प्रसिद्ध झालेला हा भाऊंचा मजकूर.)

नांव प्रभाकर नारायण पाध्ये. केव्हां तरी जो - तो मला 'भाऊ पाध्ये' म्हणूं लागला. तेंच नांव सुटसुटीत वाटलें म्हणून पुढें चालविलें. वय अडतीस. डोळ्याला चष्मा लागलाय, डोक्याची चांदी झाली आहे. शिक्षण बी. ए. - विषय अर्थशास्त्र.
कौटुंबिक जीवन : एकूण वैवाहिक जीवन वैतागाचें. पत्नी सौ. शोशन्ना पाध्ये (माजगांवकर). धर्माने बेने इस्त्राएल. संयुक्त समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्या. लेखक लोकांशी त्याच संबंध ठेवतात. त्यामुळें माझी त्यांच्या भुणभुणींतून सुटका होते. मुलें दोन- भाऊचा धक्का आणि वैतागवाडी.
आतां दै. 'नवशक्ती'मध्ये सहसंपादक. पूर्वी कारकून, मास्तर, कामगार कार्यकर्ता वगैरे उपद्व्याप झाले. खरे म्हणजे बेकार राहणेंच मला पसंत आहे.
प्रकाशित वाङ्मय : कादंब-या- डोंबा-याचा खेळ, करंटा, वैतागवाडी. अप्रकाशित- वासूनाका (कथासंग्रह). याशिवाय दोन कादंब-यांचे खर्डे आणि पॅगोडा आणि बेने इस्त्राएल समाजावरील कादंबरींचीं काहीं प्रकरणें लिहून तयार आहेत. मराठी साहित्यांत रोज भलीबुरी भर घातली जातेय, मीहि लिहितोंच आहें. त्यामुळें मराठी साहित्याची काय परिस्थिती होत असेल कोण जाणे! कसेंही असलें तरी मराठी साहित्याचे भलें किंवा बुरें घडत असता आपला हातभार हा लागला पाहिजेच.
राजकारणांत लुडबुड करण्याचा छंद. पूर्वी राजकारण सोडलें होतें, परंतु, डॉ. राममनोहर लोहिया या चक्रम माणसाच्या आकर्षणामुळे पुन्हा राजकारणांत पाऊल टाकलें. आतां हा असामी जोंपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत आपणहि राजकारणांत लुडबूड करत राहणार.
पी. टी. आय.चा टेलिप्रिंटर हा आवडता लेखक.
बीअर, टेबल-टेनिस आणि वहिदा रेहमान या आवडत्या गोष्टी. (दुर्दैवाने या तिन्ही गोष्टींपर्यंत माझा हात पोहोचूं शकणार नाहीं.) नावडत्या गोष्टी: जयप्रकाशांचे राजकारण, प्रा. गंगाधर गाडगीळ यांचे लिखाण आणि व्ही. शांताराम यांचे सिनेमे.
स्पर्धेस पुस्तक पाठविण्याच्या वेळी मी 'साधना'वाल्यांना  म्हणालों होतों कीं आपले तकदीर इतकें भिकार आहे की आपल्याला बक्षीस म्हणून कधीं मिळणारच नाहीं. परंतु, मार्च महिन्यांत कन्या राशीच्या भाग्यस्थानी गुरू आला होता. 'वैतागवाडी'ला बक्षीस हा बहुधा त्याचा परिणाम असावा. ठीक आहे. कपडे अगदींच फाटायला आले होते, तर नवे शिवतां येतील. परंतु म्हणून कांहीं जागेच्या प्रश्नाचा वैताग संपणार नाहीं. माझे कांही हितचिंतक म्हणतात कीं भावड्याला पुन्हा बक्षीस मिळतां कामा नये अशी तजवीज केली पाहिजे. त्यांना मी सुयश चिंतितो.

Thursday, September 23, 2010

दोन फोटो




भाऊंचे हे दोन भन्नाट
  फोटो  
'रुची'च्या एका अंकातले,
 देविदास बागूल  
यांनी काढलेले.
हा खालचा फोटो भाऊ 'नवशक्ति'च्या ऑफिसात बसलेले असतानाचा-

Sunday, August 29, 2010

'टीकास्वयंवर'मधला उतारा

- भालचंद्र नेमाडे

('टीकास्वयंवर' या 'साकेत प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या नेमाड्यांच्या पुस्तकातील 'मराठी कादंबरी' या प्रकरणातील हा भाऊंविषयीचा उतारा, नेमाड्यांच्या परवानगीने इथे.)

डोंबा-याचा खेळ (१९६०) आणि करंटा (१९६१) ह्या कामगार चळवळीच्या किचकट आशयापासून वणवा (१९७९) ह्या अत्याधुनिक उच्चवर्गीय जोडप्यांच्या अरण्यातल्या लैंगिक व्यवहारावर लिहिलेल्या कादंबरीपर्यंत आधुनिकतेचा विशाल आशय जिद्दीने, निर्व्याजपणे, कुठेही दांडी न मारता मांडणारे भाऊ पाध्ये ह्यांनी नव्या कादंबरीचा सर्वोत्त्कृष्ट आविष्कार केला. खुल्या संरचना मांडून नाना त-हेचे वास्तव आशय निवडून पाध्यांनी अभिरुचीचा नवा प्रांत निर्माण केला. त्यांची मुंबईची भाषाही त्यांच्या नव्या वास्तववादातूनच जन्मली. तिच्यात काव्यात्मकतेचा मागमूसही नसतो. 'पोट एकदम टायरसारखं गच्च झाल्यासारखं वाटलं मला.' (वैतागवाडी), 'गप्पा एमनी एम चाललेल्या', 'त्याचा आता सरकलाय त्या पोरीपायी' (वासूनाका)- अशा लोकांच्या वाक्प्रचारांनी ती निवेदन स्पष्ट करते. त्यांच्या कादंब-यांत नावापासून निवडीचे वास्तव द्रव्य सुरू होते. (धोपेश्वरकर, आझादचाचा, प्रियवंदा-मालविका-शर्मिष्ठा-आयव्ही-क्लारा, डाफ्या-मामू-धोश्या, इ. कोरेटा, फरी, इ. बॅम्फोर्ड-रोशन-नीलिमा इ.) पाध्ये हे मुळात समाजवादी नैतिकता असलेले गंभीर लेखक आहेत. (भुकेले आदिवासी जग विरुद्ध निव्वळ लैंगिक चाळे करणारी आधुनिक जोडपी- वणवा, स्त्रीमुक्ती- अग्रेसर, हिंदू जातीयता- वैतागवाडी, लग्नसंस्था, अनौरस संतती- बॅ. अनिरुद्ध धोपेश्वरकर, वालपाखाडी नीतिमत्ता, वेश्यांबद्दल आदर- वासूनाका, इ.). कुठल्याही अन्य मराठी साहित्यिकांपेक्षा पाध्यांच्या कादंबरीत मुंबईबद्दल मातृभूमीसदृश प्रेम आहे, मुंबईतल्या सर्व समाजांबद्दल पोटतिडिकेचं प्रेम आहे. मुंबईतल्या भूगोलाला जिवंत उठाव मिळालेले आहेत. ही माणुसकीची दृष्टी मराठीत साने गुरुजींनंतर कोणात दिसत नाही. पाध्यांचे कोणतेही पात्र फ्लॅशबॅक तंत्राचा उपयोग करत नाही की स्वप्नरंजनात शिरत नाही. त्यांच्या गद्यशैलीलाही ह्यामुळेच जाडेभरडे भक्कम पोत आहे. ह्यातूनच वासूनाक्यावरच्या मवाली बेकार मुलांपासून अत्याधुनिक स्त्री-पुरुषांपर्यंत सर्व प्रकार कादंबरीत येणे शक्य होते. वालपाखाडीपासून मलबारहिलपर्यंतचे नैतिक जीवनही व्यक्त होते. ("तुम्हाला दारू प्यायची असेल तर प्या. नका पिऊ. तो तुमचा प्रश्न आहे." "उन्हे उलटली म्हणजे आमची कंपनी वुलन पँट्स चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. दुसरा धंदाच नव्हता. क्रिकेटचे अंग नव्हते की आर. एस. एस. मध्ये जाऊन 'दहिने रुख बाए रुख' करायला आम्ही भट नव्हतो.") चांगले जुने झाडाझुडांचे घर सोडून आधुनिक वसाहतीत फ्लॅट घ्यायला लावणारी बायको बॅरिस्टर धोपेश्वरकरला तुच्छ वाटते. ह्या जबर नैतिकतेचा परिणाम म्हणून राडा ह्या शिवसेनेवरच्या कादंबरीची संपूर्ण आवृत्ती कोणालाच वाचायला मिळाली नाही अशी गडप केली गेली. लैंगिकता हे आशयसूत्र असलेल्या कादंब-यांतूनही पाध्ये नैतिक मूल्यविचारच मांडत असतात.

Wednesday, August 25, 2010

फुल्याफुल्यांच्या वादग्रस्त वाङ्मयाचा जनक

- चंद्रकान्त पाटील

भाऊ पाध्येवर पुन्हा एकदा लिहायची वेळ आली आहे. भाऊ पाध्ये नावाचा एक श्रेष्ठ साहित्यिक, पत्रकार, चित्रपट समीक्षक आणि नव्या विद्रोही लेखकांचा आवडता हीरो दहा-पंधरा दिवसांपासून बॉम्बे इस्पितळातल्या पाचव्या मजल्यावर पाचशे तेवीस क्रमांकाच्या खोलीत विकलांग अवस्थेत पडून आहे. ज्यानं आयुष्यभर मुंबईचं दर्शन आपल्या सगळ्या साहित्यांतून वाचकांना करून दिलं, मुंबईच्या सगळ्या ठसठसत्या नसांना अचूक पकडण्याच प्रयत्न केला त्या भाऊला मुम्बईची नैतिकता व्यक्त करायची होती. कन्नमवारपासून अधोगतीला लागलेल्या मुंबईला गँगवॉरपर्यंत येतायेता पक्षाघाताचा झटका वाढतच गेला, आणि तो आपल्या सगळ्या लेखनातून प्रभावीपणे मांडू पाहणा-या भाऊलाच अर्धांगवायूचा झटका आला ही दैवदुर्विलासाचीच बाब आहे! भाऊची वाचा गेली आहे. एरवीही भाऊनं आपल्या वाचेचा आयुष्यात फारच कमी उपयोग केला होता, पण त्याचे पाय विकलांग झाले हे वाईटच झालं. ज्या अफाट मुंबईत भाऊ वणवण भटकत लहानाचा मोठा झाला, ज्यानं आयुष्याची सगळी वर्षं मुंबईच्या राज्यरस्त्यांवरून ते गल्लीबोळापर्यंत भटकण्यात घालवली त्या भाऊचा एक पाय गेला ही वाईटच गोष्ट झाली! डॉक्टर म्हणतायत् भाऊ बरा होईल, आणि तो बोलू लागेल, हिंडू-फिरू लागेल, आणि तो बरा होणं आवश्यक आहे. आम्ही सगळे, ज्यांच्यावर भाऊचं ऋण आहे कधीही न फिटणारं, त्याच्या ब-या होण्याची वाट पाहात आहोत, पण नुस्तं बरं होणं फारसं उपयोगाचं नाही. भाऊला लिहिता आलं पाहिजे. लिहिण्यासाठी पुरेसं सामर्थ्य टिकवता आलं पाहिजे- आणि मला खात्री आहे की भाऊची जगण्यावरची विलक्षण श्रद्धा आणि धैर्य त्याला पुन्हा लिहितं करील. त्याला स्वतःला संपूर्ण समाधान होईल अशी एक महान कादंबरी भाऊच्या डोक्यात आहे, किती तरी वर्षांपासूनच. भाऊची अदम्य जीविताकांक्षा नक्कीच त्याला तारून नेईल, आणि तो कादंबरी लिहीलच! आम्ही तिची वाट पाहात आहोत.

भाऊ पाध्ये या अफलातून माणसाच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. फिल्म क्रिटिक म्हणून जगत असताना त्यानं मायावी मुम्बईचं दर्शनी रूप पाहिलं, इम्पोर्टेड गाड्यांमधून फिरत पंचतारांकित हॉटेलांचं स्वर्गसुखही पाहिलं, पण भाऊ खडतर व्रत घेतल्यासारखा फुटपाथवरचा माणूसच राहिला. हे सगळं त्याच्या आतल्या एका प्रखर नैतिकतेमुळेच शक्य झालं. भाऊनं आपली व्यक्तिगत नैतिकता आत जपून ठेवली. वादळातून जाताना दिवा जपत न्यावा तशी. प्रस्थापित समाजातली खोटी दांभिक दिखाऊ नैतिकता चव्हाट्यावर मांडताना भाऊनं पददलितांची आणि फुटपाथवरून चालत जाणा-या सर्वसामान्यांची बाजू ताणून धरली. हे करीत असताना भाऊला अनेक धक्के खावे लागले, पण त्यानं सहजपणे, कुठलीही कुरकुर न करता, कुठल्याही व्रणाशिवाय, जखमांशिवाय ते सहन केले. एका परीनं हे भाऊचे धक्केच पुढं येणार्यांयना संरक्षक ठरले. भाऊचं महत्त्व असं शॉक अ‍ॅब्सॉर्बर म्हणून नक्कीच वाङ्मयीन संस्कृतीत मोलाचं आहे. त्यातून जसं अस्सल साहित्यकारांना सुरक्षित राहता आलं तसं कुठलीही नैतिक भूमिका न घेता प्रायोगिकतेसाठी विषयवासना उगाळणार्यात चंद्रकांत खोतांसारखे आमचे नकली मित्रही सुरक्षितपणे तरून गेले. भाऊचं अख्खं साहित्यच मागच्या-पुढच्यांनी आणि समकालिनांनी रफ-नोट्ससारखं वापरलं आणि त्यावर ते गब्बरही झाले. गब्बर सिंग म्हणून गाजले. भाऊचं मात्र काहीच झालं नाही- काही होण्यासाठी म्हणून भाऊनं हा खटाटोप केलाच नव्हता. त्याच्यामागे एक तीव्रतर यातनामय संवेदना होती, एक सहवेदना होती, विशाल मानवी करूणा होती, करुणेशिवाय भाऊसारखं लिहूनच होत नाही हे आम्ही भाऊकडूनच शिकलो. भाऊच्या वाङ्मयानं अनेक वाद झाले, वादळं उठली, भाऊनं खरं तर मराठीत पहिल्यांदाच फुल्याफुल्यांचं वादग्रस्त वाङ्मय निर्माण केलं. पण अशी वाङ्मयीन वादळं आणि वाङ्मयीन वाद क्षणजीवी असतात. वादळं ओसरल्यावरही आणि विसरल्यावरही अस्सल वाङ्मय मागे उरतंच. भाऊचं वाङ्मय उरलंच आहे आणि म्हणूनच भाऊच्या जवळ बॉम्बे हॉस्पिटलातल्या खोलीत रात्रंदिवस अनेक नवे लेखक, सहकारी आणि आत्मीय लोक बसून असतात, आणि भाऊच्या पत्नीला, शोषण्णालाही आधार देत असतात. भाऊकडून मी परतलो तेव्हा माझ्या एका तरूण मित्रानं सांगितलं, ‘‘भाऊला नामदेव ढसाळनं बॉम्बे हॉस्पिटलात दाखल केलं, मी रोज एक फेरी टाकतो, मलिका- नामदेव- अशोक- सतीश- मन्या- सुधाकर- प्रदीप- मुळे- भाऊचा मुलगा- सून- शोषन्नाचे नातेवाईक असे कितीतरी लोक कायम तिथं असतात, पण आज पंधरा दिवस होऊन गेले, एकही समाजवादी भाऊकडे फिरकलासुद्धा नाही. भाऊचे सोडा, निदान शोषन्नामुळे तरी-’’ अर्थात मला याचं फारसं आश्चर्य वाटलं नाही. भाऊसोबतचे सर्व समाजवादी मला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माहित आहेत, पण माझ्या त्या तरुण मित्राला अजून बरंचसं माहित व्हायचं आहे, म्हणून त्यावर मी भाष्य केलं नाही. वस्तुस्थितीच अशी आहे की जे लोक गेल्या पंचवीस-तीस वर्षांत समाजवादाकडेसुद्धा फिरकले नाहीत ते भाऊकडे काय जाणार. समाजवादाचं हृदय असणं आणि समाजवादाचे सदरे घालणं यातला फरक आपण ओळखायलाच हवा. भाऊच्या वयाला साठ वर्षं पूर्ण झाली तेव्हा भाऊच्या मुंबईपासून दूर वेरूळच्या लेण्यांजवळच्या एका निवांत आर्ट गॅलरीत आम्ही पंचवीस-तीस मित्रांनी भाऊची साठी अत्यंत अनौपचारिकतेनं आणि आत्मीयतेनं साजरी केली होती. त्या कार्यक्रमाची चक्रमुद्रित पत्रिका भाऊच्या दारावर अजूनही चिकटवलेली आहे असं शोषन्ना मला सांगत होती. भाऊच्या असंख्य चाहत्यांना त्यावेळी बोलवता आलं नाही याची हळहळ आम्हाला आहे. भाऊ लवकर बरा होईल, तो पुन्हा लिहू लागेल, त्याच्या हातून त्याची महाकादंबरी पूर्ण होईल, आणि त्याच्या सत्तरीच्या वेळी आम्ही प्रचंड मोठा सोहळा करू अशी आम्हा सगळ्यांची तीव्रतर इच्छा आहे, एवढंच तूर्त.
***
('साकेत प्रकाशना'ने प्रकाशित केलेल्या 'विषयांतर' या चंद्रकान्त पाटीलांच्या पुस्तकात हा लेख आहे.)

Wednesday, July 28, 2010

भाऊंचं एक चित्र


३०. १०. १९९६

रेखाचित्रकार - मनोज आचार्य




(आरती साळुंके यांच्या संग्रहातून.)

Monday, July 26, 2010

एक स्केच

भाऊंचं हे स्केच राजा ढालेंनी काढलंय. 'ललित'च्या एका अंकात छापून आलं होतं.

Tuesday, July 20, 2010

अग्रलेख

- आचार्य प्रल्हाद केशव अत्रे

('वासूनाका' प्रसिद्ध झाल्यानंतर आचार्य अत्र्यांनी दै. मराठामध्ये पुस्तकावर टीका करणारा अग्रलेख लिहिला. ह्या गाजलेल्या आणि पुस्तकाला 'गाजवणाऱ्या' अग्रलेखातला इथे प्रसिद्ध होतोय तो मजकूर 'वासूनाका सांगोपांग' ह्या डिंपल पब्लिकेशनने प्रसिद्ध केलेल्या आणि वसंत शिरवाडकरांनी संपादित केलेल्या पुस्तकातून घेतला आहे, त्यात अग्रलेखाचं शीर्षक दिलेले नाही, त्यामुळे पोस्टला नुसतं 'अग्रलेख' असंच म्हटलंय.
मूळ अग्रलेखाबरोबर भाऊंचा एक फोटो छापला होता, तो इथे दिलेला नाहीये, त्यामुळे त्या फोटोच्या संदर्भात अग्रलेखाची सुरुवात आहे हे समजून घ्यावे.)

हा बाजूला ज्याच्या चित्राचा ठसा आम्ही छापलेला आहे ना, त्याचे नाव प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये. त्याच्या चेहेऱ्यावरून तो चांगलाच मवाली दिसतोय. ‘वासूनाका’ नावाचा एक कथासंग्रह लिहून ह्या इसमाने मराठी वाङ्मयात जी बीभत्स आणि गलिच्छ डाकूगिरी केलेली आहे, तिला तोड नाही. अशा तऱ्हेच्या हिडीस मवालगिरीला मराठी साहित्यात ‘रथचक्र’चे कर्ते श्री. ना. पेंडसे, ‘चक्र’ बनविणारे जयवंत दळवी, ‘माणूस’चे लेखक मनोहर तल्हार, ‘बाईविना बुवा’ बनलेले उद्धव शेळके आणि ‘कोसला’चे निर्माते भालचंद्र नेमाडे ह्यांनी यापूर्वीच सुरुवात केलेली आहे. तथापि ह्या हिडिस बीभत्सपणावर जर सर्वांत कोणी किळसवाणा कळस चढविला असेल, तर तो भाऊ पाध्ये ह्याच्या ‘वासूनाका’ने. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अमृताशी पैजा जिंकणारी आमची मराठी भाषा निर्माण केल्यानंतर गेल्या सात शतकांत ह्या मराठी भाषेत चांगले वाईट लिखाण करणारे पुष्कळ लेखक अन् कवी होऊन गेले. पण भाऊ पाध्ये ह्याच्यासारखा घाणेरडा कागदखराब्या ह्या महाराष्ट्रभूमीत आजपर्यंत कधई जन्माला आला नसेल. ह्याचा जन्म आपल्या मातेच्या कुशीत झालेला नसून, कोठल्या तरी बावनखणीच्या वा फोरास रोडच्या गटारात झाला असला पाहिजे, ह्याबद्दल आता आमच्या मनात तिळमात्र शंका नाही. संडासात आपली लेखणी बुडवून भाऊ पाध्याने जेव्हा हे भयानक ‘वासूनाका’ लिहिले, तेव्हा त्याची बोटे महारोगाने का झडली नाहीत किंवा त्याच्या मेंदूला कॅन्सर का झाला नाही, असे ते चोपडे वाचताना वाचकांना वाटू लागते. ‘वासूनाका’ लिहिणाऱ्या लेखकाला आई नसावी. बहीण नसावी. बायको नसावी किंवा मुलगी नसावी असे वाटते. कारण, असे जवळच्या जिव्हाळ्याचे कोणी नातेवाईक त्याला जर असते, तर धंदेवाईक वेश्यांच्या दुकानांतसुद्धा जी भाषा त्यांच्या गिऱ्हाईकांना उच्चारण्याचे कधी धाडस होणार नाही, असा गटारबोलीत ‘वासूनाका’ लिहिण्याचे धैर्य ह्या भाऊ पाध्याला कदापि झाले नसते. आम्हाला गंमत वाटते ती ही, की हा भाऊ पाध्ये पूर्वी साधारण बऱ्यापैकी लेखक होता. त्याने आमच्याकडेही पूर्वी थोडेसे लेखन केलेले आहे. आम्ही त्याला कधी पाहिले नसले किंवा त्याची व्यक्तिगत अशी काहीही माहिती आम्हाला जरी नसली, तरी आम्हाला परिचित असलेल्या त्याच्या पत्नीला तिच्या पहिल्या बाळंतपणासाठी आम्ही स्वतः दीडशे रुपयांची मदत केलेली आहे. तोच भाऊ पाध्ये कालांतराने ज्ञानेश्वराच्या अमृतमधुर मराठी भाषेत मांजराचे मूत्र आणि कुत्र्याची विष्ठा कालवील असा त्यावेळी आम्हाला सुतराम् देखील संशय आला नाही. ‘वासूनाका’ ह्या चोपड्याच्या अस्तित्वाची आम्हाला कालपरवापर्यंत जाणीवदेखील नव्हती. पण ‘राजश्री’ मासिकाने त्या चोपड्यातील गलिच्छपणा आपल्या एका अंकात उघडकीस आणल्यानंतर, त्याकडे आमचे लक्ष वेधले. तेव्हा ताबडतोब आम्ही ‘वासूनाका’ मागवून तासाभरात घाईघाईने ते वाचून टाकले. ते वाचून आमच्या सर्वांगाचा भडका उडाला. आमच्या निकटच्या मित्रमंडळींना त्यातले काही उतारे जेव्हा आम्ही वाचून दाखविले, तेव्हा ते तर हतबुद्ध झाले. ते उद्गारले, ‘अशा तऱ्हेचे गलिच्छ पुस्तक मराठी भाषेत प्रसिद्ध कसे होऊ शकते?’ आम्ही त्यांना सांगितले की, ‘अहो, भाऊ पाध्यासारख्या फोरास रोडवरच्या एखाद्या भडव्याने मराठी भाषेत काय वाटेल तो मात्रागमनीपणा केला असेल. पण ते बेवारशी पाप मुंबईच्या ‘पॉप्युलर प्रकाशन’सारख्या नामवंत आणि प्रतिष्ठित प्रकाशनकाने आपल्या अंगाखांद्यावर खेळवून लोकांच्या हाती ठेवण्याचा बेजबाबदार पागलपणा काय म्हणून करावा? भरबाजारात देहविक्रिय करणाऱ्या धंदेवाईक वेश्येला कुटुंबवत्सल गृहस्थाने आपल्या घरात हळदीकुंकवाला वा सत्यनारायणाला काय म्हणून बोलवावे? आमचे वाचक आम्हांला विचारतील की तुम्ही ‘वासूनाका’ हे चोपडे हिडीस आहे, गलिच्छ आहे, बीभत्स आहे, असे घसा खरडून आतापर्यंत या अग्रलेखात जे सांगितलेत, त्याचा एखादा काही तरी पुरावा द्या की! तर त्याबाबत आम्हाला एवढेच सांगावयाचे आहे की ह्या ‘वासूनाक्या’तला काही बीभत्स भाग इतका हिडीस आणि गलिच्छ आहे की त्याचा सामान्य नामनिर्देश देशील करणे आम्हाला शक्य नाही. स्त्री जातीच्या शरीराच्या सर्व अंगोपांगाची आणि तिच्याशी होणाऱ्या पुरुषसंबंधांची साद्यंत वर्णने कधी एखाद्या शब्दात, एखाद्या वाक्यात वा टप्प्यात पुनःपुन्हा मिटक्या मारीत ह्या भाऊ पाध्याने केलेली आहेत. आई आणि बहीण ह्यांच्या संदर्भातल्या हिडीस शिव्यांची तर समग्र पुस्तकात खैरात केलेली आहे. ‘भ्यांचोद’, ‘मादरचोद’, आणि ‘च्यायला’ ह्या शिव्या वाक्या वाक्यागणिक लेखकाने उधळलेल्या आहेत. ‘भ्यांचोद’ ही शिवी तर आम्ही ह्या पुस्तकात दीडशे वेळा मोजली. अन् ‘च्यायला’ सव्वाशे वेळा. ‘ती मुलगी बारा ** ची आहे’, ‘तिचा ** फारच भरलेला किंवा टरारला होता’, (फुल्या आमच्या). असली या चोपड्यातली महाबीभत्स शिमगा वाक्ये वाचताना वाचकांच्या माना शरमेने खाली मोडून पडतील आणि त्यांच्या मनात असाही विचार येऊन जाईल की ती वाक्ये भाऊ पाध्येच्या कुटुंबातील स्त्रियांच्या संदर्भाने कोणी तरी वापरावीत. हे चोपडे वाचून आमच्या सर्वांगाचा असा काही भटका उडाला की, ‘केशवसुतांच्या जन्मोत्सव सभे’त बोलताना ह्या भाऊ पाध्याला जोड्याने मारावयाला पाहिजे, असे आम्ही संतापाने म्हणालो. तेव्हा भाऊ पाध्येचे काही पाठीराखे त्याच्या मदतीला मोठ्या हिरीरीने धावून आले हे पाहून आम्हांला खरोखरच त्यांची कीव आली. भाऊ पाध्यांचे हे समर्थक काही सामान्य साहित्यिक नाहीत. मराठी साहित्यात ज्यांनी नावलौकिक आणि प्रतिष्ठा मिळवलेली आहे असे ते वजनदार आणि जबाबदार लोक आहेत. त्यांची नावेच सांगितली तरी पुरे. दुर्गा भागवत, विजय तेंडुलकर आणि वसंत शिरवाडकर, ह्यांनी अनुक्रमे ‘अभिरुची’, ‘महाराष्ट्र टाईम्स’ आणि ‘वीणा’ ह्या नियतकालिकांत हा हिडीस ‘वासूनाका’ अक्षरशः डोक्यावर घेऊन नाचविलेला आहे. दुर्गा भागवत ह्या तर मराठी भाषेतल्या नामांकित लेखिका आहेत. अभिजात आणि शैलीदार लेखन करण्यात त्यांचा हात धरणारे मराठीत फारच थोडे लेखक किंवा लेखिका सापडतील. असे असून त्यांनी ‘वासूनाका’ची विष्ठा चिवडून चिवडून त्यातून एक ‘गंधर्वसृष्टी’ शोधून काढली आहे. ‘वासूनाक्या’तल्या सर्व कथा पोरवयातच बिघडलेल्या माणसांच्या अतृप्त लैंगिक वासनेच्या आहेत. वासनेच्या भुकेचे बळी आहेत सारे. ते लोक उंडगे म्हणजे मनाचे दुबळे आहेत. ते दारूडे, व्यसनी व बीभत्स चलनी भाषा बोलणारे आणि लोकांची टिर्रेबाजी करणारे आहेत, असे कबूल करूनही दुर्गाबाईंनी, ह्या गुंडांच्या मनात स्त्रीच्या पातिव्रत्याबद्दल फार मोठा आदर असून ‘तरुण, सौंदर्य, चारित्र्य व प्रेमळपणा या चार गुणांचा साज ह्या मवाल्यांनी आपल्याला मनातून पूज्य वाटणाऱ्या स्त्रीच्याभोवती चढविलेला आहे’, असा अजब शोध लावलेला आहे. वस्तुतः कोणीही सभ्य आणि सुसंस्कृत स्त्री हे ‘वासूनाका’ चोपडे हातातसुद्धा धरणार नाही. पण ज्याअर्थी गटाराच्या घाणीत कोपरापर्यंत हात बुडवून दुर्गाबाई तो आपल्या नाकाजवळ नेऊन हुंगीत आहेत आणि हाताला गुलाबाचा वास येत असल्याचे त्या सोंग करीत आहेत, त्या अर्थी स्वरूपाच्या अभावामुळे दीर्घकालीन अविवाहित स्थितीत राहाणे आजपर्यंत त्यांना भागच पडल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या मनात भलभलते अविचार सध्या येत असावेत आणि त्यामुळे त्यांच्या बुद्धीचा, भावनेचा आणि अभिरुचीचा तोल ढळला असावा, असा तर्क करणे क्रमप्राप्त आहे. दुर्गाबाईंपेक्षा अधिक पोटतिडकीने तेंडुलकर ह्यांनी ‘वासूनाक्या’चे समर्थन केले आहे. त्यांनी वासूनाक्यातील काही नमुनेच आपल्या समालोचनात दिले आहेत. त्यातले काही नमुने येथे देण्यासारखे आहेत. १) ‘उन्हे उतरली म्हणजे आमची ‘कंपनी’ वुलन पँटस् चढवून वासूनाक्यावर ‘भंकसगिरी’ करायला जमत होती. आम्हाला च्यायला मधुबालेसारखी ‘पणती’ पकडणे शक्य आहे का?’ २) ‘परवा संक्रांतीची गोष्ट. सकाळी तिचा भाऊ तिळगूळ घेऊन आला. त्याने मला चिठ्ठी दिली. भ्यांचोद काय काय लिहिलं होतं त्यांत! काय म्हणे ‘मला फक्त तुम्ही हवेत. दुसरे कोणी नको! भ्यांचोद काय ती बडबडते!’ ३) ‘साला हिच्याबरोबर दोन घंटे टाईमपास होतो आहे ना! ही सगळी हिरव्या नोटेची पावर!’
हे तीन उतारे वाचले म्हणजे ‘वासूनाक्या’मधील गुंडांना ‘स्त्रीच्या इज्जतीबद्दल’ विलक्षण आदर वाटतो आणि त्यामुळे ह्या सर्व वर्णनात ‘हृदयस्पर्शी उद्विग्नता वाटते’ असा शोध लावणाऱ्या विजय तेंडुलकरांचे डोके ठाणे येरवड्याच्या तज्ज्ञ डॉक्टरकरडून तपासून घ्यावे असेच वाटल्यावाचून राहणार नाही. वसंत शिरवाडकरांनी त्याच्यापुढे जाऊन ‘वासूनाक्या’तील गलिच्छ भाषेचे आणि अश्लीलतेचे बेशरमपणे समर्थन केले आहे. ते म्हणतात, ‘‘बकाल जीवनाचे प्रत्यंतर घडविण्यासाठी लेखकाने जर पांढरपेशी सुसंस्कृत भाषेचे माध्यम वापरले असते, तर त्याच्या आशयाचा अस्सलपणाच तो हरवून बसला असता. या बकाल बोलीत अर्वाच्यता भरपूर असली तरी तिचेही एक सामर्थ्य आहे. ‘वासूनाक्या’वरील बकाल जीवन (जे लेखकाने चितारले आहे) ते खरे आहे. आणि ते खरे असल्याचे तुम्हाला शंभर टक्के जाणवावे म्हणून लेखकाने ते तेथील चालू बोलीतून तुम्हाला सांगितलेले आहे. त्याची ही सत्यता हेच त्याचे समर्थन आणि तेच त्याचे आव्हान. वासूनाक्यात आचरट किंवा अश्लिल काही नाही. त्यात जे बीभत्स दिसते, ते काही लेखकाच्या डोक्यातले नाही. ते त्याच्या वर्ण्य विषय असलेल्या जीवना आहे. ‘त्या जीवनात तसे असेल, आम्हाला त्याच्याशी काही कर्तव्य नाही, आम्हाला ते पहावयाचेही नाही’ असा विश्वामित्री आविर्भाव ज्यांचा असेल त्यांच्याशी या मुद्द्याबाबत वाद घालणे व्यर्थच आहे!’’ वाङ्मय म्हणजे काय, वाङ्मयात भाषेचे स्थान काय किंवा वाङ्मयातील वास्तववादाचे स्वरूप आणि व्याप्ती काय असावी, ह्याची सुतराम माहिती नसलेल्या वसंत शिरवाडकरासारख्या एका मूर्ख, अडाणी आणि वेडगळ माणसाशी काय वाद घालावा?
‘फायनॅन्शल एक्सप्रेस’मधे ‘जे-वॉकर’ ह्या नावाने (कोणी आम्हांला सांगितले की ‘अडाणेश्वर’ नावाचे मराठी लेखकच आहेत.) एका लेखकाने व्यक्तिशः आमच्याविरुद्ध हंबरडा फोडला आहे, की ‘भाऊ पाध्येसारख्या ‘युगप्रवर्तक’ (Epochmaking) कादंबरीकाराविरुद्ध लोकमत प्रक्षुब्ध करून आणि सरकारी कायद्याला चिथावून अत्रे हे त्यांचा निष्कारण बळी घेण्याच्या प्रयत्नात आहेत!’ म्हणून त्यांचे लोकांना असे आवाहन आहे की, त्यांनी ‘वासूनाक्या’कडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने पाहावे आणि सरकारला त्यांचे असे सांगणे आहे, की ‘त्याने ‘वासूनाक्या’वर जर काही कारवाई केली तर ती अन्याय्य आणि अविचाराची होईल.’ वासूनाक्याकडे ‘कलात्मक आणि वाङ्मयीन’ दृष्टीने कसे पाहावयाचे ते फक्त ह्या ‘अडाणेश्वरां’नाच माहीत! मग शौचकूपाकडे कलात्मक आणि वाङ्मयीन दृष्टीने का पाहू नये बरे?  ह्या गचिच्छ चोपड्यावर कायदेशीर कारवाई महाराष्ट्र सरकार काय करील ते काही आम्हाला माहीत नाही. कारण, सरकारच्या वाङ्मयीन सल्लागार मंडळींत दुर्गा भागवत किंवा ‘अडाणेश्वर’ ह्यांचेच भाऊबंद घुसलेले आहेत. म्हणूनच गलिच्छ चोपड्यांना महाराष्ट्र सरकार सालोसाल पारितोषिके देते. झोपडपट्टींतल्या किंवा खालच्या थरांतल्या लोकांच्या जीवनाचे वास्तववादी वर्णन करण्याचा आव आणून लैंगिक महारोगाने सडलेले बरेचसे मराठी लेखक आजकाल अत्यंत बीभत्स आणि हिडीस लिखाण करून मराठी भाषेत नि साहित्यांत अक्षरशः मूत्र आणि विष्ठा कालवीत आहेत. अशा त्या लिखाणाचा बहुसंख्य सभ्य आणि सुसंस्कृत मराठी जनतेने शक्य त्या उपायांनी नायनाट करावा हाच इशारा तिला आम्ही देतो.
***
(दै. मराठा, अग्रलेख, दि. २४ एप्रिल १९६६)

Monday, July 19, 2010

'वासूनाक्या'बद्दल

- विजय तेंडुलकर

('वासूनाका' प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू झालेल्या वादादरम्यान तेंडुलकरांनी 'वासूनाका'बद्दल 'महाराष्ट्र टाईम्स'मध्ये लिहिलेला हा लेख. 'वासूनाका सांगोपांग' ह्या डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या आणि वसंत शिरवाडकरांनी संपादित केलेल्या पुस्तकातून हा मजकूर घेतला आहे. तिथे ह्या लेखाचं शीर्षक दिलेलं नाही, म्हणून नुसतं ''वासूनाक्या'बद्दल' असं म्हणून ठेवलंय.)

१९६१च्या एका वाङ्मयीन आणि नव्याच दिवाळी अंकात ‘धमाल’ नावाची एक कथा प्रसिद्ध झाली; आणि साहित्यात रस घेणाऱ्या, साहित्याविषयी आस्था असणाऱ्या अनेकांना तिने धक्का दिला, सुन्न केले आणि मग विचार करायला लावले.
या कथेने धक्का दिला तो तिच्या विषयापेक्षा तिच्या शैलीने. नेहमीहून पार वेगळ्या, विक्षिप्त आणि सद्भिरुचीच्या रूढ व्याख्येला पूर्णतया सोडून अशा या ‘त्रेपन्न टिकल्यां’च्या भाषेने मी मी म्हणणाऱ्या वाचकांना गोंधळवून टाकले. अनेक चुकीचे, अशुद्ध इंग्रजी वाक्प्रचार, पूर्णतया अपरिचित असे सूचक मराठी शब्द, शब्दप्रयोग आणि काही वेळा सरळ सरळ गचिच्छ शब्द आणि वाक्ये, यांनी भरलेल्या या भाषेचे त्या आधीच्या कोणत्याही ललितकृतीतल्या कोणत्याही भाषाशैलीशी नखाएवढेही साम्य नव्हते.
ही भाषा आली होती ‘वासूनाक्या’वरून. ‘वासूनाके’ मुंबईमध्ये जागोजाग होते. त्यावरचे डाफ्या, पोक्या, मामू येताजाता सभ्य आणि सुसंस्कृत मराठी वाचकाने ऐकले-बघितलेही असतील. परंतु ही मनस्वी संकोच आणणारी भाषाशैली आणि ही माणसे वाङ्मयाच्या प्रतिष्ठित पीठावर ‘धमाल’च्या निमित्ताने प्रथमच येऊन बसत होती.
एवढ्या एका कथेपुरतेच हे थांबेल अशी अपेक्षाही खोटी ठरली आणि पुढल्याच वर्षीच्या आणखी एका दिवाळी अंकात याच लेखकाची, अशाच विषयावरची, वासूनाक्याच्याच विलक्षण विश्वातली आणि तशाच चमत्कारिक, असभ्य परंतु अत्यंत बोलक्या शैलीतली ‘इष्क’ ही कथा प्रसिद्ध झाली आणि हा ‘वासूनाका’ एखाददुसऱ्या गोष्टीपुरता मराठी वाङ्मयात फिरकण्यासाठी आला नसून याचे ‘आक्रमण’ अधिक टिकाऊ आहे हे जागरूक जाणकारांच्या ध्यानी आले; आणि मराठी वाङ्मयात येऊ घातलेल्या या नव्या प्रवाहाची इष्टानिष्टता, त्याचे कलात्मक मूल्यमापन ते मनाशी ठरवू लागले. या प्रवाहाची अपरिहार्यता तर गृहीतच होती.
‘वासूनाका’ हे भाऊ पाध्यांचे नवे पुस्तक त्या पहिल्या-वहिल्या दोन कथांची अपरिहार्य परिणती म्हटली पाहिजे. एकाच विषयावरच्या, एकाच जगाशी निगडित, त्याच त्या प्रमुख व्यक्तिरेखांतून उलगडणाऱ्या, एकाच शैलीच्या या अनेक कथा आहेत. या सामायिक भागांमुळे त्यांना कादंबरीसदृश स्वरूपही आले आहे. कादंबरीला लागते ते सलग, पूर्वनियोजित उलगडते कथानक यांना नाही, एवढेच.
या कथांतल्या ‘वासूनाका’नामक जगाविषयी तेथल्याच भाषेत सांगायचे म्हणजेः
‘उन्हे उतरली म्हणजे आमची ‘कंपनी’ वुलन पँटस् चढवून वासूनाक्यावर भंकसगिरी करायला जमत होती. दुसरा धंदाच नव्हता. क्रिकेटचे अंग नव्हते की आर.एस.एस.मध्ये जाऊन ‘दहिने रुख-बाए रुख’ करायला आम्ही भट नव्हतो. एस्.एस्.सीच्या कोचिंग क्लासेसमध्ये हल्ली पोरी फार येतात. त्यांच्यावर पत मारावी, तर आमच्य कंपनीमध्ये एक मी सोडून; दुसऱ्या कोणाचेही हात एस.एस.सी.ला पोहोचले नव्हते. शिकणे जमतच असे कोणाला! शिकून तरी काय उपयोग? माणूस नोकरीच करतो आणि वुलन पँटस् शिवतो. आमच्या बापांनी आम्हाला वुलन पँटस् शिवून ठेवल्याच आहेत. आम्हाला, च्यायला मधुबालेसारखी ‘पणती’ पकडणे शक्य आहे का? खरंच, च्यायला ‘हायवे 301’ सारखा एक दणदणीत दरोडा टाकला तरच आमच्या आयुष्याचे कल्याण होईल. जाना दो. तूर्त भंकसगिरी करूनच वालपाखडीमधल्या कोणल्याही ‘दिवटी’चा आसरा झाला तरी भले.’
यावरून हे लक्षात येईल की कोणतेही रूढ अर्थाने उच्च, उदात्त, सात्विक अथवा साधे सुसंस्कृत देखील एखादे उद्दिष्ट आयुष्याला नसलेली ही तरुण मुले आहेत. यांचे जगणे हेतूहिन आहे, मने मूलतः निकोप असली तरी रिकामी आहेत आणि आदर्श आजच्या (खरे म्हणजे तशा कालच्याच) ‘मधुबाला’ आणि ‘हायवे 301’ संस्कृतीने पुरवलेले आहेत. वुलन पँटस् आणि ‘भंकसगिरी’ हा यांची यांच्याच मते दोन मोठी वैशिष्ट्ये आहेत. यातल्या अनेकांचे लग्न झाले आहे. ‘आम्ही पण रंडीबाज असलो तरी आमच्या घरातल्या बायकोची इज्जत करत असतो’. . . असे ते सांगतात. कुणाकुणाला सहासहा मुले झालेली आहेत. ‘आता कशात काही राम नाही राहिला या कलीमध्ये’ असे म्हणणारी म्हातारी आई कुणाकुणाला आहे. यातील कुणाचा रोजगार इलेक्ट्रिक मेकॅनिकसारखा रीतसर आहे; तर कोणी सट्टा-बेटिंगवर पैसे करून ‘पोरी फिरवतो’. चोरटी दारू गाळण्याचाही अनुभव या तरुण मुलांना आहे. परंतु या सर्वांचा मिळून मुख्य उद्योग एकच – भंकसगिरी. आपल्या विषयीच्या लौकिक समजाची कल्पना यांना आहे. एके ठिकाणी यातला एक म्हणतो, ‘अरे, पोरीनं इज्जत घेतली, त्यात काय एवढं मरायचं?. . . आपला धर्मच आहे! दुनियेनं आपली इज्जत केव्हाच केली आहे! सगळी वालपाखडी आपल्याला ‘ओवाळून टाकलेली’ मानते!’ ‘इज्जत’ जाणे आणि घालवणे हा त्यांना ‘धर्म’ वाटतो.
तसे पाहिले तर ‘इज्जत’ (ऑनर) या गोष्टीची चाड अशी ना तशी या तरुणांच्या बोलण्यातून या पुस्तकात पानोपानी व्यक्त होते. आणि तिला एक प्रांजळपणा आहे. मनःपूर्वकता आहे. बायकोची इज्जत, कोणातरी ‘सू’ची इज्जत, पापामियाच्या चाळीतल्या पोरींची इज्जत, ‘बायजी’ची इज्जत अशी भोवतालच्या अनेकांची इज्जत हा त्यांचा चिंतेचा आणि चर्चेचा एक महत्त्वाचा विषय आहे. कोणी इज्जतीला न जागणे हे त्यांना भयंकर पापकर्म वाटते, अक्षम्य गुन्हा वाटतो. याने ते उद्विग्न आणि संतप्त होतात. अनेकदा आपला रिकामटेकडेपणा झुगारून कृतीला प्रवृत्त होतात; ‘इज्जत’ शिकवू जातात. या संदर्भात आपली गेलेली आणि जाणारी इज्जत हा त्यांचा ‘धर्म’ वाटतो. त्याहीपेक्षा ती त्यांची एक फार मोठी खंत वाटते. या गोष्टीपुढे स्वतःपुरते ते असह्य, हतबल दिसतात आणि एक प्रकारे याचीच तीव्र प्रतिक्रिया म्हणून इतरांच्या इज्जतीची काळजी ते पोटतिडकीने वहातात.
यातही एक विलक्षण गोष्ट घडत असते. कोणाकोणाची इज्जत सांभाळू जाताना सुक्तसूक्त विचार त्यांना रहात नाही, सार्वजनिक आणि खासगी यातल्या मर्यादा ते धर्मयोद्ध्याच्या तडफेने पाहाता पाहाता ओलांडतात. प्रसंगी हिंस्रदेखील बनतात. परंतु एवढे सगळे इतक्या हिरीरीने केल्यावर शेवटी त्यांना आढळते ते हे की, इज्जत कुणालाच आणि कुठेच नाही! सगळा एकजात बेइज्जतीचा, बनावट, नकली, ढोंगी, खोटा सोयिस्कर मामला आहे! सगळीच ‘भंकस’ आहे! उदाहरणार्थ, जिच्या इज्जतीची वासूनाक्यावरच्या पोक्याला फार चाड, आणि जिला बश्याने तिच्या लग्नात पन्नास रुपयाची साडी सदिच्छांसह दिली, तिच्याविषयी हा बश्याचा नंतरचा अनुभव पाहाः ‘परवा संक्रातीची गोष्ट. सकाळी तिचा भाऊ तिळगुळ घेऊन आला. त्याने मला चिठी दिली. भ्यांचोद काय काय लिहिलं होतं त्यात ते वाचायला कोणीतरी प्रोफेसरच आणायला पाहिजे. काय म्हणे ‘मला फक्त तुम्ही हवेत; दुसरं कोणी नको!’ भ्यांचोद ती काय बडबडते ते मला काय समजत नाही. . .’
तशाच प्रकारचा हा आणखी एक अनुभवः ‘इतक्यात मागल्या दारावर टकटक. तशाच ओल्या अंगाने दार उघडले. पाहतो तो ककी- हातात आमंत्रणपत्रिका. मी तिला आत घेतले आणि लग्नाबद्दल तिचे काँग्रॅच्युलेशन्स केले. ती काही बोलली नाही. इतक्यात तिने दार लोटले आणि मला घट्ट आवळून धरले. म्हणते काय माहीत आहे, ‘पोक्या. . . पोक्या तुझ्यापासून मला मूल व्हावे अशी इच्छा आहे माझी! करशील ना रे पुरी?’
पोक्या यापुढे सांगतो, ‘बंद केलेल्या दाराकडे पहात मी मनातल्या मनात म्हणालो, च्यायला!’
बश्याची अशाच अनुभवाविषयीची प्रतिक्रिया काहीशी वेगळी आहे. तो म्हणतो, ‘साला हिच्याबरोबर दोन घंटे टाइमपास होतो आहे ना! . . . ही सगळी हिरव्या नोटेची पावर आहे.’
‘इज्जती’च्या नावानं जिथे तिथे दिसणाऱ्या अशा खोटेपणावर, विपरीत प्रकारांवर, हलक्या वागणुकीवर या तरुण मुलांच्या मनात एक तर स्तिमित गोंधळलेपणा आहे किंवा एखादा त्यांच्या मते नेमका निष्कर्ष आहेः हिरव्या नोटेची पावर!
ही प्रसंगी हिंस्र आहेत. असभ्य आहेत, गचिच्छ आहेत, दिशाहिन जगणारी आहेत, परंतु मुर्दाड नाहीत. ‘फिरकी कथेत ‘बायजी’चा ‘रावजी’ अपघातात वारल्याचे धक्कादायक वर्तमान कळल्यावर या मुलांच्यात घडते ते संभाषण भावनेने विलक्षण थबथबलेले आहे; किंबहुना भावविशच आहे. त्यांच्या मनातून काहीतरी ‘उफाळून’ येते, डोळे ‘भिजतात’, मन ‘गहिवरते’, ‘आपली वासूनाक्यावरची कंपनीच हलकट!’ असे चिडीने मनात येते. ही तरुण मुले वासूनाक्यावर दरसाल सत्यनारायण घालतात, डोंगरीच्या विद्याधर बाबाकडेही यातला कोणी कोणा जाऊन ‘पश्चाताप’ करतो.
परंतु विद्याधर बाबा, बायजी, सू, बकुळा, केशरवडी, भानू, ऍडव्होकेट पंडित आणि त्याचे घरंदाज कुटुंब, अशा सर्वांच्या बाबतीत या तरुण मुलांचा अनुभव एकच एक आहे. त्याचे नकलीपण, खोटेपण, ढोंग, भंकस! सगळ्या चांगल्या गोष्टींची अर्थहीनता आणि तकलादूपण! आणि यातली सफाई!
याने ती गोंधळतात, मनापासून उबगता. क्वचित संतापतात. हा संताप, उबग मग निघतो त्यांच्यामागून त्यांच्याच वळणाने येणाऱ्या पोरांच्या बाबतीत.
पोक्या म्हणतो, ‘या वयात या पोरांची ही लाइन म्हणजे ही पोरं पुढे काय करणार हे दिसत होतं. या पोरांना खानदानीत नोकरी धंदा करायचा नाही, लाइनशीर राहायचं नाही, लोफर व्हायचं आहे आणि एक दिवस व्हॅगॉबॉण्ड नाहीतर रोडसाइड रोमिओ म्हणून लॉकपमध्ये जाऊन इज्जतीचं खोबरं करून घ्यायचं हे. . .’
ही उद्विग्नता दिखाऊ नव्हे, ही काळजापासूनची आहे, उत्स्फूर्त आहे. ही बाळगणारांच्या स्वतःच्या आयुष्याचे खोबरे पार्श्वभूमीवर असल्याने ही क्षणभर हास्योत्पादक ठरली तरी त्याहून ती हृदयस्पर्शी आहे, अस्वस्थ करणारी आहे.
इज्जत नावाच्या गोष्टीमागचा खोटेपणा, नकलीपणा, दांभिकता, मुलायम सफाई हा या कथांतून सातत्याने व्यक्त होणारा विषय कितपत खरा, व्यापक आणि महत्त्वाचा आहे हे ज्याने त्याने स्वतःपुरते ठरवायचे आहे. यापोटचा उबग, चीड यांचा वांझपणा आणि एकूणच सगळ्या जीवनाची अर्थहीनता प्रत्येकाने स्वतःशी पडताळून पाहाण्याची बाब आहे. या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थोड्याफार फरकाने असले ‘वासूनाके’ आज अस्तित्वात आहेत हे मात्र एक निर्विवाद सत्य आहे आणि त्यांचे कमालीचे स्पष्ट, निरर्गल, उबगवाणे तरीही हृद्य दर्शन भाऊ पाध्यांनी त्यांच्या पुस्तकात घडवले आहे.
कलात्मकतेत या कथांत डावे-उजवे करता येईल; परंतु त्यामागची हृद्यता उपेक्षून केवळ निरर्गलतेकडे पाहाणे मात्र भाऊ पाध्यांना, या कथांना आणि एकूण वाङ्मयनिर्मितीच्या उद्देशालाच अन्यायाचे तसेच हानिकारक ठरणार आहे.
***
(महाराष्ट्र टाईम्स, ३ मार्च १९६६)